04 July 2020

News Flash

.. तो माणूस असतो!

बगदादीला शोधणाऱ्या कुत्र्याचं नाव जाहीर झालेलं नाही. ते मुद्दामहूनच गुप्त ठेवलंय.

||  गिरीश कुबेर

इतकं तंत्रज्ञान सुधारलंय, डिजिटलायझेशन आणि असं काय काय झालंय.. तरी अमेरिकेसारख्या अद्ययावत देशाला कुत्र्यांची गरज इतकी का लागावी? इतक्या प्रचंड यंत्रणेचं अवलंबित्व कुत्र्यांवर इतकं असावं?

‘शिकणं आणि शिकवणं दोघांना आनंदाचं झालं पाहिजे’, ‘काही तरी प्रेरणा असायला हवी’, ‘काही तरी आव्हान हवं’, ‘सातत्य असायला हवं’, ‘अभ्यासात मध्ये काही विरंगुळा हवा’ आणि ‘प्रत्येक दिवसाच्या शाळेचा शेवट काही तरी सकारात्मक हवा’..

अशा अनेक मूलभूत सूचना आणि त्यांचं कसोशीनं पालन करणारे कर्मचारी. हे सगळं पाहिलं की कोणाला वाटेल, कोणत्या तरी आदर्श वगैरे शाळांची ही नियम सूचना आहे. बरोबरच आहे हा अंदाज. ही शाळाच. आदर्श नियमावलीही तिचीच. पण विद्यार्थी मात्र इतरांपेक्षा वेगळे.

या शाळेतल्या विद्यार्थ्यांना चार पाय आहेत आणि एक शेपूटदेखील. ही आदर्श शाळा आहे अमेरिकेची अत्यंत सामर्थ्यशाली गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएची आणि हे विद्यार्थी आहेत कुत्रे. सर्वसाधारणपणे ज्यांना हडतहुडुत करण्यात आपण धन्यता मानतो ते कुत्रे. गेल्या आठवडय़ात सीआयएचे हे कुत्रे अचानक चर्चेत आले. कारणही तसंच होतं. अमेरिकी फौजांनी सीरियात अबु बक्र अल बगदादी या आयसिसच्या दहशतवाद्याची हत्या केली. त्यात सीआयएच्या कुत्र्याने बजावलेली कामगिरी.

हा बगदादी एका खंदकात लपला होता. तिथं तो खरोखरच आहे का नाही, याची खातरजमा करण्याचं काम केलं सीआयएच्या एका कुत्र्यानं. त्यांनं आत घुसून बगदादी असल्याची वर्दी दिली आणि मग अमेरिकी फौजा पाठोपाठ आत गेल्या. त्यात बगदादी मारला गेला. या कुत्र्याची कामगिरी इतकी चोख होती, की त्याच्या पडताळणीवर अमेरिकी फौजांनी बेलाशक विश्वास ठेवला. या वेळी बगदादीनं अंगावरची स्फोटकं उडवून विरोधाचा प्रयत्न केला. पण तो काही यशस्वी झाला नाही. या कारवाईचं मोठेपण म्हणजे एकाही अमेरिकी सैनिकाच्या अंगाला ओरखडाही आला नाही. पण हा कुत्रा मात्र जखमी झाला. किती ते कळायला मार्ग नाही. पण त्याच्या जिवाला धोका नाही, असं जाहीर झालंय. बगदादीच्या निधनाइतकी, किंबहुना जास्तच, चांगली बातमी म्हणजे हा कुत्रा सुरक्षित आहे, ही. याआधी अमेरिकी फौजांनी पाकिस्तानातील अबोटाबाद इथं मध्यरात्रीच्या कारवाईत ओसामा बिन लादेन याला ठार केलं, त्या कारवाईतही एका कुत्र्याचा मोठा वाटा होता. ‘कैरो’ असं त्या कुत्र्याचं नाव.

बगदादीला शोधणाऱ्या कुत्र्याचं नाव जाहीर झालेलं नाही. ते मुद्दामहूनच गुप्त ठेवलंय. पण हा कुत्रा बेल्जियम मलिनॉइस जातीचा आहे, हे जाहीर झालंय. सीआयएत अलीकडे दाखल केली गेलेली ही जात बुद्धी आणि धडाडी यासाठी ओळखली जाते. अत्यंत आज्ञाधारक असा हा कुत्रा ध्येयापासून काहीही झालं तरी विचलित होत नाही. अफाट शारीरिक क्षमता, बुद्धी आणि कार्यक्षमता हे गुण एकत्र असणं तसंही दुर्मीळच. पण या कुत्र्याच्या ठायी ते एकवटलेत.

सीआयए तिच्या पाताळयंत्री वगैरे कारवायांसाठी विख्यात आहे. पण अनेकांना माहीत नसेल, जगातली सर्वोत्तम कुत्र्यांची सर्वोत्तम पलटण सीआयएकडे आहे. त्यांच्याकडे दत्तगुरू आणि त्यासमवेत ते कुत्रे वगैरे असतं की नाही, ते माहीत नाही. पण कुत्र्यांना प्राणपणाने जपतात, हे मात्र खरं. माझा परदेशी मित्र म्हणतो, ‘‘आमच्या देशात माणसापेक्षा कुत्रा वा मांजर म्हणून जन्माला यावं. चंगळ असते.’’

सीआयएच्या कुत्र्यांची तशी ती असते. माणसांना काय वागवतील, इतक्या प्रेमानं अमेरिकी सरकार आपल्या कुत्र्यांची निगुतीनं काळजी घेतं. जर्मन शेफर्ड, लॅब्रेडॉर आणि आता हे बेल्जियम मलिनॉइस अशा निवडक जातींतील कुत्र्यांची निवड केली जाते. वर्षांचे व्हायच्या आत त्यांना १० आठवडय़ांच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. गंमत म्हणजे, हे कुत्रे आणि त्यांना हाताळणारे सीआयएचे कर्मचारी दोघांचंही प्रशिक्षण. दोघांनाही माहीत हवं ना, एकमेकांना काय शिकवलं जातंय ते. आपल्या गुरुजींना काय आणि किती येतंय, हे विद्यार्थ्यांलाही कळू देण्याची प्रथा फारच महत्त्वाची म्हणायची.

तर.. हे १० आठवडय़ांचं प्रशिक्षण संपलं की परीक्षा. ती म्हणजे एखादाच पेपर वगैरे नाही. चांगली चार आठवडय़ांपर्यंत चालणारी परीक्षा. हीसुद्धा दोघांची एकत्र. गुरुजी आणि विद्यार्थी. दोन पायांचा गुरुजी आणि चार पायांचा विद्यार्थी.. काय छान ध्यान दिसत असेल! या परीक्षेत दोघांनाही नुसतं उत्तीर्ण होऊन चालत नाही. पैकीच्या पैकीच गुण मिळवावे लागतात. नाही मिळाले तर पुन्हा प्रशिक्षण. दोघांचंही.

..आणि यातून यशस्वीपणे बाहेर पडले की नियुक्ती. वेगवेगळ्या कामांसाठी, मोहिमांसाठी या श्वानांना तयार केलेलं असतं. त्याप्रमाणे दोघंही त्या कामांसाठी तैनात केले जातात. अमेरिकेत सर्वसामान्यपणे कर्मचाऱ्यांना आठवडय़ाला ३५ तास काम करावं लागतं. कुत्रे आणि त्यांना हाताळणारे यांच्यासाठी मात्र ही मर्यादा थोडी जास्त आहे. गरजेनुसार ती बदलते. आणि सेवा काल? फक्त नऊ वर्ष. ती झाली की दणदणीत वेतनावर निवृत्ती. बऱ्याचदा त्यांना सीआयएत असताना हाताळणारेच या श्वानांना दत्तक घेतात.

इतकं तंत्रज्ञान सुधारलंय, डिजिटलायझेशन आणि असं काय काय झालंय.. तरी अमेरिकेसारख्या अद्ययावत देशाला कुत्र्यांची गरज इतकी का लागावी? इतक्या प्रचंड यंत्रणेचं अवलंबित्व कुत्र्यांवर इतकं असावं?

‘‘वेगवेगळ्या पद्धतींच्या तब्बल १९ हजार स्फोटकांतला फरक कुत्र्यांना कळतो,’’ असं उत्तर माझ्या या प्रश्नाला आमच्या फॅमिली प्राणी डॉक्टरनं दिलं. श्वानांच्या या क्षमतेचं वर्गीकरण त्यानं फारच छान करून सांगितलं, ‘‘तू ऑफिसातनं घरी आल्यावर स्वयंपाकघरातनं येणाऱ्या वासावर आपल्या ताटात काय पडणार हे ओळखतोस, बरोबर? म्हणजे चरचरीत लसणाची फोडणी दिलेली अंबाडीची भाजी आहे का आणखी काय, हे तुला कळतं. पण जे काही बनतंय, त्यात किती आणि काय काय आहे, हे तुला कळतं का?’’

म्हणजे?

म्हणजे समजा अंबाडीची भाजी बनत असेल, तर त्यातली अंबाडी, भाताचा तांदूळ किंवा कण्या असल्या तर ते, फोडणीचं तेल, कढीपत्ता, पाणी.. अशा प्रत्येक घटकाचा वास काही आपल्याला येत नाही. कुत्र्यांना तो येतो. आणि नुसता येतोच असं नाही, तर हा घटक किती प्रमाणात आहे, हेदेखील कळतं.. आणि ते सांगतात.

कळतं इथपर्यंत ठीक, पण सांगतात ही जरा अतिशयोक्तीच वाटली. पण कोणताही श्वानप्रेमी ते मान्य करणार नाही. यातल्या प्रत्येकाला आपल्या श्वानाच्या बुद्धिमत्तेची खात्री असते. सीआयएलादेखील ती आहे. या कुत्र्यांना हुडकून काढायचा घटक सापडला, की त्याच्या बाजूलाच बसून राहण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ते मग एकदम निश्चल होतात. ही विशेष काळजी. हवं ते सापडल्याच्या उत्साहात ते काही करायला गेले तर भलताच प्रसंग ओढवायचा.

एरवी आत्मकेंद्री असलेला अमेरिकी सरकारी अधिकारी जेव्हा कुत्र्याचा विषय निघतो तेव्हा खुलतो. सीआयएतल्या एखाद्या अधिकाऱ्याची कधी भेट झाली तर याचा प्रत्यय होईल. ‘मुक्या प्राण्यांवर दया करा,’ असं काही तिकडे शिकवत नाहीत. त्यामुळे ते त्यांना दया दाखवत नाहीत. तर बरोबरीनं वागवतात. लंडनमधला एक पत्रकार मित्र मध्यंतरी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याविषयी बोलताना अनुदार उद्गार काढता झाला. का, असं विचारलं तर म्हणाला : ‘‘बोरिसला ना कुत्र्यांचं प्रेम ना माजरांचं. असा माणूस कसा काय चांगला असणार?’’

हे जरा अतिच वाटेल. ते सोडा. पण आपल्याकडे कुत्रे आणि माणसं दोघंही असं का वागतात? यावर आमच्या डॉक्टरचं उत्तर भारी आहे. तो म्हणाला : ‘‘माणसांचं मला माहीत नाही. पण एक खात्रीनं सांगतो.. देअर इज नो सच थिंग अ‍ॅज बॅड डॉग. जस्ट बॅड ओनर्स.’’

कुत्रा कधीच वाईट नसतो, वाईट असतो तो मालक.

..आणि वाईट भाग हा की, तो माणूस असतो.

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 2:42 am

Web Title: he is a man akp 94
Next Stories
1 पुढे काय’चा शोध!
2 पेंग्विन परत आले.. 
3 योगायोगाचा ‘धूर’!
Just Now!
X