News Flash

आडवाटेला दूर एक माळ..

रात्र अधिकाधिक घनदाट होत वेटाळतेय मला।

रात्र अधिकाधिक घनदाट होत वेटाळतेय मला।

थंडगार, पिसाट वारे वाहताहेत भणाणा।

पण कोणत्या जुलमी, जादूई मंत्रानं खिळवलंय।

मी हलू शकत नाही, जाऊ  शकत नाही।

भले भले वृक्ष मोडू लागलेत।

निष्पर्ण फांद्या हिमभारानं वाकल्यात।

वादळ वेगानं खाली झेपावतंय।

पण तरीही मी जाऊ  शकत नाही।

माथ्यावर ढगांच्या झुंडी।

पायांतळी पाचोळ्यांच्या वावटळी।

पण काही भयानक मला हलवू शकत नाही।  मी हलणार नाही, जाऊ शकणार नाही’

– एमिली ब्रॉन्टे (भावानुवाद)

निसर्गाच्या रौद्रभीषण रूपाचीही असोशी असणारी, त्या रूपाविष्काराने मंत्रमुग्ध होत जागीच खिळून जाणारी, स्वत:ला निसर्गातच सामावू पाहाणारी ही कवयित्री म्हणजे ब्रिटिश कादंबरीकार एमिली ब्रॉन्टे (१८१८-१८४८). इंग्रजी साहित्यिकांमध्ये तिची जागा मानाच्या पहिल्या रांगेत आहे. ‘वुदरिंग हाइटस्’ या आपल्या पहिल्या आणि एकमेव कादंबरीमुळे तिला हा सन्मान मिळाला आहे. मात्र तिच्या कादंबरीएवढी तिच्या काव्यरचनेची साहित्यविश्वात दखल घेतली जात नाही. अवघं तीसच वर्षांचं आयुष्य लाभलेल्या एमिलीच्या द्विजन्मशताब्दी वर्षांची सुरुवात गेल्याच महिन्यापासून झालीय.

एखाद्या लेखकाला, प्रतिभावंतांच्या मांदियाळीत स्थान मिळण्यासाठी काही नियम, अटी असतात का? असं स्थान कधी, कसं आणि का मिळतं? याविषयी काही सांगणं कठीण. कारण प्रतिभा ही नवनवोन्मेषशालिनी, अनन्यसाधारण आणि नियमरहित असते हे आपण जाणतो. एखादा अनघड प्रतिभावंत आपल्या पहिल्याच/ एखाद्याच कलाकृतीद्वारा प्रतिभावंतांमध्ये अढळ स्थान प्राप्त करतो असंही आपण पाहतो.

एमिली ब्रॉन्टे व तिच्या बहिणी- शार्लट व अ‍ॅनी या तिघी ब्रॉन्टे भगिनींबाबतीतही असंच काहीसं झालं. या तिघींनी आपापल्या अक्षरवाटा एकेकटीनेच शोधल्या असल्या तरी या बहिणींचा एकत्र विचारही केला जातो, कारण जन्मापासून मरेपर्यंत त्यांच्यातील नातं जितकं जैविक, त्याहून अधिक मानसिक जवळकीचं होतं. त्या एकमेकींच्या लिहिण्याकडे लक्ष ठेवून होत्या. एमिलीच्या लेखनात त्यांचा संदर्भ आहे. शार्लटने तर आपली ‘शर्ली’ ही कादंबरी एमिलीवरच बेतली आहे. आपल्यात एमिली अधिक प्रतिभावान आहे व तिचं लेखन फार मौलिक आहे याची तीव्र जाण शार्लटला होती.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील इंग्रजी साहित्यक्षेत्राला तेव्हा अपरिचितच असणारी ही एमिली! वडील पेट्रिक ब्रॉन्टे हे आर्यलडचे रहिवासी. त्यांना भरपूर भावंडं आणि त्याहून अधिक दारिद्रय़. शिक्षण नाही. काहीतरी सटरफटर कामं करता-करता चर्चची ओढ वाटू लागली आणि पेट्रिकने धर्मोपदेशक होण्याचे ठरवून तसे शिक्षण घेतले. मग लग्न झालं. भराभरा भाराभर मुले झाली. पाच मुली आणि एक मुलगा. एमिली हे पाचवं अपत्य. आधी थॉर्टन गावी व नंतर हॅवर्थ या गावी पेट्रिकची तिथला व्हिकर -विशिष्ट विभागाचा धर्मोपदेशक- म्हणून चर्चतर्फे नेमणूक झाली. त्यामुळे काही नाही तरी राहण्याची जागा, आणि तुटपुंजा पण नियमित पगार मिळू लागला. वाढत्या संसाराचा भार, सततची बाळंतपणं, अतोनात कष्ट आणि दारिद्रय़ानं होणारी ओढाताण यांनी मरिया – एमिलीची आई – जेरीस आली होती. त्यातच कर्करोगानं गाठलं आणि ती लौकरच मृत्युमुखी पडली. सर्वात धाकटी अ‍ॅनी ही मुलगी तेव्हा केवळ दीड वर्षांची होती. आणि सगळ्यात मोठी, मरिया जेमतेम सात वर्षांची. ती व तिच्यापाठची एलिझाबेथ भावंडांना सांभाळू लागल्या. त्यांच्यात नात्यापलीकडची एक घट्ट जवळीक झाली. आर्थिक परिस्थिती इतकी वाईट की वडिलांचं दुसरं लग्न होईना.

पण मरिया व एलिझाबेथ धाकटय़ांचं सारं करायच्या. खाणंपिणं, गोष्टी सांगणं, हेही आपल्या परीनं करत. नंतर एक मावशी मदतीला येऊन राहिली. हॅवर्थ हे तसं आडबाजूचं गाव. लिव्हरपूल हे सगळ्यात जवळचं मोठं शहरही तीसेक मैलांवर. मुलं तशी एकाकी असत. त्यातही एमिली अधिकच अबोल व अंतर्मुख वृत्तीची. घरातला कुत्रा, मांजरं तिला जवळची वाटत. मैत्रिणी नाहीतच. सारा परिसर खडकाळ व ओसाड. विस्तृत पसरलेले कातळ. माळावर भन्नाट वारा असे. तेथे फिरणं आणि कल्पनाविश्वात रमणं हाच तिचा सोबती होता.

मरिया व एलिझाबेथ यांचा क्षयाने मृत्यू झाला आणि वडिलांनी मुलींना शाळेतून काढले. एमिली शाळेत नाखूष असे. शिक्षणात तिचं लक्ष नव्हतं असं नव्हे, पण त्यापेक्षा तिला आपल्या घराजवळचा ओसाड माळ, ते कातळ, बार्नवेल हा भाऊ  व अ‍ॅनी यांच्याबरोबर राहावंसं वाटे.

रीतसर शिक्षण नसूनही एमिलीचं वाचन चांगलं होतं. घरापासून २-३ मैलांवर असलेल्या वाचनालयात जाताना ती खुशीत असे. वडिलांचं आपल्याकडे फारसं लक्ष नसतं याची जाणीव तिला होती. पण आता आपणच तयार केलेल्या भावविश्वात ती इतकी रंगून जाई की तिला बाकी कशाचीच जाणीव नसे. शार्लट ही त्यामानाने खटपटी व बोलकी, लोकांत मिसळणारी होती. भाऊ अतिलाडाने बिघडत होता. त्याचं वाचन चांगलं पण अभ्यासात फारसं लक्ष नसे. तो चित्रं चांगली काढे. एमिलीही त्याच्या जोडीने चित्रं काढण्यात तासन्तास घालवी. आरंभापासून या तिघींनाही लेखन करण्याची सुप्त इच्छा होती. काही दिवस फ्रेंच व जर्मन शिकण्याचा प्रयोग झाला. एमिली ते सारं पटापट शिकली. आता वयाच्या विशीत आलेल्या बहिणींना अर्थार्जन करण्याची गरज वाटू लागली. भाऊ  मात्र सतत अपयशीच होत होता.

एमिली शाळेत असतानाच काव्यरचना करू लागली होती. पण तिचं हे गुपित तिच्यापुरतंच होते. मिल्टन, बायरन यांच्या कवितेचा प्रभाव तिच्यावर होता. ‘पॅरॅडाईज लॉस्ट’ हे तिचं आवडतं काव्य होतं. तिच्या कविता या कधी निसर्गाच्या आविष्कारांशी संबंधित, कधी आपल्या भावविश्वातील काल्पनिक प्रियकराबद्दल तर कधी ईश्वरी, गूढ अनुभवांबद्दल, आध्यात्मिक विचारांशी जुळणाऱ्या असत. तिने व अ‍ॅनीने गोंडाल -आदिवासी- लोककथा, लोकगीतं याच्याशी संबंधित कविता, कथा रचल्या. तिची भाषा लयबद्ध, नादमधुर, उत्कट आहे. जवळजवळ दोनेकशे कवितांची रचयित्री एमिली शेवटपर्यंत आत्ममग्न राहिली. तिचं नातं पशुपक्ष्यांशी आणि संवादही त्यांच्याशीच! ना कधी लोकांकडून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली, ना तिच्या रचनांना दाद मिळाली. आडवाटेला, दूर, ओसाड माळावर फुललेलं इवलंसं रानफूल म्हणजे एमिली, पण तिची प्रतिभा मात्र अशा माळावरील वाऱ्याचा बेभान आवेग आणि धुंद वादळाचा आवेश घेऊन आलेली! लेखिका सुमती देवस्थळींनी तर तिला सप्तर्षीमधील अरुंधती म्हटलंय.

ती देखणी नव्हती. तिचे डोळे मात्र अत्यंत भावविभोर आणि बोलके होते. घरातील अडचणींना तोंड देताना तिघी थकून जात. अशातच एक दिवस एमिलीच्या कवितांची वही शार्लटला मिळाली. अ‍ॅनी व शार्लट स्वत:ही कविता करतच होत्या. एमिलीच्या प्रतिभेचा तो अप्रतिम काव्याविष्कार पाहताना शार्लट चकित झाली, हरखून गेली. आपली बहीण म्हणजे प्रतिभेचा खळाळता, उत्फुल्ल, चैतन्यदायी झरा आहे असं तिच्या लक्षात आलं. आपल्या तिघींच्या कवितांचा एकत्रित संग्रह का काढू नये असा विचार शार्लटने केला. त्यासाठी प्रकाशक शोधणं, कवितांची निवड करणं आदी सोपस्कार तिनंच केले. स्त्रियांनी केलेल्या कविता म्हणून त्या दुर्लक्षिल्या जाऊ  नयेत या विचारानं त्यांनी आपल्या आद्याक्षरांवरून सुरू होणारी, (पुरुष वा स्त्री कोणाचीही समजली जावीत अशी) संदिग्ध नावं घेतली. प्रकाशकाला छपाईचा खर्च दिला व Poems by Currer, Ellis and Action Bell या नावाने १८४६च्या मे महिन्यात हे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यात एमिलीच्या २१ व इतर दोघींच्या २०-२० कविता मिळून ६१ कविता होत्या. हा संग्रह पाहून सारं कुटुंब आनंदित झालं. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. बार्नवेलचा प्रेयसीकडून झालेला अपेक्षाभंग, अ‍ॅनीच्या प्रियकराचा मृत्यू आणि त्यांचं यातनामय जगणं साक्षीभावानं बघण्याची वेळ एमिलीवर आली, त्यामुळे ती खचली.

या काळातच आपल्या पहिल्यावहिल्या कादंबरीचं ‘वुदरिंग हाइटस्’चं लेखन एमिली करत होती. त्यातील पात्रांची सुखदु:खं आणि घरातल्यांची दु:खं या दोन्हीत ती इतकी बुडून गेली की त्यातील भेद तिच्या दृष्टीनं जणू नाहीसाच झाला. आपल्या अंतर्मनात उमललेली कविता लिहिण्याऐवजी वास्तवात, डोळ्यांसमोर चालणारा भावभावनांचा खेळ तिला अधिक जवळचा, नाटय़मय वाटला असेल का? तो सारा अनुभवपट खूपच प्रत्ययकारी वाटून तो सामावता येईल असा कादंबरीचा भव्य आकृतिबंध निवडला असेल, असं वाटतं. प्रकाशक मिळावा म्हणून तिघी भगिनींनी आपापल्या कादंबऱ्या एकत्र दिल्या. शार्लटची सुप्रसिद्ध कादंबरी ‘जेन आयरे’, अ‍ॅनीची ‘अग्निस ग्रे’ आणि ‘वुदरिंग हाइटस्’ यांचे प्रकाशन थॉमस काउटी न्यूबाय या प्रकाशनाने मान्य केले, पण १८४७ मध्ये प्रत्यक्ष दोनच प्रसिद्ध केल्या. ‘जेन आयरे’ नंतर प्रकाशित झाली.

‘वुदरिंग हाइटस्’ हे फार्महाऊसचं नाव. त्या ओसाड माळरानावर जवळपास दुसरं घर नाही. ‘थ्रशक्रॉस ग्रॅइन्ज’ हे शेतावरचं आणखी एक घर वुदरिंग हाइटस्पासून जवळ म्हणजे चारेक मैलांवर. तेथे आलेला नवीन भाडेकरू (लॉकवूड) ओळख करून घ्यायला आणि माहिती घ्यायला वुदरिंग हाइटस्मध्ये येतो. हिमवर्षांव, पिसाट वारे यांत अडकून तिथेच राहतो. त्याच्या दैनंदिनीतून, त्याला माहिती पुरवणाऱ्या हाऊसकीपरच्या (डीन)द्वारा, आणि कधी कॅथरीन या नायिकेच्या द्वारा उलगडणारी ही विलक्षण कथा. ‘वुदिरग’ हा स्थानिय, बोली भाषेतील शब्द. तुफान वादळानं झोडलेलं, ओसाड माळावरचं, प्रशस्त दुमजली, सर्व बाजूंनी मोकळं घर. खरं म्हणजे महालच. त्याला कोणताही आडोसा नाही, शेजार नाही. अशा या घरात घडलेली ही कथा सरळ रेषेत घडत नाही, सरळ निवेदनाऐवजी कधी फ्लॅशबॅकच्या तंत्राचा वापर करते तर कधी तुटक संभाषणांचा उपयोग करते. त्यात मानवी हिंस्र वृत्ती, प्रेमातील आदिम रांगडेपणा आणि उत्कटता, प्रेमासाठी केलेला त्याग, त्याचसाठी घेतलेला सूड, अशा विविध भावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडतं. त्यातील मुख्य पात्रं हिथक्लिफ व कॅथरीन यांचंही रेखाटन असंच वेगळं आहे.

एमिलीच्या समकालीन लेखिका जेन ऑस्टेन, जॉर्ज इलियट, शार्लट यांच्या कादंबऱ्यांतून अशा रसरशीत भावनांचं दर्शन होत नव्हतं. त्यांनी निर्मिलेल्या व्यक्तिरेखा तत्कालीन सौंदर्यकल्पनांच्या व वर्तनसरणीच्या चौकटी अधिकच घट्ट करणाऱ्या होत्या. नायक हिथक्लिफ काळ्या केसांचा, फाटके कपडे घालणारा, अस्वच्छ राहणारा अनाथ मुलगा होता. त्यामुळे वाचकांना हे सारं फार नवीन वाटलं असणार. प्रत्यक्षात पहिल्या वर्षी पुस्तकावर आलेली बहुतेक परीक्षणं प्रतिकूलच होती. प्रेमातील मनस्वी उत्कटता व त्यासाठी घेतला गेलेला हिंस्र सूड, यांची एवढी जहाल मात्रा तत्कालीन वाचकांना भिरभिरवणारी होती. भाषा इतकी प्रभावी आणि परिणामकारक होती की लेखक एलिस बेल हा पुरुषच असला पाहिजे अशी त्यांना खात्री वाटली. पुढे हजारो प्रतींची विक्री झाली तरी आरंभी केवळ तीनशे प्रती काढल्या होत्या. त्याही लेखिकेकडून छपाईचा खर्च घेऊन व तिच्या टोपणनावाने!

पुढे एमिलीवर, ‘वुदरिंग हाइटस्’वर अनेक अभ्यासकांनी पुस्तकं, परीक्षणं लिहिली. हॉलीवूडने गेल्या शतकात चार वेळा चित्रपट केले. पहिल्यात लॉरेन्स ऑलिव्हएने हिथक्लिफ साकारला. दूरचित्रवाणीने मालिका केल्या. बॉलीवूडने देखील दिलीपकुमार-वहिदाला घेऊन ‘दिल दिया दर्द लिया’ हा चित्रपट केला. पण अल्पायुषी एमिली या साऱ्याचा आनंद घ्यायला होती कुठे? ‘टोपणनावामागील लेखिका मी आहे’, हे सांगणंही तेव्हा तिला फारसं शक्य झालं नव्हतं. कादंबरी प्रकाशनानंतर वर्षांतच क्षयाने तिचा मृत्यू झाला. एक मनस्वी, उत्कट, आत्ममग्न प्रतिभा एकदाच पूर्णत्वाने बहरली आणि परिस्थितीच्या आघाताने अकाली कोळपली. ती खरी वेगळ्याच जगातील होती का?

शार्लट ब्रॉन्टे आपल्या लहान बहिणीबद्दल म्हणते –

एमिली म्हणजे एक गूढच होती. एकीकडे  कणखर वृत्तीची आणि त्याचवेळी लहान मुलासारखी साधी. जितकी हट्टी तितकीच प्रेमळ. तिच्या आवडी अगदीच वेगळ्या आणि अकलात्मक होत्या. तिला आवडे ते माळावर फिरणे आणि स्वयंपाकघरात काम करणे. पण या सगळ्यापलीकडे तिच्याजवळ जे बुद्धिवान, धगधगतं मन होतं ते सतत एका वेगळ्याच जगात वावरे. त्यामुळे ती आणि बा व्यावहारिक जग यात संवाद साधायला कुणीतरी दुवा लागे.

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:10 am

Web Title: biography of emily bronte
Next Stories
1 जिन्दगीनामा
2 नाते जडले गतकालाशी
3 ‘पोलादी पडदा’ दुभंगताना
Just Now!
X