दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने जिंकणे अपेक्षितच होते. पण ती इतकी एकतर्फी ठरेल, हे अपेक्षित नव्हते. विशाखापट्टणम येथील सामना किमान पाचव्या दिवसापर्यंत तरी चालला. पुणे आणि रांची येथील कसोटी सामने चौथ्या दिवशीच संपले. काही महत्त्वाच्या क्रिकेटपटूंच्या निवृत्तीमुळे दक्षिण आफ्रिका संघाचा पूर्वीइतका दबदबा राहिलेला नाही. तरीदेखील गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये झालेली त्यांची घसरण चिंताजनक आहे. गौरेतर क्रिकेटपटूंना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे उत्तरदायित्व सांभाळताना त्यांची दमछाक होत आहे. याचे कारण आजही तेथील स्थानिक क्रिकेटमध्ये गौरेतर क्रिकेटपटूंच्या विकासासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. दुसरीकडे, गोऱ्या क्रिकेटपटूंमध्ये राष्ट्रीय संघातून खेळण्याऐवजी काही वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये खेळून काढण्याची प्रवृत्ती बोकाळल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटची सार्वत्रिक घसरण सुरू झाली आहे. याउलट भारतात क्रिकेटचा विकास तळागाळापर्यंत होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वामुळे एरवी निव्वळ आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये आलेले तरुण आवर्जून कसोटी क्रिकेटमध्ये येत आहेत. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव ही ठळक उदाहरणे. भारतीय मैदानांवर खेळताना चांगले फलंदाज आणि निष्णात फिरकी गोलंदाज हे या संघाच्या आजवरच्या यशाचे गमक होते. विराट कोहलीने मात्र वेगळा विचार केला. त्याने आग्रहाने भारतीय मध्यम-तेज गोलंदाजी विकसित करण्यावर भर दिला. परिणामी परदेशी मैदानांवर भारतीय संघ सातत्याने कसोटी सामने जिंकू लागला आहे. ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी नोंदवला गेलेला ऐतिहासिक पहिलावहिला कसोटी मालिका विजय या बदललेल्या मानसिकतेचे निदर्शक आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या खेपेला आपण कसोटी मालिका १-२ अशी गमावली. तरीही त्या एकमेव विजयामध्ये भारताने चार तेज गोलंदाज खेळवले नि पाचवा हार्दिक पंडय़ा, जो स्वत: एक मध्यमगती गोलंदाजच आहे. हा निर्णय धाडसी होता, पण तो यशस्वी ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेच्या आधी जसप्रीत बुमरा जायबंदी झाल्यामुळे त्याला विश्रांती देणे भाग पडले. मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा यांनी त्याची उणीव जाणवू दिली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीला प्रत्येक वेळी शमी आणि यादवने स्थिरावण्याची उसंतच दिली नाही. भारतीय मैदानांवर फिरकी गोलंदाजांबरोबरीने मध्यम-तेज गोलंदाज बळी घेऊ लागले आहेत. शिवाय एखादा गोलंदाज गैरहजर असेल तरी त्याची जागा घेण्यासाठी तितक्याच क्षमतेचा गोलंदाज तयार आहे. देशी आणि परदेशी मैदानांवर प्रतिस्पध्र्याचे २० बळी घेऊ शकणारी सक्षम गोलंदाजी हे भारताच्या वर्चस्वाचे मुख्य कारण आहे. याच जोरावर भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत काही काळ अव्वल स्थानावर विराजमान आहे. याच कारणास्तव कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे. रोहित शर्माला सलामीला खेळवण्याचा निर्णय भलताच फळला. या निर्णयाचे श्रेयही विराटलाच द्यावे लागेल. या दोन फलंदाजांतील सुप्त आणि व्यक्त स्पर्धेचा झाकोळ विराटच्या संघहित प्राधान्यावर आलेला नाही हे महत्त्वाचे. कसोटी क्रिकेटला विराट अनन्यसाधारण महत्त्व देतो. म्हणूनच भारतातील पाच प्रमुख केंद्रांवरच (मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बेंगळूरु) ते खेळले जावे, याविषयी तो आग्रही आहे. गतकाळातील वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांप्रमाणेच भारताचा हा संघ येती काही वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणार याचे स्पष्ट संकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील विजयामुळे मिळालेले आहेत.