आपण मोठे होत असताना काही काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. तसेच देशांनीही मोठं होताना काही काही कामं इतरांसाठी सोडायची असतात. त्या गोष्टी आपल्याला येत नाहीत म्हणून नव्हे  तर त्या करण्यात शहाणपणा नसतो म्हणून सोडायच्या असतात..

काही काही आश्वासनं देशकालातीत असावीत बहुधा. म्हणजे एखाद्या नेत्यानं आपल्या जनतेशी संवाद साधताना स्वदेशीच्या भावनेला हात घालणं आणि या स्वदेशीची सांगड देशप्रेमाशी वगैरे घालणं. अशा या भावनिक वातावरणात जे जे स्वदेशी ते ते उत्तम वा शहाणपणाचं असं काही मानलं जातं. सामान्य जनतेला हा मुद्दा पटकन पटतो. तो एकदा का पटवला की मग ते ते राजकारणी सर्व आर्थिक शहाणपणा बाजूला ठेवू शकतात आणि जनतेच्या डोक्यावर विनासायास शहाणपणाच्या मिऱ्या वाटतात.

याचं ताजं उदाहरण म्हणजे अमेरिकेचे ताजेतवाने नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. गेल्या आठवडय़ात २० जानेवारीला त्यांनी पदग्रहण केलं. साऱ्या जगाचं या घटनेकडे आणि त्यानंतर हे ट्रम्प महाशय काय बोलतायत याकडे लक्ष होतं. याचं कारण निवडणुकीच्या प्रचारात ट्रम्प यांनी अशा काही मागास मुद्दय़ांवर प्रचार केला होता की हा गृहस्थ सत्तेवर आला तर काय असा प्रश्न जगातल्या अनेकांना पडला होता. तेव्हा तो क्षण एकदाचा आला. आणि त्यानंतर ते ट्रम्प यांचं गाजलेलं भाषण.

‘अमेरिका फर्स्ट’ असा संदेश त्यांनी या भाषणात दिला. म्हणजे पहिल्यांदा ते हित अमेरिकेचं पाहणार. उगाच जगाच्या कल्याणाचा वगैरे यापुढे विचार अमेरिका करणार नाही, असं त्यांचं म्हणणं. ते एक वेळ ठीक. पण पुढचा त्यांचा मुद्दा हा अर्थदृष्टय़ा गोंधळलेल्या आणि भोंगळलेल्या गांधीवाद्यांच्या आश्वासनासारखा. तो होता स्वदेशीचा. या भाषणात त्यांनी नागरिकांना अमेरिकी वस्तूच वापरा, अमेरिकी वस्तूच विकत घ्या, असा आग्रह केला. अमेरिकी अध्यक्षानं ही स्वदेशीची हाक दिली.

शक्य आहे का ते? ज्या देशानं आपल्याला जागतिकीकरण शिकवलं, जग ही बाजारपेठ मानत त्या देशात शेकडय़ांनी उद्योजक तयार झाले आणि देशांच्या सीमा भेदून कसं वाढायचं हे जगानं अमेरिकेकडे पाहून समजून घेतलं तो देश आता अचानक ‘‘आमची कोठेही शाखा नाही’’, अशा मानसिकतेत कसा काय शिरणार?

मध्यंतरी एक विनोद फिरत होता समाजमाध्यमांत. अमेरिकेविषयी. बटाटे, मिरच्या मेक्सिकोतनं, सायप्रसमधनं कोथिंबीर, चहा आणि सॉफ्टवेअर भारतातनं, बिअर जर्मनीतनं, व्हिस्की इंग्लंडातनं, चीज नेदरलँडमधनं, कपडे बांगलादेशातनं, औद्योगिक सामग्री चीनमधनं वगैरे वगैरे ज्या देशात आयात होते तो अमेरिका  नावाचा देश जगातल्या औद्योगिक उत्पादनांमधला २६ टक्के वाटा एकटय़ानं उचलतो. म्हणजे जगातल्या लोकसंख्येच्या जेमतेम पाच टक्के लोकसंख्या ज्या अमेरिका नावाच्या भूभागात आहे, जो देश आयातीवर जगतो तो देश जगातला एकमेव महासत्ता म्हणून ओळखला जातो. मग अशा वेळी अमेरिकीच वस्तू वापरा हा नव्या अध्यक्षांचा संदेश कितपत शहाणपणाचा असू शकतो? या प्रश्नाच्या उत्तरासाठी गेल्या वर्षीच्या अमेरिकेच्या आयात वस्तूंची यादी तपासायला हवी.

अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंत सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहेत कपडे. आपली भारतीय मंडळी अमेरिकेत फिरायला गेल्यावर येताना मुलाबाळापत्नीसाठी कपडे आणत असले तरी ते अमेरिकेत तयार होत नाहीत. अमेरिकेत कपडे पाठवणारा सगळ्यात मोठा देश आहे चीन. या आपल्या शेजारी देशात तयार झालेल्या कपडय़ांतले तब्बल ३७ टक्के अमेरिकेत जातात. चीनपाठोपाठ व्हिएतनाम आणि बांगलादेश हेदेखील अमेरिकेत कपडय़ांचे मोठे निर्यातदार आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर आहेत पादत्राणं. यातही आघाडीवर आहे तो चीन. त्या देशात तयार होणाऱ्यातले ८७ टक्के जोडे एकटय़ा अमेरिकेत जातात. इथेही मागे आहेत व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि मेक्सिको हे देश. पण ते अगदीच मागे आहेत. त्यांचं प्रमाण आहे दोनपाच टक्के वगैरे. आपल्याला आपल्या कोल्हापुरी पायताणांचा काय मोठा करकरीत अभिमान. पण अमेरिकेत काही त्यांची मोठी निर्यात होत नाही.

तिसऱ्या क्रमांकावर आहे फर्निचर. घरात, कार्यालयात वापरायच्या खुच्र्या, टेबल, कपाटं वगैरे. यातही आघाडीवर आहे तो चीनच. त्या देशातनं ५८ टक्के फर्निचर अमेरिकेत जातं. पाठोपाठ आहेत मेक्सिको, कॅनडा वगैरे. स्वयंपाकघरात वापरावयाची भांडी, वस्तुसामग्री चौथ्या क्रमांकावर आहेत अमेरिकेत आयात होणाऱ्यांच्या यादीत. यातही पहिल्या क्रमांकावर आहे तो चीनच. मागोमाग आहेत दक्षिण कोरिया, मेक्सिको वगैरे.

वास्तविक अमेरिका हा मोटारींचा जन्मदेश. विसाव्या शतकाची पहाट होत असताना अमेरिकेत हेन्री फोर्ड यांनी पहिली मोटार तयार केली. परंतु अमेरिकेत आता मोटारी आयात होतात. त्यात आघाडीवर आहे तो कॅनडा. आणि अर्थातच जपान आणि पाठोपाठ जर्मनी. आता कॅनडातल्या मोटारी अमेरिकेत असतात याचा अर्थ त्या कोणा कॅनेडियन कंपनीनं बनवलेल्या असतात असं नाही. कंपन्या असतात अमेरिकी, जर्मन वगैरे. पण त्यांच्या मोटारी बनलेल्या असतात कॅनडा किंवा तत्सम कोणा देशांत.

तेव्हा या सगळ्यामुळे अमेरिकेत गतसाली २ लाख २२ हजार कोटी डॉलरच्या मालाची आयात झाली. भांडवली वस्तुसामग्री,  मोटारी वगळून ग्राहकोपयोगी वस्तू, औद्योगिक उत्पादनं, मोटारी,  खाद्यपेयं वगैरे अशी ही उतरंड आहे. या तुलनेत अमेरिकेनं निर्यात केलेल्या वस्तूंचं मूल्य आहे १ लाख ८८ हजार कोटी डॉलरच्या आसपास. पण अमेरिकेतनं बाहेर जाणाऱ्या वस्तू काय असतात? बोइंग, मॅक्डोनाल्ड डग्लस, लॉकहीड मार्टिन्स वगैरे कंपनीची विमानं, अंतराळ वाहनं, अत्यंत उच्च दर्जाची यंत्रसामग्री वगैरे. तरीही अमेरिकेतनं बाहेर जाणाऱ्या वस्तूंपेक्षा अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंचं मूल्य जास्त आहे.

पण तरीही अमेरिकेच्या महासत्तापणावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. याचं कारण आपण मोठे होत असताना काही काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात तसंच देशांनीही मोठं होताना काही काही कामं इतरांसाठी सोडायची असतात. या गोष्टी आपल्याला येत नाहीत म्हणून इतरांसाठी सोडायच्या असतात असं नाही. तर त्या करण्यात शहाणपणा नसतो म्हणून सोडायच्या असतात.

देशाच्या पातळीवर हा शहाणपणा आर्थिक आणि/ किंवा सामरिक असतो. म्हणजे अमुक एखादी वस्तू आपणच तयार केली नाही तर आपली अडवणूक होणार असेल तर ती वस्तू त्या देशानं स्वत:च बनवली तर ते योग्यच. सामरिक कारणांसाठी ते समर्थनीयही ठरतं. पण कोथिंबीर किंवा बटाटे किंवा मोटारी किंवा मद्य वा बिअर वगैरे या वस्तू काही सामरिक महत्त्वाच्या मानता येणार नाहीत. तेव्हा या आणि अशा अन्य वस्तूंच्या निर्मितीत बडय़ा देशांनी आपली ऊर्जा खर्च करायची नसते.

आणखी एक कारण यामागे असतं. ते म्हणजे आर्थिक. स्वदेशी वगैरे भावना कितीही ऐकायला छान असल्या, देशवासीयांच्या भावना त्यामुळे उचंबळून छाती फुगून वगैरे येत असली तरी त्यामागे आर्थिक शहाणपण असतंच असं नाही. बऱ्याचदा ते नसतंच. तेव्हा देशांनी विचार करायचा असतो तो आर्थिक शहाणपणा समोर ठेवून. तो ज्यानं जगाला शिकवला त्याच देशात आता स्वदेशीचे वारे वाहू लागले असतील तर गंमतच म्हणायची. ‘मेक इन’चा मोह अमेरिकनांनाही भुरळ पाडू लागला तर..

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

 Twitter : @girishkuber