News Flash

लेडी ऑफ फायनान्स!

१९४३ साली त्यांनी न्यू यॉर्क फेडमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. वास्तविक ते पद त्या वेळी महिलांसाठी नव्हतं.

मॅडेलिन मॅकव्हिनी (Madeline McWhinney)

गिरीश कुबेर

त्यांचं सांगणं असायचं : काय मिळवायचं आहे हे ठरवा आणि ते मिळवाच. बरोबरच्या पुरुषांना मागे टाकण्याचा एकच रास्त मार्ग आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांच्यापेक्षा सरस होणं..

मॅडेलिन मॅकव्हिनी यांच्या निधनाची बातमी आपल्याकडे दिसली नाही. ‘सीएनएन बिझनेस’, ‘ब्लूमबर्ग’ वगैरेवर होती. पण आपल्याकडे फारसं काही कुणाला या बाईंविषयी ममत्व असल्याचं दिसलं नाही.

या मॅडेलिन अलीकडेच निर्वतल्या. ९८ वर्षांच्या होत्या. त्यांच्याविषयी पहिल्यांदा वाचलं होतं ते पॉल व्हॉल्कर यांच्या ‘कीपिंग अ‍ॅट इट’ या आत्मचरित्रात. अलीकडच्या काळात अमेरिकी फेडचे दोन बँकर आणि त्यांची कारकीर्द चांगलीच रंगतदार. एक हे व्हॉल्कर आणि दुसरे त्यांच्यानंतरचे अ‍ॅलन ग्रीनस्पॅन. दोघेही ताडमाड आणि व्यक्तिमत्त्व म्हणून समोरच्यास दबकवणारे. दोघांचीही कार्यशैली बँकिंगच्या मर्यादा ओलांडून जगण्याच्या अन्य अंगांनाही स्पर्श करणारी. व्हॉल्कर गेल्या वर्षी गेले. निक्सन ते ओबामा इतक्यांच्या अध्यक्षकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पत्करल्या. सद्दाम हुसेन यांच्या काळातला इराकसंदर्भात त्यांनी केलेला अहवाल गाजला. त्यात तर त्यांनी थेट संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल कोफी अन्नन यांच्या चिरंजीवाचा आर्थिक घोटाळा उघडकीस आणला. असो.

तर त्यांच्या आत्मचरित्रात मॅडेलिन मॅकव्हिनी यांचा उल्लेख आहे. त्यांच्या कोणत्या तरी निवडणुकांत व्हॉल्कर त्यांचे प्रचारप्रमुख होते आणि या दोघांनी ती निवडणूक कशी गाजवली वगैरे असं काही. त्यात मॅडेलिन जिंकल्या. त्यांच्या निधनाची बातमी आली आणि ते आठवलं. त्यांच्याविषयी मग शोधाशोध सुरू केली. काही वाचायला मिळतंय का वगैरे. त्या आघाडीवर मात्र हिरमोड झाला नाही. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’ वगैरे अनेकांनी त्यांच्याविषयी रसरशीत मृत्युलेख लिहिले. ‘इकॉनॉमिस्ट’च्या शेवटच्या पानावरही काही तरी असेलच.

मॅडेलिन मॅकव्हिनी या अर्थतज्ज्ञ होत्या. अलीकडच्या काळात अर्थतज्ज्ञ हे संबोधन तसं बऱ्यापैकी आकर्षक बनलंय. पण मॅडेलिन बाई ज्या काळात या क्षेत्रात आल्या तेव्हा ते तसं नव्हतं. सगळाच्या सगळा पुरुषी खाक्या. म्हणजे ही पहिल्या महायुद्धाच्या काळातली गोष्ट. तेव्हा अमेरिकेत महिलांना पतीच्या किंवा वडिलांच्या परवानगीशिवाय एकटय़ाला बँकेत खातंही उघडू दिलं जायचं नाही. ‘बायकांना काय कळतं अर्थव्यवहारातलं,’ असा अमेरिकी पुरुषरावांचा त्या वेळी समज होता. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य वगैरे मुद्दे त्यामुळे दूरदूरच असणार. त्या वेळी मॅडेलिन यांनी पुरुषांच्या बरोबरीनं, खांद्याला खांदा लावून अर्थशास्त्र शिकायला सुरुवात केली. त्यांचे वडील डेन्व्हरला एका बँकेशी संबंधित होते. पाच-सहा भावंडं घरात. रविवारी या मुलांशी गप्पा मारताना वडील त्यांना बँक व्यवहारांची बालसुलभ अशी माहिती द्यायचे. त्यातून मॅडेलिनना बँकिंगची गोडी लागली असावी.

१९४३ साली त्यांनी न्यू यॉर्क फेडमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. वास्तविक ते पद त्या वेळी महिलांसाठी नव्हतं. पण तरी त्यांची या पदासाठी निवड झाली. का? कारण पुरुष कोणी उपलब्धच नव्हते. सगळे गेलेले दुसऱ्या महायुद्धात आघाडीवर. त्यामुळे अशा काही कामांसाठी जास्त कोणी नव्हतेच. म्हणून मग मॅडेलिनना संधी मिळाली.  पद : कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी. त्या कामावर जायला लागल्या तेव्हा सगळीकडे युद्धाचीच हवा. त्यामुळे बँकेच्या खिडक्यांना काळा रंग तरी लावलेला असे किंवा कागद डकवून त्यातून प्रकाश बाहेर जाणार नाही अशी व्यवस्था केलेली असे. अशा वातावरणात पुरुषांमधला सुप्त पुरुषवाद उफाळून येतो. आपल्या आसपासच्या महिलांची आपल्याला काळजी आहे, आपण त्यांचे तारणहार आहोत अशा काहीशा भावनेतून पुरुष वागू लागतात. त्यातूनच पुढे मग पुरुषी अरेरावी सुरू होते. बँकेत मॅडेलिन यांनी ती चांगलीच अनुभवली. वास्तविक त्या बँकेत लागल्या त्या काही अगदीच कारकून म्हणून वगैरे नाही. अधिकारी पदावरच त्यांची निवड झाली. त्यांचं शिक्षणही तसं होतं. पण तरी त्यांना पुरुषी वर्चस्ववादाला तोंड द्यावं लागलं. मध्यंतरी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या त्या काळच्या आठवणी जागवल्या. त्यातली एक चांगलीच बोलकी. बँकेत अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र प्रसाधनगृहं होती. पण मॅडेलिन अधिकारी होत्या तरी त्यांना ती वापरायला मनाई होती. म्हणजे अधिकारी फक्त पुरुषच असंच मानणारा तो काळ. तो इतका पुरुषप्रधान होता की न्यू यॉर्कच्या भांडवली बाजारातही, जिथे खरेदी-विक्री व्हायची तिथेही महिलांना प्रवेश नसायचा. न्यू यॉर्क फेडच्या अधिकारी म्हणून त्यांना भांडवली बाजारात जावं लागायचं. पण स्त्री म्हणून प्रवेश नाही. कोणत्याही आधुनिक शहरात जसे क्लब असतात, तसे त्या वेळीही न्यू यॉर्कमध्ये होते. पण मॅडेलिन पद/पत/प्रतिष्ठा असूनही त्या क्लब्जचं सदस्यत्व मिळवू शकत नव्हत्या.. वर्गणी भरूनसुद्धा.

पुढे १९५५ साली त्यांना आणखी एक पदोन्नती मिळाली. चीफ ऑफ द फायनान्शियल अ‍ॅण्ड ट्रेड स्टॅटिस्टिक्स डिव्हिजन. या पदावर विराजमान होणारी त्या पहिल्या महिला. दरम्यानच्या काळात युद्ध संपलं होतं. पुरुषवर्ग माघारी येऊ लागला होता. म्हणून बँकेत त्यांना अधिकच अडचणी समोर यायला लागल्या. तो संगणकाच्या रांगण्याचा काळ. तेव्हा संगणक यंत्रं आली होती. पण फारच मागास होती. जाडसर कागदांच्या कार्डावर पंचिंग करून- थोडक्यात विशिष्ट पद्धतीनं भोकं पाडून- माहिती साठवली जायची. पुरुषांचा त्यालाही विरोध. का? तर त्यांना कार्ड पंचिंग करणं कमीपणाचं वाटायचं. हे काय आपलं काम नाही.. अशी पुरुषी मिजास. त्याचाही फायदा मॅडेलिन यांनी उचलला आणि जास्तीत जास्त संगणक व्यवस्था शिकून घेतली. त्यामुळे जेव्हा कामं करायची वेळ आली तेव्हा त्याचं सर्वात जास्त ज्ञान हे त्यांनाच होतं. त्यामुळे पुरुष त्यांचा अधिकाधिक दुस्वास करू लागले.

इतका की, त्या वेळी फेडच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी न्यासाची निवडणूक होती. त्या पदासाठी मॅडेलिन निवडणुकीच्या िरगणात उतरल्या. समोर बँकेचा कोणी ढुढ्ढाचार्य असा अधिकारी पुरुष. तो कस्पटापेक्षाही कमी लेखायचा मॅडेलिन यांना. तर त्या निवडणुकीत त्यांना त्यांच्या एका तरुण कनिष्ठ पुरुष सहकाऱ्यानं मोठी मदत केली.

पॉल व्हॉल्कर हे त्या तरुणाचं नाव. त्यांनी त्या वेळी बेंडबाजा घेऊन प्रत्येक टेबलावर जाऊन मॅडेलिन यांचा प्रचार केला.

मॅडेलिन निवडणूक जिंकल्या. त्यानंतरही त्यांना अनेक महत्त्वाची पदं मिळाली. पुढे तर त्या फेडच्या उपाध्यक्षही झाल्या.

ही साठच्या दशकातली गोष्ट. एव्हाना महिलांविषयीचा आकस कमी व्हायला लागला होता आणि स्त्री-पुरुष समानतेचे वारे वाहू लागले नव्हते तरी त्यांची चाहूल लागत होती. त्या काळात मॅडेलिन यांचं यश निश्चितच झळाळणारं असं होतं. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत तुम्हाला सामोरं जावं लागलेलं सर्वात मोठं आव्हान कोणतं, असं नंतर त्यांना एका वार्ताहर परिषदेत विचारलं गेलं. त्यावर त्यांचं उत्तर होतं : एकच.. ते म्हणजे पुरुष.

पण गंमत म्हणजे तरीही मॅडेलिन स्त्रीहक्क-वादी अजिबात नव्हत्या. ‘‘मी जे काही मिळवलंय ते बाई म्हणून नाही. तर चांगली अर्थतज्ज्ञ या नात्यानं हे मला मिळालंय. माझं बाईपण दुय्यम आहे,’’ असं त्यांचं विधान. या आघाडीवरही त्या इतक्या सरळ होत्या की, १९७३ साली त्यांनी स्वत:च स्थापन केलेली महिला बँक त्यांनी सोडून दिली. ‘संचालक मंडळातल्या बायकांना बँकिंगपेक्षा महिला राजकारणातच रस’ असं त्यांना लक्षात आलं म्हणून.

नंतर त्या काही वित्त सल्लागार कंपन्यांच्या प्रमुख बनल्या. ‘फोर्ब्स’सारख्या मासिकानं मुखपृष्ठावर स्थान देऊन त्यांचा यथोचित गौरवही केला नंतर. महिला म्हणून अनेक जणी त्यांच्याकडे सल्ला, मार्गदर्शनाला यायच्या. त्यांना त्यांचं सांगणं असायचं : काय मिळवायचं आहे हे ठरवा आणि ते मिळवाच. बरोबरच्या पुरुषांना मागे टाकण्याचा एकच रास्त मार्ग आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांच्यापेक्षा सरस होणं.

त्यांच्या निधनाची बातमी वाचली आणि आणखी एका अप्रतिम पुस्तकाची आठवण झाली. ‘लॉर्ड्स ऑफ फायनान्स’. मूळचे पाकिस्तानी बँकर लियाकत अहमद यांनी अत्यंत कष्टाने मांडलेली ही पहिल्या महायुद्धकाळातल्या तीन बँकर्सची कहाणी. त्यांनी जगाला कसं आर्थिक संकटापासनं वाचवलं, हे सांगणारी. ते सर्व पुरुष. पण महिला बँकर्सची, किंवा मॅडेलिन यांची यशोगाथा अशी कोणी लिहिली, तर तिचं शीर्षक ‘लेडी ऑफ फायनान्स’ असं असायला हरकत नाही.

आपल्याकडे सरकारने स्थापन केलेली फक्त महिलांसाठीची राष्ट्रीयीकृत बँक बंद करावी लागली, त्याचं तिसरं वर्षश्राद्ध अलीकडेच पार पडलं. त्यानिमित्तानेही..

girish.kuber@expressindia.com
@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 2:16 am

Web Title: article about lady of finance economist madeline mcwhinney zws 70
Next Stories
1 त्यात काय सांगायचं?
2 मात करायची झाली तर..
3 ऑर्वेल खोटा ठरला त्याची गोष्ट !
Just Now!
X