भारत, अमेरिका आणि पाकिस्तान या त्रिकोणात भारत नेहमीच एका कोपऱ्यात का पडलेला असतो यात कसलेही कोडे नाही. तरीही अमेरिकेने पाकिस्तानला आठ एफ-१६ लढाऊ विमाने तसेच रडार आणि तत्संबंधीची इलेक्ट्रॉनिक सामग्री देण्याचे गेल्याच आठवडय़ात जाहीर केल्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या वर्षीचा अमेरिका दौरा, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांच्या मैत्रीचे किस्से, ओबामा यांच्या निवासस्थानी साजरी झालेली दिवाळी अशा पाश्र्वभूमीवर, म्हणजे भारताचे अमेरिकेबरोबर एवढे घट्ट मैत्रीचे संबंध असतानाही तो देश भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानच्या गळ्यात गळे का घालतो असा हा प्रश्न आहे. तो अर्थातच भाबडा आहे. त्याहून अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाकिस्तानशी मैत्री ठेवण्यासारखे त्या देशाकडे असे काय आहे की त्याच्या सगळ्या आगळिकींकडे अमेरिकेने दुर्लक्ष करावे? अमेरिकेने पाकला एफ-१६ विकण्यासंबंधीची घोषणा केल्यानंतर त्याबाबत भारताने तातडीने अधिकृतरीत्या नाराजी व्यक्त केली आहे. साठच्या दशकात अमेरिकेने पाकिस्तानला लष्करी साह्य़ केले तेव्हाही भारताने त्यास तीव्र आक्षेप घेतला होता. पण तेव्हा अमेरिकेला पाकिस्तान आपल्या गटात हवा होता तो कम्युनिस्टांच्या, सोव्हिएत रशियाच्या विरोधात. ऐंशीच्या दशकात अमेरिकेने मदत केली तेव्हा तर अफगाणिस्तानवरील रशियाचे आक्रमण हे मोठेच कारण होते. शिवाय पाकला अशी मदत केली म्हणजे ते राष्ट्र अण्वस्त्रांच्या नादी लागणार नाही, असा तेव्हाचा अमेरिकी प्रशासनाचा युक्तिवाद होता. त्यानंतर अशीच मोठी मदत अमेरिकेने केली ती नऊ-अकराच्या हल्ल्यानंतर. तेव्हा पाकिस्तान अमेरिकेच्या दहशतवादविरोधी जागतिक लढय़ाचा भाग होता आणि आताही नेमके तेच कारण पुढे करून अमेरिका पाकला मदत करीत आहे. या मदतीचा बराच मोठा भाग हा भारताच्या विरोधात उतरविला जातो, या मदतीमुळे पाकिस्तानातील लष्करशहांना प्रतिष्ठा-मान्यता मिळते आणि  पाकिस्तान हा दहशतवादी संघटनांचा साह्य़कर्ता म्हणून उरतोच हे माहीत असूनही अमेरिकेकडून पाकिस्तानला लष्करी साह्य़ केले जाते. याचे कारण अमेरिकेच्या गरजेतही लपलेले असते हे लक्षात घेतले पाहिजे. अमेरिकेची गरज ही येथील भू-राजकीय समीकरणांतून आलेली आहे. भारत, चीन, अफगाणिस्तान आणि पलीकडे रशिया या कडीतील पाकिस्तानचे नैसर्गिक स्थान हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. आशिया खंडातून खेळल्या जात असलेल्या छुप्या शीतयुद्धातील पाकिस्तान हा अमेरिकेचा अघोषित तळही आहे. ही बाब लक्षात घेऊनच अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांकडे पाहिले पाहिजे. तसे पाहिल्यास ते भारताच्या दृष्टीने तोटय़ाचे नाहीत हे लक्षात येते. काश्मीर-प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा मुद्दा. त्यातून अमेरिकेने केव्हाच अंग काढलेले आहे. बाकी मग उरतो तो अमेरिकेच्या व्यावहारिक राजकारणाचा भाग. त्यावर भारत नेहमी नाराजीच व्यक्त करतो असे नाही. अफगाणिस्तान-पाकिस्तान-चीन आणि अमेरिका अशा वाटाघाटी ‘अफगाणिस्तानातील शांतते’साठी गेल्या महिन्यात अमेरिकेने घडवून आणल्या, याची आपण केवळ नोंद घेतली. मात्र ‘एफ-१६’च्या या मदतीबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली आहे. तो राजनैतिक व्यवहाराचा भाग झाला. या नाराजीपलीकडे जाऊन काही मिळवायचे असेल, तर या मदतीआडून अमेरिका पाकिस्तानवर दहशतवादाबाबत कसा दबाव आणील हे पाहणे. अद्याप एफ-१६ विक्रीला अमेरिकी काँग्रेसची मंजुरी मिळणे बाकी आहे. ते लक्षात घेऊन हे साध्य करणे हा मुत्सद्देगिरीचा भाग झाला. पण भारताचे हित आहे ते त्यातच.