पैशाने मोठा म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठा. तो म्हणेल ती पूर्व. मग सिएटलमध्ये असंच असेल का? कारण जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यासारखे जगातले धनाढय़ातले धनाढय़ उद्योगपती या शहरात राहतात. त्या गावची ही कहाणी. सत्यकथा.

वॉशिंग्टन, न्यूयॉर्क किंवा सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया वगैरे अमेरिकी शहरांच्या तुलनेत सिएटल हे तसं लहानच म्हणायचं. केवढी प्रचंड आहेत ही बाकीची शहरं. पण सिएटल असं कवेत घेता येतं. गावाची वेस दिसते लांबवरनं. मध्ये समुद्राएवढय़ा तळ्यावर बांधलेल्या पुलानं गाव जोडलं गेलंय आसपासच्या प्रदेशाशी.

Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
ketu guru navpancham yog
गुरू आणि केतुची लवकरच होईल युती! नवपंचम राजयोगामुळे या राशींना लाभेल भाग्यची साथ, मिळेल भरपूर पैसा
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
jitendra awhad Prakash Ambedkar
वंचितची मविआकडे ४८ पैकी २७ जागांची मागणी; जितेंद्र आव्हाड म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावावर…”

पण तरी एवढय़ाशा सिएटल या गावानं जगाला चार महाबॅ्रण्ड दिलेत. बोइंग. अ‍ॅमॅझोन. मायक्रोसॉफ्ट आणि स्टार बक्स. यातले पहिले तीन तंत्रज्ञानाशी संबंधित तर स्टार बक्स ही विख्यात कॉफी दुकान मालिका. सिएटलातल्या बाजारपेठेत जगातलं पहिलं स्टारबक्स आहे. या चारही ब्रॅण्ड्सचा जन्म सिएटलातला. त्यांचे प्रणेते सिएटलचे रहिवासी. म्हणजे विल्यम बोइंग, जेफ बेझोस, बिल गेट्स आणि स्टारबक्स काढणारे जेरी बाल्डविन, झेव सिगेल आणि गॉर्डन बॉकर (या ब्रॅण्ड्सच्या जन्माच्या चित्तरकथा नंतर कधी तरी.) हे सगळे इथले.

कल्पना करा- आपल्याकडच्या एखाद्या लहानशा शहरात असे एकापेक्षा एक तगडे ब्रॅण्ड्स असतील तर काय बडदास्त ठेवली जाईल त्यांच्या प्रवर्तकांची. आपले नगरसेवक, महापौर म्हणवून घेणारे दाराशी उभे राहून कुर्निसात करतील या अशा उद्योगपतींना. पैशाने मोठा म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठा. तो म्हणेल ती पूर्व. मग सिएटलमध्ये असंच असेल का? कारण जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यासारखे जगातले धनाढय़ातले धनाढय़ उद्योगपती या शहरात राहतात. त्या गावची ही कहाणी. सत्यकथा.

एक तर जेफ बेझोस याचं घर अगदीच साधं आहे. आहे तसंच ठेवलंय. जगातल्या पहिल्या पाचांतला हा धनाढय़, वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाचा मालक बऱ्याचदा वॉशिंग्टनला असतो. पण सिएटलमध्ये असला तरी त्याचा काहीही बडेजाव नसतो. घरात आहे की नाही ते कळतही नाही.

बिल गेट्स याचंही तसंच. तो तर अस्सल सिएटलकर. जन्म, शिक्षण, पत्नी, उद्योग- सगळं काही सिएटलातच. कायम सिएटलातच राहते ही व्यक्ती. पण वैशिष्टय़ म्हणजे गेट्स कुटुंबीय स्वत:चं खासगी आयुष्य कमालीचं जपतात. त्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात कोणीही नाक खुपसलेलं आवडत नाही. ‘सहज आलो होतो इकडे, म्हटलं आहात का पाहावं’, अशा प्रकारची वाक्यं घेऊन येणारे अजागळ पाहुणे तर सोडाच पण अन्य कोणीही खासगी आयुष्यात ढवळाढवळ केलेली त्यांना आवडत नाही. दोन मुलं आहेत बिल आणि मेलिंडा यांना. पण ही पोरंही कधी जाऊन बसलेत मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयात, असं चुकूनसुद्धा नाही. कोणी ओळखतही नाही त्यांना. सिएटल शहरात या दोघांच्या नावच्या न्यासाचं कार्यालय आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन. ही पूर्णपणे त्यांनी स्वत:च्या पैशातनं चालवलेली संस्था. गेट्स यांची आहे म्हणून मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना तिथे काही विशेष वागणूक आहे असं मुळीच नाही. जगभरात कोटय़वधी रुपयांची समाजकामं या न्यासातर्फे सुरू आहेत. पण सर्व शांतपणे.

या इतरांपासून लांब राहायच्या सवयीमुळे त्यांना आपलं घरही लांब हवं होतं. सिएटलला नदी आहे, तळं आहे. तर यातल्या किनाऱ्यावर, दूर एका कोपऱ्यात गेट्स कुटुंबीयांनी ठरवलं आपलं घर करायचं. आता गेट्स यांचं घर म्हणजे बंगलाच असणार. तो बांधत असताना त्यांना लक्षात आलं आसपासही खूप बंगले आहेत. म्हणजे या बंगल्यातली वर्दळ नाही म्हटलं तरी आपली डोकेदुखी ठरणार. म्हणून त्यांनी एकेक बंगलेवाल्याला गाठलं आणि विचारलं मागाल तितके पैसे देतो. तुमचा बंगला विकाल का?

जवळपास सगळेच हो म्हणाले. मग हे सगळेच बंगले गेट्स यांनी विकत घेतले. पाडले. आणि जमीन सपाट करून चांगली मोठमोठी झाडं लावली तिथं. या गर्द झाडांच्या मध्ये गेट्स यांचा बंगला. दिसतंच नाही समोरनंसुद्धा इतका झाडीत दडलाय तो. पण त्यांना लक्षात आलं या इतक्या झाडीतनंही नदीकडे जाणारी एक वाट आहे. नाही म्हटलं तरी अनेक जण या वाटेवरनं नदीकडे येत असतात. शांत, प्रेक्षणीय अशी जागा आहे ती. त्यामुळे थोडीशी का असेना वर्दळ असते कधी कधी तिथं. त्यातलेच काही चुकार गेट्स यांच्या बंगल्याकडे जात असणार.

म्हणून ही पायवाट बंद करायला हवी. लोकांची ही कटकटसुद्धा टाळायला हवी- गेट्स यांना वाटलं. आता गेट्स यांच्याइतक्या बलाढय़ व्यक्तीनं अशी इच्छा जरी व्यक्त केली असती तरी त्या गावच्या, शहराच्या महापौरापासनं ते नगरसेवकापर्यंत सगळ्यांनी कमरेत लवलवून जातीनं ते काम पूर्ण केलं असतं. वर साहेब- ते केलं बरं का- आशीर्वाद असू द्या आमच्यावर तुमचे- अशी लाळघोटी चार वाक्यंही फेकली असती. मग आपल्या देशातला असा उद्योगपती खूश होऊन गेला असता.

पण गेट्स त्यामानाने चांगलेच कमनशिबी. संपत्ती वगैरे केली असेल त्यांनी. पण गावच्या नगरपालिकेत काही वट नाही त्यांची. कारण नगरपालिकेनं त्यांची ही विनंती चक्क धुडकावली. ‘ही वाट लोकांसाठी आहे. तिला खासगी ठरवून ती बंद करता येणार नाही,’ ‘नदीपर्यंत चालत जायचा हक्क आहे जनतेचा- तो हिरावून घेता येणार नाही’ अशा शब्दांत सिएटल नगर व्यवस्थेनं गेट्स यांना ठणकावलं. मग नगरपालिकेच्या बाजूनं आणखी लोक उभे राहिले. सगळ्यांनी एकच आवाज केला या मुद्दय़ावर.

मग गेट्स यांनी हा प्रस्तावच गुंडाळला. लोकांच्या भावनांचा अनादर करत, त्यांच्या नाकावर टिच्चून हा रस्ता बंदच करून टाकावा असं नाही वाटलं त्यांना. आता गेट्स आणि हा रस्ता आनंदाने नांदतायत. पण एक नवीनच प्रश्न तयार झाला.

सिएटल विमानतळ ते गाव हे अंतर काही खूप नाही. पण मध्ये वाहतूक प्रचंड असते. चांगलाच वेळ जातो त्यात. म्हणून गेट्स यांना वाटलं आपल्या बंगल्याच्या गच्चीवर किंवा अंगणात हेलिपॅड बांधावं. विमानतळावर उतरलं की स्वत:च्या हेलिकॉप्टरमधनं थेट घरातच. विमानही स्वत:चं आणि हेलिकॉप्टरही स्वत:चं. उगाच ती वाहतूक कोंडीची कटकट नको. या विचारानं त्यांनी पालिकेकडे हेलिपॅड उभारण्याची परवानगी मागितली. तीसुद्धा काम सुरू करायच्या आधी. आता आपल्यासाठी हे सगळंच आश्चर्य. काम करून टाकायचं आणि नंतर कागदोपत्री रिवाजापुरतं परवानगीचं नाटक करायचं हा आपला शिरस्ता. पण गेट्स आपल्याकडे नसल्यामुळे त्यांनी काम करण्याआधी परवानगी मागितली.

सिएटल नगरपालिकाही आपल्याकडची नसल्यानं तिनं ही परवानगी चक्क नाकारली. तुम्ही जिथं राहताय तिथं हेलिकॉप्टर उतरवायला मंजुरी देता येणार नाही. झाडांसाठी, आसपासच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी असं करता येणार नाही, असं नगर परिषदेनं गेट्स यांना कळवलं. गेट्स यांना पुन्हा नकार घ्यावा लागला.

जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीस हात चोळत बसण्याखेरीज पर्याय राहिला नाही. गेट्स काहीही करू शकले नाहीत. तरीही त्यांनी एक केलं. बंगल्याच्या समोर नदीत त्यांच्या मालकीची एक नौका होती. ती त्यांनी बदलून मोठी घेतली. इतकी मोठी की तिच्या वरच्या मजल्यावर हेलिकॉप्टर उतरवता येतं.

आता बिल गेट्स बंगल्यातनं बाहेर पडून नदीच्या दिशेनं जातात. तिथून हेलिकॉप्टर त्यांना विमानतळावर घेऊन जातं. किंवा तिकडून घेऊन येतं. अशा तऱ्हेनं त्यांचा मधला वाहतुकीचा वेळ आणि अनाहुतांचा संपर्क टळतो आता.

वेळ वाचवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचंच. पण नियमांचं रक्षण होणं हे तुमच्या-आमच्यासाठी महत्त्वाचं. आता आपल्याकडे पालिका निवडणुकांचा हंगाम सुरू झालाय. तेव्हा त्या निमित्तानं आपल्या आणि त्यांच्या नगरपालिकांतला फरक कळावा म्हणून हा प्रपंच. हा फरक कळून घ्यायला हवा कारण तो आहे म्हणून आपल्या आणि त्यांच्या शहरातही फरक आहे.

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

Twitter : @girishkuber