स्वित्झर्लन्डमधील इंटरलाकेन गावातील एक हॉटेल. खोलीतल्या खिडकीशी एक गोरीगोबरी मुलगी उभी.. ती म्हणजे मी. चेहरेपट्टी रशियन. वय र्वष सहा-सात. वडील त्याच खोलीत आरामखुर्चीवर बसलेले.. त्यांच्या मागे एक तरुण बाई.. खुर्चीवर बसलेली. ती माझ्यावर लक्ष ठेवायला.. तिच्या मांडीवर एका टोपलीत काही सामान.. कात्रीदेखील. माझ्याबरोबर सुट्टी घालवायला आलेले वडील.. मी पटकन कात्री उचलली.. खोलीतल्या सोफ्यावर विटल्यासारखी फिकी, निळी कव्हरं. हे सगळं इतकं लख्ख आठवतंय?..

‘‘मी आता ही सगळी कव्हरं फाडून, कापून टाकीन.’’

9 year old deadlifting 75 kg viral video
भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

‘‘नाही. तू फाडणार नाहीयेस.’’

ते शब्द तसेच आहेत.. त्यांच्या पूर्ण स्वराघातासकट.. ठामपणासकट.. कानात अजून घुमताहेत.. त्या वेळी होते तसेच.. ते पुन्हा जणू जिवंत झालेत.. रागावलेल्या मला मी दिसतच नाहीये. पण ती बाई मात्र अजून डोळ्यांपुढे आहे ..मी पुन्हा तेच म्हणते ..जर्मनमध्ये ..तुला जर्मन येत होतं?.. माहीत नाही.. पण तेव्हा मी ते जर्मन शब्द उच्चारले.. ते शब्द, त्यावर दिलेला आघात, असणारं वजन.. पुढे कळलं की, मोहिनीविद्येचा (हिप्नॉटाइज), वापर करणाऱ्यांचा किंवा जनावरांना प्रशिक्षण देणाऱ्यांचा स्वर असा असतो.. त्यांचे शब्द असेच असतात.. म्हणजे मी कोण?.. जनावर?.. का माझ्यावर काही मोहिनीविद्या?.. मी हिंसक झाले होते? का केवळ रागाचा आविष्कार? माहीत नाही..

विसाव्या शतकातील फ्रेंच लेखकांमध्ये मानाचं स्थान पटकावणारी शतायु लेखिका नाताली सारोत! हिच्या आत्मचरित्रातील ही आठवण. विसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर तिचा जन्म. १९०० मध्ये जन्मलेली नाताली १९९९ मध्ये मृत्यू पावली. याही अर्थाने ती विसाव्या शतकाची लेखिका आणि शतकाची साक्षीदार. संपूर्ण विसावं शतक आधीच्या शतकांच्या तुलनेत अधिक घडामोडींचं, उलथापालथीचं, वेगवान शतक. दोन महायुद्धं, विज्ञान-तंत्रज्ञानाने घडवलेली अभूतपूर्व क्रांती आणि त्या अनुषंगाने जागतिक समाजजीवनात झालेले टोकाचे बदल, मानवी प्रतिभेने निर्मिलेली उत्तुंग शिखरं अशा अनेक गोष्टींची नाताली साक्षीदार! हे बदल आविष्कृत करताना पूर्वीपेक्षा वेगळी माध्यमं उपयोगात आणणं गरजेचं होतं. ते तिनं केलं.

मॉस्कोजवळील आयवानोवो नावाच्या गावात तिचा जन्म. त्यांचे कुटुंब रशियन ज्यू. वृत्तीने पारंपरिक, मध्यमवर्गीय पण आर्थिक सुस्थिती. वडील विज्ञानातील पीएच.डी.प्राप्त केमिकल इंजिनीयर. आई पॉलिन ही कादंबरीकार व कथालेखिका. ती ‘विक्रोवस्की’ या टोपणनावाने लिहीत असे. लहानपणापासून आईला लिहिताना पाहून नातालीच्या मनात लेखनाची आवड उत्पन्न व्हावी यात नवल नाही. पण लेखनाबरोबरच तिला अगदी खूप लहान असल्यापासून वाचनाचीही जबरदस्त आवड होती. एका मुलाखतीत नातालीने एक गमतीदार आठवण सांगितली आहे. ती म्हणते, ‘‘मी घरात एकटी. मोठय़ांचं ऐकून पोपटपंची करे. नुसतं तिच्या बोलण्याचं अनुकरण करण्यावर न थांबता तिच्यासारखं लिहिण्याची प्रबळ इच्छा झाली. कारण कधीही पाहावं तर आई आपली लिहीत असे. खूप कष्ट घेत, वाचलेल्या सगळ्या प्रेमकथांमधील भारी-भारी शब्दांची उसनवारी करत मी एक कादंबरी लिहिली. ती आईच्या एका मित्राला दाखवली. त्याने एक नजर टाकत म्हटलं, ‘आधी शब्दांची स्पेलिंग्ज शिक आणि मग कादंबरी.’’

पण अशी मजा पुढे उरली नाही. नाताली ५-६ वर्षांची असतानाच आई-वडील विभक्त झाले आणि ती अधिकच एकटी झाली. स्वत:चंच मनोविश्व रचू लागली. याच काळात निरीक्षणशक्ती तीव्र झाली असावी. आईने दुसरं लग्नही केलं व ती नातालीला घेऊन पॅरिसला राहू लागली. तिथल्या शाळेत जाऊ  लागली. वर्षांतून एकदा सुट्टीत महिनाभर ती वडिलांबरोबर राही. आरंभी सांगितलेली तिची आठवण याच काळातील आहे. पुढे दोनेक वर्षांनी ती आई व सावत्र वडील यांच्याबरोबर पुन्हा रशियाला-सेंट पीटर्सबर्गला परतली. तिथल्या ज्यूविरोधी वातावरणामुळे सगळ्यांना रशियातून हद्दपार व्हावं लागलं. नाताली वडिलांबरोबर पॅरिसला गेली. प्रथम सहा महिन्यांसाठी गेलेल्या नातालीने शेवटी वडिलांजवळच राहायचं ठरवलं. आणि रशिया-फ्रान्स अशी जा-ये थांबली. शिक्षण नीट सुरू झालं. ‘१२व्या वर्षी प्राथमिक शिक्षण संपलं तेव्हाच माझं लहानपण संपलं. आज मागे वळून बघताना त्या बालपणाने मला काय दिलं असा विचार करते तेव्हा दिसतं की खूप मोठा अवकाश होता तितकाच गोंधळ होता. घरात आणि मनातही होता. पण वाचनाची आवड लागली.’ ’ ती सांगते.

त्यानंतर फ्रान्समधील सोबोर्न विद्यापीठात इंग्लिश वाङ्मयाचा अभ्यास, ऑक्स्फर्डमधून बी.ए.ची पदवी. पुढे परत पॅरिसला येऊन कायद्यातील पदवी घेतली. वकील असणाऱ्या रेमंड सारोत यांच्याशी पंचविसाव्या वर्षी विवाह. तिनं काही र्वष वकिली करत लहान खटले लढवले. पण लक्ष लेखनाकडेच होतं.

मार्सेल प्रूस्त, जेम्स जॉयसे, व्हर्जिनिया वूल्फ यांच्या लेखनाचा तिच्यावर प्रभाव होता. प्रूस्तच्या पुस्तकांमुळे कादंबरीची कल्पनाच पूर्ण बदलली असं तिला वाटे. बत्तिसाव्या वर्षी तिनं आपलं पहिलं पुस्तक ‘ट्रॉपिझम’ लिहायला सुरुवात केली. पाच र्वष ती ते पुस्तक लिहीत होती. पुढे दोन र्वष प्रकाशक शोधण्यात गेली आणि १९३९ मध्ये ते प्रकाशित झालं. तिच्या या पहिल्या पुस्तकाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण विचारवंत व चिंतनशील लेखक ज्याँ पॉल सार्त् यांनी तिच्या लेखनाचं कौतुक केलं.

त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले होते. नाताली ज्यू होती. त्या वेळी ज्यूंच्या विरोधात वातावरण होतं. त्यांनी वकिली करू नये, आपल्या कपडय़ांवर ठसठशीतपणे दिसेल असा पिवळा बिल्ला (ज्यू असल्याची खूण) लावला पाहिजे असे नियम आले. तिने असा बिल्ला लावणं नाकारलं. ती आपल्या तीन मुलींसह चक्क भूमिगत झाली. आपला नवरा तरी सुरक्षित राहावा म्हणून तिने नवऱ्याच्याच मदतीने खोटय़ा नावाने, घटस्फोटाची खोटी कागदपत्रं तयार केली. पण प्रत्यक्षात ते सारे जण एकत्रच राहात होते. ती काही र्वष नातालीला परिस्थितीशी संघर्ष करावा लागला.

युद्धाच्या धुमश्चक्रीतही तिचं लेखन थांबलं नव्हतं. ज्यू असल्याने काही र्वष अज्ञातवास सहन करावा लागला, तसाच तिनं आपणहून जणू वाङ्मयीन अज्ञातवास स्वीकारला. दहा र्वष तिने लेखन प्रसिद्ध केलं नाही. स्वत:ला जणू काही कोंडून घेतलं होतं. साहित्यिक वर्तुळात जाणं, तिथल्या लोकांच्या भेटीगाठी यावर तिनं स्वत:हूनच बंधनं घातली. जवळजवळ वीस-पंचवीस र्वष अशी गेली. मग मात्र तिनं मागे वळून पाहिलं नाही. मानसन्मान, यश मिळत गेलं.

नातालीचं वेगळेपण काय होतं? तिच्या पहिल्या लेखनाला प्रतिसाद का मिळाला नाही? दुसरं पुस्तक ‘द पोटर्र्ेट ऑफ अ मॅन अननोन’ या काहीशा रहस्यमय कादंबरीला ज्याँ पॉल सार्त् यांची विस्तृत प्रस्तावना लाभूनही व्यावहारिक यश कमी मिळालं. त्याचं कारण होतं तिच्या लेखनाचा अगदी निराळा घाट! आरंभी तिचं लेखन म्हणजे कादंबरी नाही असं लोकांना वाटत होतं. त्यातील गाभाच लक्षात आला नव्हता. ती अगदी वेगळ्या प्रकारात लिहीत होती.

कादंबरी म्हणजे काय? कादंबरी म्हणजे कितीतरी पात्रं, किती तरी प्रसंग, त्या पात्रांतील ताणतणाव, संघर्ष, मोठय़ा कालपटावर घडलेल्या घटना वगैरे, वगैरे. कधी त्यात रहस्य, कधी ऐतिहासिक घटना, पात्र, तर कधी अत्याचाराच्या गोष्टी. हे सारं आपल्या संवादकौशल्यानं सांभाळणारा कादंबरीकार यशस्वी. ही सारी लेखनतंत्रं एकोणिसाव्या शतकातली. विसाव्या शतकात ही तंत्रं धुडकावून लावत कादंबरीलेखनाची वेगळी वाट चोखाळणाऱ्या साहित्यिकांनी कादंबरीची व्याख्याच बदलली, तिच्या आकृतिबंधात, भाषेत, रचनेत वैशिष्टय़पूर्ण बदल केले. फ्रान्समधील लेखकांनी त्यासाठी एक चळवळच उभी केली.

फ्रान्स, विशेषत: पॅरिस म्हणजे फॅशन्स व कलाजगतातील सगळ्या नव्या प्रवाहांची पंढरी. चित्रकला, चित्रपट असो की वाङ्मय. नवनवीन प्रवाहांचा आरंभ करणाऱ्या प्रयोगशील कलाकारांना इथे प्रोत्साहन मिळतं. १९४०-५०च्या काळात कादंबरीलेखनातील अशाच नव्या प्रयोगांमधून काही लेखक पुढे आले. त्यात मार्गारिट द्युरास, ग्रिलेट, ब्यूटर आणि नाताली सारोत हे प्रमुख होते.

त्यातही अग्रगण्य होती नाताली. तिच्या निबंधांनी चळवळीचा जाहीरनामाच लिहिला जणू. तिच्या कादंबरीत रूढार्थाने ज्याला कादंबरी म्हणता येईल असं काही नव्हतं. त्यात कोणाचीच ‘गोष्ट’ सांगितली नव्हती. काल्पनिक पात्रं उभी केली नव्हती. त्यामुळे ती पात्रं खरी वाटावीत असा प्रयत्न नव्हता. इतकंच काय पण कोणत्याही पात्रांना नावं नव्हती. बहुतेक वेळा ‘ती’, ‘तो’, ‘ते’ अशा सर्वनामांवरच सारी रचना. यामुळे एकीकडे निश्चित व्यक्ती, तिचे समाजातील स्थान इत्यादी संदर्भ मनात येत नव्हते. तर दुसरीकडे अमुक एक पात्र तू किंवा मी किंवा शेजारचा असं कोणीही असू शकतं. यामुळे ती रचना खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची झाली.

‘ट्रॉपिझम’ हे तिचं पहिलं पुस्तक सर्वस्वी वेगळं होतं. केवळ चोवीस छोटी टिपणं. ट्रॉपिझम म्हणजे काय? खरं म्हणजे ती वनस्पतिशास्त्रातील कल्पना. बाहेरच्या एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देत ज्या वेळी सजीवांमध्ये आपोआप बदल घडतो, तेव्हा त्याला ट्रॉपिझम म्हणतात. उदाहरणार्थ सूर्यफूल. सूर्याच्या दिशेने ते आपलं तोंड फिरवत असतं, किंवा पाण्याच्या दिशेनं मूळं जातात हा आपला नेहमीचा अनुभव. नातालीला वाटे, आपल्या अंतर्मनात उठणारे तरंग, किंवा मनोव्यापार हे असेच नकळत घडत असतात. ती म्हणते, ‘‘माझ्या मनात अनेक ठसे उमटत. त्या स्पष्ट ठशांबद्दल झालेली ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. त्यांचा आकारही त्या ठशांसारखाच झाला. असे ठसे प्रत्येकाच्या मनात उमटतात, पण आपण त्यांचं, आपल्या अंतर्मनातील हालचालींचं, तरंगांचं नीट निरीक्षण केलं की ते लक्षात येतात. त्यांची निश्चित अशी व्याख्या सांगता येत नाही. ते तरंग आपल्या जाणिवेतून हळूवारपणे जात असतात. आपले दैनंदिन हावभाव, बोलणं या मागे हे सारे जिवंत ठसे असतात. माझ्या पुढच्या सर्व लेखनाचं, पुस्तकांचं बीज या ‘ट्रॉपिझम’मध्येच आहे.

आपण, आपली पिढी ज्या परिस्थितीत जगतो आहोत, त्याबद्दल लिहायचं तर पूर्वीचे रचनेचे संकेत पुरेसे नाहीत. आमच्या पिढीला शंका आहेत, अविश्वास आहे. तुकडय़ा-तुकडय़ात विभागलेल्या सत्यापर्यंत पोचण्याची धडपड करताना नवीन प्रकारची रचना आपोआपच शोधावी लागते. मला जे सांगायचंय ते या नव्या रचनेतून मला वाचकांपर्यंत पोचवता येतं.’’

नातालीचं लेखन वाचताना मला आपल्या कमल देसाईंची ‘काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई’, किंवा श्याम मनोहर यांची ‘कळ’ यांची आठवण येत होती. या पुस्तकांच्या प्रकाशनानंतर त्यांच्यावरही आरंभी दुबरेधतेचा शिक्का बसला होता.‘चाईल्डहूड’ (१९८३) या तिच्या आत्मचरित्रात तिनं १२ वर्षांपर्यंतचं आयमुष्य चित्रित केलंय. तेही वेगळ्या रीतीने. आपलीच दोन मनं कल्पून त्यांच्या संवादातून ते उलगडतं. एक मन दुसऱ्याला कधी अडवतं, टोकतं, आठवण करून देतं, शंका उपस्थित करतं. नवीन रचनेतील तिचं हे सगळ्यात यशस्वी पुस्तक. मला आठवलं, मुंडकोपनिषदातील ‘द्वा सुपर्णा सयुजा सखाया:’..या श्लोकाचा उत्तम अन्वयार्थ लावत, लिहिलेलं विश्राम बेडेकरांचं ‘एक झाड दोन पक्षी’. एकाच झाडावरील एकमेकांना चिकटून असणारे दोन मित्र-पक्षी. एक जण मोठय़ा आनंदाने झाडावरची फळं खातो आणि दुसरा केवळ बघत असतो. तशीच आपली दोन मनं. एक कर्ता-भोक्ता तर दुसरं आपली विवेकबुद्धी. योगायोग असा की, दोन्ही पुस्तकं त्याच दोन वर्षांतील. रचनेत इतकं साम्य! नातालीला अर्थातच उपनिषद माहीत नाही. श्याम मनोहर वगळता इतर तिघे अगदीच समकालीन. भाषा, सामाजिक परिस्थिती आदी अनेक प्रकारचं भिन्नत्व असतानाही, कधी कधी मानवी प्रतिभा समान काळी, समांतरपणे कशी कार्यरत होते याचं आश्चर्य वाटतं.

२०१७चं नोबेल मिळवणाऱ्या पण आरंभी वाचायला कठीण वाटणाऱ्या काशुओ सुझिगुरो यांच्यासारख्या लेखकांची वाट प्रशस्त करण्यासाठी नातालीसारख्या लेखकांनी तुडवलेल्या वाटा, केलेला संघर्ष उपयोगी पडत असेल?

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com