27 February 2021

News Flash

उसासाठी?.. ‘कशासा’ठी!

भेट झाल्यावर त्यानं मखमली रुमालातून काही जवाहिरं काढावीत तशा दोन बाटल्या काढल्या.

स्पॅनिश भाषेशी परिचय नसल्यास, या लेबलावरचं ठळक नाव चटकन समजत नाही!

गिरीश कुबेर @girishkuber
girish.kuber@expressindia.com 

इथेनॉलचं काय करायचं याचा आपण घोळ घालतो. उसाच्या मळीचा निर्णय घेत नाही. काही साखर कारखाने मग ती तशीच नदीत सोडून देतात. याउलट ब्राझीलमध्ये १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारी आहेत.. आणि उसाचं पेयही आहे!

गेल्या आठवडय़ात ‘वसंतदादा साखर संस्थे’च्या वार्षिक परिषदेला हजर राहता आलं. पुण्याजवळ मांजरी इथं ही संस्था आहे. परिसरात बहरलेली उसाची शेतं आणि त्यात ही संस्था. भारतातच नाही तर जगातही उसावरच्या संशोधनासाठी ही संस्था ओळखली जाते. उसाचा उतारा कसा वाढेल, कोणत्या भागात उसाची कोणती जात जास्त पीक देईल वगैरे संशोधन या संस्थेत केलं जातं. त्या दिवशी संस्थेचा वर्धापन दिन होता. त्यामुळे मोठय़ा संख्येने राज्यातील ऊस शेतकरी, समस्त साखर कारखानदार तिथं हजर होते. आसमंतात हिरवागार ऊस आणि पांढऱ्या शुभ्र कपडय़ातले हे साखर कारखानदार! छान दृश्य होतं ते..!

अनेकांच्या बोलण्यातून साखरनिर्मिती प्रक्रियेत तयार होणाऱ्या इथेनॉल या घटकाला दर कसे कमी आहेत किंवा ते पेट्रोलमध्ये मिसळण्याच्या निर्णयाची गती किती मंद आहे वगैरे तक्रारींचे सूर कानावर येत होते. खरं होतं त्यांचं. आपल्याकडे अटलबिहारी वाजपेयी सरकार सत्तेवर असताना पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला गेला. सरकार बदलल्यावर तो निर्णयही बदलला. या अशा धरसोडीमुळे त्या क्षेत्राची कशी वाट लागलीये वगैरे तक्रार त्यातले काही अभ्यासू तिथं मांडत होते.

चूक नव्हतं त्यांचं काही. चूक असलीच तर आपल्या धोरण धरसोडीची. या इथेनॉलचं काय करायचं याचा आपण घोळ घालतो. उसाच्या मळीचा निर्णय घेत नाही. काही साखर कारखाने मग ती तशीच नदीत सोडून देतात. मग तो आसमंतात पसरणारा दरुगध वगैरे आलंच ओघानं. खरं म्हणजे साखर आणि ऊस ही काही आपलीच मक्तेदारी नाही जगात. आपल्यापेक्षा किती तरी देशांनी ऊस, मळी, इथेनॉल यांचा आपल्यापेक्षा किती तरी विधायक उपयोग विकसित केलाय. उदाहरणार्थ ब्राझील.

आपल्याकडच्या काही साखर कारखानदारांनी ब्राझीलमध्ये ऊस शेती घेतलीये. एक तर त्या देशात पाणी भरपूर. आणि फार खोलवरही जावं लागत नाही त्यासाठी. त्यामुळे ऊस आपल्यापेक्षा किती तरी पटींनी जास्त पिकतो त्या देशात. इथेनॉलचा वापरही त्या देशानं इतका केलाय की कौतुक वाटावं. वास्तविक फोर्ड वगैरे मोटार कंपन्या आपल्याकडेही आहेत. पण त्या देशात १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारी आहेत. म्हणजे त्यांत पेट्रोल/डिझेल भरावंच लागत नाही. फक्त इथेनॉल भरलं तरी झालं.

हे खरं तर आपणही करू शकतो. एकटय़ा महाराष्ट्रात १९९ साखर कारखाने आहेत. म्हणजे किती इथेनॉल त्यात तयार होऊ शकतं आणि आपल्या पेट्रोलची बचत होऊ शकते याचा हिशेब एकदा मांडायला हवा. पण तो पुन्हा कधी तरी.

२०२० अजून आपल्यात भिनायचंय. आणि मुख्य म्हणजे त्याआधी वर्षांखेरीस जी काही द्रव्यं अंगात मुरली असतील त्यांचा अद्याप निचरा व्हायचाय. त्यामुळे वाहन वा ‘मोटार उद्योग आणि इंधन समस्या’ वगैरे अशा काही गहन प्रश्नाला हात घालण्याआधी थोडं सलावायला हरकत नाही. प्रश्न साखर उद्योगाचा आणि ब्राझीलचा संदर्भ निघालेलाच आहे तर तिथल्या या क्षेत्राच्या ‘तीर्था’ची माहिती आनंददायी ठरेल आणि त्या तीर्थाचा अनुभव घेता आलाच तर तो ब्रह्मानंदी टाळी लावणारा ठरेल, यात शंका नाही. पण त्याआधी त्याची माहिती असायला हवी.

ती व्यवसायानिमित्त जग भटकणाऱ्या एका मित्रानं दिली. तो नुकताच ब्राझीलच्या दौऱ्याहून परत आला होता आणि एका निवांत शनिवारची प्रतीक्षा होती. तो मिळाला. भेट झाल्यावर त्यानं मखमली रुमालातून काही जवाहिरं काढावीत तशा दोन बाटल्या काढल्या. एकीत पाण्याच्या रंगाचं पेय होतं आणि दुसरीत चॉकोलेटच्या रंगाचं. मग सुरू झालं त्यावर त्याचं प्रवचन. उद्बोधक आणि ऊध्र्वगामी.

ही दोन्ही पेयं उसापासून बनवलेली होती. आपल्याकडे अशा द्रवांत मळी हा कच्चा माल असतो. तसं त्या देशात होत नाही. ब्राझीलमध्ये उसाच्या रसापासूनच थेट पेयं बनवतात. उसाचा रस निघाला की तोच आंबवतात. आपल्या गोव्यात काजूगरांच्या रसाला जसं आंबवतात तसा तिकडे उसाचा रस आंबवला जातो. त्या आंबवलेल्या ऊस रसाचं पृथक्करण करायचं आणि तो गार झाला की तसाच बाटलीत भरायचा. पाण्यासारखाच दिसतो तो. त्या दोनपैकी एका बाटलीत होतं ते पेय ते! गोव्यात काजूपासनं तयार झालेलं पेयदेखील असंच भरभरून भरलं जातं.. आणि अर्थातच असंच भरभरून रिचवलं जातं. या अशा पहिल्या धारेच्या (यासाठी दुसरा कोणता शब्द नाही का? पहिल्या धारेची हा फारच अपवित्र शब्द. तो उच्चारताच तो पिऊन रस्त्यावर लोळत पडलेले नरपुंगवच डोळ्यासमोर येतात) पेयाला उर्राक असं म्हणतात गोव्यात. पण हे पेय ज्यांना उरकण्याची घाई आहे, त्यांच्यासाठीच. थांबायची इच्छा असलेले असं काही करत नाहीत.

ब्राझीलमध्येही नाही. दर्दी मंडळींसाठी उसाच्या रसापासून बनलेलं हे पेय मुरवत ठेवलं जातं. त्यासाठी किमान काळ तीन वर्ष. कमाल काहीही मर्यादा नाही. परत हा पेयसाठा कशात मुरवायचा याचंही एक शास्त्र आहे. फ्रान्सच्या वाइन्स ज्यामध्ये साठवल्या जातात ती लाकडी पिंपं या ब्राझिली पेयासाठीही वापरली जातात. या पिंपांचं भलतंच प्रस्थ. तिकडे स्कॉटलंडमध्ये स्पे किंवा ट्वीड किंवा क्लाइड अशा नद्यांच्या कुशीत फुललेल्या बार्लीला जोजवण्यासाठी देखील ही फ्रेंच पिंपंच लागतात आणि तिकडे अटलांटिकपलीकडच्या ब्राझीलमध्ये उगम पावून सर्वत्र- आणि सर्वागीही- पसरणाऱ्या पेयासाठीही तीच पिंपं हवी असतात, हे अजब आहे. म्हणजे फ्रेंच पिंपांच्या तनस्पर्शाने पावन झाल्याखेरीज जगात कोणत्याही पेयाला मुक्ती नाही. ही फ्रेंच पुण्याई पिंपातून या उसाच्या रसात उतरली की त्याचा रंग बदलतो. म्हणजे हे पेय तसं पाण्याच्या रंगाचंच असतं. पण फ्रेंच स्पर्शाने त्याच्या आयुष्यात रंगत येते. म्हणजे शब्दश:देखील.

ही दोन पेयं ब्राझीलच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्या देशातल्या कोणत्याही शीतपेयात या दोनातील एकाचा अंतर्भाव असतो. घराबाहेर पडलं की फुटबॉल आणि घरात आलं की हे पेय अशी ही ब्राझिलियन जीवनशैली. ब्राझीलला आपल्या फुटबॉलचा जसा अभिमान आहे तसाच या पेयाचाही अभिमान आहे. इतका की अमेरिकेशी जेव्हा त्या देशाची व्यापार कराराची चर्चा सुरू होती तेव्हा ब्राझीलची अट काय होती? तर आम्ही अमेरिकेसाठी सर्व त्या व्यापार संधी देऊ, पण अमेरिकेनं आमच्या या पेयाचं मुक्त स्वागत करायला हवं. आणि अमेरिकेनं ही अट मान्य केली, हे विशेष. आता अमेरिकेत या पेयाला मानाचं स्थान आहे. मेक्सिकोच्या ‘टकीला’इतकं नाही, पण हे पेय आता अमेरिकेनं स्वीकारलंय.

त्यामुळे ब्राझीलच्या साखर उद्योगाची अधिकच भरभराट झालीये. साखर नाही तर नाही. ही ब्राझिली पेयं थेट उसाच्या रसापासनंच बनत असल्यामुळे साखर कारखानदारीचंही भलं झालंय.

‘कशासा’ हे या पेयाचं नाव. आपल्या साखरसम्राटांनीही या पेयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. उसासाठी इतकं का करता असं कोणी विचारलं की त्याचं उत्तर ताठ मानेनं ‘कशासा’ठी असं देता येईल.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 5:06 am

Web Title: ethanol production from sugarcane in india cars running on ethanol in brazil
Next Stories
1 बहरला पारिजात दारी..
2 तारुण्य आणि जनअरण्य
3 .. तो माणूस असतो!
Just Now!
X