सत्तर-ऐंशीच्या दशकात, विशी-पंचविशीच्या उंबरठय़ावरची जी पिढी कल्लेदार केस आणि घोळदार बेलबॉटम पँट फॅशन स्टेटमेंट म्हणून मिरवत होती, त्या पिढीच्या मनाचा स्मरणरंजनाचा एक भारावलेला कोपरा काल अचानक रितारिता झाला. गेल्या तीन-चार आठवडय़ांपासून या कोपऱ्याला एक अस्वस्थतेची चाहूल लागली होती; पण तरीही असे काही असू शकते, घडू शकते यावर विश्वास ठेवायला ही पिढी तयारच नव्हती. काही माणसांच्या बाबतीत, ती वास्तवापेक्षा वेगळी असतात आणि ती तुमच्या-आमच्यासारखं जगत नाहीत, असाच भाबडा समज रूढ झालेला असतो. असं नसतं, हे माहीत असूनही, वास्तव स्वीकारायला मन तयारच नसतं. विनोद खन्ना हा त्यातलाच एक माणूस. रुपेरी पडद्यावरचा, देखणा, ऐटबाज आणि, इंग्रजीतील हँडसम या शब्दाभोवती असणारे सारे अर्थ एका देहात एकवटलेला हा अभिनेता आणि राजनेता, वास्तवातल्या माणसांच्या दुनियेपेक्षा आपले असे एक वेगळेपण घेऊनच जन्मला आणि ते सदैव सोबतीला घेऊनच जगला. म्हणूनच, एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात आजारपणाने खंगलेला विनोद खन्ना समाजमाध्यमांतून छायाचित्राच्या रूपाने जगासमोर आला, तेव्हा ते कुणालाही खरे वाटलेच नाही. मिस्कील डोळ्यांच्या, भरदार छातीच्या, गोऱ्या रंगाच्या या देखण्या अभिनेत्याने, त्याच्या काळातील दिग्गजांच्या समोरही आपल्याच अस्तित्वाची मोहोर कायम उमटविली आणि तो लाखो रसिकांचा लाडका बनला. विनोद खन्नाची भूमिका असलेला चित्रपट कधी ‘डब्यात’ गेलाच नाही. त्याच्या अभिनयाने चित्रपटसृष्टीला भरभरून दान दिले आणि त्याच्या पडद्यावरील केवळ अस्तित्वाच्या चाहुलीनेदेखील रसिकांची मने पुरेपूर तृप्त होत राहिली. १९६८ साली केवळ योगायोगाने एका चित्रपटात भूमिका करण्याच्या व तो यशस्वी न झाल्यास चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरविण्याच्या वडिलांच्या अटीवर चंदेरी दुनियेत दाखल झालेल्या या ‘हँडसम हंक’ने ‘मन का मीत’ या चित्रपटातून दिलेल्या पहिल्या दर्शनातच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. हा चित्रपट तुफान चालला आणि विनोद खन्नाचा जन्म वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळण्यासाठी नव्हे, तर चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यासाठीच झाला आहे, हे सिद्धच झाले. एखाद्या खलनायकाने रुपेरी पडद्यावरच्या आपल्या अभिनयाने नायकालाही झाकोळून टाकावे आणि संपूर्ण चित्रपटाला स्वत:भोवतीच फिरावयास भाग पाडावे अशी मोहमयी मेख त्याच्या अभिनयाला लाभली होती. त्यामुळेच त्याच्या पदार्पणातील पहिल्या काही चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिकेतील अभिनयाने खलनायक हाच खरा हिरो ठरत गेला आणि खलनायकाच्या भूमिकेलाही महत्त्व प्राप्त झाले. खलनायक, सहनायक, चरित्र अभिनेता आणि एक्स्ट्रा म्हणून पडद्यावर अधूनमधून वावरणाऱ्यास चंदेरी दुनियेत भवितव्य नाही असा समज असण्याचा तो काळ होता; पण विनोद खन्नाने आपल्या ‘अभिनयी जादू’ने तो काळच पुसून टाकला आणि खलनायकी भूमिकांतूनही नायकाचा मान मिळविला, कारण त्या भूमिका विनोद खन्ना नावाच्या ‘ही-मॅन’ने वठविल्या होत्या. ‘आन मिलो सजना’, ‘मेरा गांव मेरा देस’, ‘पत्थर और पायल’ हे चित्रपट तर विनोद खन्नाच्या खलनायकी भूमिकांमुळेच सुपरहिट ठरले. तरीही, त्याच्या अभिनयाला खलनायकी ‘लेबल’ चिकटलेच नाही. विनोद खन्नाच्या रोमँटिक भूमिकांमुळे त्याच्या पिढीतील तरुणाईच्या प्रेमभावनांना नव्या रंगांनी सजविले. त्या रंगांनी सजलेल्या प्रेमछटा आजही अनेकांच्या वास्तव आयुष्यातील आठवणींचा कप्पा तितक्याच टवटवीत, सुगंधी आणि हळवेपणाने व्यापून राहिल्या आहेत. १९७३ मध्ये गुलजार यांच्या एका चित्रपटाने, ‘अचानक’ या खलनायकाला नायकत्व बहाल केले आणि विनोद खन्ना हा परिपूर्ण अभिनेता झाला. पुढच्याच वर्षीच्या ‘इम्तहान’ने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले आणि त्याच काळात चंदेरी दुनियेत चमकणाऱ्या दिग्गज अभिनेत्यांसमोरही विनोद खन्ना तेजाने तळपतच राहिला. जवळपास दीडशे चित्रपटांना आपल्या अभिनयाचा परीसस्पर्श देऊन विनोद खन्नाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासावर या चित्रपटांची आणि आपल्या नावाची अमीट मोहोर उमटविली. राजेश खन्नाच्या कारकीर्दीच्या अस्तकाळात अमिताभ बच्चन नावाचा तारा चंदेरी दुनियेच्या पूर्वेस उगवताना स्पष्ट दिसू लागला असतानाही, विनोद खन्ना नावाच्या ताऱ्याभोवतीच्या अवकाशात त्याचेच तेज झळकत होते. १९८२ मध्ये ओशोभक्तीने भारावून त्याने चित्रपटसृष्टीचा संन्यास घेतला नसता, तर तेव्हा या चंदेरी दुनियेत उजळू पाहणारे तारे उगवलेदेखील नसते, असे आजही अनेकांना वाटते, हाच विनोद खन्नाच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीचा विजय आहे. यशाच्या आणि कीर्तीच्या, लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अचानक संन्यास घेऊन या अभिनेत्याने जणू स्वत:हूनच त्या सृष्टीतील जीवघेण्या स्पर्धेतून माघार घेत आपले आसन रिते करून ठेवले नसते, तर तिथवर पोहोचणेदेखील अनेकांना साधले नसते, अशी खंत आज विनोद खन्नाच्या चाहत्यांकडून व्यक्त होते. यशाच्या सर्वोच्च शिखरावरून पायउतार झाल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला मनोमन त्याच स्थानावर अढळपणे बसविणाऱ्या चाहत्यांचे प्रेम विनोद खन्नाला त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत लाभले, म्हणूनच या उमद्या आणि मर्दानी माणसाला कर्करोगाने ग्रस्त अवस्थेत पाहताना असंख्य हृदये अक्षरश: पिळवटून गेली. त्याच्यासाठी लाखो रसिकांनी मनोमन प्रार्थना केल्या; पण पडद्यावरच्या दुनियेतील अमर मर्दालादेखील नियतीचे वास्तव अटळच असते, हेच अखेरीस खरे ठरले. रसिकांच्या मनातील ‘अमर’ अभिनेत्याची ही अखेर तशी चटका लावणारीच, पण चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आपल्या नावाच्या पानांना सोनेरी मुलामा लावूनच हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यामुळे या पानांना वेगळ्या वाचनखुणा लावण्याची गरजच नाही. अवघा इतिहास समोर धरावा आणि ती नेमकी सोनेरी पाने उघडून वाचावयास घ्यावीत, एवढे तेज त्या इतिहासाच्या पानापानांत जमा झालेले आहे आणि ते कायमच राहणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलतो आहे. नव्या जमान्यात, पहिल्या काही दिवसांतच कोटय़वधींचा गल्ला गोळा करणाऱ्या ‘सुपरहिट्ट’ चित्रपटांचे आयुष्य जेमतेम दोन-चार महिन्यांनंतर मिळमिळीत होत आहे आणि काही दिवसांपुरता रसिकांच्या हृदयावर विराजमान होणारा एखादा ‘सुपरस्टार’ अभिनेता नव्याने उगवणाऱ्या नव्या दिवसाबरोबर काही कळायच्या आतच विस्मृतीच्या पडद्याआड झाकला जात आहे. अशा या अस्थिर आणि चंचल दुनियेतही आपल्या अस्तित्वाचे अढळपद प्राप्त करणाऱ्या विनोद खन्ना नावाच्या एका चंदेरी ताऱ्याची अखेर चटका लावणारी असली, तरी इतिहासाच्या रूपाने हा तारा तेजस्वीपणे चमकतच राहणार आहे.