X

एका ‘पिता’महाचे पुण्यस्मरण 

कोण होती ही असामी?

हा काळ एडवर्ड अब्राहम डायर याचं आपल्यावरचं ऋण मान्य करण्याचा. त्याच्या स्मृती जागवण्याचा. हातातल्या पेल्यातल्या सोनेरी द्रवाचे चार थेंब त्याच्या नावानं आसपास शिंपडण्याचा.

कोण होती ही असामी?

अर्थातच हा एक ब्रिटिश अधिकारी. १९व्या शतकाच्या सुरुवातीला राणीच्या राज्यात अनेक ब्रिटिश भारतात आले. हा त्यातला एक. हरहुन्नरी असावा. डोक्यात उद्योग व्यवसायाचा विचार. इंग्लंडातच राहिलो तर नेहमीच्याच मार्गानं प्रगती करावी लागेल. ब्रिटिश वसाहत असलेल्या भारतात गेलो तर कमी वेळात बरंच काही करता येईल असं त्याला वाटलं. योग्यच होता तो.

तर याच विचारानं हा गृहस्थ १८२० साली भारतात आला. आल्या आल्या उगाच इकडेतिकडे हिंडत बसला नाही. थेट हिमाचलातल्या सिमल्यात गेला. भारतात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी हिमाचल हे मोठं आकर्षक राज्य होतं. सिमला, डलहौसी वगैरे त्यातली गावं तर ब्रिटिशांनीच वसवली. वास्तविक ते यायच्या आधी आपल्याला हिमालय आणि हिमाचल वगैरे माहीत नव्हतं असं नाही. पण थंड हवेचं ठिकाण वगैरे चंगळवाद मान्य नसल्यामुळे असेल पण आपण काही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे ब्रिटिशांनी अशा स्थळांचा गोंडस विकास केला. देशभरातली अशी अनेक ठिकाणं सांगता येतील.

तर त्यामुळे हा एडवर्ड अब्राहम डायर हा थेट सिमल्याला गेला. विचार त्यामागचा असा की आपण आपल्या व्यवसायातनं भारतीयांना तर काही नवीन पुरवूच. पण आधी ब्रिटनमधनं भारतात राहायची वेळ आलेल्यांच्या गरजांचा काही विचार करायला हवा. चतुर होता तो. म्हणजे लंडनमध्ये आपल्या मराठी खानावळ काढणाऱ्या त्या विख्यात आजींसारखा. असलाच या दोघांत फरक इतकाच की आपल्या आजींनी खाण्याचा विचार केला तर या एडवर्ड अब्राहम डायर यानं केला तो पिण्याचा. म्हणजे इंग्लंडात जाणाऱ्या आपल्या मंडळींना पिठलंभात, भाकरी भाजी कशी मिळेल अशी चिंता त्या मराठी माउलीला लागली म्हणून त्यांनी लंडनात खाणावळ सुरू केली तर इंग्लंडातून भारतात येणाऱ्या आपल्या मंडळींच्या पिण्याची कशी आबाळ होत असेल याची काळजी या एडवर्ड अब्राहम डायर यानं केली आणि भारतात पिणावळ काढण्याचा विचार केला.

नुसता विचारच त्यानं केला असं नाही, तर तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नही सुरू केले. पण संन्याशाच्या लग्नाला येणाऱ्या सतराशे विघ्नांसारखं त्याचं झालं. व्यवसाय सुरू करायला संधी तर आहे, पण साधनंच नाहीत. जागाही त्यानं मुक्रर केली होती. हिमाचल. त्याला लक्षात आलं आपल्या मायदेशातल्या स्कॉटलंडची आठवण व्हावी अशी हवा आहे या राज्यातली. तेव्हा स्कॉटलंड या राज्यात फळाला येते तशी उत्तम व्हिस्की या राज्यात वहायला काय हरकत आहे..असा प्रश्न त्याला पडला.

नशीब त्याचं चांगलं की त्या वेळी ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यामुळे कोणी संस्कृतीरक्षक आडवा आला नाही. कदाचित ब्रिटिशांनाही जाणवलं असणार.. किती चांगला व्यवसाय विचार आहे याचा. नाही तरी गळा ओला करण्याची साधनं.. इतक्या लांबनं मायदेशातनं आणणं किती त्रासाचं आणि खर्चाचंच होतं. तेव्हा कोणी आपल्या हितासाठी ही द्रवरूप साधनं भारतातच तयार करू पाहत असेल तर राणीच्या प्रतिनिधींनाही आनंदच वाटला असणार. सुंठीवाचून खोकला जाण्याची काय..येण्याचीच वेळ येणार नाही. त्यामुळे सरकारनंही त्याला त्याच्या उद्योगात मदत करण्याचा निर्णय केला.

पण मदत म्हणजे कशाकशासाठी मदत करायची हा प्रश्न होता. याचं कारण असं की भारतात आधुनिक मद्य आंबवण्याची पद्धतच नव्हती त्या वेळी. आता पाश्चात्त्यांचं सर्व काही आपल्याकडे वेदकाळापासूनच होतं असं म्हणतो आपण. पण याबाबत ते सत्य असावं. कारण थेट रामायण काळात सीतामाउलीनं रावणाची निर्भर्त्सना करताना दुय्यम दर्जाच्या मद्याची उपमा त्याला दिली होती. (संस्कृतिभंगाचा धोका लक्षात घेऊन या संदर्भातील अधिक तपशील असा जाहीर करणे योग्य नव्हे. जिज्ञासूंनी साक्षात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे लेखन वाचावे.)

तर मुद्दा असा की पुराणकाळात भले भारतात सोमरस वगैरे असेलही. पण आधुनिक मद्य या देशात तयार करायचं तरी कसं असा प्रश्न या एडवर्ड अब्राहम डायर याला पडला. मद्य तयार करायची धान्यं नाहीत ती नाहीतच. पण त्यासाठी लागणारी भांडीकुंडीही नाहीत. एडवर्ड अब्राहम डायर हा खानदानी होता. म्हणजे चांगल्या पुरोहितास पूजेची पळीपंचपात्रीही कशी उत्तम दर्जाची लागतात तसाच त्याचाही कुलीन मद्यनिर्मितीसाठी चांगल्या तांब्यांच्या भांडय़ांचा आग्रह होता. पण तो काही या देशात पूर्ण होईना. तेव्हा या पठ्ठय़ानं ही सगळी भांडी आपल्या मायदेशातनं आणण्याचा निर्णय घेतला. ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडनमधनं निघालेल्या जहाजातनं ही मद्यनिर्मितीची भांडी भारताच्या किनारी आणली गेली. पण ती नुसती इथवर येऊन चालणारं नव्हतं. दूर तिकडे उंचावर हिमालयात ती न्यायची होती. आणि तेव्हा काही आजच्यासारख्या वाहतुकीच्या सोयी नव्हत्या.

तेव्हा या सद्गृहस्थानं गंगामैयाची आराधना केली. गंगेनं आतापर्यंत अनेक पापं पोटात घेतली आहेत असं म्हणतात. काही तसं मानतातदेखील. पण ब्रिटिशांच्या काळात ही पापं इतक्या मोठय़ा प्रमाणावर तिच्या पोटात जायला सुरुवात व्हायची होती. तेव्हा या एडवर्ड अब्राहम डायर यानं गंगा नदीच्या पात्रातनं आपण आज उत्तराखंड म्हणतो तिथे जमेल तितकं वरपर्यंत ही अवाढव्य भांडी वाहून नेली. म्हणजे तो जे काही बनवू पाहत होता त्या पेयास गंगेचा असा स्पर्श झाला होता. असो. तर तिथून उत्तराखंडातनं खेचरांचे गाडे करून त्यावरनं ही भांडी त्यानं आपल्या ईप्सित स्थळी नेली. साधारण नऊ-दहा महिन्यांचा प्रवास होता हा.

साधनसामग्री हाताशी आल्यानंतर एडवर्ड अब्राहम डायर यानं या भरतभूवरची पहिली मद्यशाळा उभी करायला घेतली. त्यासाठी त्यानं निवडलेली जागा होती कसौली. हिमाचलातलं आजही अत्यंत लोकप्रिय असलेलं स्थळ. उत्तम हवा. उंच हिमालयी बर्फाच्छादित शिखरांनी झाकलेलं. काही महिन्यांतच तिथून पहिली भारतीय बिअर बाजारात आली. लायन. तिचं इतकं स्वागत झालं की ब्रिटिशांनी तर मायदेशाची आठवण करून देणारी बिअर असं तिचं वर्णन केलं.

पण फक्त बिअरवर समाधान मानेल इतका एडवर्ड अब्राहम डायर हा अल्पसंतुष्ट नव्हता. त्याचं स्वप्न होतं भारतातली पहिली माल्ट व्हिस्की तयार करण्याचं. त्याचं म्हणणं होतं स्कॉटलंडइतकी उत्तम हवा आहे, पाणी देणारे झरे आहेत मग स्कॉटलंडसारखी व्हिस्की भारतात तयार का होऊ नये. उणीव होती ती बार्ली किंवा गव्हाच्या जातीचं रायसारखं धान्य यांचीच. पण आणता येईल ते इंग्लंडातनं असा विचार त्यानं केला. पण काहीही झालं तरी उत्तम व्हिस्की त्याला भारतात बनवायची होतीच. त्यासाठी त्याला आपल्या मद्यालयाचं स्थलांतरही करावं लागलं. कसौलीपासनं जवळच ब्रिटिशांनी नवं टुमदार वसवलं. एडवर्ड अब्राहम डायर यानं आपलं मद्यालय मग त्या गावात नेलं.

सोलन हे त्या गावाचं नाव.

आता जुन्याजाणत्यांच्या ओल्या आठवणी जाग्या झाल्या असतील. ‘सोलन नं. १’ या नावाच्या. ही केवळ सोलन या गावातलीच नव्हे तर भारतातलीदेखील पहिली जातिवंत अशी व्हिस्की. पुढे या एडवर्ड अब्राहम डायर याला एच जी मेकिन नावाचे गृहस्थ येऊन मिळाले. मग ती झाली डायर मेकिन अशी कंपनी. तोपर्यंत एडवर्ड अब्राहम डायर यांनी म्यानमार ते श्रीलंका ते खडकी ते दार्जिलिंग अशा अनेक ठिकाणी आपली मद्यालयं उभी केली. स्वातंत्र्यानंतर नरेंद्रनाथ (शप्पथ हे नाव खरं आहे.) मोहन या नावाच्या गृहस्थाचं स्वदेशप्रेम जागृत झालं आणि त्यांनी इंग्लंडात जाऊन मेकिन यांच्याकडनं ही कंपनी विकत घेतली. तोपर्यंत लंडन स्टॉक एक्स्चेंजवर ती नोंदली गेली होती. मग तिचं भारतीय हस्तांतरण झाल्यावर नाव झालं मोहन मेकिन.

आजही ती कसौलीत आहे. कधी गेलात हिमाचलात फिरायला तर तिचं जरूर दर्शन घ्यायला हवं. तिथं तयार झालेली ‘सोलन नं. १’ हाच तर आधार होता आपल्या पूर्वजांचा किती तरी वर्ष. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला हवी. एडवर्ड अब्राहम डायर यानं गंगेतनं वाहून नेलेली भांडीदेखील तशीच आहेत अजूनही तिथं. गंगेची पुण्याई म्हणा हवं तर पण अजूनही ती कामाला येतायत.

पण आता सोलन काही तितकीशी लोकप्रिय नाही. दुय्यम मळीपासनं तयार झालेल्या इंडियन मेड फॉरिन लिकरनं, म्हणजे आयएमएफलनं, तिची जागा घेतलीये. काहीही घाण प्यायला लागलोय आपण.

दुय्यमांची सवय लागली की असंच होत असतं अस्सलांचं. काळाची रीतच आहे ती. तेव्हा आपण आपलं कालाय तस्मै नम: म्हणायचं आणि पेला उचलायचा. ओठाला लावायच्या आधी स्मरण तेवढं करायचं..या खऱ्या ‘पिता’महांचं.

ता.क. १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांड घडवणारा कर्नल रेजिनाल्ड डायर हा एडवर्ड अब्राहम डायर यांचा पुत्र. आपल्याला तो माहितीये पण एडवर्ड अब्राहम डायर ठाऊक नाही. सोनेरी रंगापेक्षा लाल अधिक लक्षात राहतो हेच खरं.

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

First Published on: December 30, 2017 2:31 am