पडद्यावर दर्शन होताच लक्षात येते ते नाक, पाणीदार डोळे आणि भव्य कपाळावर रुळणाऱ्या केसांच्या बटा. बोलायला लागले की लक्षात येई त्या प्रत्येक उच्चारांतली ताकद, अभिनयातील सहजता आणि त्यातून सहजपणे प्रतीत होणारी सर्जनशीलता. सईद जाफरी यांना ज्यांनी ज्यांनी चित्रपटाच्या पडद्यावर पाहिले, त्यांच्या लक्षात ते कायमचे राहिले आहेत. बॉलीवूडपेक्षाही परदेशी चित्रपटांच्या दुनियेत त्यांनी अधिक चाहते मिळवले. भूमिका कितीही छोटी असली, तरी ते आपली छाप पाडत. नाटक ही त्यांची पहिली आवड होती. अलीगढ आणि मद्रासनंतर अलाहाबाद विद्यापीठातही त्यांनी काही काळ शिक्षण घेतले, नंतर ते काही काळ दिल्ली आकाशवाणीत काम करीत होते व १९५१ ते १९५६ या काळात आकाशवाणी केंद्राचे संचालकही होते. नाटक हाच त्यांचा श्वास असल्याने दिल्लीला जाऊन ‘युनिटी थिटएर’ ही नाटक कंपनी सुरू करणे हे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते. चित्रपटातील प्रवेश रंगभूमीवरूनच झाला. सत्यजित राय व जेम्स आयव्हरी यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांचे ते लाडके कलाकार होते, यापेक्षा त्यांच्याविषयी वेगळे काही सांगण्याची गरज नाही. दिल, जुदाई, राम तेरी गंगा मली, कत्ल, चष्मेबद्दूर, हीरो हिरालाल, खून भरी मांग या बॉलीवूडपटांत चाचा किंवा पिता होण्याचेच काम. ‘मासूम’मध्ये एक गाणेही मिळाले, पण इंग्रजी चित्रपटात त्यांना अनेकविध प्रकारच्या भूमिका करता आल्या. द मॅन हू वूड बी किंग, गांधी, अ पॅसेज टू इंडिया, द ज्वेल इन द क्राऊन हे त्यांचे वेगळे आणि लक्षात राहणारे चित्रपट. ‘कोरोनेशन स्ट्रीट’ ही त्यांची टीव्ही मालिका परदेशात विशेष गाजली होती. ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय अभिनेते. भारतात चित्रपट भरपूर आहेत, पण चित्रपटांचा दर्जा म्हणावा तर तो ब्रिटनमध्ये आहे, असे त्यांचे मत होते. त्यांना काही काळ बीबीसीत नोकरीही करावी लागली, हॅरॉड्सच्या दुकानी विक्रेत्याचेही काम केले. तेथे त्यांची माजी सहकारी इनग्रिड बर्गमन त्यांच्याकडे आली असता, तिला आपण विक्रेता असल्याचे लक्षात येऊ नये म्हणून जाफरी यांनी जॅकेट आणि टाय चढवला आणि ग्राहक असल्याचे भासवून वेळ मारून नेल्याची आठवण ते सांगत असत. काळ बदलला आणि ब्रिटिश टेलिव्हिजनवर त्यांना अनेक भूमिका मिळाल्या. ‘पॅसेज टू इंडिया’ हे नाटक अमेरिकेत सादर करीत असताना त्यातील प्रा. गोडबोले या भूमिकेसाठी त्यांना सायंकालीन ‘पूरिया’ रागही सादर करावा लागणार होता, तेव्हा त्यांनी थेट रविशंकर यांना फोन केला व त्यांनाच तो गाऊन दाखवला होता. सत्तरीतही मी तरुणच आहे असे ते म्हणायचे. उत्तम वाचन आणि उत्तम वचन हे त्यांचे जगण्याचे सूत्र. जे काही करायचे, ते मन लावून आणि प्राण ओतून. त्यामुळे भूमिका किती छोटी आहे यापेक्षा त्यात आपला जीव किती आहे, हे महत्त्वाचे असे जीवनसार जगणारा हा कलावंत. व्यक्तिगत आयुष्यातील दु:खांवर मात करीत, दुनियेच्या सारिपाटावर बराच काळ नशिबाचे उलटे-सुलटे फासे पडताना पाहिलेला हा ‘शतरंज का खिलाडी’ आता अनंताच्या प्रवासाला गेला आहे.