15 July 2020

News Flash

त्यात काय सांगायचं?

रुग्णालयात भरती व्हायला लागेल. तुला करोनाची लागण आहे.

गिरीश कुबेर

सरकारी सेवेतल्या एका अनुभवी डॉक्टरांच्या मते, आजार पुरेसा बळावण्याआधी चाचणी झाली तर तीत करोनाची बाधा सापडतही नाही.पतर दुसऱ्या डॉक्टरांचं म्हणणं : डेक्सामेथॅसोनचं इतकं कौतुक छापायचं काय कारण?.. यात ‘कोविडोस्कोप’ दिसत होता..

चंद्राबाबू नायडू राजकीय क्षितिजावर नुकतेच आले होते तेव्हाची ही गोष्ट. त्या वेळी त्यांनी आपल्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ सुरू केलं होतं. बराच गाजावाजा झाला होता त्याचा त्या वेळी. म्हणून आपल्याकडे काय परिस्थिती त्याची बातमी करायला मंत्रालयात गेलो. वरिष्ठ नोकरशाहीत मित्रमंडळी खूप. त्यातल्या दोघातिघांना विषय काय आहे ते सांगितलं. त्यावर त्यातला एक लगेच भेटूया म्हणाला. गेलो त्याच्या दालनात. तो शेजारच्या खोलीत घेऊन गेला.

छोटासा कॉन्फरन्स हॉल. आयताकृती लांब टेबल. समोर टीव्ही. त्यानं विचारलं, कोण कोण जिल्हाधिकाऱ्यांना ओळखतोस? चारपाच नावं सांगितल्याचं आठवतंय. चांगले मित्र होते. ती नावं सांगितल्यावर त्याच्या सहकाऱ्यानं एकापाठोपाठ सगळ्यांशी संपर्क साधला आणि दोनपाच मिनिटांत सगळे समोरच्या टीव्हीवरच्या चौकटीत एकवटले. हा माझा मंत्रालयीन अधिकारीमित्र म्हणाला : इतकं काय कौतुक चंद्राबाबूंच्या व्हिडीओ कॉन्फरन्सचं? आपल्याकडे कधीपासूनच आहे ही व्यवस्था!

त्यावर त्यांना विचारलं : हे आधी का नाही सांगितलंत?

त्यांचं उत्तर : त्यात काय सांगायचं?

आज हा प्रसंग आठवायला दोन कारणं आहेत. एका स्नेह्य़ाला झालेली करोनाची लागण आणि दुसरं कारण म्हणजे करोनावर डेक्सामेथॅसोन हे औषध असल्याची ब्रिटनमधनं आलेली बातमी.

झालं असं की एका परिचिताचं पडसं आणि खोकला बरा होईना. गेल्या आठवडय़ात त्याला तापही आला. साऱ्या कुटुंबाची पाचावर धारण. हल्ली वातावरण असं की माणसं साधी शिंक आली तरी कानकोंडी होतात. त्यात याला तर खोकला यायचा. तोही चारचौघात. म्हणजे पाहायलाच नको. सर्वाचं म्हणणं पडलं करोनाची चाचणी करायलाच हवी. पण त्याचीही काही व्यवस्था होईना. काहीच दुसरं लक्षण नसताना चाचणी कोण करणार? पण मार्ग काय हेही कळेना. काहीएक खटपटी-लटपटीमुळे एक सरकारी डॉक्टर त्याला तपासायला तयार झाला. त्यानं तपासलं आणि सांगितलं : छातीचा एक्सरे काढ. त्यावर त्याचे कुटुंबीय पुन्हा हवालदिल. त्यांना वाटत होतं हा डॉक्टर करोना-चाचणीची शिफारस करेल. पण त्यांनी सांगितला एक्स-रे.

निरुत्साहानेच त्याने काढला तो. या डॉक्टरांचे कसे लागेबांधे असतात वगैरे चर्चा. संध्याकाळी गेला तो डॉक्टरांना दाखवायला. त्यांनी पाहिला आणि म्हणाले. रुग्णालयात भरती व्हायला लागेल. तुला करोनाची लागण आहे.

सगळेच चक्रावले. सुशिक्षित घरचे. त्यामुळे लगेच गुगलवर वगैरे त्यांनी धांडोळा घेतला. एक्सरेतून करोना निदान झाल्याची माहिती कुठेच नाही. आणि हे डॉक्टर केवळ एक्सरे पाहून छातीठोकपणे सांगतायत. तुला करोनाची बाधा आहे. हा पठ्ठय़ा आपल्या घशात, नाकात कापूसकांडय़ा घालून चाचणी केली जाणार अशा मनाच्या तयारीनं आलेला. पण तसं काहीही नाही. नुसताच एक्सरे. त्याच्या आसपास राहणारे जे कोणी हुशार/ चुणचुणीत वगैरे (खरे तर ते तसे प्रत्येकाच्या आसपास असतातच) रहिवासी होते, ते वेडय़ात काढू लागले. करोना काय असा एक्सरेतनं कळतो की काय. वगैरे. हे असे हुशार/चुणचुणीत नेहमी कडेकडेनं बोलत असतात. नुसती बडबड. प्रत्यक्ष मदत काही नाही. शेवटी न राहवून या परिचिताचा भाऊ डॉक्टरांकडे पुन्हा गेला. ‘हे फक्त एक्सरेतनं कसं काय कळणार?’ असं काही त्याला त्या डॉक्टरांना विचारायचं होतं. ते विचारलं त्यानं. डॉक्टर ठाम होते. वर म्हणाले- लवकर घेऊन जा त्याला रुग्णालयात. ऑक्सिजन लावावा लागणार आहे त्याला.

ते ऐकल्यावर सगळेच तंतरले. एकदम पळापळ. अशा वेळी प्रत्येकाच्या शेजारचे ते हुशार/चुणचुणीत गायब होतात. इथेही तसंच झालं. बऱ्याच भवती न भवतीनंतर याची कोणत्या तरी रुग्णालयात सोय झाली. यथावकाश करोना चाचणी झाली. एक दिवसाने तिचा रिपोर्ट आला. हा करोना पॉझिटिव्ह आला आणि पाठोपाठ त्याला ऑक्सिजन लावायचीही वेळ आली. हे सर्व कळल्यावर मला राहवलं नाही. दुसऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या मध्यस्थीनं या डॉक्टपर्यंत पोहोचलो. हेतू एकच. ही एक्सरेची काय भानगड आहे ते विचारायचं. विचारलं. त्यांनी सर्व काही व्यवस्थित समजावून सांगितलं.

ते सरकारी सेवेत आहेत आणि या करोनाकाळात अक्षरश: हजारो तपासण्या त्यांनी केल्यात. त्यांचं निरीक्षण असं की करोनाच्या प्रचलित चाचण्यांपेक्षा छातीच्या एक्सरेतून याचा प्रादुर्भाव जास्त अचूक समजतो. (या संदर्भातील तांत्रिक तपशील शुक्रवारच्या अंकात लोकसत्ताच्या आरोग्य प्रतिनिधी शैलजा तिवले यांच्या वृत्तात सविस्तर आहे) खेरीज त्या नाकघशातल्या चाचणीचे निष्कर्ष कळायला वेळही लागतो. त्यापेक्षा आपला जुनाजाणता एक्सरेच बरा.. असं या डॉक्टरांचं निरीक्षण. त्यांच्या म्हणण्यानुसार या पद्धतीनं त्यांनी काढलेल्या निदानाची अचूकता ९० टक्के इतकी आहे. त्या तुलनेत करोनाच्या पारंपरिक चाचणीचे निष्कर्ष चुकण्याची शक्यता अधिक आहे. आणि परत पारंपरिक चाचणी ही आजार पुरेसा बळावण्याच्या आधी झाली तर तीत करोनाची बाधा सापडतही नाही.

हे खूप धक्कादायक. आपल्या भारतीय डॉक्टरांनी अत्यंत वेगळेपणाने, नव्या मार्गाने जात करोना-निदानाची नवी पद्धत विकसित करावी हे खरोखरच आनंददायी. त्यांचं सगळं ऐकल्यावर डॉक्टरांना विचारलं : याची शास्त्रीय पाहणी करून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध का नाही करत? तसं करायला हवं. जगात कित्येक देशांत करोनावर काय काय सुरू आहे आणि ते देश काहीसं किरकोळ वेगळं केलं तरी किती लगेच जगाला सांगतात. आपणही हे सांगायला हवं. किती महत्त्वाचं आहे हे. यात मला एक चांगला ‘कोविडोस्कोप’ दिसत होता..

हे भडाभडा बोलणं ऐकल्यावर हे डॉक्टर शांतपणे म्हणाले : आता माझ्या रुग्णांना तपासू की या छापाछापीच्या भानगडीत पडू? इथे जेवायला उसंत नाही आणि निबंध वगैरे लिहायला वेळ कुठून आणू? आणि या क्षणाला जास्त महत्त्वाचं काय? माणसं बरी होणं की त्यांच्या आजाराचं कसं निदान झालं ते छापून आणणं? आणि त्यात काय एवढं सांगायचं?

काय उत्तर देणार?

हाच प्रश्न अगदी नंतरच्या चारपाच दिवसांत पुन्हा पडला. त्या वेळी अन्य सर्वाप्रमाणे डेक्सामेथॅसोन या करोनावर प्रभावी ठरलेल्या औषधाची बातमी लोकसत्तानेही छापली. ती वाचून दुसऱ्या दिवशी सक्काळी सक्काळी एका विख्यात ज्येष्ठ डॉक्टरांचा फोन आला. कातावलेले होते. (भल्या सकाळी फोन करणारे हे कातावलेले असतात) म्हणाले. हे डेक्सामेथॅसोनचं इतकं कौतुक छापायचं काय कारण? कोणी काहीही सांगतं आणि तुम्ही मीडियावाले डोक्यावर घेता.

त्यांना आधी शांत केलं. सांगितलं आज जगात सर्वत्र ही मोठी बातमी कशी आहे.. करोनावर काहीतरी उपाय सापडलाय ते किती महत्त्वाचं आहे ते वगैरे. त्यासाठी ऑक्सफर्डला कसा प्रयोग झाला डेक्सामेथॅसोनचा. असं बरंच काही.

त्यांनी त्यावर चार-पाच ब्रँड नावं फेकली तोंडावर आणि हे या कंपनीचं आहे, ते त्या कंपनीचं आहे, अशी माहिती त्याच्या जोडीला. वर विचारलं ही कसली नावं आहेत? कशावर दिली जातात ही औषधं?

त्यावर त्यांना नम्रपणे आठवण करून दिली : मी डॉक्टर नाही, मला हे कसं काय माहीत असणार?

ते म्हणाले : ही सर्व त्या तुम्ही कौतुक करता त्या डेक्सामेथॅसोन औषधाची वेगवेगळी नावं आहेत. आम्ही ती सर्रास देत असतो. अगदी कर्करोग ते करोना. डेक्सामेथॅसोन दिलं जातं. ते साधं दाहरोधक संप्रेरक (अँटी इन्फ्लेमेटरी स्टिरॉइड) आहे.

ते बरंच काही बोलत गेले. त्यांचा तो धबधबा अडवून ‘‘तुम्ही करोनाग्रस्तांना डेक्सामेथॅसोन दिल्याच्या नोंदी ठेवल्या होत्या का?’’, ‘‘किती जणांना ते दिलं असेल?’’, ‘‘त्याचे काय परिणाम झाले?’’.. आदी काहीही विचारण्याचं धाडस मला झालं नाही.

कारण या सर्व प्रश्नांचं उत्तर माहीत होतं..

‘त्यात काय सांगायचं?’ हा प्रतिप्रश्न.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 3:55 am

Web Title: dexamethasone the breakthrough drug for covid treatment zws 70
Next Stories
1 मात करायची झाली तर..
2 ऑर्वेल खोटा ठरला त्याची गोष्ट !
3 सेवा हाच धर्म.. आणि कर्मही!
Just Now!
X