‘‘कॅमेऱ्यानं मला माझ्या अनुभवाला चौकट द्यायला शिकवलं,’’ असे सांगणाऱ्या सुमित्रा भावे यांचे चित्रपट आरस्पानी नितळ अनुभवांचे असत. वैविध्यपूर्ण विषय आणि मांडणीच्याही विविध पद्धती त्यांनी हाताळल्या. त्यांचा चित्रपट कधी माणूसपणाचा अर्थ शिकवणारा, कधी सामाजिक भान व्यक्त करणारा, तर कधी आजारांवर बोलणारा. कधी माहितीपट, कधी लघुपट, तर कधी थेट पूर्ण लांबीचा चित्रपट. या साऱ्यातून व्यक्त होत राहाते ती समाजाचे खोल भान असणारी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणारी विलक्षण संवेदनशील मनाची बाई! सुमित्राबाईंनी ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’त शिक्षण घेतल्याने त्यांच्यात मुळातच असलेल्या सामाजिक जाणिवेला अधिक खोल, तीव्र भान आले. तेथे शिकलेल्या असामान्य मानसशास्त्राचा (अ‍ॅबनॉर्मल सायकॉलॉजी) उपयोग त्यांना ‘देवराई’ करताना झाला. अनेक रोगांना, आजारांना त्यांनी इतक्या तरलतेने आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त के ले आहे की जणू गोड आवरणातली कडू औषधाची गोळी. साहजिकच तो आजार राहात नाही तर माणसामाणसांतील नात्यांची, जगण्यातल्या वास्तव-अवास्तवाच्या खेळाची आणि आयुष्याच्या क्षणभंगुरतेबरोबरच आभाळभर व्यापून उरणाऱ्या माणूसपणाची कहाणी होऊन जाते. म्हणूनच ‘जिंदगी झिंदाबाद’ हा एचआयव्ही-एड्सवरचा चित्रपट त्या आजाराबरोबरच स्वत: मृत्यूच्या दारात असतानाही शुश्रूषा करणाऱ्या दोन मित्रांची कथा होऊन जाते. ‘नितळ’मधली कोड आलेली मुलगी काय, ‘कासव’मधला नैराश्यग्रस्त तरुण काय किं वा विस्मरणामुळे घर हरवलेले आजोबा काय, ही पात्रे आपल्या आजूबाजूची खरीखुरी माणसे होऊन जातात. कॅ मेऱ्याला डोळा लावल्यावर समोरच्या दृश्याला चौकट दिली की ते दृश्य राहात नाही. त्याची कथा, चित्रपट होतोे, यावर विश्वास असणाऱ्या सुमित्राबाईंचा ‘देवराई’ म्हणूनच मनोभंगाच्या (स्क्रिझोफ्रेनिक) मानसिकतेवर बोलत असला तरी त्यातला देवराईंचा, त्यातला रानभुलीचा, चकव्याचा आणि एकदा तर शांततेचा आवाज आपल्याला ऐकवायला लावतो आणि त्या आजाराचे गांभीर्य आपल्याला स्पर्शून जाते. आजारच नव्हे, तर ‘चाकोरी’, ‘दहावी फ’ असो की ‘दोघी’सारखे त्यांचे चित्रपट माणसाचे दु:ख, अपयश, त्याच्या विरोधात बंड करणारे मन, त्यातून येणारी हतबलता, कधी अगतिकता या सगळ्यांना कवेत घेत सामान्यांपासून सुरू झालेली गोष्ट वैश्विक रूप धारण करत जाते. तो विषय एकाचा न राहता सगळ्यांचा होऊन जातो. त्यांचे सुरुवातीचे ‘पाणी’ आणि ‘बाई’ हे लघुपट स्त्री-पुरुष समानता आणि पाण्याचा एकजुटीने सोडवता येणारा प्रश्न मांडणारे आहेत. पण जेव्हा एका जागतिक चित्रपट महोत्सवात एक निर्माती त्यांना भेटून, ‘‘तुमचा हा लघुपट मी पाकिस्तानातल्या खेड्याखेड्यांत दाखवला तिथल्या अनेक स्त्रियांनी आपल्या गावासाठी त्याचा फायदा करून घेतला,’’ हे सांगते, तेव्हा त्या विषयाचे सार्वत्रिकतेचे मोल आपसूक लक्षात येते. विषयातल्या या वैश्विकतेमुळेच असेल; त्यांच्या चित्रपटात अनेक लहानमोठ्या कलाकारांनी तर कामे के लीच, परंतु विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, कमल देसाई यांच्यासारख्या साहित्यिकांनीही आपल्या सहभागाने त्याचे महत्त्व अधोरेखित के ले. ‘‘जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठी, त्यांची छोटी प्रतिकृती स्वत: करून बघण्यासाठी, एक सशक्त अवजार चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या हाती आलं. तो आनंद मला दुसरीकडे कु ठे घेता आला असता. म्हणून मी चित्रपट बनवते’’ त्या असे का म्हणत त्याची प्रचीती यावरूनच यावी. समाजशोध आणि मानवी स्वभावशोधासाठी हे अवजार वापरणाऱ्या सुमित्राबाईंना आदरांजली.