गिरीश कुबेर

चीननं स्वत:हूनच करोना आजाराची निर्मिती केलीये आणि चीन आता आपल्याच देशातल्या या आजारानं बाधित रुग्णांना मारून टाकायला लागलाय, अशा शंका लोक बोलून दाखवू लागले आहेत. या अफवा आहेत की सत्य, हे कळायला मार्ग नाही. पण त्यासंदर्भातल्या एका सत्याची नोंद झालीये २०१९च्या जुलै महिन्यात.. म्हणजे ‘करोना व्हायरस’ हे नावदेखील कुठे चच्रेत नव्हतं तेव्हा. काय आहे ते?

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
paris 2024 olympics olympic torch lit in greece
खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच

करोना विषाणूचं रामायण काही संपायला तयार नाही. चीनमध्ये बळींची संख्या एव्हाना हजाराचा आकडा पार करून पुढे गेलीये आणि या विषाणूचा प्रसार थांबला आहे किंवा काय, याचं उत्तर काही मिळताना दिसत नाही. भारतात या विषाणूबाधित रुग्ण आढळू लागलेत. केरळात ते सापडले. आता कोलकाता विमानतळावर तपासण्यात आलेल्या काहींना त्याची लागण झाल्याचं दिसून येतंय.

त्यात या आजाराची साथ नक्की कशामुळे पसरतीये, हेच अजून नक्की करता आलेलं नाही. या आजारात तर ठणठणीत बरे दिसणाऱ्या व्यक्तीही हे विषाणू वाहून नेतात, असा संशय आहे. हे जास्तच अवघड. आजारी माणसांना तपासणे सोपं; पण निरोगींची गणना आणि मग तपासणी करणार कशी? त्यामुळे सगळं जगच या आजाराबाबत चाचपडतंय. पण या आजाराच्या प्रसाराची व्याप्ती हेच एक कारण यामागे नाही. जे कारण आहे ते कोणी अधिकृतपणे बोलून दाखवताना दिसत नाही. हे कसं काय बोलून दाखवायचं, असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. साहजिकही आहे ते!

ते कारण म्हणजे चीन.

त्या देशात नक्की काय सुरू आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. चीन तो लागूही देत नाही. याबाबत कोणी काही बोलत नाही, कारण त्या देशाची अर्थव्यवस्था. गावातल्या झोपडीत राहणाऱ्याच्या घरात काही खुट्ट झालं, तरी त्याचा लगेच बभ्रा होतो. पण गावप्रमुखाच्या घरात डोळ्यांदेखत काही आक्रीत घडत असलं तरी सगळेच गप्प बसतात. तसंच आहे हे. त्यामुळे समाजमाध्यमं, व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातल्या वावडय़ा सोडल्या, तर गंभीर पातळीवर जवळपास सर्वच जण आपल्या मनातल्या शंका मनातच ठेवताना दिसतात. या शंका प्रामुख्याने दोन आहेत.

पहिली म्हणजे चीननं स्वत:हूनच या आजाराची निर्मिती केली, ही. आणि दुसरी शंका.. किंवा खरं तर भीती.. चीन आता आपल्याच देशातल्या या आजारानं बाधित रुग्णांना मारून टाकायला लागलाय. माणसं शपथेवर हे सगळं सांगतायत. आणि पुरावा म्हणून सादर केली जातायत ती काही दृक्मुद्रणं.. लष्कराचे जवान आपल्याच नागरिकांवर गोळीबार करून त्यांना संपवून टाकत असल्याची.

चीनसंदर्भात जी काही जगात प्रतिमा आहे ती पाहता, या दृक्मुद्रणांवर अविश्वास दाखवणं अनेकांना पटत नाही. साध्या तर्काच्या आधारे तसा प्रयत्न जरी केला तरी समोरचा- ‘‘तुम्हाला माहिती नाही, चीन काय आहे ते..,’’ असं बोलून दाखवतो आणि आसपासचे त्यावर माना डोलावतात. त्याहून जे जरा अधिक शहाणे असतात ते सांगतात, ‘‘हा अमेरिकेनं तयार केलेला विषाणू आहे आणि तो त्यांनीच चीनमध्ये सोडलेला आहे.’’ गंमत अशी की, या सगळ्या अफवा आहेत की सत्य, हेदेखील अधिकृतपणे बोलायला कोणी तयार नाही. त्याला कारणही तसंच आहे.

त्यातल्या एका सत्याची नोंद झालीये २०१९च्या जुलै महिन्यात. म्हणजे ‘करोना व्हायरस’ हे नावदेखील कुठे चच्रेत नव्हतं तेव्हा. आणि हे घडलं आहे दूर तिकडे कॅनडा या देशात. त्या देशातल्या नॅशनल मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीत. या प्रयोगशाळेत एक चिनी तज्ज्ञ जोडपं होतं. डॉ. शिआनगुओ क्विउ (Xiangguo Qiu) आणि त्यांचा नवरा डॉ. केडिंग चेंग. हे दोघंही साथीच्या आजारांचे तज्ज्ञ. त्यातही विशेषत: इबोला आणि निपाह या दोन गाजलेल्या विषाणूंचा त्यांचा अभ्यास. त्यासाठी माकडांवर प्रयोग केले जात होते या प्रयोगशाळेत. पण गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस या दोघांच्या संगणकांच्या जोडण्या काढून घेतल्या गेल्या आणि त्यांची एकूणच चौकशी सुरू झाली.

या दोन आजारांच्या अतितीव्र आणि घातक म्हणता येईल अशा विषाणूंची रवानगी त्या देशातल्या एका प्रयोगशाळेतून दुसऱ्या प्रयोगशाळेत केली जात होती. यात काही नवीन नाही. हे करावं लागतं. म्हणजे १९८१च्या सुरुवातीला इराण-इराक युद्ध तापत असतानाच अमेरिकी सरकारचे दूत म्हणून डोनाल्ड रम्सफेल्ड बगदादला पाठवले गेले. त्यांच्याकडे एक छोटं खोकं तेवढं होतं. ते त्यांना इराकचा, अमेरिकेनं पुढे क्रूरकर्मा वगैरे ठरवलेला, सद्दाम हुसेन याच्या हाती द्यायचं होतं. या पुडक्यात होते दोन आजारांचे जंतू. अँथ्रॅक्स आणि प्लेग. म्हणजे काळपुळी आणि आपल्याला माहीत असलेला प्लेग. मग नंतर या विषाणूंच्या साहाय्याने सद्दामनं आपल्या देशातल्या हजारो कुर्दिश बंडखोरांना अल्लाघरी पाठवलं. आणि नंतर याच अमेरिकेनं सद्दामकडे जैविक अस्त्रं आहेत म्हणून २००३ साली त्याचा नायनाट केला. तेव्हा आजारांच्या विषाणूंची वाहतूक हा काही नवा प्रकार नाही.

कॅनडाबाबत नवी घटना होती ती इतकीच की, या आजारांचे विषाणू त्या देशातल्या प्रयोगशाळेत पोहोचलेले नाहीत.

ते चीनमध्ये गेल्याचं आढळलं. कोणी पाठवले, ते तिकडे गेलेच कसे, वगैरे काहीही माहिती कोणालाही नाही. त्यामुळे झाल्या प्रकारानं ती प्रयोगशाळा हादरली. त्यात गेले काही महिने या चिनी दाम्पत्याकडे संशोधनाच्या मिषाने येणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच वाढलेली होती. त्यात त्याआधी बारा महिन्यांत या डॉक्टरबाई किमान पाच वेळा चीनला जाऊन आल्याचं आढळलं. तेव्हा या प्रयोगशाळेच्या व्यवस्थापकांनी पहिली गोष्ट कोणती केली, तर या दोघांचा संगणक संबंध तोडला. म्हणजे त्यामागचा विचार हा की, समजा त्यांच्याकडून माहिती फुटत असेल तर आणखी ती हाती जायला नको.

कारण नाटो.. म्हणजे अमेरिकेच्या अधीन संघटनेतील देशांत जैविक आणि रासायनिक अस्त्रांवर काय काय संशोधन सुरू आहे यात चीनला रस असल्याचं आढळलं, म्हणून. म्हणजे या देशांतून जर काही आजारांची निर्मिती होतच असेल, तर त्यावरचा उतारा आपल्याकडे असायला हवा, असा चीनचा प्रयत्न होता. तेही साहजिक. कारण सर्व.. म्हणजे सर्वच.. देश हे असं करत असतात. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि तेव्हाचा सोव्हिएत रशिया यांनी परस्परांविरोधात असे अनेक उद्योग केल्याचा पुरावा आहे. पुढे व्हिएतनाम युद्धात अमेरिकेनं त्या देशात किती भयानक संहारक रसायनास्त्रे वापरली, हेदेखील आता सिद्ध झालेलं आहे. तर तसंच काही या चिनी डॉक्टरांकडून सुरू होतं किंवा काय, याचा शोध सुरू झाला. त्या वेळी नाटोचे सेक्रेटरी जनरल जेन्स स्टॉल्टेनबर्ग यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात बोलताना एक सूचक विधान केलं. ते होतं जैविक अस्त्रांच्या हेरगिरीचं.

ती झाली असं कोणीच म्हणत नाहीये. पण नाही झाली असंही कोणी सांगत नाहीये. आणि आता त्यात वावडय़ा चीनच आपल्या नागरिकांची हत्या करत असल्याच्या. त्यातलं काहीच सिद्ध झालेलं नाही. सिद्ध होईल याचीही काही शाश्वती नाही. ती किंबहुना न होण्याचीच शक्यता अधिक. हे क्षेत्रच असं आहे की, ज्यातलं वास्तव कल्पनेपेक्षाही अधिक अद्भुत, गहिरं आणि काळंकुट्ट आहे. जीवांचं हे युद्ध जगणाऱ्यांच्या अंगावर काटा आणतं.

..आणि मग ‘द कासांड्रा क्रॉसिंग’ हा सिनेमा आठवतो. सत्तरच्या दशकातला. सोफिया लॉरेन हिनं त्यात काम केलं होतं.

त्यात तीन दहशतवादी अमेरिकेवर जैविक हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सुरक्षारक्षक त्यांना टिपतात. पण एक निसटतो. तो सामान वाहून नेणाऱ्या कंटेनरवर शिरतो, त्याच्याकडचे विषाणू वातावरणात शिरतात आणि हा दहशतवादी त्याच कंटेनरमध्ये लपतो. काय झालंय हे जाहीर करायचीही चोरी. हा कंटेनर रेल्वेत चढवला जातो. या रेल्वेच्या अन्य डब्यांत हजारभर प्रवासी असतात. सुरक्षारक्षकांना गांभीर्य कळतं. म्हणजे या हजारभर प्रवाशांना या विषाणूंची लागण होणार. आणि ही रेल्वे ज्या स्थानकावर थांबेल, तिथल्या प्रवाशांत हा आजार पसरणार. मार्ग एकच.

ही रेल्वेगाडी अशा ठिकाणी न्यायची, की जिथं माणसंच नाहीत. मग प्रवाशांना रुग्णालयात डांबून या आजाराची साथ रोखायची. उपाय उत्तम. पण यात एकच धोका असतो. त्यासाठी ही रेल्वे अशा पुलावरून न्यावी लागणार असते, की जो कधीही पडेल आणि ही रेल्वे नेतानाच जर तो पडला, तर हे हजारो प्रवासी खाली पाण्यात पडून मरणार. प्रश्न असा की, या मार्गानं जाऊन प्रवाशांना मरू द्यायचं की त्या प्रवाशांमुळे पसरणाऱ्या जीवघेण्या आजाराचा धोका पत्करायचा? काय मार्ग निघतो त्यातून?

ते सांगणं काही खरं नाही. खरं इतकंच की, असं साधारण ४५ वर्षांपूर्वीचं पडद्यावरचं ‘कासांड्रा क्रॉसिंग’ वास्तवातही कधी समोर येऊ शकतं. चीन हा फक्त निमित्त.