गांधीजींची हत्या झाली, त्या सायंकाळी ‘बिर्ला हाऊस’मधले ते रक्ताचे डाग.. ती दबलेली हिरवळ.. ते शोकाकुल लोक आणि दिङ्मूढ झालेले नेते.. मनावर कायम कोरली जाणारी ही दृश्ये प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या काही थोडय़ा पत्रकारांपैकी एक होते कुलदीप नय्यर. तरुणच होते ते तेव्हा. अननुभवीसुद्धा. पंचविशीच्या कुलदीप यांनी, गांधीहत्येनंतर पुण्यात उसळलेल्या दंगलीची बातमी आपण छापायचीच नाही, तिरस्काराची विषवल्ली वाढूच द्यायची नाही, असा हट्ट धरला होता संपादकांकडे! ‘अंजाम’ नामक एका उर्दू वृत्तपत्रात नोकरीस लागून सहा महिनेही झाले नसतील, तेव्हाचा हा हट्टीपणा. त्या हट्टामागे एक भाबडा आशावाद होता. पत्रकाराला अजिबात न शोभणारा आणि फार तर पंचविशीच्या तरुणाला शोभेल असा आशावाद. ‘मी पत्रकारच आहे’ असे पुढील ७० वर्षे कुलदीप नय्यर म्हणत राहिले, बातमीदारी कधीच सुटली तरी स्तंभलेखन करीत राहिले आणि १५ पुस्तकेही त्यांनी लिहिली; पण खरे तर, पत्रकारापेक्षाही कुलदीप नय्यर हे नेहमी तरुण राहिले. आशावादी राहिले.

हा आशावाद इतका की, इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहात ‘एक्स्प्रेस वृत्तसेवे’चे प्रमुख म्हणून कार्यरत असताना आणीबाणी लादली गेली, तर या नय्यर यांनी ‘वृत्तपत्रांवरील र्निबधांविषयी चर्चा करण्यासाठी’ दिल्लीच्या प्रेस क्लबात सर्व पत्रकारांना बोलावून घेतले.. पत्रकार तेथे जमले, नय्यर यांनी त्यांच्यापुढे र्निबधांच्या निषेधाचा लेखी प्रस्तावच ठेवला. ‘पत्र तयार आहे. तो आपला ठराव आहे असे मी मानतो. स्वेच्छेने त्यावर स्वाक्षऱ्या व्हाव्यात, म्हणून मी हे पत्र मेजावर ठेवतो’ अशा नय्यर यांच्या भाषणानंतर १०३ स्वाक्षऱ्या जमल्या खऱ्या, पण इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात माहिती-प्रसारण खाते सांभाळणाऱ्या विद्याचरण शुक्लांपर्यंत ही खबर जाऊन ‘काळजी वाटल्यामुळे’ त्यांनी नय्यर यांना भेटीस बोलावले आणि पत्र मागे घ्या, स्वाक्षरी करणाऱ्यांची नावे द्या, अशा कानपिचक्या दिल्या. नय्यर यांचा नकार त्यांना तिहार तुरुंगात घेऊन गेला. त्यांच्या पत्नीने केलेल्या ‘हेबिअस कॉर्पस’ अर्जाची बातमी इंडियन एक्स्प्रेससारख्या निडर वृत्तपत्रांनी त्या वेळी लावून धरली नसती तर तीन महिन्यांत ते तेथून सुटलेच नसते. बरे, परत आल्यावरही ‘एक्स्प्रेस’मधील कूमी कपूरसारख्या तेव्हाच्या वार्ताहर तरुण-तरुणींना हे सांगत, ‘‘तुमचे सर्व लिखाण छापले जाईलच, याची खात्री नसेल.. तरीसुद्धा तुम्ही सर्व लिहाच. जे वाटते ते लिहा. आज नाही कुणी वाचणार, पुढल्या पिढय़ा तर वाचतील!’’

पत्रकाराचे काम आजपुरतेच, तेही कामावरल्या काही तासांपुरतेच मानणाऱ्यांची संख्या जास्त आणि ‘लेखक-पत्रकार’ अल्पसंख्य, असा हल्लीचा काळ. आज लेखक-पत्रकार म्हणून कार्यरत असलेले अनेक जण नय्यर यांच्या १५ पैकी एका तरी पुस्तकामुळे कधी तरी भारावलेले असतील. मग ते आणीबाणीच्या दिवसांतले ‘द जजमेंट’ असो की त्याआधीचे आणि बऱ्याच आवृत्त्या निघालेले ‘बियाँड द लाइन्स’. नय्यर यांच्या एकंदर विचारव्यूहात भारावून टाकण्याची क्षमता होती, शिवाय भारत, त्याचे शेजारी आणि जगसुद्धा सुधारू शकते, असा एक आधुनिकतावादी- भारतीयसंदर्भात ‘नेहरूवादी’ ठरेल असा- आशावाद होता. तो भाबडाच असल्याचे शेरे दररोज वृत्तपत्रांतून मिळत असतात. तरीही नय्यर लिहीत राहिले. अमेरिकेतून पत्रकारिता शिकून मायदेशी आल्यानंतर लगेच केंद्रीय माहिती सेवेतील अधिकारीपद त्यांनी मिळविले होते, कृष्णचंद्र पंत आणि लालबहादूर शास्त्रींसारख्या नेत्यांच्या सावलीत त्यांची कारकीर्द सुखाचीच होती, ते सारे सोडून आधी ‘यूएनआय’ या नव्या वृत्तसंस्थेच्या उभारणीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. ‘बातमी तातडीनेच हवी, ती पुढे काय होणार हेही सांगणारी हवी आणि दोन ‘टेक’ (सात-आठ परिच्छेद)पेक्षा जास्त नको,’ असे नवे- काहीसे अमेरिकी- निकष तर त्यांनी पत्रकारितेत आणलेच; पण ज्याला राजकीय बातमीदारी म्हणतात ती विश्लेषणाच्या आधाराने बातम्या देण्याची रीतही त्यांनी भारतीय पत्रकारितेत रुळविली. सरकारी नोकरीच्या काळात झालेल्या ओळखींचा आणि सरकारी पद्धतींच्या खडान्खडा माहितीचा पुरेपूर उपयोग त्यांनी याकामी केला. पुढे ‘स्टेट्स्मन’ या वृत्तपत्रात बातमीदारीची गळचेपी होते आहे असे दिसल्यानेच तेथून ते बाहेर पडले आणि इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहात आले. ‘स्टेट्स्मन’चे तत्कालीन संचालक-संपादक कुस्रो इराणी हे तेव्हाच्या ‘स्वतंत्र पार्टी’चे. त्यांनी राजकीय बातम्यांना पक्षीय रंग देणे आरंभले. ते नय्यर यांना रुचेना. मात्र ‘एक्स्प्रेस में खुल्ली छुट्टी थी’ हे नय्यर नेहमीच सांगत. काही वर्षांपूर्वी, रामनाथ गोएंका कारकीर्द-गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणातही त्यांनी या मोकळीकीचा आवर्जून उल्लेख केला होता.

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात नय्यर यांच्या भूमिका बदलल्या. आठच महिने का होईना, विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळात ब्रिटनमध्ये ते भारताचे उच्चायुक्त होते. पुढे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त सदस्य होते. १९९० सालच्या मार्च महिन्यात, उच्चायुक्त म्हणून लंडनच्या ‘इंडिया हाऊस’मध्ये रुजू होताच त्यांनी या वास्तूची दारे शिखांसह सर्वासाठी खुली केली. खलिस्तानवाद्यांचा जोर लंडनमध्ये सर्वाधिक असण्याचा तो काळ. तरीही त्यांनी हे केले. वाजपेयींना दिल्ली-लाहोर बसच्या उद्घाटन फेरीस ‘सरकारी बाबूंना कशाला? त्यापेक्षा राजकीय नेते, पत्रकार, कलावंत यांना न्या बसमधून’ ही सूचना नय्यर यांनीच केली. पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये जन्मलेले, मैत्रीसाठी हातावर ‘चाँदतारा’ गोंदवून घेणारे नय्यर हे पत्रकार म्हणून पूर्व पाकिस्तानातील अत्याचारांना पहिल्यांदा वाचा फोडणारे आणि बांगलादेश मुक्तिलढय़ाच्या रणभेरी वाजविणारे ठरले होते. तेच नय्यर अलीकडे भूतपूर्व राज्यसभा सदस्य या नात्याने, अत्तारी-वाघा सीमेवर दर १४ ऑगस्टला मेणबत्त्या घेऊन शांतिसंदेश देणाऱ्या जथ्याचे नेतृत्व करताना दिसत. अण्णा हजारे यांनाही पाठिंबा देऊन त्यांनी स्वत:च्या पक्षातीत- परंतु- प्रस्थापितपणावर शिक्कामोर्तबच करवून घेतले. ‘पाकिस्तानधार्जिणे’ अशी त्यांची यथेच्छ बदनामी विरोधकांनी केली. पत्रकार म्हणून हे सारे अवांछितच. पण त्यामागचा आशावाद मात्र सच्चा होता.

आणीबाणी आजच्या काळात लागू होऊ शकत नाही, असे नय्यर ठामपणे सांगत. पण ‘आज आणीबाणी जाहीरपणे लादली नाही, तरी र्निबध घालणे सोपे’ असेही म्हणत. खुद्द नय्यर यांच्यावर काहींनी ‘राजकीय सांगोवांगींना बातमीची प्रतिष्ठा देणारा’ अशी टीका केली. सन १९८७ मध्ये पाकिस्तानी अणुबॉम्ब प्रकल्पाचे प्रमुख ए. क्यू. खान यांच्या मुलाखतीतून ‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे’ याची बातमी फोडणारे नय्यर हे पत्रकार की घडत्या इतिहासाची पुस्तकेच लिहिण्यात अधिक रस असणारे बखरकार, हेही गुलदस्त्यात राहिले. या आशावादी चिरतरुणाने उत्तरायुष्यात पत्रकारितेला अंतर दिले, परंतु त्यांची मूस बदलली नाही. इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत इतकी वर्षे असूनही ‘तक़सीम’ (फाळणी)सारखे अनेक उर्दू शब्द त्यांच्या बोलण्यात येत, तेव्हा या बखरकाराने स्वत्व मात्र बरकरार- कायम- राखले आहे याची खूण पटे. त्या स्वत्वाने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.