18 January 2019

News Flash

निर्बंधी किरटेपणाच्या पलीकडे..

चांगलं असतं मधे मधे तुलना करीत राहणं.

चांगलं असतं मधे मधे तुलना करीत राहणं. अर्थातच तुलना करायची ती आपल्यापेक्षा सरस असेल त्याच्याशी. म्हणजे मग आपल्याला कुठे जायचंय, किती अंतर राहिलंय वगरेचं भान येत राहतं. अशा तुलनेसाठी चांगलं एक कारण मिळालंय.

गेल्या आठवडय़ात भारतीय भांडवली बाजाराचा निर्देशांक ३० हजारांचा टप्पा पार करून पुढे गेला. विक्रमच तो. किती टाळ्या वाजवल्या आपण. त्याच्या आधी एखाददोन दिवस दुसरा एक विक्रम झाला. तो अमेरिकेत. त्या आठवडय़ात अ‍ॅपल कंपनीची मार्केट कॅप.. म्हणजे भांडवली बाजारातलं मूल्य. (कंपनीने जारी केलेल्या समभागांची संख्या गुणिले समभागाचा दर म्हणजे मार्केट कॅप) तब्बल ८०४ बिलियन डॉलर्स इतक्या प्रचंड टप्प्यावर जाऊन पोहोचलं.

म्हणजे ८०,४०० कोटी डॉलर्स. रुपयांत मूल्यांतर केलं तर ही रक्कम होते ५२,२६,००० कोटी रुपये इतकी. अ‍ॅपल ही अवघ्या दहा वर्षांची कंपनी. तिच्या आधी एक्झॉन मोबिल या जगातल्या सगळ्यांत मोठय़ा खासगी तेल कंपनीचा असल्या आकडेवारीत पहिला क्रमांक असायचा. पण गेल्या दीडेक वर्षांत तेलाचे भाव जसजसे घसरत गेले तसतसं या कंपनीचं मूल्यही कमी होत गेलं. त्यानिमित्तानं जगात पहिल्यांदाच एखाद्या उत्पादक कंपनीनं तेल कंपनीला मागे टाकलं. असो. मुद्दा तो नाही.

पण यातला नवीन भाग हा की, ज्या दिवशी अ‍ॅपलनं हा बाजारपेठी मूल्याचा उच्चांक गाठला त्या दिवशी अ‍ॅपलची किंमत ही आपल्या समस्त सेन्सेक्सच्या बाजारमूल्यापेक्षाही अधिक होती. आपल्या समग्र सेन्सेक्सचं बाजारमूल्य होतं ५२,१५००० कोटी रुपये आणि एकटी अ‍ॅपल आहे ५२,२६,००० कोटी रुपये इतक्या किमतीची. अ‍ॅपलची किंमत त्यामुळे अर्थातच आपल्याकडे सेन्सेक्स तयार करण्यासाठी आधाराला घेतल्या जाणाऱ्या ३० कंपन्यांच्या एकत्रित मूल्यापेक्षाही अधिक होते. म्हणजे या ३० कंपन्यांचं मूल्य एकत्र केलं तरी अ‍ॅपलचं पारडं जडच राहिलं असतं.

अर्थातच अ‍ॅपल ही अमेरिकेतल्या भांडवली बाजारातली क्रमांक एकची कंपनी. मोस्ट व्हॅल्यूड कंपनी. या अ‍ॅपलच्या गल्ल्यात आजमितीला वट्ट रोकड रक्कम आहे २४,००० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड. म्हणजे साधारण १५,६०,००० कोटी रुपये. आपल्याकडच्या तीन सर्वाधिक मौल्यवान कंपन्या आहेत टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक. या तिघांचं एकत्रित मूल्य आहे २०,००० कोटी डॉलर्स. म्हणजे १३,००,००० कोटी रुपये. याचा अर्थ अ‍ॅपलच्या गल्ल्यातली निव्वळ रोकड ही भारतातल्या तीन सर्वात मोठय़ा कंपन्यांच्या मार्केट कॅप.. बाजारमूल्यापेक्षाही अधिक आहे. म्हणजे उदाहरणार्थ अ‍ॅपलनं भारतातल्या सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांचे सर्व समभाग विकत घ्यायचं ठरवलं तर त्यांची किंमत रोकडीत मोजूनही दोनेक लाख कोटी रुपये अ‍ॅपलच्या गल्ल्यात शिल्लक राहतील. हे फक्त आपल्या आकारासाठीच लाजिरवाणं आहे असं नाही. तर जनरल इलेक्ट्रिक.. म्हणजे जीई.. नावाच्या आतापर्यंत जगातल्या महाकाय कंपनीच्या एकत्रित मूल्यापेक्षाही अ‍ॅपलकडची रोकड अधिक आहे. गेल्या एकाच वर्षांत अ‍ॅपलनं आपल्या या निव्वळ रोख शिलकी रकमेत १,००० कोटी डॉलर्स.. साधारण ६५ हजार कोटी रुपये.. इतकी भर घातली. हे इतकंच नाही.

अ‍ॅपलचं मूल्य हे ब्राझील, मलेशिया, सिंगापूर वगरे देशांच्या अर्थव्यवस्थेच्या मूल्यापेक्षाही अधिक आहे. ब्राझीलची मार्केट कॅप आहे ७९,५००० कोटी डॉलर्स इतकी, रशियाची ५६,००० कोटी डॉलर्स, तर सिंगापूरची आहे ५३,३०० कोटी डॉलर्स. आणि या सगळ्यांच्या वर एक साधा फोन, संगणक बनवणाऱ्या कंपनीचं मूल्य ८०,४०० कोटी डॉलर्स आणि समजा, अ‍ॅपल हा एक देश समजला तर? तर ती आजमितीला जगातली १९ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल. पश्चिम आशिया, आफ्रिका वगरे खंडांतले अनेक देश असे आहेत की, त्यांची अर्थव्यवस्था अ‍ॅपलपेक्षाही लहान आहे. म्हणजे तसंच ठरवलं तर अ‍ॅपल हे देश ‘विकत’ घेऊ शकेल.

पण समजा, अ‍ॅपलच्या जोडीला जगातल्या पहिल्या पाच कंपन्या एकत्र केल्या तर काय चित्र असेल?

या कंपन्या आहेत अ‍ॅमेझॉन (४५,५०० कोटी डॉलर्स), अल्फाबेट.. म्हणजे गुगल.. (६४,८०० कोटी डॉलर्स), मायक्रोसॉफ्ट (५२,८०० कोटी डॉलर्स) आणि सगळ्यांत लहान म्हणजे फेसबुक (४१,९०० कोटी डॉलर्स). या सगळ्या कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य आहे २,८५,५०० कोटी डॉलर्स इतकं महाकाय. कळविण्यास अत्यंत खेद होतो की, या पाच कंपन्यांचं एकत्रित मूल्य हे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक आहे.

पण हे संख्यापुराण सांगणं हा काही या लेखाचा हेतू नाही. अनेकांना ही आकडेवारी माहीतदेखील असेल. तेव्हा लक्षात घ्यायचा तो संख्यांमागचा अर्थ. एरवीही तसा इतक्या मोठय़ा संख्यांशी आपला.. म्हणजे भारतीयांचा.. संबंध येण्याची शक्यता कमीच. तेव्हा आधीच आपण आपला अर्थ लक्षात घेण्याचा शहाणपणा दाखवलेला बरा. तर काय आहे हा अर्थ?

वरच्या पाचही कंपन्यांकडे नुसती नजर जरी टाकली तरी लक्षात येईल की, या पाचही कंपन्या नवअर्थकाळातल्या आहेत. खनिज तेल, दूरसंचार, रेल्वे, मोटारी, प्रचंड औद्योगिक सामग्री वगरे तयार करणाऱ्या कंपन्या इतके दिवस आघाडीवर असायच्या. स्टॅण्डर्ड ऑइल, एक्झॉन, एटीअ‍ॅण्डटी, जनरल मोटर्स वगरे. आता ते सगळं मागे पडलंय.

मुद्दा क्रमांक दोन. वरच्या पाचही कंपन्या या पहिल्या पिढीच्या आहेत. म्हणजे बिल गेट्सच्या आधी मायक्रोसॉफ्ट कंपनीच नव्हती, स्टीव्ह जॉब्सच्या आधी अ‍ॅपल नव्हती आणि जेफ बेझोस याच्या आधी अ‍ॅमेझॉन म्हणजे फक्त नदीच होती. अर्थातच लॅरी पेज किंवा मार्क झुकेरबर्ग यांच्या आधी ना गुगल होती ना फेसबुक. म्हणजेच आज जगातल्या अर्थव्यवहारावर नियंत्रण असणाऱ्या या कंपन्या या कालच्या पोराटोरांनी तयार केलेल्या आहेत.

मुद्दा क्रमांक तीन. या सर्व कल्पना आहेत. म्हणजे होत्या. याचा अर्थ अमुकअमुक पद्धतीनं संगणक चालायला हवेत असं गेट्स याला वाटलं, नवीन फोन, संगणक, आयपॅड या सगळ्या स्टीव्ह जॉब्सच्या डोक्यातल्या कल्पना होत्या. आज भारतातल्या खेडोपाडय़ांत वाहणारा अ‍ॅमेझॉनचा प्रवाह हा आधी जेफ बेझोसच्या डोक्यात वाहिला. इंटरनेटच्या माहिती महाजालातलं गुगलचं शोधयंत्र वा संगणकानं एकमेकांना जोडणारा फेसबुक ही पेज वा झुकेरबर्ग यांची केवळ कल्पना होती. ती त्यांनी प्रत्यक्षात आणली आणि जगानं तोपर्यंत कल्पनाही केली नव्हती अशी उत्पादनं त्यांनी दिली.

मुद्दा क्रमांक चार. या पाचही कंपन्या एकाच भूमीत जन्मलेल्या आहेत. ती म्हणजे अर्थातच अमेरिका. पण त्यातही लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे त्या कंपन्यांना जन्माला घालणारे हे सर्वच मूळ अमेरिकींच्या पोटी जन्माला आलेले नाहीत. स्थलांतरितांची मुलं ही. त्यांनी अमेरिकेला आपलं म्हटलं आणि अमेरिकेनं त्यांना झिडकारलं नाही. उलट सामावूनच घेतलं. आपल्यातलंच मानलं.

मुद्दा क्रमांक पाच. आता तरी कल्पनाशक्तीला महत्त्व द्यायला शिकायला हवं. आईनस्टाईन म्हणायचा, ‘ज्ञानापेक्षाही कल्पनाशक्ती महत्त्वाची. ज्ञानाला मर्यादा असतात, कल्पनेला नाही’. म्हणजे ज्ञान आहे, पण त्याचं काय करायचं हेच माहीत नसेल तर काय उपयोग..? तेव्हा ज्ञान कमी असलं तरी चालेल एक वेळ, पण चांगली कल्पनाशक्ती हवीच हवी.

मथितार्थ : कल्पनाशक्तीला मुक्त वाव द्यावा.

पण तो द्यायचा म्हणजे हे खाऊ नको, तिथे  पिऊ नको, या वेळेला उभा राहा, त्या वेळेला बसू नको, अमुकतमुक की.. असं कानावर आलं रे आलं की ‘जय’ म्हण. असे कसलेही र्निबध नाही घालता येत.

कारण निर्बंधी समाजाची संतती किरटीच असते..

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

Twitter: @girishkuber

 

First Published on May 20, 2017 4:56 am

Web Title: bill gates jeff bezos larry page mark zuckerberg