19 November 2017

News Flash

नाते जडले गतकालाशी

सात-आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट. आमची ‘एशियाटिक’मध्ये एक विशेष भेट ठरली.

डॉ. मीना वैशंपायन | Updated: August 19, 2017 12:05 AM

विदुषी, प्राचीन भारताच्या इतिहास संशोधनात मन:पूर्वक गुंतलेली, आणि तरी समाजहितविरोधी घटना घडल्या की ‘जागल्या’ची भूमिका बजावत आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडणारी, विचारक्षम इतिहासकार म्हणजे डॉ. रोमिला थापर! पुरातत्त्वशास्त्राच्या मदतीने उपलब्ध झालेली साधने, दंतकथा आणि सामाजिक इतिहास-लेखनाची तत्त्वे यांची उत्कृष्ट सांगड घालणाऱ्या थापर या पहिल्या संशोधक मानल्या जातात.

सात-आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट. आमची ‘एशियाटिक’मध्ये एक विशेष भेट ठरली. सुप्रसिद्ध इतिहासकार डॉ. रोमिला थापर यांच्याशी भेट व अनौपचारिक गप्पा. दोनदा ‘पद्मभूषण’ पदवी (१९९२ व २००५) नाकारणारी ही विदुषी, प्राचीन भारताच्या इतिहास संशोधनात मन:पूर्वक गुंतलेली आणि तरी समाजहितविरोधी घटना घडल्या की ‘जागल्या’ची (पब्लिक इंटलेक्चुअल)भूमिका बजावत आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडणारी, विचारक्षम इतिहासकार! जवळजवळ दीड-दोन तास त्यांच्याबरोबर आम्ही कालिदासाच्या शकुंतलेपासून, गजनीच्या महमूदापर्यंत आणि गतकाळातील सुवर्णयुगापासून वर्तमानातील अस्वस्थ करणाऱ्या दहशतवादी घटनांपर्यंत प्रवास करून आलो.

भेट संपली तेव्हा मनावर प्रभाव होता, वयाच्या ८५व्या वर्षीही जाणवणाऱ्या त्यांच्या रुबाबदार व्यक्तित्वाचा, उंचेल्या मूर्तीचा, ताठ बाण्याचा आणि अर्थातच व्यासंगाचा, व मोकळेपणाने पण अचूक बोलण्याचा! त्यांचं अभ्यासपूर्ण लेखन, स्वत:च्या संशोधनाबद्दलची खात्री, साम्यवादी विचारांकडे कल असूनही, इतर विचारप्रणालींचे आवश्यक असेल तेथे उपयोजन करणं, याची माहिती होती. मनातला आदर वाढला. त्यांची मतं पटोत वा न पटोत, त्या वादविवादात अडकोत, त्यांच्या विद्वत्तेबद्दल शंका विरोधकांनाही घेणं कठीण हे जाणवलं.

सर्वसामान्यपणे माणसाला गतकाळ जाणून घेणं, इतिहासात रमणं आवडतं. इतिहासाचा शब्दश: अर्थ पाहिला तर, इतिहास म्हणजे इति ह आस. हे (किंवा ते) असं असं होतं. इतिहास म्हणजे गतकालाचं आकलन. तो काळ आपण परत आणू शकत नाही, पण काही तथ्यांच्या मदतीने, त्याची कल्पना करू शकतो. मानवी कुतूहलाचं समाधान करण्यासाठी इतिहास-लेखक गतकालातील घटनांचं विश्लेषण करीत आपल्यापर्यंत त्या घटना पोचवतो. फार पूर्वीपासून माणूस विविध माध्यमांतून इतिहास सांगत आला आहे. पण इतिहास-लेखन वा कथन यात बहुतांशी पुरुषांचीच मक्तेदारी होती, स्त्रियांचा वाटा अल्प होता. आधुनिक काळात इतर क्षेत्रांमध्ये स्त्रिया जशा पुढे आल्या, तशा इतिहासकार म्हणूनही आपल्या व्यासंगाने, अभ्यासाने मान्यता मिळवू लागल्या. मागच्या लेखात रशियन नोबेलविजेती स्वेतलाना हिने मौखिक इतिहास-लेखनाचं दालन केवढं समृद्ध केलं ते पाहिलं होतं. प्राचीन भारताच्या इतिहास-लेखनात आज डॉ. रोमिला थापर या नावाला आंतरराष्ट्रीय ख्याती आहे.

प्रतिष्ठित पंजाबी कुटुंबात १९३१ मध्ये जन्मलेल्या रोमिला यांचे वडील सैन्यात डॉक्टर होते. ती तीन भावंडांमधील धाकटी. मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जात असताना थापर कुटुंब मात्र मुलींच्या शिक्षणाबाबत आग्रही होतं. रोमिलाला आईवडील आपल्याबरोबर बदलीच्या ठिकाणी घेऊन जात. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वडील जेव्हा घरी असत तेव्हा छोटय़ा रोमिलाला वाचायला लावत. त्या वाचनातून गप्पा आणि वडिलांशी अधिक मैत्री झाली, खूप गोष्टी नकळत शिकता आल्या असं त्यांना वाटतं.

त्यांनी एके ठिकाणी म्हटलंय की, ‘एकदा आम्ही मद्रासला (आता चेन्नई) गेलो होतो. वडील एका म्युझियममध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी मला खूप शिल्पं, प्राचीन दगडांचे प्रकार, चोलावंशातील राजांचे पुतळे दाखवले. त्यासंबंधीची पुस्तकं घेऊन आम्ही घरी आलो, आणि त्यांनी मला ती पुस्तकं वाचायला लावली. आधी कंटाळा आला, पण नंतर गोडी वाटू लागली. त्यानंतर ते माझ्याशी त्याबद्दल चर्चा करू लागले. तिथूनच मनात प्रश्न उमटू लागले, आपण कोण? आपली मुळं कुठली? आपल्या प्राचीन इतिहासात काय घडलं? आपण याचा शोध घ्यायला हवा. १९४५-४६च्या सुमाराचा तो काळ माझ्या दृष्टीने खूपच छान होता. स्वातंत्र्य दृष्टिपथात आलं होतं. त्याची आम्ही आतुरतेनं वाट पाहात होतो. पुण्याला असल्याने वाडिया कॉलेजात प्रवेश घेतला होता. पण दोन वर्षांतच त्यांची बदली दिल्लीला झाली आणि मी ‘मिरांडा हाउस’ या प्रसिद्ध कॉलेजातून इंग्लिश साहित्य घेऊन बी.ए. केलं. इतिहास हा तेव्हा माझा दुसरा विषय होता. पुढे मला परदेशात जाऊन शिकावंसं वाटत होतं. वडील म्हणाले, ‘मी पैसे ठेवलेत, पण तुझ्या हुंडय़ासाठी. तुला परदेशी जाऊन पदवी घ्यायचीय की लग्न करायचं हे ठरव.’ मी क्षणाचाही विलंब न लावता म्हटलं, ‘अर्थात पदवी. मला शोध घ्यायचा होता- स्वत:चा आणि इतिहासाचा.’

आता त्यांचा रस्ता ठरला होता. रोमिलांनी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला. लंडनने त्यांना जणू नवीन आयुष्य दिलं. तेथील स्वतंत्र आयुष्य, ग्रंथालयं, बौद्धिक वातावरण व त्यातील मुक्त आणि गंभीर चर्चा, चैतन्य या साऱ्यांचा त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम झाला. भारतात कॅन्टोन्मेन्टच्या वातावरणात राहण्यापेक्षा त्यांना लंडन मानवलं. तिथेच त्यांचा व्यासंग खऱ्या अर्थानं सुरू झाला. १९५५मध्ये इतिहास हा विषय घेऊन बी.ए. झाल्यावर त्यांचे मार्गदर्शक, विख्यात इतिहासतज्ज्ञ डॉ.ए. एल. बॅशम यांनी रोमिलांना तिथेच शिष्यवृत्ती मिळवून पीएच.डी. करण्याचा सल्ला दिला. अत्यंत कठीण अशा मुलाखतीला यशस्वीपणे तोंड दिल्यावर त्यांना ती शिष्यवृत्ती मिळाली. १९५८ मध्ये डॉक्टरेट मिळवून त्या परतल्या. त्यांचा विषय होता, kAshoka and the decline of the Mauryasl १९६३मध्ये प्रबंधावर आधारित त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर आजवर चाळीसेक पुस्तकं प्रकाशित झाली तरी त्यांना आपले ते पहिले पुस्तकच अधिक प्रिय आहे.

सम्राट अशोकाचा विचार ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडताना प्रथमच त्यांनी सम्राट अशोक आणि माणूस अशोक, या दोन वेगळ्या व्यक्तित्वांची स्वभाववैशिष्टय़े विचारात घेऊन इ.स. पूर्व तिसऱ्या शतकातील भारताच्या सामाजिक जीवनाचा संदर्भ लक्षात घेतला. त्या काळात राजकीय सत्तेचं केंद्रीकरण होत होतं आणि सामाजिक सुव्यवस्था राबवताना व्यक्तिस्वातंत्र्याला फारसा थारा दिला जात नव्हता असं त्यांचं प्रतिपादन आहे. बौद्ध धर्माचा, पंचशील तत्त्वांचा अशोकाने केलेला स्वीकार यांसारख्या गोष्टींचा प्रथमच, वेगळा विचार थापर यांनी मांडला आहे. तसे करताना पारंपरिक ऐतिहासिक साधनांच्या जोडीने त्यांनी तत्कालीन इतर संस्कृतींशी तुलना केली, बौद्ध व जैन साहित्यातील संदर्भ शोधले, तत्कालीन राजकीय व्यवस्थेत धम्माचे असणारे स्थान इत्यादी असंख्य बाबींचा विचार केला आहे. अशोकाचं व्यक्तित्व घडण्यात परिस्थितीचा कसा मोठा वाटा होता हेही दाखवले आहे.

या पहिल्या पुस्तकाने त्यांना यश मिळवून दिले. दिल्लीला परतल्यावर आपण संशोधन करणार आहोत, संसार थाटण्यात  आपल्याला रस नाही, स्वतंत्रपणे, आवडीने जगायचे आहे हे त्यांनी घरी स्पष्ट केले. मुलीच्या मताचा मान राखत, वडिलांनी आपल्या मुलाला सांगितले की, ‘मी हिला आता माझा दुसरा मुलगा समजतो. तूही तसेच तिच्याशी वागावेस.’ हेही विशेष वाटते.

त्यानंतर रोमिला थापर यांनी सोमनाथ- मंदिर, शकुंतला, प्राचीन भारताचा इतिहास, (दोन खंड) सांस्कृतिक व सामाजिक इतिहास यांसारख्या अनेक पुस्तकांचे लेखन केले. प्राचीन भारताच्या इतिहास-लेखनात प्रागैतिहासिक काळापासून ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतच्या काळाचा इतिहास त्यांनी लिहिला आहे. त्याला सर्वत्र मान्यता आहे. पण इतिहासाच्या पाठय़पुस्तकांवरून त्यांचे व इतर अभ्यासकांचे मतभेद झाले. वादविवाद त्यांना नवे नाहीत. त्यांनी परदेशी विद्यापीठांत ठरावीक मुदतीसाठी व्याख्यात्या म्हणून, तर दिल्लीजवळील कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आरंभापासून सर्वपातळ्यांवर काम केले. पण ते काम व्यावहारिकदृष्टय़ा जमेना. मग जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना करताना मात्र त्यांना समविचारी लोक भेटले, तिथले वातावरण मानवले आणि तिथे अनेक वर्षे काम करून आता त्या तेथेच प्रोफेसर एमिरेट म्हणून अजूनही कार्यरत आहेत.

विसाव्या शतकात जगभर इतिहास-लेखनाच्या नवनव्या दृष्टिकोनांमुळे व प्रगत विचारांमुळे ‘सर्वागीण इतिहास-लेखन’ (History in totality) करण्याचा आग्रह धरला जाऊ लागला होता. नवीन साधने, नवीन माहिती उपलब्ध होत होती. भारतातही स्वातंत्र्यानंतर अभ्यासक्रमाची पुनर्रचना होत होती, अशा वेळी भारताचा इतिहास लिहिताना आपण आपली संमिश्र समाजरचना, तिची वैशिष्टय़े, येथील परंपरा, लोकजीवन, लोकसाहित्य यांचा विचार केला पाहिजे. तसेच राजकीय सत्तेचे चढउतार आकलन करून घेताना, तत्कालीन आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक व अन्य देशांतील परिस्थितीचाही विचार करायला हवा हा आधुनिक दृष्टिकोन आग्रहाने मांडत, त्या आपले संशोधन याच दिशेने नेत राहिल्या. पुरातत्त्वशास्त्राच्या मदतीने उपलब्ध झालेली साधने, दंतकथा आणि सामाजिक इतिहास-लेखनाची तत्त्वे यांची उत्कृष्ट सांगड घालणाऱ्या थापर या पहिल्या संशोधक मानल्या जातात. इतिहास-लेखनाचा एक आदर्श, अभ्यासपूर्ण नमुना त्यांनी लोकांपुढे ठेवला आहे. सोमनाथ हे गझनीच्या महमूदाच्या भारतावरील स्वाऱ्यांच्या बाबतीतले पुस्तक हे त्याचे उदाहरण आहे. तळागाळाचा इतिहास, (History from below) या नवीन इतिहासविषयक दृष्टिकोनाचा उपयोग करणे त्यांच्या साम्यवादी वृत्तीला मानवणारेच होते. पुराव्यानिशी केलेली त्यांची प्रतिपादने वाचताना, त्यांचे बुद्धिवैभव लक्षात येते, तसेच कठीण विषय सुलभ करून सांगण्याची हातोटीही लक्षात येते.

ललित साहित्याचा ऐतिहासिक साधन म्हणून विचार करताना समाजधारणांचा, सामाजिक इतिहासाचा विचार करावा लागतो, कारण समाजधारणांनुसार अथवा तत्कालीन समाजाच्या गरजेनुसार, साहित्यातील पात्रांची रचना होत असते हे साहित्याच्या समाजशास्त्राचे सूत्र रोमिला थापर शकुंतलेच्या उदाहरणावरून सांगतात. त्यासाठी भिन्न-भिन्न काळात, वेगवेगळ्या समाजव्यवस्थांमध्ये शकुंतला कशी रंगवली गेली, तिची स्वभाववैशिष्टय़े कशी बदलत गेली याचा एक सुंदर आलेख त्यांनी काढला आहे. भारतीय स्त्रीत्वाचे मूर्त रूप म्हणजे शकुंतला. स्वतंत्र बाण्याची, आग्रही, आपल्या हक्कांची जाणीव असणारी महाभारतातील शकुंतला कालिदासाच्या शाकुंतलात मात्र अतिशय नेभळी, दुबळी, जे वाटय़ाला येईल त्याचा मुकाट स्वीकार करणारी आहे. याच नाटकावर आधारित जर्मनमधील अनुवाद रोमॅन्टिसिझमकडे झुकणारा आहे, तर रवींद्रनाथांनी रंगवलेली दुष्यंत-शकुंतला जोडी थोडीशी ब्रिटिश प्राच्यविद्याविशारदांच्या मताशी जुळणारी आणि थोडी राष्ट्रवादाच्या रंगात रंगलेली आहे. मूळ कथेतील हे सगळे बदल कधी अपरिहार्य, कधी त्या काळाची गरज तर कधी समाजापुढे आदर्श ठेवण्याची लेखकाला वाटलेली गरज म्हणून झाले आहेत.

आपली एक परंपरा असावी म्हणून बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. पण परंपरा बदलतात. शतकानुशतकं त्या जशाच्या तशा चालत येत नाहीत, हे विसरले जाते. रोमिला थापर यांच्या मते ब्रिटिशांनी भारतात येऊन इथल्या संस्कृतीचा, इतिहासाचा धांडोळा घेतला, ऐतिहासिक साधनं प्रकाशात आणली. पण तो घेताना त्यांनी स्वत:च्या मनात रुजलेल्या, त्यांच्या देशातील समाजाच्या इतिहास-लेखनाचे उपलब्ध नमुने, परंपरा, कल्पना डोळ्यांपुढे ठेवल्या व त्यानुसार भारतीय इतिहासाचे  लेखन केले. त्यामुळे ते चुकीच्या पायावर उभे राहिले. त्यांचे आंधळे अनुकरण करणाऱ्या आपल्या लोकांनी तेच कित्ते गिरवले व शिवाय त्या चुकीच्या गोष्टींचे समर्थन केले. ब्रिटिशांच्या इतिहासदृष्टीविषयी रोमिला यांचे आक्षेप आहेत. पण पंडित नेहरूंच्या व्यक्तित्वाचा, दूरदृष्टीचा व लोकशाहीवादी विचारांचाही प्रभाव त्यांच्यावर आहे.

गेल्या काही वर्षांत वाढलेली धार्मिक असहिष्णुता व अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर सतत होणारे हल्ले रोमिलासारख्यांना विलक्षण  अस्वस्थ करताहेत हे साहजिकच आहे. व्याख्यानांतून, लेखनातून त्या या घटनांना विरोध करत आहेत. समाज हा परिवर्तनशील असतो, त्यामुळे सनातन परंपरा वा धारणांचा पुनर्विचार करून निर्णय घेतले जावेत यासाठी ऐतिहासिक दाखले देत त्या लिहिताहेत. ‘पद्मभूषण’ पुरस्कार नाकारताना त्या म्हणाल्या होत्या, ‘‘विद्वत्जगतातले, माझ्या क्षेत्रातले सगळे मानाचे पुरस्कार मला मिळाले आहेत. एका अभ्यासकाला आणखी काय हवं? इतर पुरस्कार घेऊन मी मिंधेपण कशाला स्वीकारू?’’ त्यांची व्याख्यानं ऐकून मला वाटतं, सम्राट अशोकाप्रमाणेच त्यांच्या व्यक्तित्वातही संशोधक आणि साम्यवादी विचारप्रणालीची पुरस्कर्ती  अशी दोन व्यक्तित्वं मिसळली आहेत. त्यामुळे त्या वादात अडकतात. तरी हे मात्र खरं की आज समाजाला अशा बाणेदार, विचारक्षम, व्यासंगी अभ्यासकांची गरज आहे, आणि तेच दुर्मीळ होताहेत ही आपल्यासाठी खंत वाटणारी बाब!

डॉ. रोमिला थापर (१९३१)

  • प्राचीन भारताचा इतिहास, सोमनाथ, शकुंतला, द पास्ट बियॉन्ड अस, पब्लिक इंटलेक्च्युअल्स, अशोक अन्ड द डिक्लाइन ऑफ मौर्य यासारख्या पुस्तकांचे लेखन, व इतर काही पुस्तकांचे संपादन
  • फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड येथील विद्यापीठांमध्ये अभ्यागत प्राध्यापक,
  • अनेक विद्यापीठांच्या मानद पदव्या.
  • लायब्ररी ऑफ काँग्रेसतर्फे क्लुज जीवनगौरव पुरस्कार व फेलोशिप. जवाहरलाल नेहरू फेलोशिप, याबरोबर इतर सहा पुरस्कार.

डॉ. मीना वैशंपायन

meenaulhas@gmail.com

First Published on August 19, 2017 12:05 am

Web Title: the story of romila thapar