06 April 2020

News Flash

गोंगाट गोडवा!

एकटय़ा अमेरिकेत त्यावेळी सातेक लाख जणांनी या आजारात प्राण गमावले.

युद्धाप्रमाणेच आजारानंही अमेरिकन मरताहेत,असं सांगणारं हे व्यंगचित्र १९१८ सालचं! 

गिरीश कुबेर @girishkuber
girish.kuber@expressindia.com 

सरकारी प्रयत्नांचं अपुरेपण वारंवार माध्यमांकडून समोर आणलं गेलं. वर्तमानपत्रांकडून सरकार धारेवर धरलं जात होतं. सरकारनं किंवा सरकार धार्जण्यिांनी आरोप केला वर्तमानपत्रांवर सनसनाटी निर्माण करण्याचा, अतिरेकी वृत्तांकनाचा आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा गंभीर दाखवण्याचा.. पण चीनमध्ये हे काहीच होत नव्हतं..

अखेर करोना विषाणूजन्य आजार भारतात आलाच. चीनमध्ये शिकायला असलेल्या एका केरळी तरुणीस या विषाणूची बाधा झाल्याचं आढळलं. जर्मनीत या आजाराचे रुग्ण सापडलेत. सिंगापूर, हाँगकाँग अशा आशियाई देशात या आजाराने शिरकाव केलाय. या आजाराचा प्रसारवेग पाहून आता ‘जागतिक आरोग्य संघटने’नं आरोग्य-आणीबाणी जाहीर केलीये.

इतिहासाची पुनरावृत्ती होतीये का? असावी.

ही गोष्ट आहे १९१७-१८ सालातली. म्हणजे पहिल्या महायुद्धातली. ते संपायचंही होतं त्यावेळची. तेव्हा अर्थातच संपर्काची साधनं आजच्यासारखी नव्हती. अशा वेळी युद्ध ऐन भरात असताना ‘स्पॅनिश फ्लू’ची साथ पसरू लागली. एक प्रकारचा फ्लूच तो. ताप यायचा, नाक गळायला लागायचं, साथीला अंगदुखी आणि ढाळ लागायची. काही जणांच्या चेहऱ्यावर काळे ठिपके उमटायला लागायचे. बघता बघता उभा माणूस पार चिपाड होऊन जायचा. आणि पाठोपाठ मरण. फारच झपाटय़ानं पसरली ही साथ. युद्धामुळेही असेल, पण कमालीच्या वेगानं हा आजार पसरला. किती जणांना बाधा झाली असेल त्याची? त्याची गणतीच नाही. पण जगभरात साधारण पाच कोटी माणसं या आजाराच्या साथीत त्यावेळी गेली. एकटय़ा अमेरिकेत त्यावेळी सातेक लाख जणांनी या आजारात प्राण गमावले.

तीन-चार देश प्रामुख्याने या आजाराच्या केंद्रस्थानी होते. अमेरिका, फ्रान्स, स्पेन आणि इकडे आशियात चीन. खरं तर पहिलं महायुद्ध आणि चीन यांचा थेट काही संबंध नाही. चीन या युद्धात आधी तटस्थ होता. एक तर हे महायुद्ध प्राधान्यानं युरोपीय होतं आणि त्याआधी जपाननं चीनची वाताहत करून टाकली होती. त्यामुळे महायुद्धात उतरण्याइतका काही चीनला त्यात रस नव्हता. आपण कसे या युद्धात तटस्थ असणार आहोत असंच चीनने जाहीर केलं होतं. तो सुरुवातीला होताही तटस्थ. पण त्या देशाच्या तटस्थतेचा फायदा जपान घ्यायला लागला आणि मग चीनवर दबाव यायला लागला.

पण तरी चीन या युद्धात १९१७ पर्यंत थेट उतरला नाही. त्या वर्षी त्या देशानं जर्मनी विरोधात युद्ध पुकारलं. पण युद्ध आशियात आल्यावर चिनी मजूर मात्र मोठय़ा प्रमाणावर या युद्धात वापरले गेले. हे युद्ध युरोपमाग्रे आशियात आलं होतं. त्यामुळे त्याबरोबर स्पॅनिश फ्लूदेखील आशियात आला. तोपर्यंत या काळात या आजाराच्या साथीच्या तीन लाटा विविध देशांवर धडका मारून गेल्या.

तिकडे अमेरिकेतल्या अनेक शहरांत या आजारानं गंभीर परिस्थिती निर्माण झालेली. विशेषत: लॉस एंजलिससारखं शहर या आजाराला बळी पडलं होतं. अर्कान्सा राज्यातही परिस्थिती गंभीर होती. अमेरिकी प्रसार माध्यमं पूर्ण भरून गेलेली असायची त्या काळी या आजारात बळी पडणाऱ्यांच्या बातम्यांनी. वर्तमानपत्रं हात धुऊन या विषयाच्या मागे लागली. सरकारी प्रयत्नांचं अपुरेपण वारंवार माध्यमांकडून समोर आणलं गेलं. वर्तमानपत्रांकडून सरकार धारेवर धरलं जात होतं. सरकारनं किंवा सरकार धार्जण्यिांनी आरोप केला वर्तमानपत्रांवर सनसनाटी निर्माण करण्याचा, अतिरेकी वृत्तांकनाचा आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा गंभीर दाखवण्याचा.

पण त्याला इलाज नव्हता. आधुनिक काळात कधी न पाहायला मिळालेली ही साथ होती. आता मागे वळून पाहताना ‘हॅ: ..स्पॅनिश फ्लू म्हणजे काहीच नाही,’ वगैरे प्रतिक्रिया देता येतील. पण हा आजार म्हणजे ‘काहीच नाही’ हे त्यावेळी कळलेलं नव्हतं. आणि माणसं तर मरत होती. त्यामुळे आजार भीतीने सगळेच झाकोळले जात होते. स्पॅनिश फ्लू म्हणजे आहे तरी काय.. हे त्या वेळेला तरी कोणाला माहीतच नव्हतं.

आणि खरं सांगायचं तर त्या ज्वराजाराशी स्पेनचा काहीही संबंधच नव्हता. म्हणजे त्या आजाराचा उद्रेक त्या देशात झाला होता असंही नाही. आणि त्या युद्धातही स्पेनचा काही संबंध नव्हता. तोही देश तटस्थच होता. पण युरोपचा भाग असल्यामुळे त्यालाही या युद्धाची झळ बसत होती. आणि दुर्दैव हे की त्याच युरोपचा भाग असल्याने त्या देशाला या ज्वराजाराचीही लागण झाली. इतकी की त्या देशाचा राजा अल्फोन्स हा देखील या आजाराने आडवा झाला. मग मात्र खळबळ माजली. या कारणामुळेही असेल या ज्वराचं नाव स्पॅनिश फ्लू असं पडलं असावं.

पण तिकडे फ्रान्स, स्पेन आणि चीनमध्ये या आजाराविषयी चकार शब्द छापून येत नव्हता. अमेरिकेत या विषयी हाहाकार उडालेला आणि विशेषत: चीनमध्ये सामसूम. त्या देशावर साम्यवादी पक्षीय सरकारची पकड होती. सगळ्यावर या सरकारचं नियंत्रण. अगदी माहितीवरही. त्यामुळे त्या सरकारने आपल्या जनतेला ही माहिती काही दिलीच नाही. जनतेला हे सगळं कशाला सांगा, उगाच भीतीचं वातावरण पसरतं असं त्या सरकारचं मत. आणि त्या मताला आव्हान द्यायला माध्यमंही नाहीत. माध्यमांवरही सरकारचं नियंत्रण. माध्यमांनी नेहमी सकारात्मक बातम्या द्याव्यात, विधायक पत्रकारिता करावी, समाजात नकारात्मकता वाढणार नाही याची काळजी घ्यावी असे सरकारचे आदेश. ते न पाळण्याचा पर्यायच नाही. त्यामुळे जी काही वर्तमानपत्रं होती त्यांनी या साथीविषयी एक ओळही छापली नाही.

आठपंधरा दिवसांपूर्वी वुहानमध्ये ताज्या करोना विषाणूनं माणसं मरायला सुरुवात झाली त्या वेळी पहिले काही दिवस त्या प्रांतातील ‘सर्वाधिक खपा’च्या दैनिकात या साथीविषयी एक चकार शब्दही छापून आलेला नाही. चीन देश म्हणून कसा प्रगती करतोय आणि अमेरिकेलाही तो लवकरच कसा मागे टाकेल याच्या नमित्तिक बातम्यांचा रतीबच त्या दैनिकांत ही करोनाची साथ आदळल्यानंतरही होता.

पहिल्या महायुद्धातल्या स्पॅनिश फ्लूच्या त्या साथीत सर्वाधिक बळी चीनमध्ये गेले.

इतिहासाची पुनरावृत्ती ही की आजही करोनाच्या साथीत सर्वाधिक प्राण गमावतायत ते चिनीच. त्या देशाच्या अध्यक्षांनी, क्षी जिनिपग यांनी, अशा काही साथीची कबुली देईपर्यंत चिनी प्रसारमाध्यमांत करोना साथीविषयी काहीही छापून येत नव्हतं.

त्याचमुळे आता जे काही माध्यमांत येतंय त्यापेक्षा या साथीचं गांभीर्य किती तरी अधिक असावं असा पाश्चात्त्य चीन अभ्यासकांचा होरा आहे. म्हणजे चीन सांगतोय त्यापेक्षा किती तरी अधिक बळी या साथीत गेले आहेत वा जात आहेत असंच अनेकांचं मत आहे. त्यात तथ्य असायची शक्यता का?

कारण ही साथ आता शिन्जियांग प्रांतात पोचलीये आणि तिथेच चीन सरकारला नकोसे असलेल्या विगुर या मुसलमान स्थलांतरितांच्या छावण्या आहेत. चीन त्याला या बंडखोरांची ‘पुनर्शिक्षण केंद्रे’ असं म्हणतो. या अशा केंद्रात किमान १० लाख निर्वासित मुसलमानांना डांबण्यात आलंय. दुसरीकडे तवानला जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत सहभागी व्हायला चीन सरकारने मनाई केलीय. त्या देशात काही शे रुग्ण असावेत. तिथंही माणसं बळी पडू लागलीयेत या साथीत.

आणि चीन सरकार या आजाराच्या ‘अफवा’ पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करू लागलंय. आपण किती कणखर आहोत, हे त्या सरकारला दाखवून द्यायचंय. स्वतंत्र माध्यमं गोंधळ वाढवतात असं त्या देशाचं मत आहे. आपला कणखरपणाही त्यांना दाखवायचाय.

माध्यमांना शांत करण्यात तो देश यशस्वी झालाय. पण माध्यमांच्या गोंगाटापेक्षा त्यांची शांतता जीवघेणी असते हे या अशा शांततेचं आकर्षण असणाऱ्यांना तरी कळायला हवं..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2020 1:37 am

Web Title: coronavirus in china china government not share coronavirus information to newspaper zws 70
Next Stories
1 या ‘चिमण्यां’नो..
2 उसासाठी?.. ‘कशासा’ठी!
3 बहरला पारिजात दारी..
Just Now!
X