नवनीता देव-सेन यांच्या लेखनात सामाजिक, राजकीय, मनोवैज्ञानिक समस्यांचा मोठय़ा प्रमाणावर विचार केलेला दिसतो. विशेष म्हणजे पौराणिक कथा, मिथ्यकथा यांचा नव्याने अन्वय लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. लेखनात मानवी भावभावनांचं उत्कृष्ट चित्रण दिसतंच, पण त्यांची माणूस जाणून घेण्याची उत्कट धडपड जाणवत राहते.

‘शब्दांशिवाय आहेच काय दुसरं? शब्दांद्वारा तर माणसं एकमेकांशी जोडली जातात. माणसाचं व्यक्तित्त्व शब्दांमधूनच आविष्कृत होतं. शब्द म्हणजे मोठं नवल आहे. शब्दांवर स्वार होऊन कुठेही पोचता येतं आणि शब्दांच्या खडकांवर आपटून आपण खोल बुडूही शकतो. लहानपणापासून एकामागे एक नवनव्या शब्दांच्या आज्ञेतच तर मी राहात आलेय. त्यांनी नियमानुसार माझ्याकडून आपापला मोबदलाही वसूल केलाय. काही शब्द तसेच्या तसे राहिले, काही माझ्याबरोबरच मोठे झाले, त्यांचंही रूप बदललं. काहींनी आपला रंग बदलला. काँग्रेसला पूर्वी त्यागाचा, संन्यासाचा रंग होता, आता काय? काही खूप जवळ आले, काही अगदी दूर गेले. बघा ना, स्वातंत्र्य हा किती महान शब्द होता, आता तो किती छोटा झालाय. प्रभातफेरी तर अदृश्यच झालीय. शब्दांवर निर्भर असणारी माझी जाणीव, माझ्यातलं चैतन्य म्हणजेच तर ‘मी’ आहे.’

Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
gold and silver Pani Puri
सोने-चांदीची पाणी पुरी! मोदींच्या गुजरातमधील या पाणी पुरीची एकच चर्चा; व्हायरल VIDEO एकदा पाहाच
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण

आपल्या मनात उमलणारी ही अशी शब्दफुलं, वाचकांच्या ओंजळीत टपटप देणारी ही नबनीता देव-सेन (१९३८) म्हणजे खरोखरीच अजब रसायन आहे. (बंगालीत ‘व’ चा ‘ब’ केला जातो आणि ती नबनीता होते.) रवींद्रांच्या ‘वृष्टी पडे टापुर टुपुर’ (थेंब पडती टपटप, टपटप) या ओळीप्रमाणे स्वत:च्या लेखनाला संबोधणारी, शब्दांद्वारे विलक्षण आनंद देणारी, घेणारी नवनीता. कायम उत्फुल्ल आणि चैतन्यशील नवनीताशी माझा १५-१७ वर्षांपूर्वी शब्दपरिचय झाला, तोही तिच्या कथेचा अनुवाद करताना. तेव्हापासून तिच्या शब्दकळेवर, लेखनावर आणि तिच्या व्यक्तिमत्त्वावरही प्रेमच जडलं.

ती कथा होती मोठी गमतीदार. ‘अभिज्ञानशाकुंतल’ या नाटकाची व मूळ पौराणिक कथेची आपली ओळख जुनी. ही कथा पितृप्रधान समाजाचं प्रतिनिधित्व करणारी. पण आधुनिक काळात ‘अभिज्ञानदुष्यंत’ जर लिहिलं तर? नवनीतानं अशी कल्पना करीत या युगातली शकुंतला कशी वागेल याचं मजेशीर, विडंबनात्मक चित्र रेखाटलंय. त्यात कुठेही कशाबद्दलही नाराजी, व्यंगपूर्ण भाषा वगैरे नाही. आधुनिक स्त्रीकेंद्री व स्त्रीलिखित बंगाली वाङ्मयात आपल्या लेखनातून ठाशीवपणे स्वत:ला व्यक्त करणारी लेखिका म्हणजे नवनीता देव-सेन. शैक्षणिक कारकीर्द उज्ज्वल. हार्वर्ड विद्यापीठातून एम. ए., इंडियाना विद्यापीठातून तौलनिक साहित्यशास्त्रात पीएच.डी., बर्कले विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरल संशोधन आणि परदेशातील हे सर्व शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून. पुढे जादवपूर विद्यापीठात विभागप्रमुख. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व. प्रतिष्ठित पाश्चात्त्य विद्यापीठांमध्ये मानाची पदे, प्रतिष्ठित व्याख्याती असे किताब, मिळालेली नवनीता! त्याबरोबरच लेखन जोरात आणि विपुल. लेखनातही विविध प्रकार यशस्वीपणे हाताळलेले. ‘पद्मश्री’ मिळाली, अनेक साहित्यिक पुरस्कार मिळाले. हे सारं विशेषच वाटण्याजोगं! ती म्हणते, ‘आता आयमुष्य कृपावंत झालंय.’

नवनीताच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ‘मा आणि बाबा दोघेही कवी. त्यामुळे माझ्या अस्तित्वावर कवितेचंच राज्य होतं. त्यातून माझी सुटका कशी होणार शिवाय माझं नामकरण केलं ते महाकवी, गुरुदेव रवींद्रनाथांनी. मी तीन दिवसांची असताना आमच्या घरी एक पत्र आलं. त्यावर पत्ता होता ‘नबनीता देव, भालोबाशा’, ..आणि त्यात गुरुदेवांनी लिहिलं होतं, ‘नवनीता तुझं नावही मी तुला दिलेली भेट आहे, तू ती स्वीकारशील याची मला खात्री आहे.’ (नवनीता म्हणजे नवजाता) माझे आई-वडील म्हणजे प्रसिद्ध बंगाली कवी नरेंद्र देव आणि कवयित्री राधाराणी देवी. आई-वडिलांची मी एकुलती एक मुलगी. त्यांनी मला एवढं भरभरून प्रेम दिलं आणि इतर मुलांना मिळणार नाहीत अशा गोष्टी दिल्या, मला आयुष्यभर पुरून उरेल एवढं, शब्दांचं, विचारांचं संचित दिलं.’

सृजनशील प्रतिभा आणि विचक्षण बुद्धी तिला उपजतच लाभली होती. त्याबरोबरच लाभलं होतं विनोदबुद्धीचं विशेष इंद्रिय! कोलकात्याच्या सांस्कृतिक व उच्च वर्तुळात आई-वडिलांचा वावर होता, त्यांना मोठा मान होता. सगळं कसं छान होतं. शिष्यवृत्ती मिळवून शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या मुलीनं तिथेच आयमुष्य घालवायचं, वेगवेगळ्या विद्यापीठात विशेष पदं भूषवायची आणि स्थायिक व्हायचं, म्हणजे कशी छान चाकोरी! तिचे विचार मात्र काही वेगळेच. तिला भारताची विलक्षण ओढ. बंगाली असल्याचा मोठा अभिमान. लिहायचं ते बंगालीतच असा निश्चय. कविता, कथा, लहान मुलांसाठीच्या गोष्टी हे सारं लेखन ती बंगालीत करत होती आणि चर्चा, परिसंवाद यासाठीचे शोधनिबंध ती इंग्रजीतच लिहीत असे. वयाच्या सातव्या वर्षी प्रथम तिच्या चार कविता आणि गद्याचे दोन छोटे कथावजा तुकडे प्रसिद्ध झाले होते. त्यात बंगाली आणि इंग्रजी यांचं प्रमाण समान होतं. तेच आजही चालू राहिलंय.

आधीपासूनच तिच्या आईचं व्यक्तित्त्व अतिशय ठाम व कणखर. आपली मुलगी प्रतिभावान असली तरी आळशी व अव्यवहारी आहे असे (समस्त आयांना वाटतं तसं) तिच्याही आईला वाटे आणि नवनीता तिच्या प्रभावाखाली वावरे. आईचं -राधाराणीचं-पहिलं लग्न तिच्या तेराव्या वर्षी झालं आणि सहा महिन्यांतच ती विधवा झाली. तत्कालीन प्रथेप्रमाणे विधवेचे पोशाख, वपन असं कर्मकांड करून तिच्या आईनं तिला घरात डांबून ठेवले. पण सासूने मात्र तिची हुशारी ओळखून, तिला आपल्या घरी आणून पाठिंबा दिला, आपला मुलगा समजून वाव दिला. मग राधाराणीने नरेंद्र देवांशी विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. शंभर वर्षांपूर्वीच्या त्या काळात हे मोठेच पाप घडले अशी भावना सामान्य समाजात होती आणि त्याचा सामना तिला अनेक वर्षे करावा लागला. त्यामुळे नवनीताच्या बाबतीत ती अधिक सावध व संरक्षकाच्या भूमिकेत असे.

प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये असतानाच नवनीताची ओळख तेथे प्राध्यापक असणाऱ्या अमर्त्य सेन यांच्याशी झाली होती. बी.ए. होऊन उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाताना ती इंग्लंडला थांबली. अमर्त्य केंब्रिजला ट्रिनिटी कॉलेजचे ‘विशेष, फेलो’ होते. दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आणि आपापल्या घरी तो निर्णय फोनवरच कळवला. त्या काळात सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा अनुरूप अशी दुसरी जोडी नव्हती. नवनीताप्रमाणेच अमर्त्य यांचे नावही रवीद्रांनी ठेवले होते. इतकी समानता त्यांच्यात होती. दोघांमध्ये असणारी जातिभिन्नता कुणीच मनावर घेतली नाही. वर्षभरानंतर परत येऊन कोलकात्याला खूप मोठा विवाहसोहळा झाला. दोघेही अमेरिकेला परत गेले.

नवनीता आणि अमर्त्य यांचा संसार तिच्या दृष्टीने छान चालला होता. तिचं पीएच. डी. झालं. तिला दोन मुली झाल्या. एकीकडे तिचं लेखन मंदावलं तरी बंद झालं नव्हतं. घराची जबाबदारी, मुली, अमर्त्य यांच्या नोकऱ्यांची सतत बदलाबदल यामुळे तिने नोकरी मात्र केली नाही. पण अमर्त्यना दुसरी कुणी आवडू लागली. संसारात रमलेल्या नवनीताला त्यावर विश्वास ठेववेना. आणि तिच्या कष्टांची दखल घेण्याची वा संवादही ठेवण्याची गरज त्यांना वाटेनाशी झाली. घरात कधीच लक्ष नसणारे अमर्त्य अधिकच बाहेर रमू लागले. परिणामी सोळा वर्षांच्या संसारानंतर दोघेही शांतपणे विभक्त झाले. नवनीताने तिथे अगदी टॅक्सी चालवण्यापासून वेगवेगळ्या प्रकारे कष्ट करत काही महिने काढले. पण मुलींसाठी शेवटी कोलकात्याला आईकडे येण्याचा निर्णय घेतला. ती म्हणते-

तू मनाचा निश्चय कर.

कोण हवंय तुला?

ती स्त्री की मी?

माझ्यात आहे सामावलेला,

दोघांचा श्वास.

तू ठरव.

कोण हवंय तुला?

ती स्त्री की मी?

कोलकात्याला आल्यावर अर्थातच जनरीतीप्रमाणे समाजाने नवनीतालाच दोषी ठरवले. तिच्यावर वाटेल ते आरोप झाले. सासर-माहेरच्या कोणीच तिला समजून घेतले नाही. आईला तर आपल्यावर हे केवढं सामाजिक संकट आलं असं वाटू लागलं. घटस्फोट झाला म्हणजे चूक स्त्रीचीच, ही आपली सामाजिक समजूत. तोपर्यंत सासरे व वडील यांचं निधन झालेलं. स्वत:च्या लग्नावेळी धाडसाने घराबाहेर पडलेली, समाजाचा रोष पत्करणारी राधाराणी आईच्या भूमिकेत शिरल्यावर, ‘लोक काय म्हणतील?’चं पालुपद लावू लागली. घरात अशांतता, अस्वस्थता होती. मुली बावरलेल्या. कुटुंबातला पहिला घटस्फोट. तोवर अमर्त्य सेनही अधिकाधिक नामवंत होऊ  लागल्याने दडपण जास्त. आपली चूक नसताना आपल्यावर हे सारं लादलं गेलंय, विश्वास ठोकरला गेलाय ही भावना, विमनस्कता जाईना. जन्मापासूनची कविताच केवळ साथीला. पण कवितेतून व्यक्त होणारी घुसमट, वेदना यामुळे लोकांकडून दाखवली जाणारी कीव तिला त्रासदायक वाटू लागली. शेवटी एका क्षणी तिनं ठरवलं आता बस. आपणच यातनं बाहेर पडायला हवंय. आपल्यासाठी अनेक गोष्टी आहेत. निश्चयपूर्वक यातनं बाहेर पडायचं. ती पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी अमेरिकेला गेली. कोलकात्याला नोकरी घेतली. कविता सोडून आता ती गद्य लेखनाकडे वळली. मग तिनं मागं वळून पाहिलंच नाही. आज तिच्या नावावर ८०पेक्षा अधिक पुस्तकं आहेत. बंगाली साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ती स्त्रियांसाठीचा आदर्श ठरली आहे.

नवनीताच्या लेखनात आरंभापासूनच सामाजिक, राजकीय, मनोवैज्ञानिक समस्यांचा मोठय़ा प्रमाणावर विचार केलेला दिसतो. नक्षलवादी चळवळीत बुद्धिजीवी वर्गाने भाग घ्यावा की नाही (आणि अनुपम), भारतीय लेखकांचं इंग्रजीतील लेखन, परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांच्या दुसऱ्या पिढीच्या समस्या, एकत्र कुटुंबपद्धती ढासळत जाणं, एड्स झालेल्यांच्या व्यथा, समलैंगिकता, बालांचं वेगवेगळ्या प्रकारे होणारं शोषण अशा समस्या तिच्या कथा-कादंबऱ्यांचे विषय झालेल्या दिसतात. विशेष म्हणजे पौराणिक कथा, मिथ्यकथा यांचा नव्याने अन्वय लावण्याचा तिचा प्रयत्न असतो. लेखनात मानवी भावभावनांचं उत्कृष्ट चित्रण दिसतंच, पण तिची माणूस जाणून घेण्याची उत्कट धडपड आपल्याला जाणवत राहते. शिवाय स्वत: कायम उच्चभ्रू किंवा विद्यापीठीय वर्तुळात वावरणाऱ्या तिच्या लेखनात आढळणाऱ्या व्यक्तिरेखा मात्र बहुतांशी असंख्य सामान्य जनांपैकी असतात.

विनोदी लेखन करणाऱ्या स्त्रिया अपवादात्मक असतात, ही वस्तुस्थिती. नवनीताच्या लेखनात मात्र चुरचुरीत, प्रसन्न तरीही अंतर्मुख करायला लावणारा विनोद मोठय़ा प्रमाणावर आहे आणि तो मिश्किलपणा वाचकाला फार हवासा वाटतो. ती वार, प्रहार करत नाही, तर हळूच मजेनं टपल्या मारत जाते. आपल्या अंत:स्फूर्तीवर विसंबून बऱ्याचशा गोष्टी करणारी नवनीता, कधी एखाद्या ट्रकमध्ये बसून नेफा बॉर्डपर्यंतही जाते तर कधी एखाद्या सेमिनारचं काम संपवून महाकुंभमेळ्यासाठी थेट प्रयागला जाऊन धडकते आणि त्या जनसागरात कोणत्याच तयारीने न गेलेल्या तिची काय तारांबळ होते, ते तिच्याच शब्दात वाचायला हवे. तिची प्रवासवर्णनं आपल्याला अक्षरश: तोंडात बोट घालायला लावतात. साध्या साध्या प्रसंगात सहजपणे दिसणारी मानवी वर्तनातील विसंगती ती अचूकपणे टिपते आणि आपल्या नर्मविनोदी शैलीत मांडत जाते. महत्त्वाचं म्हणजे स्वत:वरच हसण्याचं तिचं वैशिष्टय़. आपणही गडबडतो, गोंधळतो, चुकतो, त्यामुळे किती गमती होतात, ते ती मोकळेपणाने सांगत जाते.

आपला घटस्फोट झाला म्हणून त्या नवऱ्याबद्दल वा इतर कुणाहीबद्दल मनात यत्किंचित कटुता नाही, हे तिला मुद्दाम सांगावं लागत नाही. तिच्या लेखनात ते आपोआप उमटत जातं. ती सहजपणे, ओघाने आलं तर त्याच्या सवयींबद्दल बोलते. त्यांचा संदर्भ ती किंवा मुली टाळत नाहीत आणि मिरवतही नाहीत. पुन्हा विनोदाबरोबर अतिशय आवश्यक असणारी चिंतनशीलताही छोटय़ा छोटय़ा वाक्यांतून जाणवते. एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या स्त्रियांवर तिची ‘शीत साहसिक हेमंतलोक’ ही कादंबरी रचनेच्या, भाषेच्या व विषयाच्याही दृष्टीने फार वेगळी आहे. येथे उदाहरणे देणे अशक्य आहे. पण वृद्धावस्था कशी असते, त्याकडे देखील किती वेगळ्या दृष्टीने पाहता येते याचा वेगळा विचार तिने मांडला आहे. ती म्हणते–

‘तारुण्य! तारुण्य आणि त्याचा उन्माद! आपलं लहानपण, कुमारावस्था यांना जोशात ढकलत, त्यांच्यावर मात करत अचानक येणारं हे तारुण्य नुसता हंगामा माजवतं, सारं काही उधळून टाकतं. ही शरीराची मनावर मात असते. शारीरिक वासना वर्षांमागे र्वष सत्ता गाजवते. मग हळूच येणारं मध्यवय, प्रौढवय लक्षातच येत नाही. आणि मग जेव्हा म्हातारपणाची चाहूल लागते तेव्हा आपण आपल्या स्वप्नांतून खडबडून बाहेर येतो. तारुण्य केव्हाच गेल्याची जाणीव होते. तारुण्य येतं तेव्हा एखाद्या राजासारखं गाजावाजा करत येतं, पण जाताना मात्र सूचना न देता,चोरासारखं आपलं सगळं लुबाडून घेऊन जातं. स्त्रियांना निदान त्यांचं शरीर थोडीतरी जाणीव करून देतं, पुरुषांना ते जाणवलं तरी ते मानत नाहीत. आपण चिरतरुण असं वाटतं त्यांना, आणि ते तसेच वागतात. स्त्रिया या वस्तू आणि ते उपभोक्ता! उपभोक्ता आपल्या स्वत:ची लायकी कशाला पाहतोय?’

आज ऐंशीच्या उंबरठय़ावर उभी असणारी नवनीता माझ्याप्रमाणेच साऱ्या वाचकांना फार आपलीशी वाटते. या एका नवनीतामध्ये किती नवनीता सामावलेल्या आहेत. तिचे विविध पैलू प्रत्येक वेळेला तिचं एक नवं रूप समोर आणतात. पण आज, आता दिसतो एवढा हा प्रवास सहज, नैसर्गिक होता? छे. मुळीच नव्हता. खरं म्हणजे तिचं प्रवाहाविरुद्ध पोहणं होतं हे! तीच एके ठिकाणी अभिमानानं म्हणते,

‘आमचं घर हे कणखर स्त्रियांचं घर आहे, तिथे स्त्रीराज्य आहे.’ नवनीताच्या आईला आपली मुलगी म्हणजे खरा हिरा आहे असं वाटे. नवनीता महाकुंभमेळ्याहून परतल्यावर तिनं काशीला गंगेच्या काठीच राहायला जायचा विचार आईच्या कानी घातला. आई म्हणाली, ‘तू कसली कलकत्ता सोडून जाणार? पण पोरी, ती काशीची गंगा तिच्या अथांगतेसह तू तुझ्या शब्दांत सामावण्याचा प्रयत्न करतेस ना? काशीची गंगा उलटी – उत्तरेकडे वाहते, संकेताविरुद्ध-तुझ्यासारखी! तुझा हा अमृतकुंभ तू हरवू नकोस कधी!’

किती खरे आहेत ना ते शब्द!

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com