उसेन बोल्ट हरला. अखेरच्या जागतिक स्पर्धेत त्याचा धावण्याचा वेग कमी पडला. कमी म्हणजे फारच कमी. तब्बल शून्य पूर्णाक शून्य तीन सेकंद. ती १०० मीटरची धावपट्टी पार करण्यास त्याला फारच वेळ लागला. म्हणजे ९.९५ सेकंद. अर्थात हे वेळेचे गणित माणसाचे नाही. ते वाहत्या वाऱ्याचे आहे. तेथे मिलिसेकंदांचा हिशेब चालतो. त्यात उसेन कमी पडला. धाव किंचित मंदावली त्याची आणि त्याचे अखेरच्या सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. पण तो सल केवळ त्याचा एकटय़ाचाच नाही. लाखो चाहते हळहळले त्या पराभवाने. या स्पर्धेसाठी लंडनच्या त्या क्रीडागारात त्याने प्रवेश केला तेव्हाचे ते क्षण पाहा. तेथील ६० हजार प्रेक्षक मोठमोठय़ाने ओरडत त्याला शुभेच्छा देत होते. त्यांच्या डोळ्यांना एकच चित्र पाहायचे होते तेव्हा. त्याच्या विजयाचे. त्यानेच त्याला विजयाची भेट द्यावी अशी अनोखी इच्छा होती लोकांची, पण तो हरला. परंतु ती खरोखरच त्याची हार होती का? त्या स्पर्धेत पहिल्या आलेल्या जस्टिन गॅटलिनने त्याच्या एका कृतीतून दाखवून दिले की, ती हार क्रीडागारातली होती. मनांच्या मैदानावर अजूनही राज्य आहे ते त्या जमैकाच्या पवनपुत्राचेच. गॅटलिनने एका गुडघ्यावर बसून त्याला अभिवादन केले. एखाद्या सम्राटाला करावे तसे. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने त्याने उसेनच्या लाखो चाहत्यांचीच भावना त्या सलामीतून व्यक्त केली. एका प्रतिस्पध्र्याने दुसऱ्याला दिलेली ती दाद होती आणि वारा पडलेला असला म्हणजे त्यातील वेग नाहीसा झालेला नसतो, ही शहाणी जाणीव त्यात होती. आजच्या काळात हे असे काही दिसणे दुर्लभच. आजचा काळ स्पर्धेचा, हे खरे. येथे सर्वानाच जिंकायचे असते हेही खरे; परंतु त्या जिंकण्यातही उमदेपणा असावा लागतो. प्रतिस्पध्र्याचे थोरपण ओळखण्याचे मोठेपण असावे लागते, तितकेच प्रत्येक सूर्योदयाला एक सूर्यास्त असतो याचेही भान असावे लागते. ते गॅटलिनच्या त्या अभिवादनात होते. ती सलामी ही खरी या अंतिम स्पर्धेतली उसेनची अनमोल कमाई, पण ती सहज प्राप्त झालेली नाही. प्रचंड धावून त्याने ती कमविली आहे. खरे तर मैदानावर त्याचा उदय होईपर्यंत वाटायचे की, कार्ल लुईस हीच एकमेव वेगमर्यादा आहे. अमेरिकेतील त्या धावपटूला पाहताना तज्ज्ञही मान्य करीत की बस्स, यापुढे कोणीही नाही. १९९१ मधील टोक्योतल्या जागतिक चॅम्पियनशिप सामन्यांतली १०० मीटर स्पर्धेतील त्याचे ते रोमांचक धावणे म्हणजे धावण्याची परमावधीच. ९.८६ सेकंदांत त्याने ते अंतर पार करून विक्रम केला होता. उसेन बोल्ट त्या वेळी होता पाच वर्षांचा. त्यानंतर दहाच वर्षांनी तो व्यावसायिक मैदानात उतरला, धावू लागला, नवनव्या विक्रमांना गवसणी घालू लागला. त्याच्या धावण्यात कोणाला वाऱ्याचा वेग दिसत होता, तर कोणाला विजेची चमक. सहज आणि डौलाने धावायचा तो, पण ती अभ्यासाने कमावलेली सहजता होती. प्रारंभी झेप घेण्यात आपण कमी पडतो असे तो म्हणतो, पण पुढल्या काही सेकंदांत त्याचे शरीर वारा व्हायचे. पायाचा घोटा, गुडघा, नितंब, खांदा हे सारे एकरेषीय होऊन जायचे आणि तो उसळायचा. वाऱ्याच्या वेगाने लांब ढांगा टाकत, शरीराचा कोन सरळ राखत, पण त्याच वेळी कमरेपासून वर डुलत तो दौडायचा.. जणू बंदुकीतून सुटलेली गोळीच ती. त्या वाहत्या चैतन्याला पाहणे ही आनंदपर्वणीच असायची. त्या धावण्याची अखेर सुवर्णपदकाने झाली असती तर अधिक चांगले झाले असते. ते एक राहूनच गेले. ती हुरहुर आता या वायुपुत्राच्या असंख्य चाहत्यांच्या मनी कायमची राहील..