22 July 2019

News Flash

रशियन भाषेतलं मौन..

रशियात सध्या फुटबॉलचा उत्सव सुरू आहे. जगभरातले कोटय़वधी फुटबॉलप्रेमी त्याचा आनंद घेतायत.

रशियात सध्या फुटबॉलचा उत्सव सुरू आहे. जगभरातले कोटय़वधी फुटबॉलप्रेमी त्याचा आनंद घेतायत. उद्या फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. फुटबॉलमुळे निर्माण झालेल्या आनंदी वातावरणाच्या भरतीत जे निर्णय एरवी घेता आले नसते ते निर्णय पुतिन घेऊन टाकतायत. कोणते आहेत हे निर्णय?

‘‘आज रिओ द जानेरोतल्या मर्काना मैदानात फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना रंगात आलेला असताना अदृश्यपणे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन वावरताना मला दिसतायत. आजपासून फुटबॉलचा खेळ त्यांच्या काळ्या सावलीने झाकोळला जाईल. खेळाचा निखळ आनंद देणारा हा शेवटचा विश्वचषक..’’, असे खिन्न उद्गार आजपासून बरोबर चार वर्षांपूर्वी याच महिन्यात, म्हणजे १३ जुलै २०१४ या दिवशी, विख्यात खेळ भाष्यकार, न्यू रिपब्लिकचे संपादक फ्रँकलिन फॉअर यांनी काढले.

फॉअर यांनी हे मत व्यक्त केलं होतं ते त्यावेळच्या पुढच्या विश्वचषकाबद्दल. म्हणजे सध्या रशियात सुरू असलेल्या.. आणि उद्या, रविवारी, संपणाऱ्या.. फुटबॉल स्पर्धाबद्दल. त्या वेळी ते म्हणाले पुढचा विश्वचषक रशियात भरेल, नंतरचा कतार या देशात.. आणि मग खेळाचा आनंद कमी कमी होत जाईल. पुतिन यांचं शब्दश: जीवघेणं राजकारण, कतार देशाला विश्वचषक स्पर्धा देताना झालेला प्रचंड भ्रष्टाचार वगैरे वास्तव फॉअर यांच्या या मतामागे होतं. या अशा व्यक्तींच्या, देशांच्या तावडीत खेळ सापडला की त्याचा निखळ आनंद नाहीसा होतो.. असा त्यांच्या म्हणण्याचा आशय.

रशियात सध्या फुटबॉलचा उत्सव सुरू आहे. जगभरातले कोटय़वधी फुटबॉलप्रेमी त्याचा आनंद घेतायत. तारवटलेले डोळे घेऊन माणसं कार्यालयात जातायत आणि आज बेल्जियम आणि फ्रान्स यांच्यातला सामना न पाहता राहणं शक्यच नाही.. म्हणजे पुन्हा जागरण.. या विचारानं डोळे आणखी लाल करून घेतायत.. असं साधारण चित्र आहे. एकमेकांना लाथा घालणं हा राष्ट्रधर्म असलेल्या आपल्या देशात लाथा मारण्यातला कलात्मक आनंद चवीचवीनं.. बऱ्याचदा घुटक्याघुटक्यानंही.. घेतला जातोय. मग ते फ्रँकलिन फॉअर म्हणतायत त्याला काय अर्थ आहे?

आहे. त्यांच्या म्हणण्यात बराच अर्थ आहे. तो शोधायचा, समजून घ्यायचा तर रशियातल्या नागरिकांना विचारायला हवं. इथं बसून टीव्हीवर दिसणाऱ्या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटला जात असताना त्या मैदानांच्या बाहेर, लखलखाटाच्या पलीकडच्या रशियात काय चाललंय ते कळणार नाही. ते कळलं तर फ्रँकलिन किती द्रष्टे होते हेदेखील कळून जाईल.

कोणताही चतुर राजकारणी आसपासच्या वातावरणातल्या भरती-ओहोटीनुसार आपले निर्णय घेत असतो. भरतीच्या काळात काहीही न करता, हातपाय न हलवता प्रत्येकाची होडी आपोआप वर उचलली जाते. तसंच, फुटबॉलमुळे निर्माण झालेल्या आनंदी वातावरणाच्या भरतीत जे निर्णय एरवी घेता आले नसते ते निर्णय पुतिन घेऊन टाकतायत.

पहिला असा निर्णय त्यांनी घेतला १४ जून २०१८ या दिवशी. म्हणजे फुटबॉल विश्वचषक स्पर्धा सुरू झाली त्याच दिवशी. पहिल्याच दिवशी रशियानं सौदी अरेबियाचा पराभव केला आणि सगळा रशिया फुटबॉलमय होऊन गेला. ठिकठिकाणी उत्साही नागरिकांचे थवे नाचत होते, गात होते. त्याच वेळी पुतिन यांचा पहिला निर्णय आला.

त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वर ६० वरून ६५ वर आणि महिलांसाठी ५५ वरून ६३ वर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. वरवर पाहता हा निर्णय साधा वाटेल. पण रशियात त्या विरोधात नाराजी आहे. अडीच कोटी नागरिकांनी या विरोधात याआधी सह्यंचं निवेदन सरकारला दिलंय. पण मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी निवृत्त व्हायला लागल्याने त्यांना निवृत्तीवेळची पुंजी द्यायला सरकारकडे पैसा नाही. आणि दुसरं म्हणजे आहेत त्यांना निवृत्त होऊ दिलं तर त्यांची जागा घ्यायला नवे कोणी उत्सुकही नाहीत. रशियातल्या तरुणांना सरकारी नोकरीचं आकर्षण राहिलेलं नाही. कारणही अर्थातच पुतिन. त्यामुळे आहे त्यांनाच जास्तीत जास्त वापरून घ्या या विचारातून हा निर्णय घेतला गेलाय. आणि गंमत म्हणजे मी हा निर्णय कधीही घेणार नाही, असं वचन खुद्द पुतिन यांनीच दिलं होतं. ते ठीक. निवडणूक जुमलाच तो.

त्याच दिवशी सरकारनं सर्व वस्तूंवरचा मूल्यवर्धित कर १८ टक्क्यांवरनं २० टक्क्यांवर न्यायची प्रक्रिया सुरू केली. ही करवाढ सरसकट असल्यानं सगळ्यांनाच तिचा सामना करावा लागणार आहे. आणि मुख्य म्हणजे ती इतकी व्यापक आहे की या एका करवाढीनं रशियाच्या महागाई निर्देशांकात १.५ टक्क्यांची वाढ होईल.

दुसऱ्या दिवशी, १५ जूनला, रशियातल्या सगळ्या वर्तमानपत्रांत मुखपृष्ठांवर बातमी, छायाचित्रं होती ती फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटनाची. रंगीतसंगीत कार्यक्रमांची. आणि रशियाच्या सौदी अरेबियावरच्या विजयाची. निवृत्तीचं वय वाढणार, करवाढ या दोनही कडू बातम्या कुठे तरी आतल्या पानांवर छापल्या गेल्या. दोन दिवसांनी ‘मॉस्को कोमसोलेट’ या एका वर्तमानपत्रात तेवढय़ा अग्रलेखात या सरकारी निर्णयांवर भाष्य आलं. सामान्य रशियन नागरिक मायदेशानं सौदी अरेबियाविरोधात केलेल्या गोल्सचा आनंद साजरा करतोय. त्या उत्साहात तो मश्गूल आहे. पण आपल्या सरकारनं मात्र या आनंदी नागरिकांविरोधातच गोल केलाय, असं काहीसं या अग्रलेखात म्हटलं गेलं. अन्य मूठभर निषेधाचे सूर उमटले. विरोधी पक्षीयांनी आवाज करायचा प्रयत्न केला. पण लोकांपर्यंत काहीही गेलं नाही. सगळ्यांची विचारेंद्रियं बधिर होती. फुटबॉलच्या मैदानातल्या खेळोत्सवामुळे.

तेव्हा हे दोन निर्णय पचले गेल्याची खात्री झाल्यावर पुढच्या आठवडय़ात पुतिन सरकारनं आणखी एक निर्णय घेतला. परदेशी वेबसाइटवरनं होणारी बरीचशी ऑनलाइन खरेदी त्यांनी कराच्या जाळ्यात आणली. रशियातल्या नागरिकांनी परदेशी वेबसाइटवरनं ७२ हजार रुबल्सपेक्षा जास्त रकमेची खरेदीच तोपर्यंत करपात्र होती. त्याच्या आतल्या खरेदीवर काहीच कर नव्हता. सामान्य रशियनांच्या अंगात फुटबॉलचा ज्वर पुरेसा भिनल्याची खात्री झाल्यानंतर पुतिन सरकारनं ही मर्यादा १५ हजार रुबल्सपर्यंत खालती आणली. रुपयांत सांगायचं झालं तर परदेशी वेबसाइटवरच्या खरेदीला ११०० रुपयांची मर्यादा होती. ती आता २२० रु. इतकी खाली आणली गेली.

रशियात परदेशी वस्तूंचं आकर्षण अन्य कोणत्याही देशांप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर आहे. पुतिन यांच्या काळात त्यांनी सरकारी अर्थव्यवस्था अधिकाधिक मजबूत केली असली तरी औद्योगिकीकरणाला, त्यातही जनसामान्यांना ज्या वस्तू लागतात त्यांच्या निर्मितीला, फारशी काही गती आलेली नाही. दर्जा हादेखील प्रश्नच आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रशियात ऑनलाइन खरेदी होते. आता तिला चाप बसेल. रशियातल्या ग्राहक संघटनांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पत्रकं वगैरे काढली. पण युरोपातल्या रशियन माध्यमांनी तेवढी त्याची दखल घेतली. रशियातल्या नागरिकांच्या कानावर यातलं काही फारसं गेलंच नाही. ग्राहक संघटनांचा या आणि अन्यही अशाच निर्णयांविरोधात मोर्चे वगैरे काढायचा विचार होता. गावोगाव निदर्शनंही करायची होती त्यांना. पण तसं काही करता आलं नाही त्यांना. का?

कारण पुतिन यांनी आणखी एक निर्णय घेतलाय.

तो म्हणजे विश्वचषक फुटबॉल सामन्यांच्या काळात रशियात, आपल्याकडच्या भाषेत सांगायचं तर, त्यांनी १४४ कलम लावलंय. म्हणजे जमावबंदी. चारपेक्षा अधिकांना एकत्र जमता येणार नाही. अपवाद फक्त एकच.

फुटबॉल साजरं करणाऱ्यांचा. त्यासाठी फुटबॉलप्रेमी कितीही गर्दी करू शकतात. पण अन्य कोणत्याही कारणांसाठी रशियात १५ जुलैपर्यंत गर्दी करता येणार नाही. विरोधी पक्ष नेत्यांनाही या काळात नजरकैद वगैरेंना तोंड द्यावं लागतंय.

या सगळ्याविषयी विचारायचं तर पुतिन कोणाला भेटतच नाहीत. गप्पच असतात ते. समारंभात आले तरी घुमेच असतात ते. त्यामुळे त्यांच्याकडून खुलासा मागण्याचा प्रश्नच नाही.

म्हणजे रशियन भाषेतलं मौनदेखील सर्वार्थ साधनम् असतं तर..

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

First Published on July 14, 2018 2:05 am

Web Title: fifa world cup 2018 vladimir putin