भाजपचे बुजुर्ग नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी शांता कुमार आणि यशवंत सिन्हा यांना साथीला घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात दंड थोपटले ही घटना वाटते तेवढी सहज नाही. मागच्या वेळी अशाच प्रकारे अडवाणी यांनी बंड केले होते. तेव्हा ते फारच केविलवाणे ठरले. याचे कारण अडवाणी हे आता पक्षातील संपलेला ऊजास्रोत आहेत. एकेकाळी पक्षावर मांड ठोकून असलेल्या अडवाणींची अवस्था केवळ वयपरत्वे आता उरलो सल्ल्यापुरता अशी झालेली नसून, त्यांची पक्षातील गरज सरल्याचे ते चिन्ह आहे. पक्षाची सत्ता आपसूक पुढल्या पातीकडे म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांचे उजवे हात अमित शहा यांच्याकडे संक्रमित झाल्यानंतर अडवाणी हे सत्ताकेंद्रापासून दूर फेकले गेले. त्यांच्या मागे त्यावेळीही पक्षातील काही वरिष्ठ नेतेमंडळी होती. परंतु त्यातील कोणीही स्वयंप्रकाशित नव्हते. अडवाणी यांची ती मोठी कमजोरी ठरली. असे असतानाही त्यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिले, ते हास्यास्पद ठरले. यावेळेची परिस्थिती वेगळी आहे. अडवाणींचे पहिले बंड हे मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना झाले होते. आताच्या बंडाला बिहारच नव्हे, तर दिल्लीच्या पराभवाचीही पाश्र्वभूमी आहे. त्या बंडाच्या वेळी अडवाणींना एकटय़ा सुषमा स्वराज यांची साथ होती. आता त्यांच्या साथीला मुरली मनोहर जोशी आणि मंडळी असून, पक्षातील रमणसिंह, वसुंधराराजे शिंदे, शिवराज चौहान, सुषमा स्वराज अशा काही बडय़ा नेत्यांचा त्यांना छुपा पाठिंबा आहे. ते बंड सत्तेच्या वरच्या स्तरातील होते. मात्र या बंडाला दुसऱ्या स्तरातील काही खासदारांचाही पाठिंबा आहे. अर्थात ही सगळी मंडळी एका बाजूला असली तरी जोवर मातृसंस्थेचा मोदींना बिनशर्त पाठिंबा आहे तोपर्यंत या बंडखोरांनी वाजविलेल्या तुताऱ्याही पिपाण्याच ठरतील. फरक आहे तो हाच. यावेळी या तुताऱ्या जोरात वाजत आहेत. याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. मोदी आणि शहा यांना थेट लक्ष्य करणारे जे पत्रक यशवंत सिन्हा यांच्या सहीने प्रसारित झाले आहे, ते मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानातून निघालेले आहे. ही गोष्ट महत्त्वाचीच; याचे कारण जोशी यांचे संघाशी असलेले नाते. संघशिस्तीत वाढलेल्या या नेत्याची ही कृती बेशिस्तीची असणे शक्य नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. या पत्रकाचे बोलविते धनी कोणी वेगळेच आहेत. हा विरोध संघभावनेनेच करण्यात आलेला आहे आणि आता त्याची धार बोथट करण्याचे कामही संघभावनेनेच सुरू असल्याचे दिसत आहे. अडवाणी हे भाजपाध्यक्ष असतानाही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि तेव्हाही ती सामूहिक जबाबदारी असल्याचेच गणले जात होते, हे नागपूरचे लाडके नेते नितीन गडकरी यांनी अडवाणी यांच्या लक्षात आणून देणे याचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे. म्हणजेच, अडवाणी-जोशी यांच्यामार्फत इशारा देण्याचे जे काम होते ते सफळसंपूर्ण झाले असून, आता बंडाचे ज्येष्ठ निशाण खाली उतरविण्याची वेळ आली आहे. असे प्रत्यक्षात होण्यापूवीं थोडी फार ओढाताण होईल. गडकरी यांनी केलेली कारवाईची भाषा ही मोदी-शहांचे समाधान करण्यासाठी कदाचित वास्तवात येईल. बाकी मग समजून घेणारांना योग्य तो इशारा मिळालेला आहे.