कंपन्या चालवताना संकटं, आव्हानं ही येणारच. कंपन्यांचे मालक वेगळ्या वयोगटांतील असतील तर निर्णयात मतभिन्नता असू शकते. तरीही एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणं महत्त्वाचं असतं..

आपण भारतीय तुलनेला घाबरतो. जरा जरी कोणी आपली कोणाशी तरी तुलना करू पाहतोय असं दिसलं की आपलं लगेच सुरू होतं.. आपण कुठे.. ते कुठे.. आपल्याकडची परिस्थिती.. त्यांची परिस्थिती.. कशी काय तुलना होऊ शकते.. वगैरे प्रश्न लगेच उभे केले जातात. अनेकांना आवडत नाही असं तुलना करणं. त्यामुळे मग हे तुलना हाणून पाडण्यासाठी नवनव्या सबबी काढतात. आंब्याची आणि मोसंबीची तुलना कशी काय होऊ शकते.. वगैरे जणू काही सैद्धांतिक मुद्दे मांडत असल्यासारखा युक्तिवाद करतात. आंबा आणि मोसंबी ही दोन्हीही फळंच की. दोघांत चव, गुणधर्म वगैरे असतील वेगवेगळे. पण त्यांचं फळपण तर समान आहे. असो. मुद्दा इतकाच की तुलना करायला हवी. त्यामुळे बाकी काही नाही तरी आपण किती खोल पाण्यात आहोत ते त्यामुळे कळतं.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

हे का कळून घ्यायचं..? का करायची तुलना?

उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट आणि इन्फोसिस. आणि म्हणून बिल गेट्स आणि नारायण मूर्ती. दोन्हीही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या. पहिली काही तरी उत्पादनं तयार करणारी. दुसरी सेवा देणारी. यातला मूलभूत फरक म्हणजे उत्पादन करणाऱ्या कंपन्या नवीन काही तरी माहिती तंत्रज्ञान बाजारात आणतात. अनेक जण ते नवीन काही उत्पादन घेतात. मग प्रश्न असा की ते उत्पादन सांभाळणार कोण? तर इन्फोसिससारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सेवा कंपन्या. म्हणजे मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर समजा अमेरिकेतल्या किंवा ब्रिटनमधल्या किंवा भारतातल्या एका मोठय़ा कंपनीनं घेतलं तर त्या सॉफ्टवेअरला हाताळण्याची, सांभाळण्याची किंवा त्या अनुषंगानं सेवा देण्याची कामं इन्फोसिससारख्या कंपन्या करतात. यापेक्षाही सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे कोणी तरी बंगला बांधतं आणि कोणी तरी त्या बंगल्याची देखभाल करतं. बंगला बांधणारे उत्पादक आणि तो सांभाळणारे सेवा क्षेत्रातले. सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर.

हा एक फरक सोडला या कंपन्यांमधला तर बाकी अनेक साम्यस्थळं आहेत. एक म्हणजे बिल गेट्स याच्याप्रमाणे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे पहिल्या पिढीचे उद्योजक. बिल गेट्स यांना उद्योग हा पिढीजात मिळाला नाही आणि मूर्ती यांनाही तो वडिलोपार्जित वारसा म्हणून मिळालेला नाही. दोघांच्याही उद्योगाची सुरुवात तशी साधारण आसपासच झाली. मायक्रोसॉफ्टची स्थापना झाली १९७५ साली आणि इन्फोसिसचा जन्म झाला १९८१ साली. मायक्रोसॉफ्टमध्ये आज साधारण १ लाख २० हजार ८४९ इतके कर्मचारी काम करतात तर इन्फोसिसच्या बाबत ही संख्या आहे २ लाखांहूनही अधिक.

पण मायक्रोसॉफ्टचा यंदाचा महसूल आहे ९० बिलियन डॉलर्स इतका. म्हणजे ९००० कोटी डॉलर्स इतका. रुपयांत पाहू गेल्यास ५ लाख ८५ हजार कोटी रुपये इतका. या तुलनेत इन्फोसिसचा महसूल आहे १० बिलियन डॉलर्स. म्हणजे १००० कोटी डॉलर्स. साधारण ६५ हजार कोटी रुपये इतका. मायक्रोसॉफ्टची मार्केट कॅप आहे ५७,००० कोटी डॉलर्स इतकी तर इन्फोसिसची ३५०० कोटी डॉलर्स इतकी.

आपल्या नारायण मूर्ती यांच्याप्रमाणेच बिल गेट्स याचीही वृत्ती सेवाभावी. आपल्या उत्पन्नातला मोठा वाटा बिल आणि पत्नी मेलिंडा गेट्स जगभरातल्या अनेक देशांत धर्मार्थ कारणांवर खर्च करतात. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचंही तसंच. वैयक्तिक पातळीवर, कंपनीमार्फत हे दोघे किती समाजोपयोगी कामं करत असतात. आपल्या मूर्ती यांच्याप्रमाणेच बिल गेट्स यालाही वाटलं.. आपण खूपच कंपनीत गुंतलोय. त्यामुळे आपल्याला आपलं म्हणून काही करताच येत नाहीये. तेव्हा कंपनी सोडायला हवी. अवघडच असणार हे? आपणच जन्माला घातलेल्या कंपनीचा असा निरोप घ्यायचा. ते त्यांनी केलं. २००० साली कंपनीची सूत्रं स्टीव बामर यांच्या हाती दिली आणि बिल गेट्स मुख्य सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून तेवढे कायम राहिले. त्या वेळी त्यांचं वय होतं ४४. त्याआधी दोन वर्ष त्यांनी कंपनीची धुरा बामर यांच्या हाती द्यायला सुरुवात केलीच होती. म्हणजे ४२व्या वर्षी त्यांनी निवृत्तीचा विचार सुरू केला. नंतर नंतर त्यांनी हळूहळू अंग काढून घेतलं. २००८ पासून गेट्सनी मायक्रोसॉफ्टसाठी पूर्णवेळ काम करणं थांबवलंच.

इकडे आपल्या नारायण मूर्ती यांनीही २०११ साली इन्फोसिस सोडली. त्या वेळी त्यांचं वय ६५ वर्ष. म्हणजे तसंही निवृत्तीचंच वय. मूर्ती यांच्याबरोबर शिबुलाल, नंदन नीलेकणी वगैरे असे काही संस्थापक होते. मूर्ती यांच्यानंतर इन्फोसिसचा कारभार ते पाहायला लागले. पण कंपनी शिबुलाल यांच्या हातात असताना काही आव्हानं तयार झाली. इन्फोसिसचा डोलारा कोसळतोय की काय, अशाही शंका उगाच घेतल्या गेल्या. ते सारं चित्र पाहून नारायण मूर्ती यांचं मन हेलावलं. आपण बांधलेली नौका अशी वादळात सापडतीये हे काही त्यांना पाहवलं नाही. साहजिकच आहे तसं होणं. तेव्हा ते चित्र पाहून नारायण मूर्ती यांनी आपला इन्फोसिस संन्यास सोडला आणि ते पुन्हा कंपनीच्या बचावार्थ धावून आले. एव्हाना त्यांचा मुलगाही.. रोहन मूर्ती.. मोठा झाला होता. अमेरिकेत मायक्रोसॉफ्टमध्ये शिकून आला होता. तेव्हा आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून इन्फोसिस बचावार्थ तोही मैदानात उतरला. नाही तरी वडिलांची जबाबदारी स्वीकारणं हे आपल्याकडे मुलाचं कर्तव्य असतंच. नारायण मूर्ती तीनेक वर्ष होते इन्फोसिसमध्ये. २०१४ साली त्यांनी पुन्हा एकदा इन्फोसिस सोडली. विशाल सिक्का यांच्या रूपात त्यांना उत्तराधिकारी मिळाला. सिक्का त्या वेळी ४७ वर्षांचे होते.

हे सगळं तसं माहितीच आहे सगळ्यांना.

****

तुलनेचा मुद्दा इथपासून सुरू होतो. म्हणजे असं की गेल्या आठवडय़ात मूर्ती हे अर्थविषयक वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हणाले की, २०१४ साली इन्फोसिस सोडणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती, असं मला आता वाटतंय. ‘‘मी बराचसा भावनिक आहे. माझे निर्णय हे आदर्शवादावर आधारित असतात. त्या वेळी मला अनेक जण म्हणत होते इन्फोसिस सोडू नकोस. आता असं वाटतंय मी त्यांचं ऐकायला हवं होतं,’’ हे मूर्ती यांचे उद्गार आहेत.

ते असं म्हणाले कारण दरम्यानच्या काळात सिक्का यांच्या अनेक निर्णयांवरनं वाद झाला. म्हणजे मूर्ती यांना ते निर्णय पटले नाहीत. सिक्का यांना दिलं जाणारं वेतन, काही ज्येष्ठांना दिला गेलेला मेहनताना, अन्य काही गोष्टींवर कंपनीनं केलेला खर्च वगैरे मुद्दे मूर्ती यांना आवडले नाहीत. आता हेही तसं साहजिकच. मूर्ती मागच्या पिढीचे. त्या पिढीने पोटाला चिमटा वगैरे लावून आपला संसार रेटलेला असतो. पुढच्या पिढीला त्याची गरज नसते. तेव्हा ही मतांतरं नवी नाहीत.

म्हणून मूर्ती यांचं वागणंही आपल्याला नवीन नाही.

तुलना करायची ती हीच की २००८ साली मायक्रोसॉफ्टसाठी काम करणं सोडल्यापासून बिल गेट्स यांनी त्या कंपनीच्या वर्तमान वा भविष्यावर एक चकार शब्द काढलेला नाही. इतकंच काय बिल यांच्या दोन मुलांपैकी एकानंही कधी मायक्रोसॉफ्टची पायरी चढलेली नाही. बिल गेट्स जेव्हा मायक्रोसॉफ्टमध्ये होते तेव्हाही एकालाही कधी मायक्रोसॉफ्टमध्ये चिकटवावं असं त्यांना वाटलं नाही आणि मुलांनीही तशी मागणी केली नाही. इन्फोसिसप्रमाणे गेट्स गेल्यानंतर मायक्रोसॉफ्टलाही नवनवीन आव्हानांना तोंड द्यावं लागलं. कंपनीसमोर संकटं आली.

पण मायक्रोसॉफ्ट सोडणं ही माझी मोठी चूक होती, असं कधीही ते म्हणाले नाहीत. पुढच्या काही वर्षांत तर बिल गेट्स यांच्याकडे मायक्रोसॉफ्टच्या मालकीचा जो काही वाटा आहे तोही शून्यावर येईल.

..आणि तरी आपल्याला वाटतं इदं न मम शिकविणारी, वानप्रस्थाश्रम सुचवणारी आपलीच संस्कृती थोर आणि पाश्चात्त्य तेवढे भोगवादी.

या असल्या गैरसमजांची कोळिष्टकं आपल्या डोक्यातनं जावीत म्हणून तुलना करायची.

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

@girishkuber