X

कधी कधीच सुसंस्कृत!

तिघेही रशियाचे. गंभीर आजारी पडले इंग्लंडमध्ये.

सर्जेई स्क्रिपाल आणि त्याची मुलगी युलिया इंग्लंडमधल्या सॅलिस्बरीत घरासमोरच्या बाकावर बेशुद्धावस्थेत आढळले आणि अनेकांना अलेक्झांडर लिटविनेंको याच्या आठवणीनं घाम फुटला.

तिघेही रशियाचे. गंभीर आजारी पडले इंग्लंडमध्ये. आणि अलेक्झांडर तर गेलाच. सर्जेई आणि त्याच्या मुलीचं काय होईल, याची खात्री अद्याप नसली तरी अंदाज मात्र आहे सर्वाना. जवळपास १९ दिवसांनंतर काल पहिल्यांदा सॅलिस्बरी रुग्णालयात युलियानं डोळे उघडले. सर्जेई यांनी अजूनपर्यंत तितकाही प्रतिसाद दिलेला नाही. हे दोघेही जिवंत राहतील की नाही आणि राहिलेच तर त्यांची काय अवस्था असेल याबद्दल डॉक्टरांच्या मनात शंका आहेत. अलेक्झांडर यांचं जे काही झालं आणि सर्जेईचं जे काही होईल यात एक साम्य आहे.

हे दोघेही रशियन सरकारविरोधात.. म्हणजे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या.. होते / आहेत. दोघेही एके काळचे रशियन गुप्तहेर. देशासाठी हेरगिरी करता करता दोघेही परदेशांसाठीही काम करू लागले. दोघेही पकडले गेले. आणि दोघांनीही नंतर देशांतर केलं. यातल्या सर्जेईला तर फितुरीच्या आरोपाखाली शिक्षा झाली. आणि त्याला सोडावा म्हणून इंग्लंडनं आग्रह धरला. त्याप्रमाणे तो गुप्तहेरांच्या देवाणघेवाणीत सुटला आणि नंतर इंग्लंडमध्ये येऊन राहिला. त्याला लंडनमध्ये घर घेण्यासाठी मदत केली होती बोरीस बेरिझोव्हस्कीने.

हे कोण? तर रशियातले धनाढय़. पुतिन यांना सत्तेवर येण्यासाठी मदत करणारे. सत्तेवर आल्यावर पुतिन यांना ते नकोसे झाले. त्यांच्याविरोधात चौकशी वगरे सुरू झाली. शेवटी तेही इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाले. आणि २०१३ साली आपल्या आलिशान प्रासादाच्या न्हाणीघरात इंग्लंडमध्ये मृतावस्थेत आढळले. पाच वर्ष झाली. पण अजून काही त्यांच्या मरणाबाबत फार काही समजलेलं नाही. त्यांच्या आधी २००६ साली अलेक्झांडर गेलेला. त्याला चहामधनं भयानक विष दिलं गेलं. रुग्णालयात डॉक्टरांच्या नजरेखाली कणाकणानं तो गेला. कोणी काहीही करू शकलं नाही. डॉक्टरांना इतकं फक्त कळत होतं की अलेक्झांडरच्या शरीरात काही किरणोत्सारी पदार्थ गेलाय. त्या विषाला काही उताराच नव्हता.

आणि आता त्याच इंग्लंडमध्ये सर्जेई आणि मुलगी युलिया मरणासन्न आहेत. ४ मार्चला या दोघांना विषबाधा झाली आणि आठवडाभरानं निकोलाय ग्लुश्कॉव्ह हेदेखील त्यांच्या लंडनमधल्या घरात गेलेले आढळले. बेरिझोव्हस्की यांचे ते उजवे हात मानले जात. एअरोफ्लोत ही रशियन सरकारी विमान कंपनी आठवते? तिचे ते प्रमुख होते काही काळ. सध्याचे कडवे पुतिनविरोधक.

या सगळ्यांच्या जगण्यात जसं एक साम्य होतं, तसं त्यांच्या मरणातही एक समान, अदृश्य धागा आहे.

रासायनिक आणि जैविक अस्त्रं.

हा तो समान धागा. या दोघातिघांच्या मरणाच्या निमित्तानं पुतिन यांच्या विरोधातल्या भावनांची एक लाटच येऊन गेली. विशेषत सुशिक्षित जगात. इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी तर २३ रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. रशियाचा निषेध म्हणून. त्यांनी केलं ते योग्यच. पण मुद्दा असा की या रासायनिक अस्त्रांच्या निर्मिती आणि वापराचं पाप हाताला लागलेलं नाही.. असा एकही देश नाही.

गंमत म्हणजे ज्या इंग्लंडच्या पंतप्रधानांनी या अमानुष हल्ल्याचा निषेध वगरे केला त्याच इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चíचल यांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या हिटलरच्या गेस्टापो या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख रेनहार्ड हेड्रिच यांना असंच जैविक अस्त्राच्या हल्ल्यानं मारलं. या मुद्दय़ावर इंग्लंड इतकं शहाजोग आणि बनेल की दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलर आणि जर्मनीविरोधात गाजलेल्या न्यूरेंबर्ग खटल्यात या रासायनिक आणि जैविक अस्त्र निर्मात्यांना शिक्षा केली जाऊ नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. का? तर जर्मनीच्या रसायन वा जैविकास्त्र निर्मात्यांना शिक्षा झाली तर ब्रिटिश संशोधकांचंही पितळ उघडं पडेल म्हणून.

याचा अर्थ इतकाच जर्मनीनंदेखील प्रचंड प्रमाणावर रसायनास्त्रं तयार केली होती. सोविएत रशियानं त्यात आघाडी घेतली होती, अमेरिका या अस्त्रांच्या निमिर्तीत नवनवे प्रयोग करत होता. इटली, जपान या देशांची या अस्त्रांच्या निर्मितीतली प्रगती डोळ्यात भरणारी होती. आज अनेकांना माहीतही नसेल पण खुद्द हिटलर हा पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी वापरलेल्या रसायनास्त्रांनी घायाळ झाला होता. त्याला अंधत्व आलं होतं. पुढे हिटलरने अत्यंत प्रगत रसायनास्त्रं बनवली. पण जगाचं सुदैव हे की ती त्यानं वापरली मात्र नाहीत. ती त्यानं वापरली असती तर दुसऱ्या महायुद्धाचा निकाल आणखी काही काळ लांबला असता, हे निश्चित. यातला आणखी एक धक्कादायक भाग म्हणजे जी अस्त्रं वापरायला हिटलर घाबरला ती अस्त्रं चíचल यांनी मात्र बिनदिक्कत वापरली. उदाहरणार्थ अ‍ॅन्थ्रॅक्स. म्हणजे काळपुळी. दुसऱ्या महायुद्धात स्टालिनग्राडच्या लढाईत हिटलरचा पराभव झाला हे सर्वानाच माहितीये. पण हे माहीत नाही की या लढाईत हिटलरच्या जर्मन सनिकांविरोधात स्टालिनच्या रशियन फौजांनी पहिल्यांदा टय़ुलारेमिया या आजाराच्या जंतूंचा वापर केला. जैविकास्त्रं म्हणून. स्टालिन याचा साथीदार लावेंट्री बारिया हा विख्यातच होता रासायनिक आणि जैविक अस्त्रांच्या निर्मितीत. हे बारिया केजीबी या रशियाच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख होते. आताच्या पुतिन यांच्याप्रमाणे. नंतर व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेनं वापरलेल्या रसायनास्त्र, जैविकास्त्रांचा घृणास्पद इतिहास तर सर्वश्रुतच आहे. हिरवाकंच व्हिएतनाम या रसायनास्त्रांनी पार कोळपून गेला आणि त्यातल्याच काही नापाम बॉम्बसारख्यांनी माणसं जिवंतपणे होरपळली गेली. आज औषधनिर्मितीत आदरणीय असलेल्या वगरे अनेक कंपन्या प्रत्यक्षात ही रासायनिक, जैविक अस्त्रं तयार करण्याचं काम अगदी अलीकडेपर्यंत करत होत्या. आयुष्यभर शिकारीच्या शौकात अनेक प्राण्यांना हकनाक मारणाऱ्याला म्हातारपणी भूतदया आठवावी, तसंच आहे हे.

पण त्याला इलाज नाही. हे असं आहे खरं. हा विषय इतका गुंतागुंतीचा आहे की सर्जेई आणि युलियाच्या प्रकरणात कोणतं रसायनास्त्रं वापरलं गेलंय हे कळायलाच मुळी आठदहा दिवस लागले. मुख्य म्हणजे हे दोघे या काळात जिवंत असल्यानं संशोधन तरी होऊ शकलं. त्यात कळलं की नोविचोक नावाचा नव्‍‌र्ह एजंट या दोघांवरच्या हल्ल्यांसाठी वापरला गेलाय. आपल्या शरीरातली नव्‍‌र्हस सिस्टीम.. म्हणजे मज्जारज्जू व्यवस्था.. वगरे हा निकामी करून टाकतो म्हणून तो नव्‍‌र्ह एजंट. ते अनेक प्रकारचे असतात.

पण नोविचोक हा पदार्थ खास रशियातच बनतो. त्यासाठी पन्नासच्या दशकापासनं रशियात संशोधन सुरू होतं आणि आहेही. हे नव्‍‌र्ह एजंट रसायनाच्या रूपात असतात, काही वायूंच्या रूपात असतात तर काही छोटय़ा घन कणांच्या पावडरच्या रूपात. ते कसेही असोत. पण एकदा का शरीरात शिरले की मज्जासंस्थेचा ताबा घेतात आणि मग या संस्थेचं स्नायूंवरचं नियंत्रण संपुष्टात येतं. जितका जालीम नव्‍‌र्ह एजंट तितका कमीत कमी वेळात तो आपलं लक्ष्य गाठतो. हे लक्ष्य म्हणजे अर्थातच संबंधित व्यक्तीचा मृत्यू. तो कधी हृदय आकसल्यामुळे होतो तर कधी फुप्फुसं काम करेनाशी झाल्यामुळे. पण यात शंभर टक्के होतं म्हणजे या एजंटची बाधा झालेल्यांच्या डोळ्यांची बुब्बुळं लहान लहान व्हायला लागतात. म्हणजे किती भयानक मरण असेल हे. आणि तरीही या पद्धतीनं अजूनही माणसं मारली जातात. ‘युद्ध जिवांचे’ या पुस्तकाच्या निमित्तानं या सगळ्याचा अभ्यास करताना एक जाणीव सारखी होत होती.

ती म्हणजे.. आपण कधी कधीच सुसंस्कृत आहोत.

– गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

First Published on: March 24, 2018 4:24 am