18 October 2018

News Flash

शब्द शब्द जपून ठेव

तो दिवस होता १५ फेब्रुवारी १८६७.

तो दिवस होता १५ फेब्रुवारी १८६७.

सेंट पीटर्सबर्ग येथील कॅथ्रिडलमध्ये लग्न झालं आणि नवदाम्पत्य घरी आलं. वधू होती २० वर्षांची, अ‍ॅना  ग्रीगरयेवना स्नित्किना आणि वर होता ४५ वर्षांचा, फ्योदोर मिखाइल दस्तयेवस्की. जोडा विजोडच होता. दोघांमध्ये वयाचं अंतर पाव शतकाचं आणि व्यक्तित्वं तर फारच वेगळी. तो सक्तमजुरीची शिक्षा, तुरुंगवास भोगलेला, विजनात राहिलेला. अयशस्वी लग्न आणि नंतर विधुरावस्था, कर्जबाजारी, नेहमीच आकडी येत असल्याने दुर्बळ शरीराचा, जुगाराचा विलक्षण नाद असणारा, एकाकी, आयुष्याच्या काळ्या छायेचाच अनुभव असणारा; तर ती- अ‍ॅना म्हणजे मुसमुसणारं तारुण्य आणि सळसळतं चतन्य, संपन्न घरात जन्मलेली, कशाचाही अभाव, कोणताही ताणतणाव, दु:ख यांची ओळख नसणारी!

हे लग्न टिकेल? ती दोघे सुखी होतील? तिच्या व्यक्तित्वातील कणखरपणा आणि खोली तिला जाणवली नसली तरी दस्तयेवस्कीला मात्र जाणवली होती आणि म्हणूनच तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. मात्र अ‍ॅनाला तरी त्या वेळी याची तेवढी जाणीव नव्हती. ती आपल्या ‘आठवणीं’मध्ये लिहिते, ‘लग्नाची तयारी त्यानेच केली होती. खूप लोक छान छान कपडे घालून आले होते. बँडही चांगला होता; पण माझ्याभोवती जणू धुकंच होतं. मला यातलं सगळं स्वच्छ आठवत नाहीये. नंतर इतरांनी सांगितलं की, मी त्या वेळी खूपच अशक्त, पांढरी पडल्यासारखी दिसत होते. चर्चमध्ये मी कशी शपथ घेतली? बहुतेक पुटपुटल्यासारखंच बोलले. आधी कोणी हात पुढे केला? कोण पुढे झालं? बहुधा फ्योदोरच असेल. आयुष्यभर मी त्यालाच तर पुढे जाऊ दिलं ना!’ तिच्या या समजूतदारपणामुळे आणि दोघांच्या परस्परांवरील उत्कट प्रेमामुळे त्यांचं वैवाहिक जीवन फार सुखाचं गेलं, एवढंच नाही तर या प्रतिभावंताकडून त्याच्या आयुष्यातील उत्तम लेखन या काळात झालं, त्याला आर्थिक यश, प्रसिद्धी मिळाली. अ‍ॅनाने रोजनिशीबरोबर आत्मचरित्रपर आठवणी लिहिल्या आणि दस्तयेवस्कीची दोन चरित्रंही लिहिली.

केवळ चार महिन्यांपूर्वीच्या ओळखीवर अ‍ॅना या विवाहाला कशी तयार झाली? तिच्या ‘आठवणीं’तून अनेक बाबींचा उलगडा होतो. त्याचं असं झालं होतं, ३ ऑक्टोबर १८६६ रोजी सकाळी अ‍ॅना ग्रीगरयेवना स्नित्किना सेंट पीटर्सबर्ग येथे एका ठिकाणी मुलाखतीसाठी गेली होती. आपलं शालेय शिक्षण नुकतंच पुरं करून, तिनं नव्याने सुरू झालेल्या लघुलेखनाच्या (स्टेनोग्राफीच्या) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. शिकता शिकता छोटीशी नोकरी करून थोडे पैसे मिळवावे, आईवडिलांवरचा आपला आर्थिक भार कमी करावा, असं तिला वाटत होतं. तेवढय़ात नोकरीची ही संधी आली होती. अ‍ॅनाला आदल्या रात्री झोप आली नव्हती. मुलाखतीची उत्कंठा तर होतीच, पण मनात भीतीही होती, कारण ते घर होतं, प्रसिद्ध रशियन लेखक फ्योदोर दस्तयेवस्की यांचं!

उच्चपदस्थ अधिकारी असणारे तिचे वडील दस्तयेवस्कीचे मोठे चाहते होते. तिलाही त्यांचं लेखन आवडत होतं; पण आपल्या या आवडत्या लेखकाला भेटण्याचा वा त्यांच्या हाताखाली नोकरी करण्याचा विचार तिच्या मनातही आला नव्हता. मग आपण आपल्या भावी पतीच्या घरात प्रवेश करतोय याची तरी तिला कल्पना कशी येणार? ती जेव्हा त्याच्यासमोर उभी राहिली, तेव्हा फ्योदोरने तिला काही जुजबी प्रश्न विचारले आणि थोडासा मजकूर लिहायला सांगितला. त्याचा सांगण्याचा वेग आणि तिचा लिहिण्याचा वेग जुळेना. ‘‘काय लिहिलं आहे ते दाखव बरं!’’ असं म्हटल्यावर अ‍ॅनानं लिहिलेली वाक्यं घाबरतच वाचून दाखवली. ते ऐकून कपाळाला हात लावत तो खालीच बसला. ‘‘हे अशा पद्धतीनं चालू राहिलं तर काही आशा नाही. प्रोफेसर ओल्खिनची सगळ्यात हुशार विद्याíथनी ना तू? पण तू तर काहीच नीट लिहीत नाहीयेस. माझं कसं होणार आता?’’ अ‍ॅना हळू आवाजात म्हणाली, ‘‘तुम्ही थोडं सावकाश सांगा आणि मग बघा.’’ नाइलाजाने त्याने मान डोलावली. आपल्यासाठी सिगरेट काढली आणि तिलाही देऊ केली. तिने ती नाकारली. त्याच्या चेहऱ्यावर एक क्षण हसू तरळलं. त्यानं तिची परीक्षा घेतली होती. तिची नोकरी पक्की झाली. पगार फार नव्हताच. पशाची निकड असल्याने फ्योदोरने प्रकाशकाकडून आगाऊ रक्कम घेतली होती व त्यासाठी मानहानीकारक अटी स्वीकारल्या होत्या. जर त्या महिन्यात कादंबरी पुरी झाली नाही तर त्याच्यावर खटला भरला जाणार होता. मित्रांनी सुचवल्यावरून तो साहाय्यक-स्टेनो ठेवायला तयार झाला होता. यानिमित्ताने ती त्याच्याकडे आली होती. तिचा आश्वासक स्वर त्याला शांत करता झाला आणि मग तो नीट डिक्टेशन देऊ लागला. आपली अडचण त्याने तिला सांगितली. अ‍ॅना तिथे बसून डिक्टेशन घेई आणि मग घरी जाऊन ते सगळं नीट लिहून काढे. सांगितलेल्या मजकुराबद्दल मधूनच तो तिला काही प्रश्न विचारी, तिची प्रतिक्रिया अजमावे. मधल्या चहाच्या सुटीत तिच्याशी गप्पा मारे. दोनच दिवसांत ते एकमेकांबरोबर रुळले. ५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आणि ठरवल्याप्रमाणे ३१ तारखेला कादंबरी पूर्ण झाली. ती कादंबरी होती, ‘द गॅम्बलर’. सव्वीस दिवसांत त्याने एक महत्त्वाची साहित्यकृती पुरी केली होती. त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार आता त्याला भीती दाखवेनाशी झाली. आपल्या व्यसनाधीन जीवनाच्या अनुभवातून एका सर्जनशील कलावंताने केलेली ती उत्कट निर्मिती होती. त्याच्या निर्मितीत आपण एवढा प्रत्यक्ष भाग घेऊ शकलो याचा तिला आनंद झाला. तिच्यामुळे आपण अत्यंत नामुष्कीच्या प्रसंगातून वाचलो असं त्याला वाटलं.

विवाह झाला तरी दस्तयेवस्कीच्या नातेवाईकांनी तिला स्वीकारलं नाही. त्याची पहिली बायको सापत्य घटस्फोटिता होती. तिच्या मृत्यूनंतरही फ्योदोरचा तरुण, सावत्र, निरुद्योगी मुलगा तिथेच सावत्र वडिलांच्या पशांवर राहात होता. भावाच्या कुटुंबाची व कर्जाची जबाबदारीही त्याने आपल्या अंगावर घेतली होती. ही सारी बांडगुळे अ‍ॅना घरात आल्यावर मत्सरापोटी तिचा अक्षरश: छळ करू लागले. लग्नानंतर दोनच महिन्यांत एप्रिल १८६७ मध्ये नवदाम्पत्य युरोपला जायला निघालं. जर्मनी, इटली, स्वित्झर्लन्ड इथे त्यांचं वास्तव्य झालं. आरंभी तीन-चार महिन्यांसाठी गेलेलं हे दाम्पत्य चार वर्ष रशियाबाहेर राहिलं. या काळात अ‍ॅनाची फार कोंडी झाली. नवऱ्याच्या स्वभावाची तशी फारशी कल्पना नाही, इतर कुणी फारसं ओळखीचं नाही. शिवाय नवरा पुन्हा जुगाराच्या नादी लागून पैसे घालवत असलेला. त्याच वेळी तिनं मनाला विसावा म्हणून रोजनिशी लिहायला सुरुवात केली. रोजनिशी लिहिणं हे तिच्या दृष्टीनं अनेक कारणांसाठी महत्त्वाचं होतं. तापट फ्योदोरला समजावून घेताना त्याला न दुखवता अनेक गोष्टी कराव्या लागत होत्या. त्याबद्दलची तिची मतं, तक्रारी व्यक्त करायला हे एक साधन होतं. ती तिची प्रिय सखी झाली होती.

नवीन जागी गेल्यावर तेथील लोक, प्रथा, अनुभव यांचे तिने केलेले लेखन म्हणजे मूलभूत स्वरूपाचे दस्तावेजीकरण आहे. त्यांच्या प्रवासात दस्तयेवस्की अनेक गोष्टींबद्दल तक्रार करीत असे. पैसे मिळवण्यासाठी रस्त्यावर गाणी म्हणणारे, वाद्यं वाजवणारे लोक, चहाऐवजी कॉफी प्यावी लागणे, जर्मन, ज्यू लोकांचे वर्तन अशी त्याच्या तक्रारींची यादीच तिनं दिली आहे; पण या ‘आठवणीं’तील सगळ्यात महत्त्वाचा आणि रोचक भाग म्हणजे त्या दोघांत उमलत गेलेलं प्रेम. तिच्या पहिल्या गर्भारपणात तिला आईची, रशियाची फारच आठवण येत असे, त्या वेळी तिचे डोहाळे पुरवणारा नवरा, कोणी तिचं कौतुक केलं की मत्सराने तिच्यावर संशय घेणारा नवरा आणि मग मनातील शंका किती व्यर्थ होत्या ते लक्षात आल्यावर तिची मनधरणी करणारा नवरा अशी दस्तयेवस्कीची किती तरी रूपं तिनं रेखाटली आहेत. तिच्या जुगारी पतीला आपल्या मनावर याबाबतीत नियंत्रण ठेवता येत नव्हते. तो अनेकदा तिच्याजवळ कबुलीजबाब देई आणि पुन्हा तसाच वागे. देणी फेडता येत नसल्याने त्यांना रशियात लौकर परतता आले नाही. त्यांची पहिली मुलगी न्यूमोनिया होऊन वारली. मात्र तिचं दु:ख समजून न घेऊ शकलेल्या शेजाऱ्यांनी तक्रार करायला सुरुवात केली. त्या वेळी तिला घरची फार आठवण येत असे, रडू आवरत नसे. अशा वेळी तिचं सांत्वन करायला दस्तयेवस्कीच होता. अ‍ॅनाच्या रोजनिशींमध्ये एका असामान्य प्रतिभावंताच्या प्रेमाच्या अधिकारी आपण  आहोत याविषयी अनेकदा कृतज्ञता प्रकटताना दिसते. त्याप्रमाणे कट्टर देशभक्त रशियन हे रूपही दिसतं. टॉलस्टॉय पत्नी सोफियाप्रमाणेच अ‍ॅनाही, गृहिणी सचिव: सखी मिथ:प्रियशिष्या’ हा श्लोक सार्थ करणारी होती. प्रतिभावंताची पत्नी होण्यातली आव्हानं आणि सुखही त्यांनी झेललं होतं. रोजनिशी लिहिणं धोक्याचंच. विशेषत: त्या काळातील स्त्रियांना आपले खासगीपण राखण्याचे स्वातंत्र्य नसल्याने ती वाचली जाणं, त्यावरून कलह होणं सहज शक्य होतं. अ‍ॅनाने त्यात एक युक्ती केली. तिने आपलं सर्व लेखन स्टेनोग्राफीच्या संकेताक्षरांमध्ये लिहिल्याने ते इतरांना वाचणं शक्य नव्हतं. आपल्या काही रोजनिशा व आठवणी तिने दस्तयेवस्कीच्या मृत्यूनंतर नेहमीच्या भाषेत रूपांतरित केल्या, काही तिच्या मृत्यूनंतर केल्या गेल्या. त्यामुळे तिच्या लेखनाचा गरअर्थ वा गैरवापर झाला नाही. दस्तयेवस्कीचे चरित्रकार जोसेफ फ्रॅन्क यांनी तिच्या रोजनिशांचा वापर केला. त्यांचं म्हणणं असं की, अ‍ॅनाने लघुलिपीतही आपली काही वेगळी चिन्हं बसवली होती. ती शोधून काढणं फार जिकिरीचं होतं. इतक्या सावधपणे आपलं लेखन जपून ठेवणाऱ्या अ‍ॅनाचं कौतुक वाटतं.

वयाच्या ३५ व्या वर्षी वैधव्य आलं तरी तिनं पुढचं सारं आयुष्य दस्तयेवस्कीच्या पुस्तकांची, हस्तलिखितांची, त्याच्या अगणित पत्रांची  व्यवस्था लावण्यात, मुला-नातवंडांमध्ये घालवली. तिला एक आगळा छंदही होता- पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा. एकदा दोघांमध्ये काही वाद झाला व दस्तयेवस्कीने म्हटले, ‘‘स्त्रियांना चिकाटीपूर्ण, सातत्याने काहीच करता येत नाही.’’ त्याला आव्हान म्हणून अ‍ॅनाने हा नवीन छंद लावून घेतला आणि त्याच्या पुस्तकांचं प्रकाशन व पुढील सर्व व्याप सांभाळला. रशियन स्त्रियांमधील पहिल्या अल्पसंख्य तिकीट संग्राहकांपैकी अ‍ॅना एक होती. १८७१ मध्ये रशियाला परतल्यावर तिच्याच पुढाकाराने दस्तयेवस्कीने स्वत:ची पुस्तके स्वत: प्रकाशित केली व तो रशियातील पहिला लेखक-प्रकाशक बनला. त्याचा ब्रॅन्ड तयार करण्यात अ‍ॅनाचा मोठा वाटा होता. आपली सर्वोत्तम कृती- ‘ब्रदर्स कारामाझॉव्ह’ ही त्याने अ‍ॅनाला अर्पण केली आहे.

‘त्या २६ दिवसां’च्या काळात दस्तयेवस्की तिला आपला भूतकाळ, आपल्या आर्थिक अडचणी नेहमी सांगे. त्याची पात्रं नेहमी दु:खी असतात असे तिला वाटे. एकदा तिने विचारले, ‘‘तुम्हाला नेहमी कटू, दु:खी क्षणांचीच का आठवण होते? सुखी प्रसंग नाहीत का?’’ तो म्हणाला, ‘‘सुख म्हणजे काय हेच मला माहीत नाही. माझ्या स्वप्नातलं सुख मला कधी मिळेल असं वाटत नाही.’’ पण १८७१ ला रशियात परतल्यापासून त्याने जुगार पूर्णपणे सोडला होता. त्याच्याशी विवाह झाल्यापासून तिने त्याच्यावर सुखाची अक्षरश: उधळण केली होती. त्यामुळे १८८१ मध्ये मृत्यूच्या दारी असताना त्याने तिला म्हटले होते, ‘‘मी एकनिष्ठतेने तुझ्यावर अपार प्रेम केले. आज मी समाधानाने या अंतिम क्षणाला सामोरा जातोय. तू माझ्या ओंजळीत वासनांपलीकडचे आत्मिक सुखही भरभरून टाकले आहेस.’’ तिलाही यापरते काय हवे असणार?

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com

First Published on November 25, 2017 4:50 am

Web Title: articles in marathi on anna dostoyevskaya