News Flash

कणखरपणाचा अगतिक चेहरा

पत्रकार परिषदांमुळे लक्ष विचलित होऊन या ताणात भरच पडते असे तिने स्पष्ट केले आहे.

विख्यात टेनिसपटू नाओमी ओसाकाने मानसिक ताणाचे कारण देऊन फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. हा निर्णय सर्वस्वी तिचा, की तसा तो घेण्यासाठी तिला भाग पाडले गेले, यावर चर्चा होत राहील. फ्रेंच स्पर्धा रविवारी सुरू झाली, त्याच्या आधीपासूनच ओसाका आणि स्पर्धेचे संयोजक यांच्यात एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून मतभेद झाले होते. प्रत्येक सामन्यानंतर पत्रकार परिषदेला हजर राहावे लागेल, असा फ्रेंच स्पर्धेतील एक नियम. असे नियम क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ अशा बहुतेक खेळांमध्ये उच्चस्तरावर अमलात येत असतात. माध्यमे हे कोणत्याही क्रीडास्पर्धेचे महत्त्वाचे अंग असल्यामुळे पत्रपरिषदांचा समावेश नियमावलीतच असतो. हे नाओमी ओसाकासारख्या व्यावसायिक टेनिसपटूला… त्यातही तिने चार-चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्यानंतर… माहीत नसण्याची शक्यता नाहीच. परंतु तिने या पत्रपरिषदांना घाबरून किंवा कंटाळून वा बिथरून माघार घेतली, की तीदेखील इतर बहुसंख्य खेळाडूंप्रमाणे मानसिक ताणाशी सामना करत असल्यामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला, हे पुरेसे स्पष्ट नाही. कदाचित या दोन्ही घटकांचा तिच्या निर्णयाशी संबंध असावा. यानिमित्ताने काही मुद्द्यांचा परामर्श घेणे आवश्यक ठरते. एखादी किंवा एखादा खेळाडू निव्वळ पत्रकार परिषदांसाठी आवश्यक चटपटीतपणा दाखवू शकत नसेल आणि त्याचा तिला गंड असेल, तर या कारणासाठी तिला माघार घ्यावी लागणे, यात नुकसान कोणाचे? याचे उत्तर आहे – नुकसान तर सर्वांचेच! ग्रँड स्लॅम स्पर्धांचे पोशाख आदींबाबत नियम व अटी असणे समजू शकते. परंतु प्रत्येक खेळाडू जितकी मैदानावर उत्तम खेळू शकते तितकी कदाचित संभाषण चतुर नसेल, तर तिच्या स्पर्धेतील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह कसे उपस्थित केले जाऊ शकते? हा धोका ओळखूनच ओसाकाने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आपण सामनोत्तर पत्रकार परिषदेस उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले. पहिल्या फेरीतील विजयानंतरही ती पत्रकार परिषदेस उपस्थित राहिली नाही म्हणून तिला दंड ठोठावण्यात आला. पण यापेक्षा अधिक कठोर शिक्षा होईल असे संयोजकांनी जाहीर केल्यानंतर तिने माघार घेतली. आपल्याला अनेकदा मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. पत्रकार परिषदांमुळे लक्ष विचलित होऊन या ताणात भरच पडते असे तिने स्पष्ट केले आहे. हे सगळे टाळता आले असते. गेल्या आठवड्यात ओसाकाने याविषयी प्रथम वाच्यता केल्यानंतरच तिचे व्यवस्थापक आणि फ्रेंच स्पर्धेची संयोजन समिती यांच्यात संवाद व्हायला हवा होता. त्याऐवजी फ्रेंच संयोजकच नव्हे, तर इतर तिन्ही ग्रँड स्लॅम स्पर्धा संयोजकांनी पत्रकार परिषदांची अपरिहार्यता अधोरेखित केली होती. ओसाकाचे गौरेतर असणे हे या वादाला नवीन परिमाण पुरवते. त्याचबरोबर, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक कणखरपणाही यशस्वी खेळाडूसाठी आणि विशेषत: दीर्घ यशप्रवासासाठी आवश्यक असतो, हे ओसाकाने ओळखले पाहिजे. फ्रेंच स्पर्धेत तिची मजल आजवर तिसऱ्या फेरीपलीकडे गेलेली नाही. तिच्या चार विजेतेपदांपैकी दोन ऑस्ट्रेलियन आणि दोन अमेरिकन खुल्या स्पर्धेतील आहेत. विम्बल्डनमध्येही ती आजवर फार यशस्वी ठरलेली नाही. परंतु बोर्ग, लेंडल, बेकर, सॅम्प्रस यासारख्यांनीही चारही ग्रँड स्पर्धा जिंकल्या नाहीत म्हणून त्यांच्या महानतेत उणीव आढळत नाही. फेडरर, नडाल, जोकोविच हे बिनीचे टेनिसवीर इंग्रजी नीट बोलू शकत नाहीत, याबद्दल त्यांच्याही मनात गंड नाही. ओसाका आज केवळ २३ वर्षांची आहे. तिला अजून बरीच मजल मारायची आहे. परंतु तिने उपस्थित केलेला मुद्दा स्पर्धा संयोजकांनीही गांभीर्याने घेऊन त्यातून काहीतरी मध्यममार्ग काढायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 12:06 am

Web Title: vulnerable face of toughness akp 94
Next Stories
1 ‘राजद्रोहा’च्या कालबातेचा वेध
2 अडीच लाखांचा हिशेब
3 लक्षद्वीपचा मुकाबला
Just Now!
X