06 December 2020

News Flash

समृद्ध.. सत्त्वशील!

यशवंत हे लाभलेले नामाभिधान वायएम यांनी यशाच्या परिणामांना शेकडोवेळा पार करून खरे ठरविले.

(संग्रहित छायाचित्र)

देशाच्या अर्थोद्योग क्षेत्रातील अवघ्या काही आदरणीय व्यक्तींतील एक यशवंत मोरेश्वर देवस्थळी बुधवारी निवर्तले. या क्षेत्रात एकेकाळी मराठी व्यक्तींचा दबदबा होता. अर्थ क्षेत्रात टाटा समूहातील द. रा. पेंडसे, अभियांत्रिकीतील सुमंत मुळगावकर, ‘सेबी’तील चंद्रशेखर भा. भावे आदी. अलीकडच्या काळात त्या पंगतीत ज्यांना मानाचे स्थान होते त्यातील एक देवस्थळी. आयुष्यातील ४२ वर्षे एकाच उद्योग समूहात सचोटीने काम करण्याइतकी स्थितीशीलता आणि हाच माणूस सतत नवीन जबाबदारी व महत्त्वांकाक्षेचा माग घेणारी साहसी कर्तबगारीही राखतो. आकडय़ांमध्ये रमणारा आणि टक्केवारीची भाषा जाणणारा माणूस गायन—संगीतांची उत्तम जाण व आवडही राखतो. माणूस शिस्तप्रिय असला की स्वच्छंदता, जीवनातील गोडी गमावतो वगैरे तर साफ झूठच. यशवंत मोरेश्वर अर्थात वायएम देवस्थळी साधेपणा जपतच  जीवन जगले; तरी त्यात नीरसता कधीही नव्हती. वायएम वयाच्या ७४ व्या वर्षी आपल्यातून निघून गेले. यशवंत हे लाभलेले नामाभिधान वायएम यांनी यशाच्या परिणामांना शेकडोवेळा पार करून खरे ठरविले.

सातवीपर्यंत मराठी माध्यमात महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण. कुटुंबात एकूण सात भावंडे. पुढे परिस्थितीची साथ नसतानाही चांगले शिक्षण घेता आले आणि ज्येष्ठ बंधूंच्या साथीमुळे कसल्याही अडचणी न येता सनदी लेखापाल होईपर्यंत त्यांना शिक्षण पूर्ण करता आले. हा सारा प्रवास मेहनत, समर्पण, धडपड, सचोटीतून त्यांनी साध्य केला. गुणवत्तेला अग्रक्रम देणाऱ्या, नेतृत्त्व गुण, कर्तबगारीची कदर असलेल्या लार्सन अँड टूब्रो (एल अ‍ॅण्ड टी) समूहात काम करण्याची संधी मिळाली आणि ‘यशाच्या बऱ्याच शिडय़ा चढता आल्या त्या या कंपनीत काम केल्यामुळेच,’ असे वायएम बिनदिक्कत सांगत असत. स्वभावातील हा विनय त्यांनी जीवनभर जपला. तथापि असंख्य व्यवधाने असलेल्या या महाकाय उद्योगाचे जटिल वित्तीय व्यवस्थापन सक्षमपणे सांभाळून कंपनीची तिजोरी मजबूत राखण्यात त्यांचे योगदान यातून तसूभरही कमी होत नाही. कंपनीच्या खतावण्या आणि वित्त व्यवहार वायएम यांनी हाताळायला सुरुवात केली तेव्हा डॉलरमागे रुपयाचे मूल्य सात रुपये होते आणि त्यांच्या निवृत्तीसमयी ते ७० रुपयांवर गेले होते. एल अ‍ॅण्ड टीचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि संचालक मंडळात सदस्यत्व वायएम यांना १९९५ साली मिळाले आणि २०११ मधील त्यांच्या निवृत्तीपर्यंत कंपनीचा ताळेबंद वार्षिक सरासरी २२.२ टक्के दराने फुगत आला, या त्यांच्या कर्तबगारी खुणा अमीट असून कोणीही त्या नाकारू शकणार नाही.

२०११ मध्ये एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज या नवीन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. एल अ‍ॅण्ड टीच्या पारंपरिक व्यवसायापेक्षा निराळ्या अशा वित्त व्यवसायाची सूत्रे पूर्णपणे त्यांच्या हाती आली आणि अल्पावधीतच, तगडी स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात त्यांनी या नवीन कंपनीला कौतुकपात्र स्थानावर नेऊन ठेवले. निवृत्ती कधीही न पाहिलेल्या या माणसाच्या निरंतरतेतही कधीच खंड पडला नाही. क्रियाशीलता, नवसर्जनाचा ध्यास सतत सुरूच राहिला. उलट व्याप उत्तरोत्तर वाढत गेला आणि सामाजिक क्षेत्रात नव्या मंडळींना प्रोत्साहन ते चित्रपट निर्मितीपर्यंत विस्तारला. वायएम म्हणायचे की, ‘‘भूतकाळात मी फारसा रमत नाही. आज आणि उद्या काय करायचे हेच जास्त भावते. तेच खरे तर आपली उमेद कायम ठेवत असतात.’’ जीवनात जे काही कमावले ते म्हणजे ज्ञान, अनुभव, संपत्ती आणि कीर्ती हे सर्व आपले मानायचे नसते, त्याचे आपण केवळ विश्वस्त असतो, हाच जीवनमंत्र त्यांनी कायम जपला. यशाची हीच खरी ओळख यशवंत देवस्थळी यांनी आपल्याला घडवून दिली आहे.

वायएम यांचे मोठेपण जसे त्यांच्या साधेपणात आहे त्यापेक्षा ते त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख दातृत्वात आहे. आज महाराष्ट्रातील शब्दश: असंख्य संस्था वायएम यांच्या सक्रिय आर्थिक प्रेरणेने अनेक उत्तमोत्तम कामे करीत आहेत. या दातृत्वाचा त्यांनी एका शब्दाने कधी उच्चार केला नाही. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमात ते मोठय़ा उत्साहाने सहभागी होत. त्यात प्रसिद्ध झालेल्या अनेक संस्थांत ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी जातीने हजेरी लावत. या संस्थांना आर्थिक मदत करणाऱ्या दात्यांची नावे प्रसिद्ध केली जातात. पण आपले नाव या यादीत कधीही येऊ नये, याची ते आवर्जून खबरदारी घेत. कित्येक कोटी रुपये त्यांनी महाराष्ट्रातील समाज जीवनाच्या समृद्धीसाठी स्वत:च्या खिशातून  खर्च केले. याच सामाजिक जाणिवेतून त्यांनी आपल्या पैशातून वृध्दाश्रम उभा केला. जे करायचे ते उत्तम, असा त्यांचा कटाक्ष असे.  गंभीर आजारपणाच्या काळातही त्यांनी आपली वैयक्तिक टापटीप सोडली नाही. गबाळेपणाचा-  मग तो आर्थिक, सामाजिक वा सौदर्यासक्तीबाबतचा असो, त्यांना मन:पूर्वक तिटकारा होता. त्यांच्या प्रत्येक कामातून त्यांचा उत्तमाचा ध्यास दिसून येतो. सामाजिक संस्थांना देणग्या दिल्या की आपले काम झाले, असे ते मानत नसत. या संस्थांची आर्थिक घडी नीट बसावी आणि त्यातून काही एक भरीव काम उभे रहावे असा त्यांचा कटाक्ष असे आणि त्यासाठी ते जातीने प्रयत्न करीत. त्यांचा व्यावसायिक अनुभव याकामी येत असे.

ते जितक्या साधेपणाने जगले तितक्याच साधेपणाने गेले. या उंचीच्या बंगाली वा मल्याळी व्यक्ती निवर्तल्यास तेथील सरकार, मुख्यमंत्री, राजकारणी त्यास मोठय़ा आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतात. वायएम यांच्या निधनावर आर्थिक राजधानी हाताळणाऱ्या धुरिणांना शब्दसुमनेही वाहण्याचे सुचले नाही. अर्थात, किशोरी आमोणकर यांना अंतिम वंदन करण्याची गरज तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, शिवछत्रीपतींचा बसता उठता जागर करणाऱ्यांना जिथे वाटली नाही, तिथे तितक्याच ताकदीचे काम वित्तक्षेत्रात करणारे वायएम यांच्या निधनाची दखल ही मंडळी घेतील, ही अपेक्षाच मूर्खपणाची. या सर्व क्षणिकांपेक्षा ते खरे यशवंत होते. क्षणभंगुर मनुष्यभूमीतून ते आता खऱ्या अर्थाने ‘देव’स्थळी गेले. ‘लक्ष्मी’ला ‘सरस्वती’ची साथ हवी असे मानणाऱ्या आणि उत्तम मार्गाने धन जोडोन ‘उदास विचारे वेच’ करणाऱ्या, संपत्तीपल्याडची समृद्धी आणि सात्त्विकता जपणाऱ्या  वायएम यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:06 am

Web Title: yashwant moreshwar devasthali one of the most respected personalities in the country economy passed away on wednesday abn 97
Next Stories
1 जोय बाबा सौमित्रदा!
2 ‘झाडीपट्टी’ची व्यथा!
3 मोडला नाही कणा, तरी..
Just Now!
X