देवत्व देण्याइतके कार्यक्षम वगैरे असूनही ली कुआन आपला उत्तराधिकारी तयार करू शकले नाहीत. म्हणजे व्यक्ती म्हणून ते थोर होते, पण थोर व्यवस्था मात्र ते तयार करू शकले नाहीत.
आता सिंगापूरकरांच्या डोळ्यावरील पट्टीही निघायला लागलीये. व्यक्तिमाहात्म्य आणि व्यक्ती यातला फरक, निर्भय वर्तमानपत्र वगैरे सगळं समजून घ्यायचंय त्यांना..
एक व्यक्ती काय काय करू शकते.. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंगापूर. ली कुआन यांनी अक्षरश: स्वत:च्या हातांनी देश घडवला. आताच्या बकाल मुंबईसारखाच आणि त्याहूनही बकाल असणारा आपल्यासारखाच तिसऱ्या जगातल्या शेवटच्या काही पंगतींतला हा देश ली कुआन यांनी पहिल्या जगातल्या खाशा स्वाऱ्यांच्या रांगेत आणून ठेवला. त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
पण त्यामुळे एक झालं. ते म्हणजे व्यवस्था असली नसली तरी चालेल, पण व्यक्ती जर प्रबळ, सामथ्र्यवान आणि निर्धारी असेल तर ती चमत्कार घडवू शकते या आपल्या सिद्धान्तावर त्यामुळे चांगलंच शिक्कामोर्तब झालं. म्हणजे ते आपल्यासारखंच तसं. संभवामि युगे युगे.. कोणी तरी हरीचा लाल उगवणार आणि आपला उद्धार करणार. ली कुआन यांनी ही गीता खरी करून दाखवली. व्यक्तीची निष्ठा, कार्यतत्परता आणि त्याला जोडून धोरणं राबवण्याचे अमर्याद अधिकार दिले गेले की झालं. व्यवस्था असो वा नसो. परिस्थितीत सकारात्मक बदल होतोच होतो. म्हणजे अच्छे दिन येतातच येतात.
आता ली कुआन यांनीच हे सिद्ध करून दाखवलेलं असल्यामुळे त्याचा प्रतिवाद आपण करायची आणि केला तरी जनसामान्यांनी तो मान्य करायची काही शक्यताच नव्हती. त्यामुळे जेव्हा केव्हा व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेपेक्षा व्यवस्थाकेंद्रित व्यक्ती घडवणं हे जास्त महत्त्वाचं आहे, असं सांगितलं, लिहिलं, की त्यातल्या त्यात जे चतुरजन होते ते ली कुआन आणि सिंगापूर यांच्याकडे बोट दाखवायचे. ‘‘काही काय सांगता राव.. कशाला हवी व्यवस्था? एक पोलादी व्यक्तिमत्त्व दिलं की झालं. येतातच अच्छे दिन..’’ असे युक्तिवाद तोंडावर फेकले जायचे.
ते फेकणाऱ्यांची राजकीय समज किती, काय वगैरे शोध घेण्याच्या फंदात पडायचं कारण नाही. त्यानं काही साध्य होणारंही नाही. कारण एखाद्यानं.. मग ती व्यक्ती असो वा समाज.. गांधारी होऊनच राहायचं ठरवलं असेल तर कोणीच काही करू शकत नाही. पण या सगळ्यांपेक्षा ली कुआन हे नक्कीच शहाणे, प्रामाणिक आणि द्रष्टे होते. याचं कारण असं की, सिंगापुरी जनता आपल्या पायाशी कशी लोळण घेतीये, आपल्याला कसं देवत्व देऊ पाहतीये हे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं. मुख्य म्हणजे त्यात ते आनंद मानणारे नव्हते. नाही तर नमस्कार वगैरे करू नका असं म्हणणारे स्वत:चं मंदिर उभारलं गेलं तरी कसे गप्प असतात हे आपण पाहतोच आहोत. पण स्वत:च्या हयातीतच मंदिरात जाऊन बसणाऱ्या नरेंद्रांपेक्षा ली कुआन निश्चितच वेगळे होते. त्यामुळे त्यांचा या देवत्वीकरणास ठाम विरोध होता. मी मेल्यावर माझं घर पाडून टाका.. असा स्वच्छ आदेश त्यांनी आपल्या मुलाला देऊन ठेवला होता. माझ्या जयंत्यामयंत्या साजऱ्या करायच्या नाहीत, असंही त्यांनी सांगून ठेवलं होतं.
यामागे, कुठे तरी आपण व्यवस्थानिर्मितीत कमी पडलोय, ही खंत ली कुआन यांना सतावत असेल का?
उत्तर होकारार्थी असणं शक्य आहे. याचं कारण इतकं करूनही ली कुआन यांना आपल्यानंतर देशाची सूत्रं आपल्याच पोराच्या हाती द्यावी लागली. म्हणजे सिंगापुरी नागरिकांच्या मते देवत्व देण्याइतके कार्यक्षम वगैरे असूनही ली कुआन आपला उत्तराधिकारी तयार करू शकले नाहीत. याचाच अर्थ असा की, ली कुआन व्यक्ती म्हणून थोर होते, पण ते थोर व्यवस्था मात्र तयार करू शकले नाहीत.
आता व्यक्तिपूजेतच धन्यता मानणारे आपल्याकडील अनेक महाभाग, ‘‘मग त्यात काय झालं.. सिंगापूर या देशाला तर ते थोर करून गेले..’’ असा युक्तिवाद करतील, पण तो किती फसवा आहे हे समजून घ्यायचं असेल तर याच सिंगापूरच्या वर्तमानाचा प्रामाणिक वेध घ्यायला हवा.
कारण तिकडे ली कुआन यांच्या दोन मुलांत जाहीर वादविवाद झडू लागले आहेत आणि पंतप्रधानपदी असलेले ली सेन लुंग हे माझ्या वडिलांच्या पुण्याईचा वापर स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी, स्वार्थासाठी करतायत.. असा खळबळजनक आरोप पंतप्रधान ली सेन यांची सख्खी बहीण ली वै लिंग हिनं केलाय. म्हणजेच ली कुआन या थोर व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्याच दोन चिरंजीवांत जाहीर मतभेद निर्माण झालेत. कशावरून? तर ली कुआन यांचा खरा वारस कोण? ली कुआन यांची मुलगी ली वै ही शल्यक आहे. मज्जारज्जू, मेंदू परिसरातील शस्त्रक्रिया हे तिचं वैशिष्टय़. सिंगापुरातल्याच बलाढय़ रुग्णालयात ती या विभागाची प्रमुख आहे, पण आपल्या पंतप्रधान भावावर ती आताच का रागावली?
गेल्या महिन्याच्या अखेरीस या दोघांचे वडील आणि आधुनिक सिंगापूरचे जनक ली कुआन यांचा पहिला स्मृतिदिन होता. मोठा दणक्यात साजरा झाला तो. लंडनच्या मादाम तुसॉँ इथं उभा केला गेलाय तसे ली कुआन यांचे मेणाचे पुतळे यानिमित्तानं मोक्याच्या ठिकाणी उभारले गेले. ठिकठिकाणी त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. अगदी रांगा लागल्या. सरकारी पातळीवरही वेगवेगळ्या मार्गानी ली कुआन यांचं स्मरण केलं गेलं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला चांगलाच उजाळा मिळेल, अशी खबरदारी घेतली होती सरकारनं. म्हणजेच पंतप्रधान ली सेन यांनी.
ली वै या भडकल्या आहेत ते याचमुळे. त्यांचं म्हणणं असं की, हयातभर ली कुआन यांचं मत नागरिकांनी आपल्याला देवत्व वगैरे देऊ नये असंच होतं. निधनानंतर आपण राहत होतो त्या घराचं मंदिर होईल, म्हणून मी गेल्यावर ते घरच पाडा, असं त्यांचं म्हणणं होतं, पण आपला भाऊ नेमकं तेच करतोय जे होऊ नये असं आपल्या वडिलांना वाटत होतं आणि भाऊ हे सगळं करतोय कारण त्याला वडिलांच्या आठवणींवर आपला सत्तेचा खुंटा बळकट करायचाय.
त्या इतक्या रागावल्या की, त्यांनी सरकारनं जे काही चालवलंय त्याविरोधात लेखच लिहिला आणि दिला पाठवून ‘द स्ट्रेट टाइम्स’ या एकमेव, बलाढय़ अशा स्थानिक वर्तमानपत्रात. तसं त्यांना या वर्तमानपत्रात लिहायची सवय होतीच. त्यांचं सदरही होतं तिथं. त्यामुळे त्यांना वाटलं हा लेखही येईल छापून.
पण या वर्तमानपत्रानं त्यांचा एकही शब्द छापला नाही. कसा छापणार ते तरी? हे वर्तमानपत्रही सरकारच्याच मालकीचं. सरकारची री ओढणं हेच त्याचं काम. तेव्हा सरकारविरोधात जाण्याची हिंमत त्याला होणारच कशी? हे कळल्यावर ली वै इतक्या संतापल्या की, त्यांनी आपला न छापला गेलेला लेख तसाच्या तसा फेसबुकच्या पटलावर ठेवला आणि मग अर्थातच हलकल्लोळ उडाला. पंतप्रधान ली सेन यांनाही याच माध्यमात येऊन आपल्या सख्ख्या बहिणीनं केलेल्या आरोपांचा प्रतिवाद करावा लागला.
पण जी लाज जायची ती गेली. जे काही झालं त्यामुळे सिंगापूरच्या स्थैर्यावर भरवसा ठेवून असलेले बँकर्स, गुंतवणूकदार सगळेच हादरलेत. हे या बहीणभावातलं भांडण असंच वाढलं तर काय, हा प्रश्न त्यांना पडलाय?
सिंगापूरकरांच्या डोळ्यावरील पट्टीही आता निघायला लागलीये. व्यक्तिमाहात्म्य आणि व्यक्ती यातला फरक, निर्भय वर्तमानपत्र वगैरे सगळं समजून घ्यायचंय त्यांना आता. चांगलंय!
पण उघडय़ा डोळ्यांच्या गांधारींचं काय करायचं हा प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
Twitter: @girishkuber

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father of singapore lee kuan yew
First published on: 16-04-2016 at 02:40 IST