आयन रँड (१९०५-१९८२)

  • तत्त्वज्ञ, कादंबरीकार, नाटककार, पटकथालेखिका,
  • आयन रँडचे तत्त्वज्ञान शिकवणारी संस्था- आयन रँड इन्स्टिटय़ूट
  • फाऊंटनहेड व अ‍ॅटलास श्रग्ग्ड या दोन्ही कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद प्रसिद्ध.
  • अनुवादिका- मुग्धा कर्णिक, डायमंड पब्लिकेशन

आयन रँड हे नाव ऐकलं की अनेकांच्या भुवया वर चढतात, तर एखाद्या भक्ताच्या चेहऱ्यावर आपल्या दैवताविषयी ऐकताना दिसावं, इतकं कौतुक काहींच्या चेहऱ्यावर दिसतं. खरं म्हणजे आयन पहिल्यापासून इतकी नास्तिक होती की तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल भक्तियुक्त प्रेम वाटावं हेही कदाचित तिला आवडलं नसतं. आपल्या वैचारिक कादंबरी लेखनामुळे, तत्त्वज्ञानात्मक लेखनामुळे आणि आगळ्या व्यक्तित्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही जिला मानमान्यता मिळाली, ती आयन रॅन्ड म्हणजे विसाव्या शतकातील एक विलक्षण बुद्धिमान लेखिका.

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Children Fear
“बुवा आला…, पोलीस आले…”; अशी भीती तुम्हीही मुलांना घालता का? मुलांच्या ‘घाबरटपणा’मागे पालकच ठरतात जबाबदार!
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

पूर्वापार चालत आलेल्या, जनमानसात घट्ट रुतलेल्या अनेक संकेतांना, कल्पनांना तिने अगदी मुळापासून हलवलं. त्यामुळे साहजिकच तिच्यावर कठोर टीका झाली, पण तिची बाजूही अनेकांनी उचलून धरली. तिने निखळ बुद्धिवाद महत्त्वाचा मानला, वस्तुनिष्ठतावादाचा नवीन सिद्धान्त मांडला, व्यावसायिक, व्यक्तिगत नैतिकतेची वेगळी तत्त्वं मांडली, औद्योगिक भांडवलशाहीला पाठिंबा दिला, साम्यवादी विचारांना कडाडून विरोध केला. पुन्हा हे सारे विचार ज्यातून व्यक्त होतील, अशी पाश्र्वभूमी कादंबरीसाठी तयार करत, आपल्या व्यक्तिरेखांना तसाच आकार दिला. त्यात कलात्मकतेला बाधा येणार नाही असा विचार केलेला होता. त्यामुळे लेखिका म्हणून तिची प्रतिमा कितीतरी उंचीवर गेली.

आयन रँडचे विचार, तिने मांडलेलं तत्त्वज्ञान यावर आरंभी टीका झाली. पण मधला काही काळ असा गेला की तिच्या विचारांशी मतभेद असले तरी आपण आयन रँड वाचली आहे हे सांगणं विद्वत् जगतात प्रतिष्ठेचं मानलं जाई. इथे तिच्या विचारांबद्दल ऊहापोह करणं, किंवा निदान ते संपूर्णपणे सांगणं, बसवणं कठीण आहे. मात्र तिने कशाबद्दल सांगितलं आणि तिने चोखाळलेली वाट केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर एकंदरीतच किती निराळी, कठीण होती, याचे स्मरण करावे असे फार मनापासून वाटते.

२ फेब्रुवारी १९०५ रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील ज्यू सुखवस्तू कुटुंबात जन्मलेली अलिसा रोझेनबाउम ही घरातील सर्वात मोठी मुलगी होती. तिला आणखी दोन लहान बहिणी होत्या. अगदी लहान असताना ती वाचायला शिकली आणि मग एक मोठंच जग तिच्यापुढे खुलं झालं. या लेकीची वाचनाची आवड लक्षात घेऊन आई तिच्यासाठी अद्भुत कथा, साहसी कथा वा छोटय़ा कादंबऱ्या घेऊन येई. अशाच एका वेळी आईने आणलेल्या ‘फ्रेंच बॉय’ या मासिकातील साहसी कथा वाचताना त्यातील वीर नायकाचे चित्र तिच्या मनावर जे ठसले ते कायमचे! हाती तलवार धरून घोडय़ावर मांड टाकलेला तो पुरुषी सौंदर्याचा नमुना पुढे तिच्या कादंबऱ्यांमधील नायकांच्या चित्रणात प्रतिबिंबित झालेला दिसतो.

वाचनाच्या जोडीनेच लिहायची आवड लागली आणि वयाच्या नवव्या वर्षीच आपण लेखिका व्हायचं हे तिनं पक्कं ठरवलं. लहानपणापासूनच आपल्या म्हणण्यावर ती ठाम असे. शाळेतल्या एखाद्या तासाला कंटाळा आला की या बाई सरळ वहीत कथा लिहायला सुरुवात करीत. पण त्याहीवेळी आपण वेगळं काय लिहू शकतो, वेगळा विचार करता येतो का याचाच अंदाज ती मनाशी घेत असे. ती म्हणते, ‘माझ्या आजूबाजूच्या लोकांची वर्णनं करण्यात मला मुळीच रस नव्हता. मला नवीन व्यक्ती उभ्या कराव्याशा वाटत. त्या नवीन व्यक्ती अशा गोष्टी करीत की ज्या ही आजूबाजूची माणसं कधीच करू शकणार नाहीत. अशा गोष्टींत मला रस होता. लोक काय काय करू शकतात, त्यांच्या क्षमता किती उंचीवर जाऊ  शकतात हे मला दाखवायचे होते.’

तिच्या लहानपणीचा काळ रशियातील उलथापालथींचा होता. अलिसा बारा वर्षांची असताना १९१७च्या ऑक्टोबरमध्ये बोल्शेविक क्रांती झाली. (त्याला यंदा शंभर वर्षे झाली.) त्या वेळी सेंट पीटर्सबर्गमध्ये असणाऱ्या अलिसाने आपल्या घराच्या खिडकीतून गोळीबार होताना पाहिला. त्याचा तिच्या मनावर मोठाच परिणाम झाला. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्या ज्यू कुटुंबाला स्थलांतर करावं लागलं. तीन वर्षे क्रिमियाला राहून १९२१ला सगळे जण परतले. त्यावेळी सेंट पीटर्सबर्गचं नाव पेट्रोग्राड झालं होतं. रशियन क्रांतीनंतर स्त्रियांना विद्यापीठाची दारं खुली झाली होती. अलिसा पेट्रोग्राड स्टेट विद्यापीठात दाखल झाली. तिच्या राजकीय जाणिवा विकसित होऊ  लागल्या. व्हिक्टर ह्य़ूगोसारख्यांच्या कादंबऱ्या वाचून बाहेरच्या जगाची ओळख होऊ  लागली होती. अलिसाने फ्रेंच, जर्मन, रशियन भाषा आत्मसात केल्या, मुद्दाम इतिहास हा विषय घेतला. अरिस्टॉटल, नीत्शे, प्लेटो या तत्त्वचिंतकांच्या विचारांची तिला ओळख झाली. त्यातील अरिस्टॉटलच्या विचारांच्या आधाराने तिनं पुढे आपल्या तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांची मांडणी केली. वाङ्मय व तत्त्वज्ञान यातच आपण काम करायचं आहे हे मनाशी नक्की केलं.

पदवी मिळाल्यावर तिनं पोला नेग्री नावाच्या पोलिश अभिनेत्रीविषयी लिहिलेला निबंध हे तिचं पहिलं प्रकाशन (१९२५). त्याचवेळी तिनं आयन रँड हे टोपण नाव घेतलं. ते नाव म्हणजेच तिची ओळख ठरली. हिब्रू भाषेतील (Ayin) या शब्दावरून तिनं ते सार्थ नाव घेतलं असं सांगितलं जातं.

तिच्या लक्षात येऊ लागलं की, आपण अशा एका देशात जन्माला आलो आहोत जिथे व्यक्तिगत स्वातंत्र्याला थारा नाही. व्यक्तिस्वातंत्र्याची जी तत्त्वं आपल्याला आदर्श वाटतात तिची इथे पायमल्ली केली जातेय. व्यक्तीनं राष्ट्रासाठी जगायचं आणि स्वसुखाचा त्याग सामूहिक कल्याणासाठी करायचा, अशी अपेक्षा आहे. ती पुरी करणं किती मनस्ताप देणारं आहे! शिवाय आपण तसं का करायचं? सामूहिक बाबींना प्राधान्य देताना व्यक्तीला पार विसरायचं? अत्यंत बुद्धिमान, सक्षम, आणि धाडसी व्यक्तींवर अन्याय होतोय आणि पराक्रमी माणसांवर हल्ला म्हणजे आपल्यावर व्यक्तिश: हल्ला असं तिला वाटलं. पदवी मिळाल्यावर आपण अमेरिका गाठायची असं तिनं ठरवलं. १९२६मध्ये एकवीस वर्षांची अलिसा अमेरिकेला आली, त्यावेळी चित्रपटांसाठी पटकथा लिहायच्या असा तिचा विचार होता. अमेरिकेत – मॅनहटन येथे पोचल्यावर तिने जेव्हा क्षितिजरेखेकडे नजर टाकली तेव्हा तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तेथील मुक्त आकाश तिला जणू स्वातंत्र्य बहाल करीत साद घालत होतं. आयनने छोटी छोटी कामं करत, ओळखी करून घेतल्या. हॉलीवूडमध्ये प्रवेश मिळाला. काही पटकथांचं लेखन केलं. फ्रँन्क ओकॉनर या अभिनेत्याशी तिचं लग्न झालं.

त्याचवेळी ‘वुई द लिव्हिंग’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी तिनं लिहिली. ‘मी’ विरुद्ध ‘राज्य / राष्ट्र’ यातील संघर्ष यात चित्रित झाला आहे. ती म्हणते, ‘मी यापेक्षा वेगळं आत्मचरित्र लिहू शकलेच नसते. यातील पाश्र्वभूमी रशियातील, माझ्या लहानपणाची आहे पण प्रसंग मात्र बरेचसे कल्पित आहेत.’ नायिका कीरा व तिचा प्रियकर लिओ एका कम्युनिस्ट राज्यात अडकले आहेत आणि त्यांना राज्यासाठी त्याग करण्याची जबरदस्ती होतेय. कीरा रागाने त्यांना म्हणतेय, ‘मी जन्माला येऊन या जगात जगते आहे. मला काय हवंय ते मला माहीत आहे. मला या जगात हवं तसंच, हव्या त्या गोष्टींसाठीच मी जगणार. मी काय करावं हे मला तुम्ही का सांगावं? मी कसं जगावं हे मी ठरवणार. माझ्या मूल्यांप्रमाणे, कल्पनांप्रमाणेच जगणार. आमचं आयुष्य, आमचं यश, आमचं व्यक्तित्व हे सगळ्यात, अतिमहत्त्वाचं आहे. आपल्यामधील जे जे उत्कृष्ट आहे, त्याचा उपयोग करून जगण्याला अर्थ देणं, आपल्या मनाप्रमाणे जगणं हेच खरं जगणं आहे.’

आयनला प्रश्न होता की, सर्जनशील मनाला कशामुळे प्रेरणा मिळते?  मानवजातीचं भलं व्हावं अशी नि:स्वार्थी प्रेरणा असते? मिळणारी प्रसिद्धी, पैसा, कौतुक हे त्याला हवं असतं? आपलं वर्चस्व तो सिद्ध करू पाहतो? का स्वत:च्या सर्जनशील, द्रष्टय़ा मनाला इतर कुणाच्या गरजांचा, मतांचा विचार न करता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावासा वाटतो? हा ‘फाऊंटनहेड’ (१९४३) या कादंबरीचा नायक आर्किटेक्ट हॉवर्ड रॉर्कचा संघर्ष आहे. आपल्या सर्जनशील मनाची एकात्मता अभंग राखत बाहेरच्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांना, सामाजिक विरोधांना तो तोंड देतो. आयनच्या मनातील आगळा, साहसी नायक जसा असायला हवा तसा इथे त्याच्या सर्व गुणांसकट प्रकटतो. पण तो वास्तव आहे? आयन म्हणते, वाङ्मयीनदृष्टय़ा नाही, पण वास्तवात हवा असा. त्याला अत्यंत तीव्र अशी स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची जाणीव आहे, सर्जनशील मन आहे. समाजाच्या पारंपरिक, चुकीच्या किंवा असुंदर कल्पना ग्रा धरून मी का वागायचे? आपल्या अतुलनीय बुद्धीविषयी असणारी तीव्र जाणीव, अहंता आणि नि:स्वार्थी वृत्ती हे विरोधी घटक मानवांमध्ये कसे कार्यरत असतात याचे हे उदाहरण. अहंकारी माणूस इतरांच्या गरजांचा विचार करत नाही. त्याचं ध्येय, उद्देश, विचारप्रक्रिया आणि वासना या स्व-तंत्र असतात. महान सर्जनशील मन हा मानवी प्रगतीचा उगम आहे असे तिला वाटे.

आयनने या कादंबरीचं नाव आधी ‘सेकंडहॅन्डर्स’ असं ठेवलं होतं. लोक सारखे कशा ना कशावर अवलंबून असतात, त्यांना आपल्या यशाला सामाजिक मान्यता लागते, सत्ताकांक्षा व सत्तासंघर्षांतही ते असेच इतरांवर अवलंबून असतात. (रोजची वृत्तपत्रं पाहिली की तिचं म्हणणं किती बरोबर, द्रष्टेपणाचं होतं हे पटतं.) आयनने दाखवलेली ही मर्मदृष्टी लक्षणीय आहे. या कादंबरीला अमाप यश मिळालं. हा प्रतिसाद सामूहिक नव्हता. एकेकटय़ाचा होता. प्रेम, वासना, परावलंबन, कारणमीमांसा, तर्कशास्त्र, मानवी स्वभावातील हाव या साऱ्या गोष्टींबद्दल ठाम विधानं मांडणारी ही कादंबरी लोकांना साहजिकच आवडली. त्यावर गॅरी कूपर अभिनीत चित्रपटही निघाला.

इतक्या यशानंतर पुढच्या कादंबरीचा विचार सुरू झाला. कुशाग्र बुद्धिसंपन्न आणि उद्यमशील माणसांना जर सत्ताधारी, निर्बुद्ध माणसं, त्यांच्या कामात सतत अडथळे आणू लागली तर उद्योग चालणार कसे? प्रगती होणार कशी? हा विचार तिच्या मनात होता. हे बुद्धिमंत संप करून घरी बसले तर? मानवाच्या अस्तित्वात यांची भूमिका कोणती? या प्रश्नांचा विचार करणारा विषय घेऊन एक गुंतागुंतीचं कथानक तिनं तयार केलं. आयनच्या साहित्यिक कारकीर्दीतील शिरपेच म्हणावा असा हा ग्रंथराज ‘अ‍ॅटलास श्रग्ग्ड’ (१९५६)! पाश्चात्य संस्कृतीचा उतरणीवरचा प्रवास कसा असेल याचे स्पष्ट चित्र दाखवणारी ही कादंबरी लिहायला आयनला बारा वर्षे लागली. यात थरार आहे तशीच चिंतनात्मकता आहे, ती घटनाबहुल आहे तशी विचारबहुलही आहे. ग्रीक पुराणकथांमध्ये पृथ्वीचं ओझं आपल्या खांद्यांवर पेलणारा अ‍ॅटलास म्हणजे शक्तिमान वीर आहे. त्याला ते ओझं अस झालंय. अशावेळी त्याने इतर कसला विचार न करता तुच्छता दाखवत ते ओझं झुगारलं तर काय होईल याचं चित्र यात आहे.

आयनने केलेली सैद्धांतिक मांडणी, तिची विलक्षण प्रगल्भ बुद्धी, तिचा प्रचंड आवाका याला सलाम करताना मनात अनेक प्रश्न येतातच. तिच्या व्यक्तिरेखा बऱ्याच अंशी केवळ काळ्या-पांढऱ्या रंगात आहेत. मानवी स्वभावात करडय़ा रंगाच्या छटा असणारे लोक बहुसंख्य असतात. त्यांनी कसं जगायचं? तरुणांनी जग पादाक्रांत करावं हे बरोबरच पण मग इतर समाजघटकांनी कसं जगायचं? तिच्या जगात त्यांना जसं स्थान नाही, तसंच प्रेमाशिवाय इतर भावनांना नाही. भारतीय मनाला आपली असंख्य, अनावश्यक ओझी, दडपणं, ‘लोक काय म्हणतील’चा चाबूक दूर करण्याची प्रेरणा यातून मिळते, पण इतकं स्वार्थी, स्वकेंद्री होणं समाजयोग्य आहे का?

तरुणांना सोयीची व हवीशी वाटणारी, त्यांनी बऱ्याच प्रमाणात अंगीकारलेली ही विचारधारा पुढे अधिक विक्राळ रूप धारण करेल, का आयनसारखीच कुणी आणखी प्रज्ञावती आपल्याला मार्ग दाखवेल ते काळच ठरवेल.

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com