अमेरिकेत स्वत:हून परागंदा म्हणून राहिलेले सौदी अरेबियाचे पत्रकार, सौदी राजवटीचे कधी सल्लागार आणि कधी टीकाकार जमाल खाशोगी हे तुर्कस्तानातून दहा दिवसांपूर्वी गायब झाले. त्यांना सौदी अरेबियाच्या राजवटीने ठार केले असावे, असा अंदाज पुराव्यासकट बांधला जात आहे. २ ऑक्टोबर रोजी खाशोगी इस्तंबुलमधील सौदी दूतावासात काही कामानिमित्त गेले होते. तेथून ते परत बाहेर आलेच नाहीत किंवा कोणाला नंतर दिसलेलेही नाहीत. तुर्की अधिकाऱ्यांनी पडद्यामागे पुरवलेल्या माहितीनुसार, सौदी अधिकाऱ्यांनी खाशोगी यांची दूतावासातच हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते गुप्तरीत्या बाहेर हलवले. खाशोगी यांचा निकाल लावण्यासाठी काही सौदी अधिकारी खासगी जेट विमानाने इस्तंबुलमध्ये दाखल झाले होते, याबाबतचे पुरावेही जगासमोर आले आहेत. या कथित हत्येबद्दल सध्या तरी संशयाची सुई सौदी अरेबियाचे महत्त्वाकांक्षी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या दिशेनेच वळलेली दिसते. खाशोगी हे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे आखाती राजकारणविषयक स्तंभलेखक/पत्रकार होते. सौदी राजवटीवर त्यांनी अलीकडे अनेकदा टीका केली; पण ही टीका मित्रत्वाची असते, असे त्यांनीच एका मुलाखतीत म्हटले होते. पण हे ‘मित्रत्व’ मोहम्मद बिन सलमान यांना मानवलेले नाही हे उघड आहे. मोहम्मद बिन सलमान पहिल्यांदा सक्रिय झाले, त्या वेळी त्यांची प्रतिमा उदारमतवादी अशी होती. त्यांनी धार्मिक पोलिसांना प्रतिबंध केला होता. महिलांना मोटार चालवण्याची परवानगी आणि नोकऱ्यांसाठी प्रोत्साहन दिले होते. मात्र अलीकडच्या काळात त्यांनी विरोधकांना ठेचण्यासाठी सरसकट दडपशाहीचा मार्ग अवलंबलेला आहे. गेल्या वर्षी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या नावाखाली बिन सलमान यांनी राजघराण्यातील आणि सरकारमधील १००हून अधिक जणांना तुरुंगात डांबले. त्यांच्याविरुद्धचा कोणताही पुरावा जाहीर करण्यात आलेला नाही. यांतील काही जणांना मृत्युदंडाची शिक्षा झालेली आहे. मग लेबनॉनचे पंतप्रधान साद हरिरी यांना त्यांनी दोन आठवडे स्थानबद्धतेत ठेवले. महिला चळवळीतील कार्यकर्त्यां लूजैन अल-हाथलूल यांना अबूधाबीतून अटक करून सौदी तुरुंगात डांबले गेले. त्यांनी परदेशी गुंतवणूकदारांना सौदी अरेबियात बोलावलेले असले, केवळ रोबोंमार्फत चालवल्या जाणाऱ्या स्वतंत्र नगरीची अफलातून घोषणा केली असली, तरी त्यांचे प्रगतिपुस्तक अजिबात आश्वासक नाही. विरोधकांना परदेशात ठार मारण्याचा हृदयशून्य आचरटपणा आजवर सद्दाम हुसेन, मुहाम्मर गडाफी या अरब शासकांनी केला होता. मोहम्मद बिन सलमानही त्याच माळेतले आहेत या संशयावर खाशोगी प्रकरणाने शिक्कामोर्तब होऊ शकते. खाशोगी प्रकरणात तुर्कस्तानची भूमिकाही संशयातीत राहिलेली नाही. तुर्की पंतप्रधान रिसेप तायिप एदरेगान यांच्या काळात सर्वाधिक पत्रकार तुरुंगात डांबले गेले. मुस्लीम ब्रदरहूड संघटनेला त्यांचा असलेला पाठिंबा, कतारबरोबर त्यांनी दाखवलेली जवळीक या दोन कारणांमुळे सौदी अरेबिया आणि त्यांच्या अमिराती देशांच्या टोळीचा एदरेगान यांच्यावर राग आहेच. अशा परिस्थितीत तर खाशोगी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी विशेष लक्ष घालायला हवे होते; पण निर्भीडपणे विचार मांडणाऱ्यांविषयी आकस, त्यांच्या जीविताविषयी तुच्छता हे गुण जगातील एकाधिकारशाहीवादी शासकांमध्ये समान दिसून येतात. आता तर परागंदा झालेल्या पत्रकारांना वेगळ्या देशात गाठून त्यांची कत्तल होते आणि याविषयी कुणालाही उत्तरदायी ठरवता येत नाही, ही प्रथा तर भयंकर आहे. नाही म्हणायला एका धर्मगुरूची मात्र तुर्कस्तानने दोन वर्षांनी मुक्तता केली आणि त्यांची अमेरिकेत पाठवणीही केली. पत्रकाराऐवजी धर्मगुरूच्या जीविताला दिला गेलेला हा प्राधान्यक्रमही सूचक आहे.