25 April 2018

News Flash

आपण आपलं मानायचं..

सुब्रमण्यन जे बोलायचं नसतं ते बोलले. विषय होता शेतकरी.

इतकी प्रचंड जनता आपल्याकडे शेतीवर अवलंबून आहे, पण या शेतीसाठी आपल्याकडे चटपटीत बडबडीखेरीज काही निश्चित कार्यक्रम नाही.

गेल्या आठवडय़ात नरेंद्र मोदी सरकारचे मुख्य अर्थसल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी मोठं वादळच उठवून दिलं. सुब्रमण्यन जे बोलायचं नसतं ते बोलले. विषय होता शेतकरी.

म्हणजे मग आपल्याकडे लगेच काळी आई, धरणीमाता, घामातनं पिकणारे मोती वगैरे भावनोत्कट शब्दप्रयोग मैदानात येतात. अर्थात हे काही सुब्रमण्यन यांना माहीत नसेल असं नाही. तरीही ते बोलले आणि त्यांनी शेतकऱ्यांना थेट प्राप्तिकराच्या जाळ्यात ओढण्याची मागणी केली. हे तर दुहेरी अब्रह्मण्यम. एक तर शेतीवर बोलायचं आणि वर प्राप्तिकर लावा अशी मागणी करायची.

तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्यावर गदारोळ उडाला. ही मागणी किती अन्यायकारक आहे, असंवेदनशील आहे, शेतकऱ्यांचा अपमान करणारी आहे वगैरे वगैरे अपेक्षित टीका त्यावर सुरू झाली. पण अशी मागणी करणारे सुब्रमण्यन काही पहिले नाहीत. देश स्वतंत्रही झाला नव्हता त्या वेळी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय कर समितीने शेतीवरचं उत्पन्न करमुक्त का समजायचं असा प्रश्न केला होता. आणि वर शेती उत्पन्नाला प्राप्तिकरातनं वगळण्याचा अपवाद करू नये असं स्पष्ट केलं होतं. कधी? तर १९२५ साली. आता आणखी आठ वर्षांनी या घटनेचा शतक महोत्सव होईल. पण तरी शेतीवर कर लावायचा की नाही, याचा निर्णय काही आपल्याला या शंभर वर्षांत घेता आलेला नाही. झालंच तर दिवंगत शरद जोशी यांच्यासारखा शेतकरी नेतादेखील हेच म्हणायचा.. माझ्या शेतकऱ्यावर प्राप्तिकर विवरणपत्रं भरायची वेळ यायला हवी. म्हणजे जोशी यांना अभिप्रेत होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न कर भरायला लागेल इतकं वाढावं.

अनेकांना माहीतही नसेल, पण तामिळनाडू, केरळ, ओदिशा, बिहार, आसाम आणि प. बंगाल या राज्यांत शेतीवर कर आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांनी शेती उत्पन्नावर काही ना काही कर लावायचा प्रयत्न करून पाहिला. शेतीचं उत्पन्न कराच्या कचाटय़ात आणायचा प्रयत्नच झाला नाही, असं नाही. पण राजकीय विरोधामुळे सोडून द्यावे लागले. खरं तर सुब्रमण्यन शेतीवर सरसकट कर लावा असं काही म्हणत नाहीयेत. ती बाब फारच दूरची. त्यांचं म्हणणं असं की ठरावीक उत्पन्नाच्या वर कमावणाऱ्या शेतकऱ्याला प्राप्तिकर देणं भाग पाडावं, सरसकट सर्वच शेतकऱ्यांना प्राप्तिकरमुक्ती देण्याचं काहीही कारण नाही. हरयाणा, पंजाब, मध्य प्रदेश इतकंच काय महाराष्ट्रातदेखील अनेक शेतकरी इतके गबर आहेत की त्यांना खरं तर प्राप्तिकरात माफी देता कामा नये. पण शेतकरी म्हटलं की सगळेच या विषयाला हात लावायला घाबरतात. खरं तर आपल्याकडे शेतकरी दोनच गटांत विभागले गेलेत. गबर आणि गरीब. गबर आहेत ते इतके आहेत की लहानमोठय़ा उद्योगपतीला लाजवतील आणि गरीब म्हणजे इतके गरीब की दोन वेळच्या अन्नाला मोताद.

यातून दिसून येते ती एकच बाब.

ती म्हणजे शेतीविषयक व्यवस्थेत आपल्याकडे असलेला सातत्याचा अभाव. नक्की धोरणच नाही. बरेचसे धरसोड प्रयत्न. या सातत्याच्या अभावाचा फायदा जसे बडे शेतकरी घेतात तसेच राजकारणीही घेतात आणि परत बऱ्याचशा शहरी वाचकांना शेतीत नक्की चाललंय काय, हे समजतच नाही. शेतमाल दुकानातनंच येतो, असं मानणारा हा वर्ग. त्याला वाटत असतं आपण जरा काही कमावलं की प्राप्तिकरापासनं अनेक कर द्यावे लागतात.. पण शेतकऱ्यांचं बरं आहे.. कितीही कमावलं तरी कसलाच कर नाही. कायमचं करमुक्त आयुष्य.

पण वास्तव या दोन्ही टोकांच्या मध्ये आहे. ते आधी समजून घ्यायला हवं. याचं कारण असं की आपल्याकडे शेतकरी म्हणून जो वर्ग आहे त्यातल्या तब्बल ८६ टक्के शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन सरासरी २ हेक्टर वा त्याहूनही कमी आहे. हे सर्व अर्थातच अल्पभूधारक. तेव्हा त्यांना प्राप्तिकर लागायचा काही प्रश्नच येत नाही. प्रश्न आहे तो उरलेल्या १४ टक्क्यांचं काय करायचं, हा. या उर्वरितांसाठीही शेती हा व्यवसाय वाटतो तितका रम्य नाही. बरीच कारणं आहेत, यामागे.

एक म्हणजे आपल्या देशात शेतकरी हा एकच असा वर्ग आहे की ज्याला त्याच्यासाठी आवश्यक ते किरकोळ बाजारपेठेतून खरेदी करावं लागतं, पण त्याच वेळी त्यानं पिकवलेलं मात्र घाऊक दरानं विकलं जात असतं. म्हणजे कच्चा माल किरकोळ दरात खरेदी करायचा आणि पक्का मात्र घाऊकच्या दरात विकायचा. ही बाब भयंकरच अन्यायाची म्हणायला हवी. कारण घाऊक विकताना भाव पाडून विकावं लागतं आणि किरकोळ खरेदी करताना चढे दर द्यावे लागतात. म्हणजेच शेतकऱ्यांचं दोन्ही बाजूनं नुकसान.

दुसरा असा अन्यायाचा मुद्दा म्हणजे मालवाहतुकीचा. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेतला एकच असा घटक आहे की त्याला दोन्ही वेळा मालवाहतुकीचा खर्च स्वत:च्या उत्पन्नातून द्यावा लागतो. म्हणजे इथेही परत शेतकऱ्याला घाटाच. खेरीज त्याला आपल्या उत्पादनाचा दर आपणच ठरवण्याचा अधिकार नाही. ही बाबही तितकीच अन्यायाची. खरं तर जो उत्पादन करणारा आहे त्याला आपल्या उत्पादित वस्तूचा दर ठरवता यायला हवा. अन्य उत्पादनांच्या बाबत हा नियम पाळला जातो. अपवाद फक्त शेतकऱ्याचा. उत्पादन त्याचं आणि दर मात्र भलतेच ठरवणार. महाराष्ट्रातले तूरडाळ उत्पादक वा तेलंगणातले लाल मिरची पिकवणारे यांच्या सध्या सुरू असणाऱ्या आंदोलनामागे हेही एक कारण आहे.

इतकी प्रचंड जनता आपल्याकडे शेतीवर अवलंबून आहे, पण या शेतीसाठी आपल्याकडे चटपटीत बडबडीखेरीज काही निश्चित कार्यक्रम नाही. मोअर क्रॉप, पर ड्रॉप, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आगामी सहा वर्षांत दुपटीने वाढ करायची वगैरे घोषणा तर रग्गड झाल्या. पण प्रत्यक्ष शेतातली स्थिती काही बदललेली नाही. त्यामुळे एक मागणी वारंवार होते आपल्याकडे.

ती म्हणजे कर्जमाफी. खरं तर या कर्जमाफीनं काहीही साध्य होत नाही, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालंय. पण आता प्रश्न या सिद्धासिद्धतेच्या पलीकडे गेलाय. तुम्ही मागत होता तेव्हा कर्जमाफी मिळाली तेव्हा आता आम्ही मागतोय तर तुम्हीही ती द्यायला हवी.. असा यामागचा भाव आहे. त्यातून ना शेतकऱ्यांचं भलं होतं ना ग्राहकांचं. हेही सगळ्यांना कळत असतं. पण तरी हे असले मार्ग चोखाळले जातात. कारण कोणाला मूळ समस्या सोडवायची नसते, पण तरी आपण काही तरी करतोय असं दाखवायचं असतं.

किती आकार असेल या शेतकरी कर्जाचा?

कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार गतवर्षांच्या एप्रिलअखेपर्यंत दिली गेलेली आणि थकीत असलेली एकूण कृषी कर्जे १२ लाख ६० हजार कोटी इतकी प्रचंड आहेत. हे कर्जबाजारी शेतकरी सगळ्यात अधिक आहेत ते अर्थातच उत्तर प्रदेशात. ७९ लाख ८ हजार १०० इतके. पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक. ४० लाख ६७ हजार २०० इतके कर्जबाजारी शेतकरी आपल्याकडे आहेत. सगळ्याच प्रमुख राज्यांत कमीअधिक प्रमाणात ही स्थिती आहे. पण कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेल्या शेतकरी कुटुंबांची संख्या किती असावी? ती आहे ४,६८,४८,१०० इतकी. म्हणजे जवळपास पाच कोटींच्या आसपास ही कुटुंबं आहेत. एका कुटुंबात चार-पाच सदस्य आहेत असं धरलं तर कर्जबाधित शेतकऱ्यांची संख्या होते साधारण २० कोटी इतकी प्रचंड.

आणि तरी यांच्या समस्यांवर आपल्याकडे उत्तरच नाही. तिकडे लष्करप्रमुख बिपिन रावत तक्रार करतायत सरकारकडून निधी मिळत नसल्याबद्दल आणि इकडे शेतकरीही काही मिळत नसल्याबद्दल नाराज. तरी वर पुन्हा ‘जय जवान, जय किसान’ असं आपण आपलं मानायचं.

या अशा मानण्याचा मोह काही आपल्याला सुटता सुटत नाही.

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

Twitter : @girishkuber

 

First Published on May 6, 2017 3:04 am

Web Title: arvind subramanian narendra modi maharashtra farmers girish kuber marathi articles
 1. शुभदा बापट
  Jun 8, 2017 at 2:37 pm
  तरी वर पुन्हा ‘जय जवान, जय किसान’ असं आपण आपलं मानायचं. mastch
  Reply
  1. शुभदा बापट
   Jun 8, 2017 at 2:36 pm
   तरी वर पुन्हा ‘जय जवान, जय किसान’ असं आपण आपलं मानायचं. mastch
   Reply
   1. V
    varad
    May 11, 2017 at 12:27 am
    "म्हणजे मग आपल्याकडे लगेच काळी आई, धरणीमाता, घामातनं पिकणारे मोती वगैरे भावनोत्कट शब्दप्रयोग मैदानात येतात." याची allergy का ? शेवटी हा देश शेतकरी जातींवरच उभा आहे. इतिहासातही लष्करी शेतकरी जातींनीच देश वाचवला आणि सध्या हि देशाचे पोट भरतोय.
    Reply
    1. V
     varad
     May 11, 2017 at 12:20 am
     केवळ विशिष्ट जातीचे आहेत म्हणून शरद जोशी यांना महान वगैरे शेतकरी नेते ठरवू नका. हे म्हणजे असे झाले भारत त बसून अमेरिकेचा सल्लागार व्हावे ..!! आणि राहिले गोष्ट टॅक्स भरायची टॅक्स हा फक्त डायरेक्ट नसतो बरे ..!! शेतकरी जे काही अगदी बी बियाणांपासून ते पेट्रोल पर्यंत ते काही टॅक्स फ्री नसते . सामान्य नोकरदारापेक्षा जास्त इंडिरेक्ट टॅक्स शेतकरी भरतात कारण शेतीसाठी म्हणून प्रचंड साधन सामग्रीची गरज असते . तेव्हा खरा-खोटे कागद दाखवून ,जीवावर आल्यासारखे टॅक्स भरणारे यांची बरोबरी करू नका ..!!
     Reply
     1. गोपाल
      May 8, 2017 at 7:25 pm
      कुबेर,साहेब आपण गेल्या ७० वर्ष्यात कोणतीच system उभारू शकलो नाही.आणि,ह्याची कुणाला लाज हि वाटत नाही .EC,S.C,ह्या system काय तो अपवाद .आपल्या समस्याचे निदानही अजून आपल्याला आले नाही जो तो आपल्या विचारा चे झापड डोळ्यावर लावून तेच सत्य आहे हेच सांगत असतो.Impartial मिडिया ,विचारवंत,लेखक,कुणीच नाही.अनाठाई आदर्शवाद,चे बळी आहोत सर्व जगात शेती दुय्यम झाली आहे कारखानदारी अव्वल झाली आहे.उद्योग,त्यातून नोकरी,त्यातून आर्थिक स्थर्य,रस्ते,वीज,पाणी,आरोग्य हे होणे आवश्यक आहे शेतीतून आताच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत Land Holding कुटुंबाच्या विभाग्नितून कमी,कमी होत जाणार गरजा वाढत जाणार .मी ३५ वर्ष कोरडवाहू शेती,विदर्भात केली.पण Mobile,color TV,Motorcycle,Car,चांगल घर,थाटात लग्न कार्य ,शिक्ष्शन (शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत ) हे सर्व शेती पूर्ण करू शकत नाही ह्यातून कर्जबाजारी वाढते कर्ज फितू शकले नाही म्हणजे वैफल्य येते ,व्यसनाधीनता वाढते .पण शेतकरी आत्महत्या करत नाहीच आत्महत्या करणार्याच्या नावे एकर २ एकर शेती असते पण आत्महत्या आणि शेती,कर्ज यांचा संबंध नसतो. MOb.7387004375.
      Reply
      1. G
       gavkari
       May 7, 2017 at 10:50 pm
       गरीब शेतक-याच्या आडून गबर शेतकरी आपला मतलब साधून घेत आहेत त्यावर फक्त लेख लिहून काहीही फरक पडणार नाही. शेतीवर आयकर लावायचा कायदा खासदारच पास होऊ देणार नाहीत कारण बहुतेक खासदारांची १० एकरातून १०० कोटींची कमाई अशी स्थिती आहे. तरी शेती मधून फायदा होत नाही अशी बोंब मारायला तेच पुढे आहेत.
       Reply
       1. S
        Somnath
        May 7, 2017 at 9:10 am
        संतुलित लेख. कर्जे बुडवणारी मोठी धेंडेच आहेत.त्यांची बँक खाती तपासा मग कळेल. नावावर मात्र कर्ज असूनही भरायचे नाहीत आज ना उद्या कर्जे माफ होतील म्हणून ती भरायची नाहीत हा त्यांचा खाक्या.कर्जमाफी मध्ये भरडतोयतो गरीब शेतकरी आणि फायदा होतो तो राजकारण्यांचे वर्चस्व असलेल्या बँकांना (काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या) आणि मोठ्या धेंडांना.
        Reply
        1. Shriram Bapat
         May 6, 2017 at 5:16 pm
         I entirely agree with Prasad's comment. What most of the media and opposition leaders are doing is nothing except pampering farmers. It is sending a bad signal to those brave farmers and converting them into beggars who want everything for free.
         Reply
         1. S
          sarang kulkarni
          May 6, 2017 at 1:10 pm
          changla lekh
          Reply
          1. राजन तांबे
           May 6, 2017 at 12:54 pm
           उत्तम लेख!
           Reply
           1. प्रसाद
            May 6, 2017 at 11:08 am
            शेती आणि अन्य व्यवसाय यांत काहीच फरक नाही. सुशिक्षित / अशिक्षित कामगार, छोटेमोठे व्यावसायिक यांतही काही गबर, तर काही अन्नाला मोताद असतातच. शेतकऱ्यांतही काही मध्यमवर्गीय नक्कीच असतील. शिकून सवरून नोकरी करणाऱ्यालाही शिक्षण ‘किरकोळ दराने’ विकत घ्यावे लागते आणि नोकरीत पगार मात्र प्रचलित बाजारभावानुसार मालक ठरवतील तोच (एका अर्थी घाऊक दरानेच) घ्यावा लागतो. खासदार / आमदार सोडले तर आपला पगार ठरवण्याचा अधिकार किती पगारदारांना आहे? अनिश्चित पावसाचा फटका बसून शेतकऱ्याचे नुकसान होते तसेच उद्योगातील अनिश्चिततेमुळे अनेकांचे नुकसान होते. कर, आयात / निर्यात शुल्क, व्हिसाचे नियम हे असेच अनिश्चित असतात. अनिश्चित पावसाचा फटका शेतीप्रमाणेच अनेक उद्योगांनाही बसतो. नुकसानीमुळे, नैराश्यामुळे अनेक उद्योजक, विद्यार्थी, रुग्ण, इत्यादी आत्महत्याही करतात. एकूण आत्महत्यांपैकी शेतकऱ्यांच्या आत्महत्या फक्त १० आहेत! इतरांच्या आत्महत्यांची, करमाफी आणि कर्जमाफीची चर्चासुद्धा कुठे होत नाही. या सर्वांहून आपण वेगळे आहोत ही भावना शेतकरी जोपर्यंत बाळगत राहतील तोपर्यंत राजकारणी लोक त्यांच्या तोंडाला पाने पुसत रहातील.
            Reply
            1. M
             Manoj
             May 6, 2017 at 10:19 am
             भीषण परिस्थिती , अचूक विश्लेषण .... निर्ल्लज नेते , षंढ जनता आणि मधले दलाल .... पालथ्या घड्यावर अजून थोडे पाणी .... चला बाहुबली २ पाहूया..
             Reply
             1. R
              RJ
              May 6, 2017 at 5:56 am
              ग्राहकवर्ग कर्जाला लागू नये म्हणून शेतकऱ्याला स्वतःच्या मालाचा बाजारभाव ठरवण्याचा हक्क नाकारला जातो. कर्जबाजारी आपण आहोत का शेतकरी ? आता तर त्यांची पुढची पिढीसुद्धा चिठ्ठ्या लिहून ठेवून आत्महत्येच्या मार्गावर जाऊ लागली आहे आणि आपली पुढची पिढी -हा स्मार्ट फोन घेऊ की तो, इथे लाईक्स मिळवू की तिथे, ह्या पार्टीला-सिनेमाला जाऊ की त्या, इथले खाऊन-पिऊन ह्या परदेशात जाऊ सुट्टीसाठी की त्या ह्या गंभर विवंचनेत आहे.
              Reply
              1. Load More Comments