सुचेता दलाल या पहिल्या बिझिनेस स्त्री-पत्रकार. नवं जाणून घेणं, तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि घटनांचे अन्वय लावण्याची चिकित्सक वृत्ती, संदर्भ गोळा करत,‘ता’वरून ‘ताकभात’ ओळखत त्यांनी अनेक ‘बातम्या’ मिळवल्या, प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये एन्रॉनसारखे ऊर्जा घोटाळे, दिनेश दालमियांसारख्यांनी आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेले घोटाळे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनमधील गडबडी उघडकीस आणल्याच, परंतु त्यांचे ५०० कोटी रुपयांचं ‘बिग बुल’ प्रकरण उघडकीस आल्याने इतिहास घडला.

बरोबर २५ वर्षांपूर्वीची गोष्ट! २३ एप्रिल १९९२ हा तसा नेहमीसारखाच उगवलेला दिवस! त्या दिवशी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर वरवर निरुपद्रवी वाटणारी, तीन कॉलम व्यापणारी बातमी प्रसिद्ध झाली होती. तिचा मथळा होता.

Maharashtra Man Beaten To Death
कोल्हापुरात रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने डोकं फोडलं, क्रिकेट रसिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
Father death Ranjan Pada Alibag Taluka
रायगड : रागाच्या भरात मुलाने केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू, अलिबाग तालुक्यातील रांजण पाडा येथील घटना
car accident due to tire burst Three dead and five injured
अमरावती : कारचा टायर फुटून भीषण अपघात; तीन ठार, पाच जण जखमी

५०० कोटी रुपयांची गडबड.

पशाची भरपाई करण्याबद्दल स्टेट बँकेचा ब्रोकरला आदेश.

आणि बातमी होती, ‘आपले सुरक्षित रोखे व ठेवींबद्दलच्या खतावण्या, त्यांचे हिशेब आणि त्याआधारे दिलेल्या आगाऊ रकमा या साऱ्यांच्या नोंदी नियमाबरहुकूम न आढळल्याने, त्यातील गोंधळ व घोटाळा शोधण्याचा निकराचा प्रयत्न ‘स्टेट बँक’ करीत आहे. बँकेच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकृत सूत्रांनुसार हा घोटाळा अब्जावधी रुपयांचा आहे. अलीकडे शेअर बाजारातील करोडो रुपयांच्या व्यवहारांमुळे चच्रेत असलेल्या ‘बिग बुल’चा त्यात हात आहे, असे सांगितले जाते. बँकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त आठ कोटी रुपयांचे चेक देऊन त्याने बाकीच्या रकमेचे रोखे देण्याचे कबूल केले आहे.’ इत्यादी इत्यादी

बातमी हादरवून टाकणारीच होती. त्यानंतर त्यासंदर्भातल्या बातम्या रोजच धडकू लागल्या. ‘तिळा तिळा दार उघड’, असं म्हणत चोरांच्या गुहेत प्रवेश मिळालेल्या अलिबाबाचे डोळे जसे विस्फारले असतील तशीच स्थिती हजारो कोटी रुपयांचे आकडे ऐकल्यावर लोकांची झाली असेल. पंचवीस वर्षांपूर्वी अशा अवाढव्य रकमांचे घोटाळे समाजाला अपरिचित होते. त्यानंतर शेअरबाजार एकदम गडगडला. लोक हवालदिल झाले.

साऱ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी ही बातमी कुणाला, कशी मिळाली? ती खरी आहे का, अशी शंका येणंही स्वाभाविक होतं. बातमी प्रसिद्ध होण्याच्या आदल्या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कार्यालयात वेगळंच नाटय़ रंगलं होतं. या वृत्तपत्राच्या अर्थविभागाच्या संपादकाकडून बातमी आली तरी एवढय़ा रकमेचा घोटाळा जाहीर करणारी, ज्यात मोठमोठी नावं असण्याची शक्यता दर्शवणारी बातमी छापण्यापूर्वी पुराव्यांची शहानिशा करायला हवी, असं वरिष्ठांना साहजिकच वाटत होतं. त्यावरून तिथे दोन मतं होती. रात्री उशिरापर्यंत चर्चा चालू होती. अर्थविभागाच्या संपादकानेच ती बातमी आणली होती आणि ती लगेच छापली नाही तर एका दिवसात सगळं प्रकरण दडपलं जाण्याची शक्यता होती. याची कल्पना असल्याने ती छापावी असा आग्रह होता. शेवटी रात्री खूप उशिरा, थेटपणे कुणाचं नाव न घेण्याच्या अटीवर मुख्य संपादकाने परवानगी दिली आणि २३ तारखेला त्या बातमीने इतिहास घडवला. अर्थात तो ‘बिग बुल’ म्हणजे हर्षद मेहता होता हे लोकांना ओळखू आलंच!

हा इतिहास घडवणारी बातमीदार, त्या अर्थविभागाचं संपादकपद सांभाळत होती सुचेता दलाल. बातमी सुचेताजींच्या नावानेच छापली गेली आणि त्यासाठी त्यांना अर्थातच मोठय़ा संघर्षांला तोंड द्यावं लागलं. पत्रकारितेत आल्यापासूनच सुचेताजी आर्थिक विषयांशी संबंधित, (बहुतेक वेळा स्फोटक अशा) वेगवेगळ्या बातम्या देत गेल्या, त्यामुळे सतत दडपणं, ताण होतेच. वयाच्या ऐन तिशीत हा एवढा मोठा घोटाळा बाहेर यावा यासाठी धडपड करीत असताना आपली चांगली नोकरीही पणाला लागलीय याची जाणीव त्यांना होतीच. तरीही ‘खरी बातमी’ बाहेर यावी व लोकांना सावध करावं या साठीची त्यांची धडपड महत्त्वाची वाटली. हा घोटाळा उघडकीला आणल्यापासून वर्षांच्या आत त्यांनी आपल्या जोडीदाराच्या- पत्रकार व लेखक देबाशीष बसू यांच्या साहाय्याने ‘The Scam- who won, who lost, who got away’- हे पुस्तक प्रकाशित केलं. अनेक रोमांचकारी घटना, त्यांची पाश्र्वभूमी याची योग्य गुंफण करत अत्यंत ओघवत्या भाषेत लिहिलेलं ते पुस्तक वाचल्यावर, सुचेता दलाल या व्यक्तीचाही शोध घ्यावासा वाटला आणि त्यांच्याशी बोलून सरळ त्यांची भेटच मागितली. स्पष्ट, परखड, कडक भाषेत लिहिणाऱ्या, आपल्या अभ्यासपूर्ण लेखनानं आणि सचोटीपूर्ण वागण्यानं पत्रकारितेच्या व्यवसायात मान मिळवणाऱ्या सुचेता! त्या आपल्याशी कशा बोलतील अशी मनात असणारी शंका पहिल्याच भेटीनंतर दूर झाली.

३० जानेवारी १९६१ रोजी मुंबईला जन्मलेल्या सुचेताला एक मोठी बहीण व लहान भाऊ. आई-वडील डॉक्टर. आई माहेरची भातखंडे. वडिलांची नोकरी बदलीची. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहणं झालं. घरात मराठीची सवय होती तरी, शिक्षण इंग्रजीत. बेळगाव येथे शालेय शिक्षण. घर तसं मध्यमवर्गीय. आई-वडिलांनी मुलगा-मुलगी असा फरक न करता तिघांनाही सारखंच वाढवलं. पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात शेअर मार्केट, त्यातील चढ-उतार, बॉण्ड्स, रोखे, ट्रेिडग आदी शब्दांशी सुचेताची ओळखसुद्धा नव्हती. आईने या मुलांना स्वावलंबी तर बनवलंच, पण मुख्य म्हणजे त्यांचं सामान्यज्ञान वाढवलं, जगातील व्यवहारांची कल्पना ते देत गेले. रोजच्या बातम्या-अर्थात रेडिओवर- ऐकल्या पाहिजेत असा नियम होता. त्यावर काही तरी बोलणं  होई. शाळेतील सगळ्या कार्यक्रमांत मुलांनी भाग घ्यायला हवा, मुलांचा सर्वागीण विकास व्हावा याबद्दल आई विशेष जागरूक असे. त्याबरोबरच त्यांचे पाय जमिनीवरच राहावेत हेही त्यांनी शिकवलं. बुद्धिमान सुचेता तशी फारशी बोलकी नव्हती, (आताही आवश्यक तेवढंच, ठाम पण मृदू बोलणं). बहीण मात्र बोलकी, लोकांत मिसळणारी, रमणारी! पण एन्.सी. सी.चा उपक्रम, कॅम्पला जाणं, एकटीनं, जबाबदारीनं राहणं, आपल्या कामाचं, वेळेचं नियोजन करत ते नीट पार पाडणं हे सुचेताच्या आवडीचं होतं.

त्यामुळेच स्टॅटिस्टिक्सची घेऊन पदवी घेतल्यावर, कायद्याची पदवी मिळवायची ठरवून ती मुंबईला आली आणि स्वतंत्रपणे मुलींच्या वसतिगृहात राहू लागली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिनं हॉटेल ओबेरॉयमध्ये दीड वर्ष नोकरीही केली, पदवी मिळवली. त्या काळात खूप अनुभव गाठीशी बांधले. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या बहुतेक जणी शिकाऊ पत्रकार किंवा चित्रपटक्षेत्रात धडपडणाऱ्या होत्या. त्यांचे एकेक विलक्षण अनुभव ऐकताना आपण पत्रकारच व्हायचं हा विचार पक्का होत गेला. आई-वडील डॉक्टर असले तरी मुलांनी तोच व्यवसाय निवडावा, असा  त्यांचा आग्रह नव्हता. पण पत्रकारितेशीही तशी काहीच ओळख नव्हती. नाही म्हणायला मुंबईला आल्यावर काही दिवस ती बहिणीकडे राहिली. ‘लोकसत्ता’चे पहिले संपादक त्र्यं. वि. पर्वते हे बहिणीचे सासरे. तिथे प्रथम पत्रकारितेशी ओळख झाली होती.

ओबेरॉयमधील नोकरीत जीव रमला नाही, पण एका वेगळ्या वातावरणाशी परिचय झाला. १९८४ मध्ये पत्रकार म्हणून ‘फॉर्च्यून इंडिया’ या नियतकालिकात आरंभ केला. त्या पहिल्या बिझिनेस स्त्री-पत्रकार. तरी नंतरच्या ‘बिझिनेस स्टॅण्डर्ड’मधील नोकरीच्या साडेचार वर्षांनी आपल्याला पत्रकार म्हणून घडवलं, असं सुचेताजींना वाटतं. नवं जाणून घेणं, तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि घटनांचे अन्वय लावण्याची चिकित्सक वृत्ती यामुळे विषयाबद्दल आधी फारशी माहिती नसली तरी, संदर्भ गोळा करत,‘ता’वरून ‘ताकभात’ ओळखण्याचं कौशल्य वापरत त्यांनी अनेक ‘बातम्या’ मिळवल्या, प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये एन्रॉनसारखे ऊर्जा घोटाळे, दिनेश दालमियांसारख्यांनी आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेले घोटाळे, स्टॉक होिल्डग कॉर्पोरेशनमधील गडबडी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

दोन वर्षांपूर्वी ‘मनीलाइफ’च्या मासिकातील एका लेखात ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’मधील अफरातफर त्यांनी उघडकीला आणली. त्यामुळे आपली बदनामी झाली असं म्हणत ‘एनएसई’ने त्यांच्यावर १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा लावला होता. गेल्याच महिन्यात त्या दाव्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. ‘एनएसई’ला पन्नास लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला. मात्र यातील ४७ लाख रुपये ‘टाटा कॅन्सर हॉस्पिटल व मसीना हॉस्पिटल’ यांना देऊन आपल्या खर्चापोटी केवळ तीन लाख सुचेता व देबाशीष यांना मिळतील अशी व्यवस्था आहे. वाटले, ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ असं यांच्या बाबतीत म्हणता येईल.

१९९२ सालचा आर्थिक घोटाळा हा त्या वेळेपर्यंतचा सर्वात मोठा, पहिला घोटाळा होता. त्याचा आकार एवढा प्रचंड होता की, लोकांना किंवा त्या क्षेत्रातील इतरांनाही त्याची खरी व्याप्ती आरंभी कळलीच नाही. बोफोर्स घोटाळ्याच्या पन्नासपट अधिक होती. उघडकीस आलेल्या या घोटाळ्याने शेअरबाजारात बॉम्बस्फोटच झाल्यासारखी स्थिती झाली. फेरवानींसारख्या काही संबंधितांचे अचानक मृत्यूही झाले. योगायोगाने, वर्षांच्या आत शेअरबाजार साखळी बॉम्बस्फोटांनीही हादरला.

सुचेताजींनी ‘स्कॅम’ या आपल्या पुस्तकासाठी, सट्टेबाजांसकट, असंख्य लोकांच्या मुलाखती घेत, शेअर बाजारातील उलाढालींची संपूर्ण, अंतर्गत माहिती मिळवलीय. ते तुकडे जोडत समग्र, सुसंबद्ध पट तयार केलाय. ललितेतर अशा या पुस्तकात एखाद्या उत्कृष्ट कादंबरीप्रमाणे कथानकाची गुंफण करत, त्यातील उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवली आहे. या खेळातील सारे खेळिये अतिशय तयारीचे होते. त्यांची कार्यपद्धती, मनोभूमिका, काय होती हे सांगणारी शब्दचित्रं इतक्या नेमकेपणाने व तपशीलवार रेखाटली आहेत  की, ती सारी माणसं वाचकांच्या डोळ्यांसमोर साक्षात उभी राहतात. पुन्हा हे सारं वास्तव आहे याचा विसर त्या पडू देत नाहीत, सोप्या भाषेत समजावून देतात. यातील आणखी नोंद घेण्याजोगी बाब अशी की, स्वत: केलेलं एवढं मोठं धाडस, पत्करलेले धोके यांचा कुठेही उल्लेख नाही. ‘मी-आम्ही’ला एवढं बाजूला ठेवण्याचा त्यांचा निश्चय व तटस्थपणा तेथे सहजतेने दिसतो.

मात्र कोणताही मोघमपणा न ठेवता परदेशी बँका, स्वदेशी बँका, त्यातील अधिकारी, सरकारी बाबू, उच्चपदस्थ या साऱ्यांच्या चुका त्यांनी त्यांच्या पदरात घातल्या आहेत. कदाचित त्यामुळेच, सरकारी यंत्रणा हालल्या. अर्थसुरक्षेसाठी शेअर डिमॅट करण्यासारखे काही उपाय योजावे लागले. काही नियम नव्याने केले गेले. १९९३-९४ या वर्षांत या पुस्तकाने सर्वाधिक खपाचा विक्रम केला. त्यानंतर हे पुस्तक २००१ मध्ये नवीन माहितीसकटो From Harshad Mehta to Ketan Parekh -The Scam या नावानं प्रसिद्ध झालं. आर्थिक उदारीकरणाचा आरंभ झाल्यावर साऱ्या विधिनिषेधांना गुंडाळत झटपट पैसे मिळवण्याची माणसाला सुटलेली प्रचंड हाव, आत्यंतिक स्वार्थ हे सामाजिक रोग साथीसारखे वेगाने पसरत होते. हर्षदप्रमाणेच केतनने एकविसाव्या शतकाच्या स्वागता(?) साठी आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये घोटाळे केले. ती  कहाणी यात समाविष्ट केली आहे. त्यामुळे एका तपाच्या काळातील शेअरबाजाराच्या इतिहासाचं दस्तावेजीकरण यात झालं आहे.

गेली दहा वर्ष सुचेता दलाल व देबाशीष बसू स्वतंत्र रीतीने आपल्या ‘मनीलाइफ फाऊंडेशन’तर्फे अर्थसाक्षरता वाढवणं, सुरक्षित आर्थिक व्यवहारांबाबतचं समाजप्रबोधन करणं, सामान्यांच्या त्याबाबतच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणं, ही कामं करत आहेत. त्यासाठी विविध चर्चासत्रे, गाठीभेटी, समुपदेशन असे अनेक पर्याय वापरत आहेत. माणसामधील उद्यमशीलता, सर्जनक्षमता, आव्हानं झेलण्याची तयारी, चाकोरीबाहेर जात नवं विश्व उभारण्याची धडपड या गुणांची कदर सुचेताजींना मनोमन आहे. त्यांनीही आपल्या आयुष्यात नवनवीन आव्हानं यशस्वीपणे झेलली आहेत. त्यामुळे न रुळलेल्या वाटेने जाणाऱ्या अशा ‘पाथब्रेकर्स’बद्दल त्यांना कुतूहल होतं. त्यांपैकी निवडक व्यावसायिक, उद्योजक, कलावंत, यांच्या दीर्घ मुलाखती घेऊन त्या ‘पाथब्रेकर्स’ या नावाने दोन खंडांत प्रकाशित केल्या आहेत. शिवाय आर्थिक क्षेत्रात धाडसी प्रयोग करणाऱ्या ए. डी. श्रॉफ यांचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. २००६ मध्ये सुचेताजी ‘पद्मश्री’च्या मानकरी ठरल्या. सेबीचे सल्लागारपद, ग्राहकोपयोगी व ग्राहकहितासाठी काम करणाऱ्या देशभरातील काही संस्थांचं विश्वस्तपद आदी मान त्यांना मिळालं.

समाजात बळावलेल्या सर्व प्रकारच्या नीतिभ्रष्टतेने व्यथित होणारी, कोणत्याही दडपणांना बळी न पडता, आमिषांना न भुलता, साधी राहणी स्वीकारत, सचोटी व नि:स्पृहता अंगी बाणवणारी, समाजाप्रति असणारे आपलं उत्तरदायित्व पार पाडण्याचा निकराचा प्रयत्न करणारी सुचेता म्हणजे खऱ्या अर्थाने मुक्त स्त्री वाटते.

सुचेता दलाल (१९६१)

द स्कॅम, पाथब्रेकर्स (दोन भाग), (सहलेखन)

ए. डी. श्रॉफ – टायटन ऑफ फायनान्स अ‍ॅण्ड फ्री एन्टरप्राइज.

पत्रकारितेतील लक्षणीय कामगिरीबद्दल चमेलीदेवी पुरस्कार, मुंबई पत्रकार संघ पुरस्कार व फेमिना वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्कार.

डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com