23 July 2018

News Flash

जे वेड मजला लागले..

‘‘मी जेव्हा चार वर्षांची होते, तेव्हा इतर मुलांप्रमाणेच किल्ले, इमले उभारत असे.

नुकतीच एक बातमी वाचली. या वर्षी अमेरिकेतील ‘हनी अ‍ॅण्ड वॅक्स’ या पुस्तकांच्या दुकानातर्फे एका तरुण पुस्तकसंग्राहक स्त्रीला पुरस्कार देण्याची घोषणा झाली. लेखकांना जगभर मोठमोठे पुरस्कार मिळतात. हे आपल्याला माहीत आहे. आपल्याकडे काही वर्षांपूर्वी उत्तम वाचकालाही पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला जात असे. महिन्याभरापूर्वी ओहियो राज्यातील जेसिका कहान या २९वर्षीय ग्रंथपाल तरुणीला तो हजार डॉलरचा पुरस्कार मिळाला. हे पुस्तकांचे दुकान स्त्रियाच चालवतात. पुस्तकसंग्राहक स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार. त्यावरून आठवण झाली ती अ‍ॅन फॅडिमन या पुस्तकसंग्राहक आणि शब्दवेडय़ा लेखिकेची.

‘‘मी जेव्हा चार वर्षांची होते, तेव्हा इतर मुलांप्रमाणेच किल्ले, इमले उभारत असे. फरक एवढाच होता की, बहुतेक मुलं पत्त्यांची घरं बांधतात, पण मी मात्र माझ्या वडिलांच्या संग्रहातील, खिशात मावतील एवढय़ा आकाराची पुस्तकं घेऊन त्यांचे इमले बांधत असे. ती पुस्तकं म्हणजे त्यांच्याजवळील ट्रोलॉपच्या (सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखक) बावीस पुस्तकांचा संच होता. आमच्याजवळ खेळण्यातले लाकडी ठोकळे होते, पण मला ही पुस्तकंच आवडत. मध्यरात्रीच्या निळ्या प्रकाशासारखा त्यांचा रंग, मुलांच्या इवल्याशा हातात मावणारा आकार, अगदी पत्त्यांसारखीच, दारं आणि पूल बांधण्यायोग्य. आता ही वाक्यं लिहिता लिहिता ती मी माझ्या शेल्फमधून काढून हाती घेतली तेव्हा मला पूर्वीइतकाच आनंद झाला. मुलांनी पुस्तकं हाताळावीत, त्यांचे ढीग रचावेत, त्यावर मुलांच्या हातांचे ठसे उमटावेत, म्हणजे मुलांना पुस्तकांची खरी ओळख होते असं माझ्या आई-वडिलांना वाटे.’

जन्मापासूनच घरभर असणाऱ्या पुस्तकांच्या सहवासात राहात आलेली ही अ‍ॅन फॅडिमन (१९५३) अमेरिकेतील लेखिका, संपादक, झपाटलेली पुस्तकसंग्राहक. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या अ‍ॅनचे आई-वडीलही लेखक आणि पुस्तकसंग्राहक, वाचक. तिचे वडील क्लिफ्टन फॅडिमन मुळात रशियन ज्यू. आपल्या वडिलांबरोबर अमेरिकेत आले. ते निबंधलेखक, समीक्षक, संपादक, आकाशवाणीवरील ‘क्विझ’चे, टी.व्ही.वरील ग्रंथविषयक कार्यक्रम करणारे सूत्रसंचालक. त्यामुळे अमाप लोकप्रियता मिळालेली! आई दुसऱ्या महायुद्धात युद्धवार्ताहर म्हणून ‘टाइम’ या नियतकालिकासाठी वार्ताकन करण्यासाठी अतिपूर्वेच्या देशात गेली होती. घरात लेखनाचा, पुस्तकांचा खानदानी वारसा! अ‍ॅन म्हणते, ‘मला आठवतंय, तेव्हाच माझ्या आई-वडिलांच्या संग्रहात सात हजार पुस्तकं होती. शिवाय माझा भाऊ किम आणि मी-आमची ग्रंथालयं वेगळी होतीच. नंतर आई-वडील छोटय़ा घरात राहायला गेले. वडिलांना वयानुसार अंधत्व आलं तेव्हा पुस्तकांची विभागणी झाली तीही अपरिहार्य म्हणून!

हार्वर्डमधून बी.ए.ची पदवी घेऊन अ‍ॅन पत्रकारिता करू लागली. विद्यापीठात असताना वेण्डी लेसर व अ‍ॅन एका खोलीत राहात. पुढे वेण्डी समीक्षक, संपादक म्हणून प्रसिद्ध झाली. पहिल्या पाकिस्तानी महिला पंतप्रधान बेनझीर भुत्तो, चित्रपटनिर्माती कॅथलिन केनेडी या तिच्या शेजारच्या खोलीत राहात. त्यांचं वाचन, चर्चा यामुळे अ‍ॅनला बाहेरच्या जगाची थोडीफार माहिती, जाणीव झाली. तोवर तिचं जग हे पुस्तकं व फॅडिमन कुटुंबापुरतंच होतं.

अ‍ॅनचं पहिलं पुस्तक हे ललितेतर, संशोधनपर आहे. ‘द स्पिरिट कॅचेस यू अ‍ॅण्ड यू फॉल डाऊन’ (१९९७) या पुस्तकात तिने लाओसमधील ह-मॉन्ग (Hmong) जमातीतील लिया ली या छोटय़ा मुलीची व तिच्या कुटुंबीयांची खरीखुरी शोकांतिका लिहिली आहे. १९८८च्या सुमारास तिची व या लोकांची कॅलिफोर्नियातील मर्से (Merced) इस्पितळामध्ये भेट झाली. लीच्या जन्मानंतर लगेच तिला अपस्माराचा आजार झाला. तिचे आई-वडील, त्यांच्या समजुती, आध्यात्मिक श्रद्धा, त्यांच्या मुलीवरील उपचारांना यश न आल्याने त्यांना आलेली हतबलता आणि अमेरिकन वैद्यकीय व्यवसाय, व्यवस्था यांच्यात झालेला संघर्ष यांची ही कहाणी आहे. दोन संस्कृती, भिन्न भाषा, भिन्न परिस्थिती यांच्यातील हा संघर्ष अ‍ॅनला अस्वस्थ करत गेला. मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागल्यावर तिला अमेरिकी व्यवस्थेतील त्रुटी समजत गेल्या. तिने ते सारं स्पष्टपणे मांडलं. वैद्यकीय संस्था, महाविद्यालयं, मानववंशशास्त्राचे वर्ग यातील विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचण्याची शिफारस केली गेली. या पहिल्याच पुस्तकाला ललितेतर पुस्तकांसाठी असणारा यू. एस्. नॅशनल बुक क्रिटिक्स पुरस्कार मिळाला. लोकप्रियताही मिळाली. तिच्या लेखनशैलीमुळे वाचकांनी पुस्तक उचलून धरलं. संशोधनाचा चांगला अनुभव मिळाला. सध्या ती येल विद्यापीठाची पहिली निवासी प्राध्यापक-लेखक आहे. एकीकडे या पुस्तकाचं लेखन, ‘अमेरिकन स्कॉलर’ या प्रतिष्ठित मासिकाचं संपादन आणि नव्यानं मांडलेला संसार अशी तिची धावपळ चालू होती. जॉर्ज कोल्ट या लेखक-संपादकाशी तिनं लग्न केलं. तोही तिच्यासारखाच पुस्तकप्रेमी, संग्राहक, मनस्वी वाचक आहे. दोन मुलंही झाली. पण त्यामुळे पुस्तकं दूर न जाता उलट अधिक जवळ आली असं तिला वाटतं.

तिची पुढची दोन पुस्तकं आहेत ती ललितनिबंधांची. एक आहे पुस्तकांवरचं पुस्तक. Ex Libris : Confessions of a Common reader (१९९८) या आपल्या पुस्तकातून ती ग्रंथसंबंधित अनेक गोष्टींबद्दल, ग्रंथसंग्रहांबद्दल विलक्षण आत्मीयतेनं पण तितक्याच बारकाव्यानं लिहिते. (Ex libris म्हणजे From the library of- पुस्तकांबद्दल लिहिताना आपल्या मनातलं, तिला सांगायचंय. म्हणून ही लेखरूपी कबुली. ‘कॉमन रीडर’ हा व्हर्जिनिया वूल्फने वापरलेला शब्द तिनं वापरलाय. ती म्हणते, ‘मी समीक्षक नाही आणि संशोधकही नाही. मी आहे माझ्या आनंदासाठी वाचणारी सामान्य वाचक.’

दुसरा लेखसंग्रह आहे, अ‍ॅट लार्ज अ‍ॅण्ड अ‍ॅट स्मॉल (२००७). पण ती त्यांना ‘शिळोप्याच्या गप्पा’ किंवा ‘गजाली’ असं मानते. हा संवाद आहे. समोर एखाद-दुसरा मित्र आहे, हातात आवडतं पेय आहे आणि वृत्ती सैलावल्या आहेत, उद्याची घाई नाही, अशा वेळी केलेल्या या गप्पा आहेत. त्यात पुस्तकं, लेखक, लेखन याविषयीच लिहिलंय. छोटय़ा, परिचित बाबींचा विचार चिंतनशीलतेनं, तर गंभीर गोष्टींचा विचार हलक्याफुलक्या रीतीने केलेला दिसतो. आइसक्रीम, कॉफी, फुलपाखरं, याबरोबरच कोलरिज, चार्ल्स लॅम्बसारखे ललितलेखक, असे तिच्या या गप्पांचे विषय आहेत. डोळे तपासणीसाठी गेल्यावर त्या औषधाने डोळे विस्फारले जातात त्यामुळे लहान वस्तू मोठय़ा दिसतात. तर कधी त्या लहान दिसतात. तिच्या विषय निवडीत आणि हाताळणीत हाच हेतू दिसतो.

तिचं सारं विश्वच पुस्तकमय आहे. आपला व नवऱ्याचा ग्रंथसंग्रह वेगवेगळा, मुलांचा वेगळा. ज्या घराच्या भिंतींना पुस्तकांची उघडी शेल्फ टेकलेली नाहीत, ज्या भिंती चित्रांसाठी फक्त पाश्र्वभूमी म्हणून उपयोगात येतात, त्या भिंती तिला उघडय़ावाघडय़ाच वाटतात. कधी व्हिक्टोरियन काळातील लेखकांप्रमाणे, कधी केवळ देशांप्रमाणे तर कधी एका लेखकाच्या सर्व पुस्तकांसाठी एकेक कप्पा अशी वेगवेगळी रचना करत पुस्तकं लावणं मनापासून आवडणारी अ‍ॅन. स्पर्श-गंधादी पाचही संवेदनांनी पुस्तकांचा आस्वाद घेताना होणाऱ्या आनंदाचं वर्णन ती या लेखांतून करतेच, पण त्या प्रत्येक वेळी तशाच आवडीनिवडी असणाऱ्या लेखकांनी, मित्रांनी त्या त्या वेळी काय केलं, त्याबद्दल काय लिहिलं हेही ती सांगत जाते. उदाहरणार्थ, घर बदलताना वडील आधी पुस्तकांसाठी शेल्फ कशी करून घेत हे सांगताना, पालक व मुलं यांच्यातील संबंध पुस्तकांवरून कसे ठरत जातात हे तर ती सांगतेच पण रशियन लेखक व्लादिमीर नाबोकोव्ह याने आपल्या डायरीत आपला आठ वर्षांचा मुलगा पुस्तकांच्या रंगावरून मुळाक्षरं कशी ओळखायचा याची केलेली नोंदही अ‍ॅनला आठवते.

कापडीबांधणीतील, चामडय़ाच्या बांधणीतील पुस्तकं, पुस्तकांच्या पहिल्या आवृत्ती, लेखकांनी स्वाक्षरी केलेल्या दुर्मीळ प्रती, प्रतिभावंतांचं ग्रंथप्रेम, ग्रंथसवयी याविषयी ती लिहिते. तिच्या लेखनातील सूक्ष्म विनोद, शाब्दिक कोटय़ा, अचूक शब्दयोजना, एखाद्या शब्दाच्या रूढ अर्थापेक्षा शब्दकोशानुसार योग्य अर्थ नेमक्या ठिकाणी वापरणं, तिची चिंतनशील विधानं हे सगळे तिचे लेखनविशेष मुळातच वाचून अनुभवायला हवेत असे आहेत.

ग्रंथप्रेमी ग्रंथांची हाताळणी दोन प्रकारे करतात. कुणाचं प्रेम खानदानी, दरबारी पद्धतीनं व्यक्त होतं तर कुणी धसमुसळेपणानं, रांगडेपणानं प्रेम करतो. त्या दोघांचे पुस्तकप्रेमाचे आविष्कार बघण्यासारखे असतात. पहिला वाचून झालं की बुकमार्क काढून, पुस्तक बंद करून ठेवील, तर दुसरा पुस्तकांची पानं दुमडून, समासात उत्स्फूर्त प्रतिक्रिया लिहून आपल्या प्रेमाच्या खुणा सर्वत्र पसरवून ठेवील. (वाचनालयातील पुस्तकांवर ही प्रेमचिन्हं दिसतात. त्यांचं प्रदर्शन पाल्र्यात नुकतंच झालं होतं असं वाचल्याचं आठवतंय.) एकदा अ‍ॅन व कुटुंब कोपनहेगन येथे गेलं असता एका हॉटेलमध्ये राहिलं. तिथे तिच्या भावाने हातातलं पुस्तक वाचता-वाचता, उघडलेली पानं तशीच ठेवून पालथं ठेवलं व सारे बाहेर गेले. आल्यावर ते पुस्तक नीट बंद करून खोलीतील टेबलावर ठेवलेलं होतं. त्या पानांमध्ये बुकमार्क घातला होता. वर एक चिठ्ठी होती, ‘पुस्तकांशी असं दुष्टपणे वागू नका.’ नवल म्हणजे हे काम केलं होतं-खोली साफ करणाऱ्या बाईने! किमला मात्र ते पटलं नाही. उघडं पुस्तक आपलं स्वागत करायला बाहू फैलावून सज्ज असतं, असं तिला वाटतं.

मुद्रितशोधनाबद्दलचा एक लेख आहे. फॅडिमन कुटुंब मुद्रितशोधक म्हणूनच जन्माला आलं आहे, असं त्यांना वाटतं. त्यामुळे हॉटेलमधील मेन्यू कार्डावरील चुकांपासून तर पुस्तकांतील अगणित चुकांपर्यंत काहीच तिच्या नजरेतून सुटत नाही. पूर्वी आपल्याकडच्या ‘अमृत’ या डायजेस्टमध्ये ‘मुद्राराक्षसाचा विनोद’, ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ अशी सदरं यायची. त्याची आठवण झाली.

वाङ्मयचौर्य हा एक जागतिक व्यवसाय. अ‍ॅनच्या म्हणण्याप्रमाणे सगळं साहित्य हे चौर्यकर्मच आहे. नवीन काहीच नाही. शेक्सपियरपासून सगळे यात सामील आहेत. (तिनेही अशी विधानं, त्यांचे संदर्भ इतरांच्या पुस्तकांवरून घेतले आहेत.) खाद्यपदार्थाच्या पुस्तकांमध्ये अशी चोरी सगळ्यात जास्त होते. कुणाच्याही पाककृतीत चिमूटभर मीठ, मसाला जास्त घातला की आपली ‘ओरिजिनल’ पाककृती होत असल्याने ते चौर्य नसतंच. शब्दकोशातले शब्द ही काही कुणाची खासगी मालमत्ता थोडीच असते? तेच शब्द दुसरा वापरतो म्हणून ती वाङ्मयीन चोरी कशी?

तीन आठवडय़ांपूर्वी, तिचं आत्मकथनवजा एक पुस्तक आलंय, ते आहे. ‘द वाइन लव्हर्स डॉटर’ (२०१७). वाइन ही तिच्या वडिलांची प्रेयसीच जणू!  या मद्यप्रकारातील दर्दी दुसरा नाही असं तिला वाटतं. वडिलांच्या इच्छेनुसार अनेकदा वाइनचा आस्वाद घेऊनही अ‍ॅनला वाइन आवडली नाही. आपला हा वारसा मुलीत आला नाही अशी खंत त्यांना वाटे. वडील व त्यांची आवडती वाइन, त्यांच्या नात्यातील अनेक पैलू उलगडण्याचा प्रयत्न तिने यात केला आहे. त्याबरोबरच तिने आपलाही शोध घेतला आहे. ते करताना कितीदा तरी भावना अनावर झाल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काळी बाजू समोर आल्याने भ्रमनिरासही झाला. पण ते सारं तिने न लपवता उघड केलं आहे. हा संस्कृतीतील फरक!

अ‍ॅनच्या वाढदिवसाला तिला आवडणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणून जुन्या पुस्तकांचं दूरवरचं नवीन दुकान शोधून तिला तिकडे घेऊन जाणारा जॉर्ज, मुलांना मोठय़ानं वाचून दाखवताना अभिनयात रंगलेला जॉर्ज, किंडलमुळे पुस्तकं कमी जागेत मावली तरी त्यांना जुना गंध नाही, ती वारसाहक्कानं येणार नाहीत म्हणून हळहळणारी अ‍ॅन, आपल्या मुलांना वाङ्मयीन खुराक देणारी अ‍ॅन, रात्रीच माझं लेखन होतं, कारण बेल वाजत नाही, फोन घ्यावा लागत नाही, म्हणून पहाटेपर्यंत वाचत, लिहीत बसणारी अ‍ॅन, दुसऱ्या दिवशी लौकर उठायचा धोशा नसेल तेव्हा सैलावत रात्रभर जागणारी अ‍ॅन. ज्याचं पुस्तकाचं वा लिखाणाचं काम सुरू असेल त्याने पूर्णत: तेच काम करावं आणि दुसऱ्याने नोकरी करून चरितार्थ सांभाळावा अशी आपसांत व्यवस्था करून घेणारे जॉर्ज आणि अ‍ॅन.(असे पर्याय परदेशात उपलब्ध आहेत हे महत्वाचे.) ही जोडी  जीवनग्रंथातील आपण प्रकरणं आहोत असं मानणारी! अभिजात ग्रंथ वा पुस्तकं ज्यांच्या शेजारी, बरोबर असतात, त्यावरून त्यांचं मूल्य ठरतं. तो संदर्भ सुटला की ती मूल्यहीन वाटतात. त्यांचं जतन होण्यासाठी अशी ग्रंथवेडी माणसंच हवी असतात.

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com

First Published on December 9, 2017 2:50 am

Web Title: articles in marathi on anne fadiman