13 August 2020

News Flash

जल्पक नावाचे कावळे!

असहिष्णुतेविरोधातील लढाई किती कठीण आहे हेच अधोरेखित करणारे असे हे प्रकरण आहे.

वरिष्ठ पत्रकार व्ही. पी. रजीना

माहितीच्या महाजालामुळे माध्यमक्षेत्र खऱ्या अर्थाने खुले झाले. वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी ही औद्योगिक क्रांतीकाळातील जनमाध्यमे. परंतु त्यांच्याही मर्यादा होत्या. त्या इंटरनेटने ओलांडल्या आणि माध्यमांमधील लोकसहभाग वाढला. समाजमाध्यमे लोकांच्या हाती आली. एका अर्थाने माध्यम क्षेत्रात ही समाजमाध्यमीय लोकशाही अवतरली. मात्र लोकशाहीला नेहमीच एक धोका असतो, झुंडशाही बनण्याचा. उदाहरणार्थ, देशात आज असहिष्णुता वाढल्याची जी चर्चा सुरू आहे तिचे सर्वात मोठे कारण व्हॉट्सअ‍ॅपपासून फेसबुक, ट्विटपर्यंतच्या विविध समाजमाध्यमांतील झुंडशाही हेच असल्याचे दिसत आहे. झुंडशाहीला कोणताही विरोधी विचार पसंत नसतो. समाजमाध्यमांत हेच चित्र मोठय़ा प्रमाणावर दिसत असून, अनेक व्यक्ती- मग त्या सर्वसामान्य असोत की एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, साहित्यिक-कलावंत असोत की विचारवंत वा पत्रकार असोत- आज समाजमाध्यमांत वावरणाऱ्या जल्पकांच्या शाब्दिक हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि जसा दहशतवादाला धर्म नसतो त्या धर्तीवरच या जल्पनेलाही धर्म नसतो, हेही दिसून आले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याच्यावरील हल्ल्यांकडे पाहता येईल. त्याइतकेच उद्वेगजनक, परंतु त्याइतके प्रसिद्धीस न आलेले उदाहरण आहे ते केरळमधील एक वरिष्ठ पत्रकार व्ही. पी. रजीना यांचे. जमात-ए-इस्लमीच्या ‘माध्यमम्’ या मल्याळी दैनिकातील त्या एक साध्या उपसंपादक. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर एक लेख लिहिला आणि टीकेची सुनामीच उठली. काय होती त्यांची गर्हणीय चूक? त्या समाजातील असहिष्णुतेबद्दल बोलल्या नव्हत्या. त्यांनी कोणत्याही सत्ताधाऱ्यावर वा पक्षावर टीका करून देशद्रोहही केला नव्हता. त्या जात, धर्म, वंश याबद्दलही बोलल्या नव्हत्या. त्यांनी फेसबुकवर फक्त आपला अनुभव लिहिला होता. दोन दशकांपूर्वी त्या मदरशात शिकत होत्या. त्या वेळी त्यांनी तेथे ‘याचि देही याचि डोळा’ जे अनुभवले तेच त्यांनी तेथे मांडले होते. त्या काळात त्यांच्या सहाध्यायी विद्यार्थिनींचे मदरशातील उस्ताद कसे शोषण करीत असत याचा लेखाजोखा त्यांनी तपशीलवार दिला होता. आता यावर एक प्रश्न हमखास येतो की, हे लिहायला वा बोलायला यांना आताच कसे सुचले? आधी का बोलला नाहीत? असे हेत्वारोपी प्रश्न मूर्खच. पण रजीना यांनी हे लिहिले त्याला कारण होते केरळमध्ये सुरू असलेल्या लिंगभेदविषयक चर्चेचे. ते खरे तर अत्यंत वैयक्तिक अनुभव होते. ते सार्वत्रिक आहेत असेही रजीना यांचे म्हणणे नव्हते. तरीही ती धर्मसंस्थेवरील टीका मानली गेली आणि जल्पकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्यावर तुटून पडल्या. या जल्पकांनी तक्रारी करकरून त्यांचे खाते बंद करणे फेसबुकला भाग पाडले. अद्याप त्यांच्याविरोधात कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही की धर्मद्रोहाच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात कोणी फतवा काढलेला नाही. तरीही चिंताजनक भाग हा, की यातील बहुसंख्य जल्पक हे इतरांच्या असहिष्णुतेवर टीका करणारे आहेत. असहिष्णुतेविरोधातील लढाई किती कठीण आहे हेच अधोरेखित करणारे असे हे प्रकरण आहे. आपल्याविरोधी मते मांडणाऱ्यांवर एखाद्या कावळ्यासारखे तुटून पडणे हे फॅसिझमचे लक्षण. त्याची शिकार आता सर्वसामान्य विचारी मंडळीही होऊ लागली आहेत आणि जल्पक नावाचे कावळे मात्र वाढू लागले आहेत, हा समाजापुढील मोठा धोका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 12:51 am

Web Title: woman journalist targeted for fb post on abuse in madrasas
Next Stories
1 ‘कार्ट’ची बनते मग ढकलगाडी!
2 कागदावरचा कचरा!
3 हिंस्र गोंधळ!
Just Now!
X