X

डिजिटल डिक्टेटर

ते जाणून घेण्यासाठी ‘सेरिमनी’ हे पुस्तक वाचायला हवं. वँग लिक्शिआँग हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

एका देशाचा प्रमुख तंत्रप्रेमी असतो. देशसेवेच्या नावाखाली   तंत्रज्ञानाद्वारे हा नक्की काय करतोय हे हळूहळू नागरिकांना कळायला लागलं.  आपलं जगणं हराम करणाऱ्या या सत्ताधीशाच्या नाकात तंत्रज्ञानच वेसण घालेल का..असा प्रश्न मग नागरिकांना पडू लागला. आणि अखेर या सत्ताधीशाच्या निकटवर्तीयालाच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. काय होतं ते?

एक देश आहे. लोकशाही आहे म्हणतात त्या देशात. लोक निवडून देतात सत्ताधाऱ्यांना. पण हे सत्ताधारी एकाच पक्षाचे. म्हणजे लोकांसमोर फार काही उमेदवार आहेत आणि त्यातनं काही त्यांना निवडायचेत वगैरे असं काही नाही. तर या पक्षाचा नेता लोकप्रिय आहे. हा नेता सत्तेवर येतो. बहुमताने. मतदारांचा भरघोस पाठिंबा त्याला मिळतो.

या नेत्याची पहिली खेप संपत येते. मग या नेत्याला वाटायला लागतं आपण आणखी एकदा देशाच्या प्रमुखपदी राहायला हवं. तशी संधी मिळेल अशी व्यवस्था तो करतो. त्याची लोकप्रियता आणखीनच वाढते. हा नेता तंत्रप्रेमी आहे. नागरिकांसाठी छानशी अशी डिजिटल ओळखपत्र तो तयार करतो. या ओळखपत्राचा क्रमांक मग या नागरिकांच्या जगण्या-मरण्याच्या प्रत्येक गोष्टीशी जोडला जातो. सुरुवातीला नागरिक हरखून जातात. त्यांना वाटतं किती छान सोय आहे. पण ही सोय कालांतरानं किती गैरसोयीची आहे हे त्यांना कळायला लागतं. कारण या ओळखपत्राच्या निमित्तानं सरकारनं त्यांच्या अस्तित्वाची दोरीच आपल्या हाती ठेवलेली असते. या डिजिटल ओळखपत्राची जोडणी त्या व्यक्तीच्या बँक खात्याला, गुंतवणुकीला आणि इतकंच काय त्याच्या मोबाइल फोनलासुद्धा झालेली. कोण कोणत्या चित्रपटाला जातंय, कोणाकोणाला भेटतंय, व्यक्तींची गुंतवणूक कशात आहे, प्रत्येकाचा दिनक्रम कसा आहे, तो एखाद दिवशी बदलला गेला तर का असं झालं, प्रत्येकाची मित्रमंडळी कोणकोण आहेत, ती प्रवास कधी आणि कोणत्या कोणत्या देशात करतात, परत येताना काय काय त्यांनी आणलेलं असतं, या मंडळींचे राजकीय विचार काय आहेत, हे लोकं कुठे कुठे भेटतात..असं प्रत्येकाचं जगण्याचं व्याकरणच सरकारच्या हाती जातं. हे इतकंच नाही. हा नेता देशभर कॅमेऱ्यांचं जाळं तयार करतो. कारण दिलं जातं सुरक्षेचं.

पण या सुरक्षेमागं काय आहे, हे देखील नंतर कळू लागतं नागरिकांना. हे कॅमेरे बुद्धिमान आहेत. त्यांनी एखाद्या ठिकाणच्या गर्दीत समजा एखादा चेहेरा टिपला आणि सरकारला याच चेहेऱ्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ती एका क्षणात मिळते. कारण संगणक प्रणालीनं प्रत्येक चेहेरा डिजिटल ओळखपत्र क्रमांकाशी जोडलेला असतो. म्हणजे एखाद्या चेहेऱ्यावर संगणकाच्या पडद्यावरचा बाण रोखला की पडद्यावर लगेच त्या व्यक्तीचा डिजिटल ओळख क्रमांक झळकतो, हा कोणता रहिवासी आहे, काय करतो..वगैरे वगैरे सर्व काही माहिती लगेच हाताशी तयार. सुरुवातीला या तंत्रज्ञानाने अचंबित झालेल्या नागरिकांना नंतर कळतं. या तंत्राचा खरा उपयोग काय आहे ते. कारण एखाद्या राजकीय चर्चेला, सभेला गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती सरकारच्या हाती क्षणार्धात जमा व्हायला लागते.

लगेच सुरक्षा यंत्रणांचे प्रश्न. या सभेला का गेलात? त्यात तुमचा रस काय? तुम्हाला मुळात जावंसंच का वाटलं? असं काही. ज्यांनी गुमान खाली मान घालून खरी उत्तरं दिली त्यांचं ठीक. पण बंडखोरी किंवा स्वतंत्र विचार वगैरे दाखवायचा प्रयत्न जरी कोणी केला तरी त्याची खैर नाही अशी अवस्था यायला लागली. जे फारच राजकीय विरोध किंवा तसं काही करायला लागले त्यांची बँक खाती एका क्षणात गोठवली जायला लागली. तरीही कोणी स्वतंत्र बाणा वगैरे दाखवायचा प्रयत्न केलाच तर तशा व्यक्तींचे मोबाइल फोन बंद व्हायला लागले, आजारी पडले तर डॉक्टरांकडे औषधंही घ्यायची पंचाईत..ओळखपत्रंच नाही. मग करणार काय?

आणि त्यात या राज्यकर्त्यांला त्याच्या अस्तित्वाला आधार देईल असा कार्यक्रम सापडला. भ्रष्टाचार निर्मूलन. देशातल्या प्रत्येक नागरिकाचा संपूर्ण डिजिटाइज्ड असा तपशील सरकारच्या हातात आलेला. त्यामुळे हा राज्यकर्ता जरा कोणी विरोध करतंय असं दिसलं की त्याच्याविरोधात भ्रष्टाचार केल्याची मोहीमच काढायला लागला. आता किमान जीवनशैली असलेल्या नागरिकाच्या बँक खात्यात काही ना काही शिल्लक असते. म्युच्युअल फंड किंवा तत्समांत त्याची काही गुंतवणूक असते किंवा जमीनजुमला तरी असतो. नागरिकांचे सर्वच तपशील हाती आल्याने नागरिकाच्या वाटेल त्या गुंतवणुकीवर सरकार प्रश्न निर्माण करायला लागलं. आणि तसंही आपण सोडून अन्य कोणीही कमावलेला पैसा हा भल्या मार्गानं नसतोच असं प्रत्येकाला वाटत असतं.

तर त्या राज्यकर्त्यांनं नागरिकांच्या याच मानसिकतेचा फायदा उठवला आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा खराखोटा वरवंटा प्रत्येकावर फिरवत आपलं भलं तेवढं साधलं. पण हळूहळू हा आपला देशप्रमुख नक्की काय करतोय हे नागरिकांना कळायला लागलं. नाराजी दाटू लागली. तंत्रज्ञानाच्या आधारे आपलं जगणं हराम करणाऱ्या या सत्ताधीशाच्या नाकात तंत्रज्ञानच वेसण घालेल का..असा प्रश्न नागरिकांना पडू लागला. आणि अखेर या सत्ताधीशाच्या निकटवर्तीयालाच या प्रश्नाचं उत्तर सापडलं.

काय होतं ते?

ते जाणून घेण्यासाठी ‘सेरिमनी’ हे पुस्तक वाचायला हवं. वँग लिक्शिआँग हे या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हटलं तर ती आहे कादंबरी. पण नाही म्हटलं तर ती आहे एक समोर घडत जाणारी सत्यकथा.

समोर म्हणजे अर्थातच चीनमध्ये. हे वँग चिनी लेखक आहेत. पण सेरिमनी आता इंग्रजीतही आलंय. हाँगकाँगचा प्रकाशक आहे कोणी. या पुस्तकात वँग यांनी २०२१ सालचा चीन कसा असेल याचं चित्र रेखाटलंय. जे न देखे रवि..ते देखे कवी..असं म्हणतात. हे असं आता मराठीतल्या कवींना दिसतं की नाही ते माहीत नाही. पण चिनी भाषेतल्या कवींना दिसत असावं. म्हणजे त्यांची हे असं काही बघण्याची नजर शाबूत असणार.

याचं कारण असं की गेल्या वर्षीच्या अखेरीस डिसेंबरात पहिल्यांदा ही कादंबरी प्रकाशित झाली. ती काळी आहे. म्हणजे तिच्यातलं अस्तित्व हे असं भयाण भीतिदायक आहे. जॉर्ज ऑरवेल याच्या १९८४ या कादंबरीप्रमाणं. तर ती जेव्हा प्रकाशित झाली त्यावेळी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला नव्हता. तो निर्णय म्हणजे स्वत:ला तहहयात चीनच्या अध्यक्षपदी ठेवण्याचा. वँग यांच्या कादंबरीतला जो सत्ताप्रमुख आहे तो स्वत:ला मरेपर्यंत देशाचं नेतृत्व करता येईल अशी तरतूद करतो. म्हणजे कादंबरीत. पण कादंबरी प्रकाशित झाली आणि अवघ्या काही आठवडय़ांत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी खरोखरच स्वत:ला कायमस्वरूपी अध्यक्ष राहता येईल यासाठी घटनादुरुस्ती करून घेतली.

हे लक्षात आलं आणि वँग यांची कादंबरी चांगलीच गाजू लागली. इतकी की तिच्या इंग्रजी प्रकाशनाचा सोहळा रद्द केला जावा यासाठी सरकारकडून वँग यांच्यावर दबाव यायला लागला. पण ते मागे हटले नाहीत. पुस्तकाचं प्रकाशन झालंच. त्यानंतर हे पुस्तक आणि वास्तव यातल्या साम्याबाबत वँग यांना अनेकांनी विचारणा केली. काही आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी त्यांच्या या साहित्यिक द्रष्टेपणाबद्दल त्यांची मुलाखतही घेतली. वँग सविस्तर बोललेत. त्यांनी या कादंबरीमागची आपली भूमिका, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांवर वचक ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न वगैरे अनेक मुद्दे मांडलेत. त्यातला एक संदर्भ चर्रकन आपल्या मनावर ओरखडा ओढतो.

डिजिटल डिक्टेटर.

सरकारच्या अशा प्रयत्नांना विरोध केला नाही तर त्यातून डिजिटल डिक्टेटर तयार होण्याचा धोका आहे, असं वँग यांचं मत आहे.

चांगला लेखक भविष्य सांगतो ते असं.

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

@girishkuber