29 March 2020

News Flash

बहरला पारिजात दारी..

मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या दोन काही देशांइतक्या मोठय़ा कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय आले.

गिरीश कुबेर @girishkuber (girish.kuber@expressindia.com)

जगात सर्वात जास्त माहिती तंत्रज्ञान अभियंते हे भारतात निपजतात. जगातल्या सर्वात मोठय़ा माहिती तंत्रज्ञान कंपन्यांत भारतीय शेकडय़ानं असतील. यात आता नवीन काही नाही. नवीन आहे ते सत्या नाडेला, सुंदर पिचाई अशा भारतीयांकडे महाप्रचंड कंपन्यांचं नेतृत्व येणं. पण त्यांच्या यशाचं कौतुक करण्याआधी काही मुद्दय़ांकडे दुर्लक्ष होता नये..

आता आपल्याकडे सुंदर पिचाई यांचा कौतुक महोत्सव सुरू होईल. साहजिक आहे तसं होणं. केवढं मोठं यश या सुंदरनं मिळवलंय. जगातल्या बलाढय़ अशा तीन कंपन्यांतली एक ‘गूगल’ या कंपनीचा, ती ज्या कंपनीचा भाग आहे त्या ‘अल्फाबेट’ या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती या आठवडय़ात झाली. आता त्याला भारतात अर्थविषयक नियतकालिकांच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहोळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रणं येतील किंवा सरकारच्या प्रवासी भारतीय वगैरे समारंभांत बोलावतील. त्याच्या शाळेतल्या शिक्षकांनी भले त्याला लहानपणी अन्य कोणत्याही शिक्षकाप्रमाणे अक्कलशून्य ठरवलं असेल. पण हे शिक्षक आता, सुंदर किती मोठा होणार हे लहानपणीच मी कसं ओळखलं होतं याच्या बाता मारतील. थोडक्यात काय, तर एक यशस्वी भारतीय म्हणून त्याला जितकं डोक्यावर घेता येईल तितकं घेतलं जाईल आणि छायाचित्र चौकटीत जितकं अडकवून टाकता येईल तितकं अडकवलं जाईल. पुढच्या टप्प्यात उद्याचा सुंदर पिचाई कसा तयार करता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील. घराघरांतले पालक आपला वंशाचा दिवा किंवा दिवली किमान ‘सा रे ग म’ विजेते किंवा गेला बाजार ‘इंडियन आयडॉल’ कसे होतील, यासाठी तसेही आपल्या पाल्याकडून उठाबशा काढून घेत असतातच. आता ते पोरांना आयटीच्या शिकवण्या सुरू करतील.

अर्थात यात वाईट वाटावं असं काही नाही. हा संस्कृतीचा भाग आहे. पण हे उदात्त संस्कृती पालन करताना काही क्षुद्र मुद्दय़ांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. या किरकोळ मुद्दय़ांकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न.

१. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे दोघे गूगलचे संस्थापक. साधारण २१ वर्षांपूर्वी त्यांनी ही कंपनी स्थापन केली. आता हे दोघेही पायउतार झाले आणि त्यांनी ‘आपल्या’ कंपनीची सूत्रं सुंदरच्या हाती दिली. हे फारच धक्कादायक म्हणायचं सांस्कृतिकदृष्टय़ा. ‘‘काय कोणी अमेरिकी सुपुत्र नाही दिसला का तुम्हाला उत्तराधिकारी म्हणून,’’ असा त्यांना प्रश्न कोणी विचारला की नाही, माहीत नाही. पण बहुधा नसावा. तसंच ‘आपल्या अमेरिकी’ कंपनीसाठी परदेशी.. तेही भारतीय.. निवडला म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोपही झाला नसावा बहुधा. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या देशाचे अध्यक्ष, ‘अमेरिका महान बनवू या’ या स्वप्नाचे शिल्पकार डोनाल्ड ट्रम्प यांचा स्थलांतरितांना विरोध असूनही पेज आणि ब्रिन यांनी आपली बलाढय़ कंपनी एका स्थलांतरिताच्या हाती निर्धास्तपणे सोपवली. आपला मुलगा, मुलगी, पुतण्या वगैरे कोणी त्यांना उत्तराधिकारी म्हणून मिळू नये म्हणजे कमाल आहे!

२. याआधी आणखी एका अमेरिकी प्रज्ञावान उद्योगपतीनं आपली कंपनी अशाच एका भारतीयाच्या हाती दिली. बिल गेट्स या त्या प्रज्ञावान उद्योगपतीचं नाव आणि सत्या नाडेला हे त्यांच्या ‘मायक्रोसॉफ्ट’ या कंपनीच्या सीईओचं नाव. आता सुंदरच्या बढतीमुळे मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या दोन काही देशांइतक्या मोठय़ा कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय आले. पण हे इतकंच नाही.

३. ‘अडोब’चे शंतनू नारायण, ‘कॉग्निझंट’चे फ्रान्सिस्को डिसुझा, ‘नेटअ‍ॅप’चे जॉर्ज कुरियन, ‘सॅनडिस्क’चे संजय मेहरोत्रा, ब्रिटनच्या ‘रेकीट बेन्किसर’ या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपनीचे लक्ष्मण नरसिंहन अशी अनेक नावं सांगता येतील. हे सर्व विविध कंपन्यांचे मुख्याधिकारी वगैरे. नावं पाहिल्यावर लक्षात येते ती बाब म्हणजे, यातले बरेचसे हे दक्षिण भारतीय आहेत. सुंदर हा चेन्नईचा तर सत्या हैदराबादचा. हे असं दक्षिणेत काय विशेष असावं, हा प्रश्न पडतो का कधी आपल्याला? या कंपन्यांचंच असं नाही, तर आपल्या टाटा समूहाचा उत्तरधिकारीदेखील असाच दक्षिणदेशी आहे. एन. चंद्रशेखरन. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरची यादी काढून पाहिली तर त्यातही हे दक्षिण भारतीय प्राधान्याने आढळतील. ते पारंपरिक असतात वगैरे आरोप/टीका करायला आवडते आपल्याला त्यांच्यावर. तसे आपण मराठी आधुनिक आणि पुरोगामी वगैरे वगैरे. पण जागतिक, वैश्विक किंवा देशांतर्गतही परिस्थितीला वळण देऊ शकतील अशा जागांवर अधिकाधिक दाक्षिणात्यच कसे काय निवडले जातात? इथे  शिवसेना किंवा तत्सम संघटना म्हणेल की, त्यांचं मोठं लॉबिइंग असतं, म्हणून. पण जगातल्या सर्वच देशांत कसं काय असं लॉबिइंग जमतं त्यांना? लॉबिइंग, गटबाजी या अशा आरोपांपलीकडे जाऊन आपण काही शिकणार आहोत का यांच्यापासून? सिटी बँकेचे एक विक्रम पंडित सोडले, तर अशी मराठी नावं का नाहीत? आपल्या शिक्षण पद्धतीत, व्यवस्थेत काही चुकतंय असं आपण कधी मान्य करणार?

४. या दाक्षिणात्यांना मागास, परंपरावादी असं म्हणतो आपण. तो बऱ्याचदा सवयीचा आणि आपल्या अपयशांसाठी इतरांना जबाबदार धरण्याच्या संस्कृतीचा भाग. ते ठीक. पण गूगलमध्ये सुंदर पिचाईंची कोणती कृती त्यांच्यासाठी एकदम प्रतिमा संवर्धनाची ठरली? गूगल कंपनीत अन्य कोणत्याही बडय़ा कंपनीप्रमाणे काही एक कार्यसंस्कृती आहे. धार्मिक, वांशिक, लैंगिक अशा कोणत्याही मुद्दय़ावर तिथे विद्वेषाची भावना पसरवायला मनाई आहे. त्याबाबत कंपनीत कोणालाही दयामाया नाही. तर झालं असं की, सुंदर यांच्या कार्यक्षेत्रातल्या एका कर्मचाऱ्यानं.. तो गौरवर्णीय पुरुष होता.. कंपनीच्या काही धोरणांविरोधात जाहीर भाष्य केलं. त्याचं म्हणणं असं होतं की, पुरुषांच्या तुलनेत महिला या अबलाच असतात, काही शारीरिक घटकांमुळे त्या पुरुषांशी बरोबरी करूच शकत नाहीत. सबब त्यांना बरोबरीची वागणूक देण्याचं काहीही कारण नाही. त्याचा रोख बहुधा वेतन, पदोन्नती अशा काही मुद्दय़ांबाबत असावा. या कर्मचाऱ्याची ही बाब उघडकीस आल्यावर सुंदर पिचाई यांनी काय केलं?

तर, त्याला कामावरून थेट काढूनच टाकलं. यावर काहींनी नाराजी व्यक्त केली. त्यावर पिचाईंचं उत्तर होतं : कंपनी सार्वमतानं चालवायची नसते!

हा धक्का होता. पण कंपनीच्या मूल्यरक्षणासाठी तो आवश्यक होता. तो सुंदर यांनी दिला. आणि तरीही आपण समग्र दाक्षिणात्यांना ‘मद्रासी’ म्हणवून हिणवण्यात धन्यता मानणार?

५. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. आजमितीला जगात सर्वात जास्त माहिती तंत्रज्ञान अभियंते हे भारतात निपजतात. आपल्याकडे जितकी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, तितक्या कदाचित प्राथमिक शाळाही नसतील. साक्षरतेचं प्रमाण नसेल एकवेळ वाढलेलं. पण अभियंत्यांची संख्या मात्र निश्चित वाढतीये. चांगलं आहे ते. पण इतके अमाप अभियंते असूनसुद्धा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं एकही उत्पादन भारतीय नाही. नाही म्हणायला, ‘हॉटमेल’ काढणारा सबीर भाटिया तसा भारतीय होता. पण अमेरिकेत जन्मलेला. त्याची कंपनीही मग मायक्रोसॉफ्ट या कंपनीनं विकत घेतली. त्यानंतर कोणा भारतीयानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एखादं उत्पादन प्रसवल्याचं उदाहरण नाही. या कंपन्यांत भारतीय शेकडय़ानं असतील. पण ते सगळे परदेशी उत्पादकाच्या सेवेत मग्न. ‘सेवा क्षेत्र’ वाढत असल्याचा आनंद त्याखेरीज कसा काय मिळणार आपल्याला? ते ठीक. यात आता नवीन काही नाही.

नवीन आहे ते सत्या नाडेला, सुंदर पिचाई अशा भारतीयांकडे महाप्रचंड कंपन्यांचं नेतृत्व येणं. जगातल्या मोठय़ा १२ कंपन्यांचं नेतृत्व भारतीय करतायत. या सर्व कंपन्यांची मिळून उलाढाल आहे ४०,००० कोटी डॉलर्स इतकी. यातली एकही कंपनी भारतीय नाही आणि त्यांचं नेतृत्व करणारेही आता त्या अर्थानं भारतीय उरलेले नाहीत. ‘टाइम’ साप्ताहिकानं मध्यंतरी लिहिलं : भारत हा गुणवान कंपनी प्रमुखांची निर्यात करणारा देश आहे.

आणि तीच तर खरी आपली वेदना आहे. गदिमा म्हणालेत तसं..

‘बहरला पारिजात दारी

फुले का पडती शेजारी?’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 4:16 am

Web Title: girish kuber article on satya nadella and sundar pichai zws 70
Next Stories
1 तारुण्य आणि जनअरण्य
2 .. तो माणूस असतो!
3 पुढे काय’चा शोध!
Just Now!
X