24 March 2019

News Flash

भाजपच्या मित्रांना धसका

बिहारमध्येही गेल्या दोन महिन्यांत चार मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाले.

सारे विरोधक एकत्र आल्याने चित्र बदलू शकते हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकांच्या निमित्ताने स्पष्ट झाले. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष हे पारंपरिक विरोधक एकत्र आल्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फूलपूर लोकसभा मतदारसंघांपाठोपाठ कैरानात विरोधकांचा विजय झाला. बिहारमध्येही गेल्या दोन महिन्यांत चार मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजप विरोधकांना बळ मिळू लागल्याने विरोधकांमध्ये साहजिकच उत्साहाचे वातावरण असतानाच भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सारे काही आलबेल नाही. भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे तेलुगू देशमने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून घटस्फोट घेतला आहे. शिवसेना अजून सत्तेत चिकटून असली तरी भाजपप्रणीत आघाडीतून बाहेर पडण्याचा मुहूर्त शोधत आहे. पंजाबमधील अकाली दलही भाजपवर समाधानी नाही. बिहारमधील नितीशकुमार, रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाह या आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रियाही भाजपला धार्जिणी नाही. यापैकी राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री कुशवाह यांनी तर, ‘रालोआची गाडी रुळावर आणावी,’ अशी विनंती भाजप व पंतप्रधान मोदी यांना केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रालोआत निर्माण झालेला बेबनाव लक्षात घेता आतापासूनच घटक पक्षांमध्ये विश्वास आणि समन्वयाचे वातावरण तयार व्हावे, अशी अपेक्षाही कुशवाह यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे मित्रपक्षांना अजिबात महत्त्व देत नाहीत. मित्रपक्षांना हीच सल आहे. १९९९ ते २००४ या भाजप सरकारच्या काळात आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ‘किंगमेकर’च्या भूमिकेत होते. मोदी वा शहा यांनी नायडू यांचा स्वाभिमान दुखावला. आंध्रच्या स्वायत्ततेच्या मुद्दय़ावर भाजपने कोंडी केली तसेच जगनमोहन रेड्डी या विरोधकाशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केल्याने चंद्राबाबू संतापले. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्याशी संगत सोडल्यावर नितीशकुमार यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली. भाजपने नेहमीप्रमाणेच नितीशकुमार यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. पोटनिवडणुकीतील पराभवाचे खापर नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर फोडले. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा चेहरा हा मुख्यमंत्री नितीशकुमार असावा, अशी मागणी करून जनता दलाने (सं.) मोदी यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधक एकत्र येत असताना आपलीही एकी राहणे महत्त्वाचे आहे हे भाजपच्या मित्रपक्षांना वाटू लागले आहे. या दृष्टीने कुशवाह यांचे वक्तव्य बरेच बोलके आहे. विरोधक एकत्र लढल्यास मोदी यांचे नाणे किती खणखणीत राहते याची चिंता मित्रपक्षांना आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभेच्या १२० जागा असून, गेल्या वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या यापैकी १०४ जागा निवडून आल्या होत्या. सारे विरोधक एकत्र आल्यास संख्याबळ नक्कीच कमी होऊ शकते. वास्तविक भाजपसाठीही हा धोक्याचा इशारा आहे. शिवसेनेपुढे युतीसाठी हात पुढे करायचा, पण त्याच वेळी शिवसेनेची कुरापत काढायची हे भाजपचे धोरण असते. अन्य मित्रपक्षांना कमी अधिक प्रमाणात असाच अनुभव येतो. मोदींमुळे आपण पुन्हा स्वबळावर सत्तेत येणार, असा भाजपच्या धुरीणांना बहुधा ठाम विश्वास असल्याने मित्रपक्षांना तेवढे महत्त्व दिले जात नाही. पण उद्या संख्याबळ कमी पडल्यास या मित्रांचेच पाय धरण्याची वेळ भाजपवर येऊ शकते.

First Published on June 5, 2018 1:55 am

Web Title: uttar pradesh and bihar by elections bjp