एखादी व्यक्ती वा समाज दु:खापेक्षा आनंदात असताना कसा वागतो यातून त्याची वा त्यांची संस्कृती कळते. म्हणजे अत्यानंद झाल्यावर ही मंडळी बोटांनी इंग्रजी व्ही अशी खूण करत चेकाळतात का, आपल्या टिनपाट विजयाची वार्ता वेळी-अवेळी फटाके फोडून इतरांना सांगतात का.. जणू काही आपण जगच जिंकलंय अशा थाटात मोटारींतनं उन्मादी घोषणा देत सभ्यांना घाबरवतात का..वगैरे वगैरे. यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल तर अशी व्यक्ती वा समाज अप्रबुद्ध आहेत असं बेलाशक मानता येईल.

मग प्रबुद्ध समाज कसा असतो? सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कप फुटबॉलचे सामने जे कोणी पाहात असतील त्यांना अशा समाजाचं दर्शन झालेलं असण्याची शक्यता आहे.

This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
Reactions of Political Leaders of Maharashtra in Famous Dialogues in Hindi Cinema
बाइट नव्हे फाइट…

प्रसंग आहे १९ जूनचा. जपान आणि कोलंबिया यांच्यातल्या सामन्यानंतरचा. हा सामना तसा एकतर्फीच होणं अपेक्षित होतं. कारण कोलंबिया हा तगडा संघ. दक्षिण अमेरिकेतले सगळेच देश उत्तम फुटबॉल खेळतात. ब्राझील, अर्जेटिना, उरुग्वे, पेरू.. असे सगळेच फुटबॉल वेडे देश. कोलंबिया त्यातलाच. गेल्या ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक सामन्यांत तर कोलंबिया हा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारून आलेला. हा संघ जगज्जेता होण्याच्या योग्यतेचा अद्याप नाही. पण जगज्जेत्यांना प्रसंगी हरवण्याची क्षमता मात्र त्यात नक्कीच आहे. त्यामुळे कोलंबियाशी खेळताना सगळेच संघ तसे जपूनच असतात. पण आताच्या विश्वचषकात जपाननं इतिहासच घडवला.

वास्तविक कोलंबियाच्या तुलनेत जपान हा काही फुटबॉलमधला बलाढय़ म्हणावा असा संघ नाही. आशिया खंडातल्या अन्य देशांच्या तुलनेत त्यातल्या त्यात उजवा जपान. पण तरीही त्या दिवशी जपाननं चक्क कोलंबियाला हरवलं. २-१ अशा गोल फरकानं. हे धक्कादायक होतं. म्हणजे दक्षिण कोरियानं जर्मनीला धूळ चारण्याइतकं नाही. पण तरी फुटबॉलप्रेमींसाठी धक्काच म्हणायचा.

अशा सामन्यांत निकाल गृहीत धरलेला असतो. म्हणजे कोलंबियाच जिंकणार असं इतिहासाधारित भाकीत वर्तवलं गेलेलं असतं. पण देदीप्यमान इतिहास हा उज्ज्वल भविष्याची हमी देऊ शकत नाही, हे सत्य फुटबॉलसारख्या खेळालाही लागू पडतं. तर या सामन्यात जपान हरणार असंच मानलं जात होतं. पण झालं उलटंच. त्यामुळे जपानी प्रेक्षकांनी सामन्यानंतर मोठाच जल्लोष केला. स्वतला ध्वजात गुंडाळून घेतलेल्या हजारो जपानींच्या उत्साहाला या विजयानं नुसतं उधाण आलं होतं. हे असं होणं तसं नेहमीचंच.

नेहमीचं नाही ते नंतरचं जपानी प्रेक्षकांचं वर्तन. विजय साजरा झाला, टाळ्या, शिटय़ा, नाच वगैरे जे काही असतं ते करून झालं. नंतर निघायची वेळ. जपानी फरक दिसला तो इथे. स्टेडियममधून निघायच्या आधी जपानी प्रेक्षकांनी केलं काय?

तर आपल्या आसपास पडलेल्या शीतपेयांच्या प्लास्टिकच्या बाटल्या, बीअरचे ग्लास, पॉपकॉर्न, चॉकलेट, बिस्किटांच्या पुडय़ांचे कागद हे सगळं या जपानी प्रेक्षकांनी उचललं..आणि तेही हा कचरा आपण केलाय की नाही याचा विचार न करता. ही जपानी कृती इतक्या उत्स्फूर्तपणे झाली की सगळेच अचंबित झाले. बरं या जपानी प्रेक्षकांना ही साफसफाई करा असं कोणी सांगितलं होतं म्हणावं..तर तसंही नाही. स्टेडियममधले सगळे जपानी प्रेक्षक एक तालात आपल्या आसपासची साफसफाई करत होते. पुढच्या सामन्यासाठी..नंतर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपण सगळा परिसर व्यवस्थित, पहिल्यासारखा करून ठेवलाय याची खात्री झाल्यावरच हे जपानी प्रेक्षक स्टेडियममधून बाहेर पडले.

जपानी प्रेक्षकांची ही कृती आजपर्यंत समाजमाध्यमांत लाखोंकडून पाहिली गेलीये. कोणी तरी कोणाला गाईचं मांस खाल्ल्याच्या संशयावरून मारतोय, कोणी तरी मुलं पळवतो म्हणून त्याला जमाव ठेचतोय, अन्य धर्मीयांच्या प्रेमात पडला म्हणून एखाद्याला ठोकून काढलं जातंय..वगैरे चवीनं पाहायची सवय असलेल्या समाजमाध्यमांत एखाद्या देशाविषयी असं काही पाहिलं/बोललं जात असेल तर किती कौतुकास्पद असेल ते.

पण हे या देशाचं वैशिष्टय़च. तेवढय़ापुरतंच ते मर्यादित नाही. इकडे रशियातल्या स्टेडियममध्ये सामन्यानंतर जपानी प्रेक्षक साफसफाई करण्यात मग्न होते तेव्हा तिकडे जपानमध्ये एक भलतीच चर्चा सुरू होती. कोबे या शहरातल्या पाणीपुरवठा खात्यातल्या कर्मचाऱ्याला झालेली शिक्षा योग्य आहे का? मुळात शिक्षा करण्याइतका त्याचा गुन्हा गंभीर आहे का? जपानी समाजमाध्यमांत यावरून दोन तट पडलेत. पण ते परस्परविरोधी नाहीत. यातल्या एका गटाचं म्हणणं ही शिक्षा अगदी योग्यच आहे कारण त्याचा गुन्हाच तसा गंभीर आहे. तर दुसऱ्या गटाचा युक्तिवाद असा की या कर्मचाऱ्याचा गुन्हा दुर्लक्ष करावा असा निश्चितच नाही. पण त्याची शिक्षा ही गुन्ह्य़ाच्या तीव्रतेपेक्षा अधिक आहे. म्हणजे ज्याला शिक्षा झाली तो कर्मचारी चुकलाच हे या दोन्ही गटांना मान्य आहे. काय होता या कर्मचाऱ्याचा गुन्हा..

तो पाणीपुरवठा खात्यात काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याच्या कक्षातल्या कॅमेऱ्यांवर टिपला गेला. तो देखील एकदा नाही. तर सात महिन्यांत. या सात महिन्यांत तब्बल २६ वेळा त्याच्याकडून हा प्रमाद घडल्याचा तपशील या कॅमेऱ्यावरनं व्यवस्थापनाला समजून आला. मग त्याची चौकशी झाली. मान्य केली चूक या कर्मचाऱ्यानं चौकशी समितीसमोर. त्यानंतर हा कर्मचारी ज्या विभागात काम करत होता त्या विभागाच्या प्रमुखानं आपल्या सहकाऱ्याच्या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली. तीसुद्धा जपानी पद्धतीप्रमाणे. म्हणजे सर्वासमोर कंबरेत लवून आपली चूक कबूल करायची. ही अशी कबुली या अधिकाऱ्यानं शहरातल्या नागरिकांसमोर दिली. नागरिकांनी मग त्याला क्षमा केली. मग त्यानंही अशी अक्षम्य चूक आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडून होणार नाही, असं आश्वासन दिलं. प्रश्न मिटला.

पण चर्चा सुरू झाली. या सगळ्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमातनं फिरू लागली आणि चच्रेला तोंड फुटलं. तर या चच्रेच्या केंद्रस्थानी असलेल्या त्या कर्मचाऱ्याचा नक्की गुन्हा तरी काय होता?

तर तो जेवणाची अधिकृत सुटी व्हायच्या आधी तीन मिनिटं आपल्या खुर्चीवरनं उठत होता. जेवणाचा डबा घेण्यासाठी. म्हणजे जेवणाची सुटी व्हायची त्या वेळी याच्या टेबलावर जेवणाचा डबा उघडलेला असायचा. जपानी सरकारी नियमाप्रमाणं जेवणाच्या सुटीचा विराम घेतला जाईपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली कामं करीत राहणं अपेक्षित असतं. म्हणजे महासत्ता होऊ घातलेल्या काही देशांतल्या कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे जेवणाच्या सुटीचे वेध ही सुटी सुरू व्हायच्या आधी दोन तास लागतात.. म्हणजे १ वाजता जेवणाची सुटी होणार असेल तर अनेक कार्यालयांत ज्याप्रमाणे ११ वाजल्यापासूनच ताटवाटय़ा मांडायला सुरुवात होते..तसं त्या जपानच्या सरकारी कार्यालयात नव्हतं. हा नियम या कर्मचाऱ्यानं मोडला. सात महिन्यांत तो २६ वेळा असं तीन तीन मिनिटं लवकर उठलेला आढळला. म्हणजे त्यानं कामातली एकंदर ७८ मिनिटं चुकवली. या कर्मचाऱ्याला दंड झाला. अर्ध्या दिवसाच्या पगाराइतका.

त्यानं तक्रारही केली नाही. कर्मचारी संघटना वगैरे कोणीही त्याच्या मदतीला आले नाहीत.

तरी बरं.. जपानच्या कोणत्याही कार्यालयात सत्यमेव जयते, श्रम एव जयते, अहर्निशं सेवामहे, सेवा हाच धर्म.. अशी काही बोधवाक्यं लिहिलेली नसतात ते.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber