क्रीडा क्षेत्रात कामगिरी आणि चिकाटी उंचावण्यासाठी बलवर्धक उत्तेजके घेण्याच्या (म्डोपिंग) प्रकाराला आळा न घातल्याबद्दल रशियातील क्रीडा व्यवस्था आणि क्रीडापटू वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हे प्रकरण आता गंभीर वळणावर आले असून, पुढील चार वर्षे ऑलिंपिक, पॅरालिंपिक, विश्वचषक फुटबॉल, युरो चषक फुटबॉलसह सर्व प्रमुख स्पर्धामधून रशियावर बहिष्काराची मागणी जोर धरत आहे. येत्या ९ डिसेंबरला जागतिक उत्तेजकविरोधी संस्था (वर्ल्ड अँटिडोपिंग एजन्सी – वाडा) रशियावर बहिष्काराची औपचारिक घोषणा करू शकते. ‘वाडा’च्या अनुपालन समितीने अलीकडेच म्हणजे २६ नोव्हेंबरला रशियन क्रीडा संघटनांवर बंदीची शिफारस केली आहे. ती अमलात आल्यास पुढील चार वर्षे रशियाच्या क्रीडा संघटनांना प्रमुख स्पर्धामध्ये सहभागी होता येणार नाही. रशियाच्या क्रीडापटूंना तटस्थ ध्वजाखाली खेळता येईल, पण त्यासाठी आपण उत्तेजके घेतलेली नाहीत, हे त्यांना सिद्ध करावे लागेल. २०१४ मध्ये रशियामध्ये सरकारपुरस्कृत डोपिंग सुरू असल्याची तक्रार प्रथम झाली होती. ते वर्ष महत्त्वाचे; कारण त्या वर्षीच हिवाळी ऑलिंपिकचे यजमानपद सोची या रशियन शहराकडे होते. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता म्हणून मिरवण्याची संधी यानिमित्ताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मिळाली होती. त्यांनी या स्पर्धेवर ५०० कोटी डॉलर उधळले. पण याच दरम्यान रशियन उत्तेजकविरोधी संस्था ‘रुसादा’ ही जागतिक डोपिंगविषयक निकष पाळत नसल्याचे ‘वाडा’ने जाहीर केले. ‘रुसादा’चे तत्कालीन प्रमुख ग्रिगोरी रॉदचेन्को अमेरिकेला पळून गेले. आपले क्रीडापटू आणि क्रीडा प्रशिक्षक डोपिंग करतच नाहीत, असा दावा रशियातर्फे वारंवार करण्यात आला. रॉदचेन्को यांना हे मान्य नव्हते. पण तेच लबाड आणि मानसिक स्वास्थ्य ढळलेले असल्याचा आरोप खुद्द पुतिन यांनी केला. त्यांच्यावरच उत्तेजके बाळगल्याचा आरोपही ठेवण्यात आला. ‘रुसादा’च्या प्रयोगशाळांना टाळे ठोकले गेले आणि रासायनिक नमुने जप्त केले गेले. संस्थेचे नवे प्रमुख युरी गानुस यांनी रशियाची प्रतिष्ठा पुनस्र्थापित करण्याचा चंग बांधला आणि प्रामाणिक पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘रुसादा’ला पुन्हा मान्यता मिळाली. मात्र एका अटीवर. या संस्थेने वाडाला सर्व जुने दस्तावेज आणि नमुने पुरवण्याचे बंधन घालण्यात आले. ही मागणी मान्य करण्यासाठी गानुस यांनी पुतिन यांना साकडे घातले. त्यानुसार वाडाकडे या वर्षांच्या सुरुवातीस दस्तावेज आणि नमुने सादर झाले, पण त्यात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक फेरफार करण्यात आल्याचे संस्थेच्या लक्षात आले. म्हणजे सरकारपुरस्कृत डोपिंग रशियामध्ये होत होते, या संशयाला पुष्टी देणारे पुरावेच पद्धतशीरपणे नष्ट करण्यात आले होते. गानुस या सगळ्या प्रकरणात तोंडघशी पडले. त्यांनी वारंवार खरी माहिती पुरवण्याविषयी आग्रह धरला. मात्र रशियाच्या सरकारने हा एकूणच प्रकार म्हणजे रशिया किंवा चीन या क्रीडा क्षेत्रातील महासत्तांची ‘बदनामी करण्याचा व्यापक कट’ असल्याची भूमिका घेतली आहे. या लपवेगिरीचा फटका रशियाला आणि विशेषत: तेथील अनेक प्रामाणिक आणि गुणवंत क्रीडापटूंना बसण्याची शक्यता आहे. वाडाच्या पद्धती पूर्णतया निर्दोष नाहीत. शिवाय डोपिंगशी संबंधित सर्वच गैरप्रकार हुडकून काढता येतील किंवा पूर्णतया प्रामाणिक क्रीडापटूंची संस्कृती निर्माण होईल असेही समजण्याचे कारण नाही. मात्र, वाडाचे निकष पाळणे आणि तरीही कामगिरी उंचावत राहणे फार अवघड नाही. शेवटी मुद्दा हा कामगिरीचा नसून प्रवृत्तीचा आहे. निष्णात ज्युदोपटूंना द्वंद्वात हातोहात लोळवणारे आणि उघडय़ा देहाने घोडेस्वारी करणारे अध्यक्ष पुतिन यांनी याविषयी गांभीर्याने विचार न केल्यास, त्यांच्या त्या चित्रफितीदेखील ‘फेक व्हिडीओ’ म्हणून अग्रेषित होऊ लागतील!