|| गिरीश कुबेर

गाझप्रॉम ही रशियन सरकारची बलाढय़ ऊर्जा कंपनी. थेट ५,५०० कोटी डॉलर इतकी महाकाय गुंतवणूक करून ही कंपनी वायुवाहिनी पूर्ण करतीये. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्या वेळी जगातल्या अत्यंत खडतर भूभागातल्या वायुवाहिनीतून इंधन वाहायला लागेल.

समोर जे काही दिसतंय त्यावर अद्वातद्वा बडबडत तात्पुरतं राजकारण करायचं, ट्विटरवर काही तरी बरळत रहायचं की समोर जे इतरांना दिसतही नाही त्याचा वेध घेत पुढच्या चार-पाच दशकांचं पारडं आपल्या बाजूनं झुकेल अशी समीकरणं जुळवायची..

सध्या जगात असे दोन प्रकारचे राजकारणी दिसतात. पहिल्या प्रकारातला अत्यंत वाचाळ आणि आपण काही ना काही निमित्तानं माध्यमात दिसत राहू अशी व्यवस्था करणारा. या गटातल्या राजकारण्यांना बोलण्याची उबळ आवरत नाही. मिळेल त्या मुद्दय़ावर विरोधकांचं नाक खाजवायला त्यांना आवडतं. या गटातले राजकारणी सर्वोच्च पदावर बसले तरी लहानसहान मुद्दय़ांवर भाष्य करतात अणि त्या पदावरनं दखल घेण्याच्या योग्यतेचे नसलेल्या छोटय़ा विरोधकांच्याही नादाला लागतात. पण दुसऱ्या गटातल्या राजकारण्यांचं तसं नसतं. ते नुसतेच मितभाषी नसतात. तर त्या जोडीला ते धोरणीही असतात. माध्यमातल्या प्रसिद्धीची फारशी ते फिकीरच करत नाहीत. ट्विटर वगरेच्या पोरखेळात उतरत नाहीत. विरोधकांना मोजतच नाहीत. पण तसं दाखवून मात्र ते देत नाहीत. प्रत्येक ताज्या घटनेवर प्रतिक्रिया देत बसत नाहीत. त्यांना उद्याची नाही तर परवाची काळजी असते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे व्लादिमिर पुतिन ही या दोन गटांतल्या राजकारण्यांची प्रतीकं. जगातल्या अत्यंत महत्त्वाच्या दोन देशांच्या प्रमुखांचं नक्की काय चाललंय हे पाहिलं की या दोहोंतला फरक ठसठशीतपणे समजून घेता येईल. तो का घ्यायचा..? आपण आणि आपले कुठे आहेत हे कळून घ्यायचं असेल तर..

अमेरिका ट्रम्प यांच्या उदयापर्यंत जागतिक व्यापारउदिमात जगाचं इंजिन होता. तसा आहेही तो अजून. पण आणखी काही वर्षांनी राहील का तो या आघाडीच्या भूमिकेत? ट्रम्प यांचा वारू असाच उधळलेला राहिला तर हे तसं कठीणच दिसतं. अनेक व्यापार संघटनांतून ट्रम्प अमेरिकेला बाहेर काढतायत, अनेक देशांशी केलेले जुने करारमदार नाकारतायत आणि आपण आणि आपला देश इतकाच विचार करतायत.

आणि पुतिन?

गाझप्रॉम ही रशियन सरकारची बलाढय़ ऊर्जा कंपनी. थेट ५,५०० कोटी डॉलर इतकी महाकाय गुंतवणूक करून ही कंपनी वायुवाहिनी पूर्ण करतीये. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्या वेळी जगातल्या अत्यंत खडतर भूभागातल्या वायुवाहिनीतून इंधन वाहायला लागेल. खडतर म्हणजे किती? तर शून्याखाली ६२ इतक्या तापमानातल्या प्रदेशात ही वायुवाहिनी असेल. सायबेरियातनं निघून तब्बल ३ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून या वाहिनीतला इंधनवायू चीनमध्ये पोहोचेल. त्याच वेळी आíक्टक समुद्रातनं म्हणजे पृथ्वीच्या डोक्यावरच्या उत्तर गोलार्धातनं दुसरी एक वाहिनी निघेल आणि युरोपीय देशांकडे जाईल. प्रशांत महासागरातल्या साखलेन नावाच्या तिसऱ्या एका ऊर्जा बेटावरनं आणखी एक वाहिनी निघेल आणि ती पुन्हा चीनला इंधन पुरवेल.

अलीकडेच पुतिन आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांची बíलनजवळ भेट झाली. ती होऊ नये यासाठी अमेरिका आणि त्यातही ट्रम्प खूप प्रयत्न करत होते. पण दोघांनीही अमेरिकेला धूप घातली नाही आणि ही बठक पार पडली. काय होता विषय या बठकीचा? बाल्टिक समुद्रातनं रशियाच्या गाझप्रॉम कंपनीला थेट जर्मनीपर्यंत इंधन वायुवाहिनी टाकायची आहे. तिचा निर्णय या बठकीत झाला. या दोन्ही नेत्यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली. म्हणजे एकाच वेळी युरोप आणि आशिया या दोन महत्त्वाच्या खंडांत रशिया इंधनवायू पुरवेल.

पण ट्रम्प यांचा पुतिन आणि मर्केल यांच्या बठकीला का विरोध होता, असा प्रश्न पडू शकतो. तो होता याचं साधं कारण म्हणजे रशियाची वायुवाहिनी पूर्ण झाली की जर्मनी अमेरिकेकडून होणारा इंधन वायुपुरवठा बंद करेल. आताच जर्मनीनं इंधनासाठी अमेरिकेवर अवलंबून न राहता आपल्या मागण्या रशियाकडून पूर्ण करून घ्यायला सुरुवातही केली आहे. साहजिकच आहे ते. युरोपीय संघ, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, म्हणजे नाटो करार आणि इराणबरोबरचा अणुभट्टी करार या तीन मुद्दय़ांवरनं आपल्या देशांतर्गत मतदारांना खूश करण्यासाठी ट्रम्प यांनी अनेक युरोपीय देशांना दुखावलंय. जर्मनीच्या मर्केल या त्यातल्या एक.

आपल्या अमेरिकी मतदारांना ट्रम्प यांनी राष्ट्रवादाचं बाळकडू पाजलंय. त्यामुळे त्यांच्या देशप्रेमानं चांगलं बाळसं धरलंय. आपला देश किती महान आहे, आपण तो आणखी महान करू या वगरे छापाची भुरळ अमेरिकी नागरिकांनाही पडतेच. दोन वर्षांपूर्वी ते आपण पाहिलंच. पण हे असं तद्दन खोटं काही करायच्या नादात हे नेते खरं तर जे काही करायला हवं ते विसरतात. खरं तर त्यांना ते कळतच नाही, हेही आपण पाहतोच. जागतिक वास्तवाचं भान नसलेले नेते हे त्या देशातल्या नागरिकांपुढचं आव्हानच.

तर या काळात पुतिन हळूहळू जगाचा ऊर्जा बाजार काबीज करत चाललेत. साठच्या दशकात तयार झालेली ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पो र्टिंग कंट्रीज, म्हणजे ओपेक, ही संघटना तशी जन्मापासनं अमेरिकेच्या ताटाखालची. तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या या संघटनेनं १९७३-७४ चा अपवाद वगळता अमेरिकेला कधीही दुखावलेलं नाही. तेल निर्यात करणारे जगातले महत्त्वाचे देश या संघटनेचे सभासद आहेत.

रशिया फक्त त्यात नाही. जगात सौदी अरेबियाखालोखाल रशियात प्रचंड तेलसाठे आहेत. पण रशिया तेल निर्यातदार देशांच्या संघटनेचा सदस्य नाही. हा इतिहास आणि वर्तमान.

पण भविष्य वेगळंच आहे.

ते आहे नसíगक वायू निर्यातदार देशांची संघटना उदयाला येणं, हे. म्हणजे तेलसंपन्न देशांनी जशी संघटना उभारून बाजारावर नियंत्रण मिळवलं, तसं आता वायुसंपन्न देशांना करायचंय. तेल निर्यातदार देशांच्या संघटनेमागे अमेरिका होती.

तर वायू निर्यातदार देशांची संघटना बांधण्याचा प्रयत्न खुद्द रशियाकडूनच सुरू आहे. इतकंच नाही तर तेलाच्या किमती आणि त्याची खरेदी-विक्री डॉलरशी जोडली गेली, त्यामुळे जसं डॉलरचं महत्त्व वाढलं तसंच नसíगक वायूचा व्यवहार रुबल या रशियन चलनाशी बांधला जावा असा पुतिन यांचा प्रयत्न आहे. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला या देशातल्या धुरिणांनी ओपेक स्थापनेसाठी प्रयत्न केले. तसं आता रशिया.. आणि पुन्हा व्हेनेझुएला.. हे देश गॅस ओपेक स्थापनेसाठी प्रयत्न करू पाहतात. या जोडीला नसíगक वायुसाठे असलेला दुसरा देश म्हणजे ओमान. त्यामुळे रशिया, व्हेनेझुएला, ओमान अशा वायुसंपन्न देशांनी एकत्र येऊन स्वत:ची स्वतंत्र संघटना तयार करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते करण्यात आघाडीवर आहेत पुतिन.

रशियाच्या अर्थव्यवस्थेला गारद करण्यासाठी क्रीमिआ आणि युक्रेन संघर्षांनंतर खनिज तेलाचे भाव पाडले गेले. का? तर रशियाची अर्थव्यवस्था तेलाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे म्हणून. पण या काळात रशियानं इंधनवायू आधारित अर्थव्यवस्था विकसित केली. इतकी की, या घडीला रशियन सरकारच्या प्रत्येकी १०० रुबल उत्पन्नापकी ४० रुबल्स हे इंधनवायूतून येतात.

अत्यंत थंड डोक्यानं राजकारण करणारा आणि देशांतर्गत यंत्रणांवर एकहाती आणि प्रचंड हुकमत असणारा हा राजकारणी. त्यांना साथ आहे ती चीनच्या क्षी जिनिपग यांची. या दोघांचं नक्की काय सुरू आहे, याचा अंदाजच नाही कोणाला. चीन हा जागतिक अर्थकारणाच्या त्रिकोणाचा चौथा कोन. जिनिपग हे पुतिन यांच्याप्रमाणेच. थंड डोक्यानं आणि त्याहूनही थंड जिभेनं काम करणारे. त्यांच्याविषयी नंतर कधी.

तूर्त दखल घ्यायची ती ट्रम्प आणि पुतिन यांची. जग या दोघांत विभागलंय. एक पदाचा पोच नसलेला आणि दुसरा अत्यंत पोचलेला.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber