13 December 2017

News Flash

उत्कलीय प्रतिभा

तीस वर्षांपूर्वीची घटना. राजस्थानात १८ वर्षीय रूपकँवर शेखावत सती गेली.

डॉ. मीना वैशंपायन | Updated: July 8, 2017 12:28 AM

सामाजिक अन्याय, भ्रष्टाचार, धार्मिक भेदभावाचे वर्तन, स्त्रियांवरील अत्याचार या साऱ्यांविरुद्ध ठाम भूमिका घेत उभी राहात, त्यासाठी लढणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या, उडिया भाषिक लेखिका म्हणजे डॉ. प्रतिभा राय. अतिशय संवेदनशील, बुद्धिमान तितक्याच निश्चयी अशा प्रतिभा राय म्हणजे उत्कल किंवा ओदिशाची प्राचीन संस्कृती व आधुनिक जग यांचा आपल्या लेखनात सुमेळ साधणाऱ्या व वाचकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार. त्यांच्याविषयी..

तीस वर्षांपूर्वीची घटना. राजस्थानात १८ वर्षीय रूपकँवर शेखावत सती गेली. विसावं शतक संपताना, जागतिकीकरणाचे वारे वाहत असताना १९८७च्या सप्टेंबरमध्ये एका कोवळ्या कळीचा परंपरेने बळी घेतला. अनेक जण हळहळले. आज कदाचित समाजमनात तिच्या स्मृतीचा अवशेषदेखील उरला नसेल; पण पुरी येथील तत्कालीन शंकराचार्यानीही तिच्या सती जाण्याचं समर्थन केलं तेव्हा एक स्त्री संतापली. तिनं त्या घटनेला उद्देशून एक लेख लिहिला- ‘सतीची व्याख्या काय?’ मानवता आणि विवेक यांचा तो प्रकट आविष्कार पाहून काहींना बरं वाटलं, पण अनेकांच्या मते तो लेख म्हणजे शंकराचार्याना आव्हान होतं. लोक संतापून तिला सतत धमक्या देऊ लागले. ती मात्र तिच्या विधानापासून मागे हटली नाही.

त्यानंतर तीच स्त्री एकदा पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गेलेली असताना तेथल्या मुख्य पुजाऱ्यांनी वर्णभेद करीत एका युवतीला प्रवेश नाकारला. या अन्यायाविरुद्ध दाद मिळवण्यासाठी पुजाऱ्यांशी बोलाचाली झाली. तिने या भेदभावाविषयी निषेध व्यक्त करत, ‘धर्माचा रंग काळा’ या शीर्षकाचा लेख वृत्तपत्रात लिहिला. पुरीच्या त्या पुजाऱ्यांनी तिच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. दहा वर्षांनंतर त्या खटल्यातून तिची निर्दोष सुटका झाली, पण पुजाऱ्यांवर त्याचा काही परिणाम झाला का, हा प्रश्नच आहे.

एवढंच नाही तर भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठीही तिनं धाडसी कृती केली. ओदिशा लोकसेवा आयोगाची सदस्य असताना तत्कालीन अध्यक्षांनी गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचं लक्षात येताच इतर सदस्यांच्या मदतीनं तिनं तो उघडकीला आणला. अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांनी तिच्यावर अब्रुनुकसानीचा एक कोटीचा दावा लावला. दिलेल्या धमक्या आणि सात र्वष चाललेला खटला याला हिमतीनं तोंड देत ती शेवटी जिंकली.

सामाजिक अन्याय, भ्रष्टाचार, धार्मिक भेदभावाचे वर्तन, स्त्रियांवरील अत्याचार या साऱ्यांविरुद्ध ठाम भूमिका घेत उभी राहात, त्यासाठी लढणारी, माझी भाषा प्रेमाची, मानवता हा धर्म आणि विवेक हा देव असं म्हणणारी ही स्त्री म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारविजेती, उडिया भाषिक लेखिका डॉ. प्रतिभा राय.  अतिशय संवेदनशील, बुद्धिमान तितक्याच निश्चयी अशा प्रतिभा राय म्हणजे उत्कल किंवा ओदिशाची (ओरिसा) प्राचीन संस्कृती व आधुनिक जग यांचा आपल्या लेखनात सुमेळ साधणाऱ्या व वाचकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार. त्यांच्या लेखनाचं वैपुल्य तर वाचकाला चकित करतंच, पण त्यातील विषयवैविध्य अधिक मोहवतं. ‘याज्ञसेनी’, ‘शिलापद्म’, ‘आदिभूमी’, ‘महामोह’, ‘पुण्यतोया’ इत्यादी कादंबऱ्या, लघुकथा, प्रवासवर्णनं, समाज व संस्कृतीविषयक लेखन आणि वयाच्या पंचाहत्तरीत क्रमश: प्रसिद्ध होणारे ‘अमृत-अन्वेष’ हे आत्मचरित्र, असा त्यांच्या लेखनाचा पसारा आहे. त्यांनी आजवर देशा-परदेशातील वाङ्मयीन चर्चासत्रं, परिषदा, वाङ्मयीन संमेलनं यात समर्थपणे भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

कटकजवळील बालिकुडा गावातील शाळेत तिचे कवी वडील परशुराम दास मुख्याध्यापक होते. ते गांधीवादी विचारांचे होते. वडिलांचा मोठाच प्रभाव तिच्यावर होता. लहानपणापासून वडिलांची लाडकी असणारी प्रतिभा नवव्या वर्षी कविता लिहीत होती आणि गुपचूप वृत्तपत्राकडे पाठवीत होती. आरंभी कविता छापून आल्या नाहीत. तिला वाटलं आपल्याजवळ चांगले व मोठमोठे शब्द नसल्यानेच कविता छापली जात नाही. मग एक दिवस शब्दकोश घेऊन तिनं त्यातले तिच्या मते भारी, जड शब्द शोधून कविता लिहिली व पाठवली; पण पुन्हा निराशा. मात्र प्रयत्न न सोडता ती एखादं-दोन कविता पाठवत राहिली. शेवटी एक दिवस छोटी कविता छापली गेली. त्या वेळी आणि नंतरही निसर्ग हीच आपली लेखनप्रेरणा होती व आहे असं तिला वाटतं. नंतर कवितालेखन फारसं झालं नाही. हा आपला प्रांत नाही याची जाणीव तिला झाली असेल, की कथा व कादंबरीलेखन अधिक आव्हानात्मक वाटलं असेल कोण जाणे.

आपल्याला लेखिकाच व्हायचंय, असं सांगूनही, वडिलांच्या आग्रहामुळे मेडिकलला प्रवेश घ्यावा लागला. त्यांनी समजूत घातली की, ‘डॉक्टर झाल्यावरही तू कथा-कादंबऱ्या लिहू शकशील. उलट तुला अधिक लोकांशी संवाद साधता येईल. त्यांच्या व्यथा, समस्या कळतील.’ प्रतिभा मेडिकलला गेली खरी, पण एका वर्षांतच तेथील वातावरण तिला सहन होईना. तिनं वडिलांना न सांगताच मेडिकल सोडलं आणि परत येऊन वनस्पतिशास्त्रात पदवी घेतली. पुढे शैक्षणिक मानसशास्त्रात पीएच.डी. केली व जवळजवळ तीस वर्षांहून अधिक काळ अध्यापन करून स्वेच्छानिवृत्ती घेतली.

विवाहानंतर प्रतिभा दासची प्रतिभा राय झाली. उच्चशिक्षित व उच्चपदस्थ पतीबरोबर केवळ शोभेची बाहुली बनून मिरवणं तिला नको होतं. ती म्हणते, ‘मला माझी स्वतंत्र ओळख हवी होती. आपल्याकडे संसाराची सगळी जबाबदारी स्त्रीवर, पत्नीवरच असते. मुलांच्या प्रत्येक कृत्यासाठी आईलाच जबाबदार धरलं जातं याची कल्पना असूनही मी संसार, नोकरी करता करता माझं लेखन चालूच ठेवलं. मी कथा-कादंबरी लिहीत नसे, तर ती त्या त्या वेळेला जगत असे. चालता-बोलता, उठता-बसता, एवढंच काय ड्रायव्हिंग करतानाही सारी पात्रं माझ्याबरोबर वावरत. मला कधी कधी त्याची जाणीवही नसे. माझ्या लेखनातली बंडखोर, धाडसी वृत्ती, निर्भयता आणि मानवतावाद या सर्व गोष्टींमागे आई-वडिलांचे संस्कार आहेत.’

लेखकाची जडणघडण व त्याचा परिसर त्याच्या साहित्यकृतीला जन्म व आकारही देतो. प्रतिभा राय यांच्या व्यक्तित्वातील मूल्यांचं अधिष्ठान, बंडखोरी, धाडस आणि निर्भयता हे गुण त्यांच्या साहित्याचा आशय सखोल करतात. त्यांच्या साहित्यविश्वातील विविध व्यक्तिरेखा या जशा अपरिचित, तळागाळातल्या आहेत, तशाच पौराणिक, ऐतिहासिक आहेत. त्यांच्या संपन्न, प्रगल्भ भाषाशैलीमुळे त्यांच्या लेखनाला आपोआपच अभिजातता येते.

उत्कल (ओदिशा ) हे राज्य प्राचीन भारतीय संस्कृती, शिल्पकला, मूर्तिकला, स्थापत्य, नृत्य यांचं माहेरघर आहे. ख्यातनाम जगन्नाथ मंदिर, सूर्य मंदिर वा इतर मंदिरे असोत, या मंदिरांबद्दलच्या ऐतिहासिक, पौराणिक कथा, दंतकथा, लोककथा तसेच रामायण, महाभारतादी महाकाव्ये प्रतिभा रायना आकर्षून घेतात. ती साहित्यशिल्पं जणू त्यांना आपलं वेगळं रूप दाखवतात आणि एका अनावर ऊर्मीतून पण वेगळ्या, अपारंपरिक दृष्टीतून त्या साऱ्याचा आणि वर्तमानातील घटनांचाही एक वेगळाच अन्वय त्या आपल्यापुढे सादर करतात.

१९९९ मध्ये ओदिशात झालेल्या प्रलयंकारी चक्रीवादळाने त्यांना हादरवून टाकलं. त्या वादळाने अपरिमित प्राणहानी, वित्तहानी झाली, गावंच्या गावं वाहून गेली, त्या घटनेची साक्षीदार असल्याने ते मनातून जाईना. २-३ वर्षांनंतर त्यांनी ‘मग्नमाटी’ (नवचैतन्यदायी पृथ्वी) ही कादंबरी लिहिली. ती केवळ त्या वादळाने केलेल्या संहाराबद्दल नसून ही भूमाता आणि तिची लेकरं यांच्या संबंधांबद्दल आहे. जसे वृक्ष, पर्वत, नद्या ही तिची निर्मिती आहे, तशीच मानवजात! पण मानवाने मर्यादा ओलांडल्या की ती अतोनात संतापते. ते चक्रीवादळ हे त्या रागाचं प्रतीक आहे. लेखिकेनं हे सांगताना या भूमातेचं रक्षण करण्यासाठी मानवजातीनं काय करायला हवं, मानवी संस्कृतीची उत्पत्ती कशी झाली व ती कशी टिकेल यासंबंधी भाष्य केलं आहे.

प्रतिभा यांची आणखी एक लक्षणीय कादंबरी आहे- ‘आदिभूमी’. ओदिशातील आदिवासी जमातींपैकी एक अतिप्राचीन जमात म्हणजे बोंडा. ओदिशाच्या नैर्ऋत्य दिशेला असणाऱ्या माल्कनगिरी जंगलात व तेथील पर्वतावर राहणारी ही जमात. तिच्याबद्दलच्या दंतकथांनी प्रतिभा यांना आकर्षित केलं आणि त्या तिथे जाऊन राहिल्या. त्यांच्या विचित्र वाटणाऱ्या चालीरीती, अपूर्ण, अल्पाक्षरी भाषा समजून घेत, संशोधनपूर्वक त्यांच्यावर लिहिलेली ही कादंबरी एका वेगळ्याच जगाचं दर्शन घडवते.

प्रतिभा यांच्यावर गांधीवादी विचारांचा प्रभाव होता. गांधींच्या आवाहनानुसार, कैक सामान्य जनांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन आयुष्याचा उमेदीचा काळ देशासाठी दिला. ते नंतर विस्मृतीत गेले. ‘उत्तरमार्ग’ या कादंबरीत अशा अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची कहाणी आहे.

प्रतिभा राय यांना वाटतं, ‘कोणार्कचं मंदिर आज भग्नावस्थेत आहे. खरं तर आता केवळ मुखशाला (प्रवेशद्वार) आहे, मंदिर राहिलंच नाहीये. लोकांना आज तेथील मिथुनशिल्पांबद्दल बोलण्यातच रस असतो; पण त्या कलापूर्ण मंदिराचे निर्माते, बाराशे शिल्पकार यांची कुणाला आठवण असते? त्यांनी आपापल्या उमेदीतल्या आयुष्याचं एक तप पूर्णपणे व्रतस्थ राहून, इतर कशाचीही पर्वा न करता ही कलाकुसर केली, त्यांची नावंही अज्ञात. त्याहीपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांनी, बायकांनी अतिशय संयमित रीतीनं हा विरह सहन केला, त्यांच्या त्यागाचं स्मरण कुणाला असणार?’ यातील मुख्य शिल्पी कमल महाराणा व त्याची नवपरिणीता पत्नी चंद्रभागा यांच्या विरहव्यथेत आजच्या काळातील प्राचीप्रभा व परदेशी संशोधक चार्ल्स यांच्या मैत्रीची, प्राचीप्रभाच्या दीर्घ प्रतीक्षेची कहाणी त्यांना दिसली व अस्वस्थ करत राहिली. विसाव्या वर्षी प्रथम पाहिलेल्या कोणार्कनं मनात घर केलं. तेव्हा प्रथम शिलालेख ही कविता लिहिली गेली. त्यानंतर कादंबरी. त्यासंबंधी खूप वाचन, संशोधन करत सातशे वर्षांपूर्वीचा तो काळ आधुनिक काळाशी जोडत ती गुंफली आहे. कोणार्क (शिलापद्म) म्हणजे उडिया शिल्पप्रतिभेची अक्षयस्मृती आणि जीवनाच्या अपूर्णतेची कथा.

द्रौपदी म्हणजे स्त्रीत्वाचं आव्हान. लेखक, समाजशास्त्रज्ञ सर्वाना ती आव्हानकारक वाटते. (आपल्या दुर्गाबाई, इरावतींनी केलेलं द्रौपदीचं चित्रण आठवेलच.) ‘याज्ञसेनी’ (कृष्णा) ही प्रतिभा रायलिखित कादंबरी अत्यंत गाजलेली. द्रौपदी ही मखजा (यज्ञातून जन्मलेली), तिचं लावण्य, बुद्धिमत्ता, तिच्या आयुष्यातील विलक्षण घटना, तिचं अमर्याद कृष्णप्रेम या साऱ्यांकडे तिच्या- एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून पाहिले असता तिचं जीवन कसं दिसेल, प्रत्येक घटना अनुभवताना, तिच्या भावभावना कशा असतील, तिच्या इच्छा-वासना कशा असतील याचा एक कॅलिडोस्कोप या कादंबरीत दिसतो. तिचा जन्म धर्मरक्षणासाठी झाला, ही बाब तिच्या मनात सतत आहे. आपले गुणदोष ती जाणून आहे. सारी कादंबरी तिच्या मुखातून कथन केली असल्याने अगदीच वेगळे परिमाण त्याला येते. एका अर्थी आधुनिक स्त्रीचं अपेक्षित रूपच दिसतं यात.

द्रौपदीप्रमाणेच अहिल्येच्या रूपाने बुद्धिमान, विद्वान, आत्मसन्मानाची जाणीव असणारी आधुनिक स्त्री प्रतिभा यांनी ‘महामोह’ या महाकादंबरीत उभी केली आहे. ती मेणाची बाहुली नसून जाणीवपूर्वक वागणारी आहे. आपली जबाबदारी ओळखणारी आहे. येथे कथेचा निराळा, चमत्कारापासून दूर, मानवी स्वभाव दर्शविणारा विचार मांडला आहे. गौतम ऋषींच्या शापाने शिळा होऊन पडलेली, वर्षांनुवर्षे रामाच्या पदस्पर्शाने पुनीत होण्याची वाट बघणारी अहिल्या एक स्त्री होती. तिच्याही अतृप्त वासना होत्या, संन्यस्त जीवनात तिची होणारी कोंडी व त्यातून तिच्या हातून घडलेले कृत्य यांचा मानवी दृष्टीतून अन्वय लावला आहे. प्रतिभा राय यांचं बहुतांशी लेखन हे स्त्रीकेंद्री असलं तरी आपण स्त्रीवादी नसून मानवतावादी आहोत, असं त्या ठासून सांगतात. त्यांच्या सर्वच लेखनात स्त्रीसंबंधीची किती तरी जीवनसत्यं त्या सहजपणे सांगून जातात. त्यामुळे त्या आपल्याशा वाटतात.

‘हरण्यातदेखील जिंकण्याचा आनंद लुटणं हे भारतीय स्त्रीच्या स्वभावाचं वैशिष्टय़ आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं तर तिच्या अगतिकतेचा तोच तर आधार आहे. काहीही न मिळतादेखील सारं काही मिळाल्याचं खोटं समाधान वर्षांनुवर्षे दु:खाला कवटाळण्याचं सामथ्र्य भारतीय स्त्रीला देत असतं’, अशी खंत असणाऱ्या प्रतिभा यांना खात्री आहे की, ‘महानदीची जशी अनेक नावं, अनेक रूपं तशीच भारतीय स्त्रीचीही अनेक रूपं दिसतात. मात्र स्त्रीची धारणाशक्ती, औदार्य, मनस्वीपण, प्रेम करण्याची शक्ती सार्वकालीन आहे.’ आजच्या भारतीय स्त्रीचं वाढतं उथळ आणि आत्मकेंद्रित रूप लेखिकेला समाधान देत असेल?

  • डॉ. प्रतिभा राय (२१ जानेवारी १९४३)
  • पद्मश्री, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी व अन्य विविध पुरस्कारांनी सन्मानित.
  • २५ कादंबऱ्या, २२ कथासंग्रह, प्रवासवर्णनं, आत्मचरित्र इत्यादी.
  • अनेक भारतीय भाषा, इंग्रजी, हंगेरियन यांमध्ये काही कृतींचे अनुवाद.

 

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com

First Published on July 8, 2017 12:28 am

Web Title: marathi articles on pratibha ray