पॅरिस वातावरण बदल करारातून बाहेर पडण्याची अधिकृत प्रक्रिया अमेरिकेने सोमवारपासून सुरू केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची याविषयीची भूमिका स्पष्ट होती. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही त्यांनी पॅरिस करारातून बाहेर पडणे हा ‘अमेरिकेच्या प्रतिष्ठे’चा मुद्दा केला होता! २०१७ मध्ये ही भाषा बदलली आणि पॅरिस करारातून बाहेर पडणे हा ‘हजारो अमेरिकी रोजगार वाचवण्या’च्या दृष्टीने आवश्यक मुद्दा ठरला. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात पेटलेले वणवे, आयोवासारख्या राज्यामध्ये आलेला महापूर, ह्य़ूस्टन ते न्यू ऑर्लिन्सपर्यंत विविध राज्यांमध्ये उठणारी भयावह चक्रीवादळे या घडामोडी ताज्या आहेत. या अनाकलनीय आणि अभूतपूर्व ऋतुरूपांच्या मुळाशी वातावरण बदल हेच प्रमुख कारण आहे. आपल्याकडेही नोव्हेंबर उजाडला तरी पावसाचा परतीचा प्रवास संपतच नाही. कोकणानजीक वर्षभरात चार चक्रीवादळे उठतात. ही समस्या रुद्रगंभीर होत असून, जीवितहानी आणि वित्तहानीवर नियंत्रण मिळवणे कोणत्याही सरकारच्या आवाक्याबाहेरचे बनू लागले आहे. वातावरण बदलामुळे देशोधडीला लागून विस्थापित होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. अमेरिकेतील संकटांमुळे ट्रम्प यांचे मतपरिवर्तन होईल, असे वाटणाऱ्यांचा त्यामुळे भ्रमनिरास होणे स्वाभाविक आहे. जून २०१७ मध्ये ट्रम्प यांनी करारमाघारीची अविचारी घोषणा केली, त्या वेळी तेलदांडग्या रिपब्लिकनांचे लांगूलचालन यापलीकडे त्या निर्णयाला कोणताही आधार नव्हता. परंतु त्यानंतर गेल्या अडीच वर्षांत परिस्थिती बदललेली आहे. मुख्य म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या काळात झालेल्या ग्रेटा थुनबर्गच्या मोहिमेमुळे वातावरण बदलाविषयीची जागृती अधिक वेगाने व्यापक होते आहे. या कसल्याचीही दखल ट्रम्प यांनी घेतलेली नसली, तरी त्यांची भाषा बदलल्याचे नक्कीच दिसून आले. पॅरिस कराराचा मसुदा हा फेकण्याच्या लायकीचा आहे, कारण त्यात अमुक तरतुदी आहेत आणि त्यांचा तमुक परिणाम होईल असे जे सांगितले जाई आणि त्यासाठी जी चुकीची माहिती खुद्द अध्यक्ष महोदय पुरवीत, ते यंदा घडलेले नाही. अमेरिकी अर्थव्यवस्था मोडकळीस येईल, असे ते आता म्हणू लागले आहेत. २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत वातावरण बदल हा महत्त्वाचा मुद्दा राहील आणि ट्रम्प यांची या मुद्दय़ावर कोंडी करता येईल, याचा सुगावा त्यांच्या डेमोक्रॅटिक विरोधकांना लागलेला आहे. सन २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन अर्ध्याने कमी केले नाही, तर प्रलयकारी आणि विनाशकारी नैसर्गिक उलथापालथ होईल हे विविध शास्त्रीय आणि आर्थिक प्रारूपांमधून स्पष्ट होऊ लागले आहे. उद्योगक्रांतीपूर्व कालापेक्षा पृथ्वीचे सरासरी तापमान एक अंश सेल्शियसने वाढलेले आहे. ही वाढ दोन अंश सेल्शियसपेक्षा आणि शक्य झाल्यास १.५ अंश सेल्शियसच्याही कमी ठेवणे हे पॅरिस कराराचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. मात्र, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या विश्लेषणानुसार, उद्योगक्रांतीपूर्व कालखंडाच्या तुलनेत एकदशांश जगाचे तापमान यापूर्वीच दोन अंश सेल्शियसने वाढलेले आहे. हे सगळे ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचत असणारच. परंतु वाळूत डोके खुपसून बसलेल्या शहामृगाप्रमाणे ट्रम्प यांची अवस्था झाली आहे. आजवर अमेरिकेने इतका पराकोटीचा अमेरिकामग्न अध्यक्ष पाहिलेला नाही. वास्तविक अनेक मोठय़ा करारांचे नेतृत्व अमेरिकेने यापूर्वी केलेले आहे. आजवर बहुधा केवळ एकदाच अमेरिकी अध्यक्षाने एखाद्या कराराशी फारकत घेतलेली दिसून येते. ते होते व्रुडो विल्सन. लीग ऑफ नेशन्स संकल्पनेचे प्रणेते. परंतु स्वत: कधी संघटनेत सहभागी झाले नाहीत. त्यांच्या उदासीनतेमध्ये दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली होती. ट्रम्प यांनी इतक्या खोलवर वाचले असण्याची शक्यता दुरापास्तच!