X

वीज म्हणाली मोटारीला..

सध्या दिल्लीत ऑटो एक्स्पो उत्सव सुरू आहे.

सध्या दिल्लीत ऑटो एक्स्पो उत्सव सुरू आहे. नवनव्या मोटारींचा उत्सव. कोणती कंपनी कशी मोटार आणतीये वगैरे वगैरे. असे महोत्सव हे तृतीयपानींचे कुंभमेळे असतात. तर आपल्या दिल्लीतल्या या मोटार उद्योग प्रदर्शनात सध्या कोणत्याच चित्रपटात फारशी काही कुठे दिसत नसलेली एक अभिनेत्री येऊन गेली. ज्या कंपनीचं आमंत्रण (आणि अर्थातच मानधन) होतं तिथं त्या कंपनीच्या मोटारींच्या पाश्र्वभूमीवर तिनं वार्ताहरांना प्रतिक्रिया दिली. माझी आवडती मोटार वगैरे काहीबाही. इथपर्यंत ते सर्व सह्य़ होतं. म्हणजे असह्य़ व्हावं असं काही त्यात फार नव्हतं; पण वार्ताहर अधिक काही विचारतायत म्हणून ती अधिक काही बोलू लागली. वास्तविक आपण काही वाहनविशारद नाही, हे तिला कळायला हवं होतं. कॅमेरा आहे समोर म्हणून किती बोलावं, असंही वाटायला हवं होतं. पण ते जाऊ द्या. तर ती पुढे म्हणाली.. आपल्या देशवासीयांनी.. प्रत्येक भारतीयानं.. यापुढे विजेवर चालणारीच मोटार वापरायला हवी.. पर्यावरण वाचवणं महत्त्वाचं आहे.

तिच्या आधी आपल्या सरकारनंही जाहीर करून टाकलं होतं, २०३० सालापर्यंत भारतात सर्वच मोटारी विजेवर चालणाऱ्या असतील. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या मोटारी बंदच व्हायला हव्यात तोपर्यंत. आपला निती आयोग, केंद्रीय वाहतूक मंत्रालय वगैरे सर्वच जण सांगतायत आता भवितव्य आहे ते फक्त विजेच्या मोटारींना. पेट्रोल, डिझेलच्या मोटारींचे दिवस भरले. जागतिक पातळीवर.. म्हणजे विकसित देशांत विशेषत: ..  काही प्रमाणात हे खरं आहेदेखील. पर्यावरणाविषयी कमालीचे संवेदनशील असलेले देश या विजेरी मोटारी आणण्यात आघाडीवर आहेत. त्यांच्या आघाडीची माहिती आपण घेऊच; पण त्याआधी आपल्या पिछाडीची जाणीव असायला हवी.

ती करून घ्यायची तर इंदिरा गांधी यांच्या काळातील एका व्यंगचित्राची आठवण काढायला हवी. आर के लक्ष्मण यांच्या भेदक कुंचल्यातून रेखाटलेल्या या व्यंगचित्रात इंदिराबाई एका धरणाच्या उद्घाटनाला आलेल्या दिसतात. त्या धरणाचा प्रमुख त्यांना सांगतो.. धरणाचं काम उत्तम झालंय.. अगदी ठरल्याबरहुकूम. एक त्रुटी तेवढी राहिलीये.

पंतप्रधान विचारतात ती कोणती?

जवळपास कुठे नदीच नाही.. असं उत्तर यावर तो अभियंता देतो.

विजेवर चालणाऱ्या मोटारींच्या आपल्याकडे सुरू असणाऱ्या लंब्याचवडय़ा बाता ऐकायला आल्या की हे व्यंगचित्र आठवतं. आपल्याकडे या अशा मोटारी तयार करण्यासाठी कंपन्या सज्ज आहेत, देशाच्या आणि अर्थातच या वसुंधरेच्या प्रदूषणाविषयी भलतेच जागरूक असलेले नागरिक विजेवर चालणाऱ्या मोटारी विकत घेण्यासाठी सज्ज होऊन बसलेत. वाट पाहतायत, कधी एकदा पर्यावरणस्नेही अशी विजेवर चालणारी मोटार येते आणि कधी एकदा आपण ती घेतोय.. इतका उत्साह आहे.

फक्त नाहीये ती वीज आणि विजेची साधनं

मुदलात आपल्या देशात सर्व नागरिकांना आपल्याला अजून वीज पुरवता आलेली नाही. अगदी मुंबईजवळचे पाडेसुद्धा अंधारात आहेत. तेव्हा अशा वेळी प्रश्न असा की, प्राधान्य कशाला? नागरिकांना त्यांचं आयुष्य उजळण्यासाठी वीज द्यायची की मोटारींवर उधळण्यासाठी ती आधी द्यायची? आणि बरं समजा, वीज आपल्याकडे पुरून उरण्याइतकी आहे असं मान्य केलं तर ती मोटारींना द्यायची कशी? उत्तर साधं आहे. पेट्रोल/डिझेल पंपांसारखे पंप उभारायचे आणि तिथनं मोटारीतल्या बॅटऱ्या चार्ज करून घ्यायच्या; पण तूर्त परिस्थिती अशी की, भारतात विजेच्या वाहनांतील विजेऱ्यांत पुन्हा प्राण आणण्यासाठी ५०० केंद्रेदेखील नाहीत किंवा जेमतेम तितकीच वीज भरणा केंद्रे आहेत.

पण त्यातही आपल्याकडे म्हणून एक विशेष गंमत आहे. ती अशी की, या वीज भरणा केंद्रांत आपल्याला सातत्यच आणता आलेलं नाही. म्हणजे असं की पारंपरिक मोटारींत कसं पेट्रोल/डिझेल कोणत्याही पंपावरनं भरता येतं. म्हणजे विशिष्ट कंपनीच्याच ब्रँडचं पेट्रोल/डिझेल लागतं असं काही नाही; पण सध्या मोटारींतल्या वीज भरणा केंद्रांचं तसं नाही. ज्या एका कंपनीची बॅटरी असेल त्याच कंपनीतनं मोटारीत वीज भरून घ्यायला हवी आणि ती तशी कंपनी जवळपास नसली तर?

या प्रश्नाला एक उत्तर आहे. ते म्हणजे मोटारी मालकानं आपल्या घरातच मोटारीसाठीही वीज भरणा केंद्र तयार करून घ्यायचं. हे म्हणजे मोटारीसाठी घराघरांतच पेट्रोल पंप उभारण्यासारखंच. ही कल्पना स्तुत्यच तशी; पण मोटार काही घरातल्या घरात चालवायची नसते. जिकडे जायचंय तिथे जाईपर्यंत वीज पुरणार नसेल किंवा येताना नव्यानं वीज भरून घ्यायची असेल तर काय करायचं?

याचंही उत्तर आहे. प्रत्येक मोटारीत एक एक जास्तीची बॅटरी ठेवून द्यायची. सध्या ऑटो किंवा टॅक्सीवाले कसा पाच लिटर इंधनाचा एखादा कॅन मोटारीत ठेवून देतात. मोटारी बॅटरीवर आपल्याकडे चालू लागल्या तर हे असं काही करावं लागेल. यात आणखी एक उपप्रश्न आहे. तो म्हणजे कोणत्या विजेवर या मोटारींच्या बॅटऱ्या चार्ज करायच्या? अल्टरनेटिव्ह करंट.. म्हणजे एसी.. की डायरेक्ट करंट डीसी? पहिल्यावर मोटारीची बॅटरी चार्ज करायला तीन वा अधिक तास लागतात आणि अर्ध्या तासात बॅटरी दुसऱ्या पद्धतीनं चार्ज करता येते. आपल्याला यातला कोणता वीज प्रकार वापरायला मिळणार?

तूर्त तरी या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही.

पण जगात अनेक विकसित देशांत विजेवर चालणाऱ्या मोटारी आल्यात. मग त्यांनी त्या कशा आणल्या? या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं आहे.

त्यांनी जय्यत तयारी केली. यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारल्या. देशभर त्यांचं जाळं तयार केलं. ते कसं चालतंय ते पाहिलं आणि मग विजेवर चालणाऱ्या मोटारी नागरिकांना वापरू दिल्या.

उदाहरणार्थ नॉर्वे.

या देशाला तर विजेच्या मोटारींची राजधानी म्हणतात. गेली दोन वर्ष या देशात विकल्या गेलेल्या प्रत्येक तीन मोटारींतली एक मोटार विजेवर चालणारी होती. या देशानं त्यासाठी गेली पाच वर्ष भरपूर तयारी केली. त्यात हा देश टोकाच्या हवामानाचा आणि सहा महिने रात्र तर सहा महिने दिवस अनुभवणारा. त्यामुळे विजेची मागणी या देशात अधिक; पण तरीही नॉर्वेची तयारी इतकी उत्तम, की जगात आज विजेवर चालणाऱ्या मोटारींत तो आदर्श मानला जातो. यापाठोपाठ दुसरा देश म्हणजे चीन. या एका देशानं वीज मोटारींवरच्या संशोधनासाठी, तयारीसाठी दरवर्षी तब्बल ८००० कोटी डॉलर इतका प्रचंड निधी वेगळा काढून ठेवला आहे. वीज संच समानता आणि वीज भरणा केंद्र यावर चीननं इतकी गुंतवणूक केलेली आहे, की पर्यावरणाच्या धोक्यावर उतारा म्हणून विजेच्या मोटारी त्या देशात खरोखरच प्रत्यक्षात येतील अशी परिस्थिती आहे. यानंतरचा.. किंबहुना या तोडीची तयारी करणारा आणखी एक देश म्हणजे अर्थातच अमेरिका. या देशातल्या लॉस एंजिलीस, सिएटल, सॅन फ्रान्सिस्को आणि पोर्टलंड या चार शहरांनी एकत्र येऊन एक गटच तयार केलाय. आता ही चार शहरं आपल्या शहरातल्या सार्वजनिक वाहतूक सेवांतल्या बस वगैरे विजेवर चालवणार आहेत. ही चार शहरं मिळून विजेवर चालणाऱ्या किती मोटारी, बसगाडय़ा घेणार असतील? तब्बल १ लाख १० हजार इतक्या प्रचंड.

पण आपल्याला मात्र उलटं जायला आवडतं. आधी खेळ सुरू करायचा आणि मग त्याचे नियम बनवण्याचा विचार करायचा. आधी कळस आणि मग त्या खालच्या इमारतीला आधार देईल असा पाया तयार करायचा.. हा आपला राष्ट्रीय गुण. इतके दिवस त्या विजेचं म्हणणं धरतीला ऐकावं लागत होतं.. आता ते मोटारींना ऐकावं लागेल.

– गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber