|| गिरीश कुबेर

आपल्याकडे काही वर्षांपूर्वी नीरा राडिया यांचं टेप प्रकरण खूप गाजलं. त्यात काही पत्रकारांचे संवाद नोंदले गेले होते. बरखा दत्त, वीर संघवी वगैरे तृतीयपर्णी पत्रकारांचं (पत्रकारानं मुळात तृतीयपर्णी होणं हेच किती अभद्र आणि भीतीदायक आहे.) संभाषण त्यात टेप केलं गेलं. कोणी कोणाला तरी मंत्री करण्याची शिफारस करतोय, तर कोणी कोणासाठी तरी रदबदलीचं आश्वासन देतोय, असं काय काय त्यात होतं.

गेल्या महिन्यात लंडनला असताना हा सगळा राडिया टेप्सचा अध्याय आठवला. तिथल्या काही ज्येष्ठ अशा व्यवसायबंधूंना याबाबत काही प्रश्न पडले होते. म्हणजे भारतात असं डिस्क्लोजरसारखं काही असतं का पत्रकारांसाठी? म्हणजे मी कोणत्याही राजकीय पक्षाचं सदस्यत्व घेणार नाही, अन्य कोणासाठी काम करणार नाही, भांडवली बाजारातील समभागांवर समजा मी काही लिहिणार असेल तर आपल्याकडे त्यातल्या कोणत्या कंपनीचे समभाग असले तर ते उघड करेन.. असं काही नियमन असतं का पत्रकारांसाठी, असा त्यांचा प्रश्न होता. पंचाईत झाली या प्रश्नाचं उत्तर देताना. काय काय सांगायचं हा प्रश्न होता. राडिया टेप्समध्ये काही जण उघड आले म्हणून बभ्रा झाला. ते दिल्ली पातळीवरचे, पण एरवी गल्लोगल्ली असे अनेक असतात. म्हणून किती दाखले द्यायचे हा प्रश्न होता.

याला संदर्भ होता ब्रिटिश माध्यमांत त्या वेळी सुरू असलेल्या चर्चेचा. ही चर्चा सुरू होती एका अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र संपादकाच्या कृतीमुळे. हे वर्तमानपत्र म्हणजे ‘द फायनान्शियल टाइम्स’ आणि संपादक लायनेल बार्बर. काय केलं या संपादकानं? नाही म्हणजे आपल्याकडचे संपादक करतात तसं काही गंभीर नाही. पण तरीही ब्रिटिश संवेदनशीलतेच्या मनानं त्याची कृती तशी गंभीर मानली गेली.

लंडनमधल्या प्रख्यात टेट या जगद्विख्यात कलादालनाचं प्रमुखपद या बार्बर यांनी स्वीकारलं. लंडनला लंडनपण मिळवून देणाऱ्या ज्या काही महान वास्तू, संस्था या शहरात आहेत, त्यातली एक म्हणजे टेट गॅलरी. ट्रॅफलगार चौकातली नॅशनल गॅलरी, पार्लमेंटजवळचं वॉर म्युझियम, क्रॉमवेल रस्त्यावरचं महाप्रचंड अशा डायनासोरच्या सांगाडय़ानं स्वागत करणारं नॅचरल हिस्टरी म्युझियम या तीन-चार संस्थांना भेट दिली नाही तर लंडनभेटीचं पुण्य पदरात पडत नाही. अर्थात मादाम तुसादमधल्या ‘अगदी डिट्टो’ दिसणाऱ्या मेणाच्या पुतळ्यांतच आनंद मानणाऱ्या संस्कृतीतल्यांना टेट, नॅशनलचं महत्त्व तसं असायचं काही कारण नाही. (जाता जाता : एकटय़ा लंडनमध्ये १७० वस्तुसंग्रहालयं आहेत.) पॅरिसमध्ये आपली मंडळी लुव्र पाहायला समजा चुकून गेलीच तर बरीचशी मोनालिसा पाहून परतीला निघतात. तसं लंडनमध्ये अनेकदा होतं. त्यामुळे टेट, टेट मॉडर्न आदी संस्था आपल्या बहुसंख्य लंडन ‘करून’ आलेल्यांना माहीत नसतात. अशा अनेकांचं लंडन ‘झालेलं’ असतं. पण म्हणून त्यांनी ते पाहिलेलं असतंच असं नाही. असो. मुद्दा लंडन नाही. तर लंडनमधली टेट गॅलरी आणि तिचं प्रमुखपद स्वीकारणारा तितक्याच ऐतिहासिक, भारदस्त अशा वर्तमानपत्राचा संपादक लायनेल बार्बर.

वास्तविक किती अभिनंदनीय घटना ही. एका बडय़ा वर्तमानपत्राच्या संपादकानं कला क्षेत्रातल्या तितक्याच, किंवा त्याहूनही बडय़ा, अशा कला संग्रहालयाचं प्रमुखपद स्वीकारणं हे किती अभिमानास्पद. जगातल्या काही उत्तम कलाकृती, मांडणशिल्पं या टेट कलासंग्रहालयात आहेत. या संस्थेचं प्रमुखपद हे कोणत्याही अर्थानं लाभदायी नाही. एक कपर्दिकही या कामासाठी प्रमुखाला मिळत नाही. परत वर आठवडय़ातनं किमान एक दिवस तरी संपूर्णपणे या संस्थेत घालवण्याची अट. ब्रिटिश पेट्रोलियम, म्हणजे बीपी, या जगातल्या पहिल्या दहांतल्या कंपनीचे प्रमुख लॉर्ड ब्राऊन हे या टेटचे आतापर्यंत प्रमुख होते. इतक्या मोठय़ा उद्योगपतीनं भूषवलेलं पद एका वर्तमानपत्राच्या संपादकाला मिळणं ही घटना खरं तर कोण आनंदाची. आपल्याकडे किती पत्रकार म्हणवून घेणारे कित्येक अ. भा. म्हणवून घेणाऱ्या अशा संस्थांच्या प्रमुखपदी सर्रास असतात. तेव्हा इतक्या मोठय़ा संस्थेत एखाद्या संपादकाची नियुक्ती झाली असती आपल्याकडे तर पहिले सहा महिने अशा व्यक्तीला गावोगावच्या अ. भा. संस्थांकडनं सत्कार स्वीकारण्यात घालवावे लागले असते. पण लंडनमध्ये असं काही झालं नाही. उलट जे झालं ते उलट होतं.

तिथे माध्यमांत चर्चा सुरू होती. प्रश्न विचारले जात होते आणि संस्था एकमेकांना विचारत होत्या : लायनेल बार्बर यानं जे काही केलं ते किती योग्य आहे? त्यानं भलताच पायंडा तर पडणार नाही? बार्बर यांच्या या कृतीचा अर्थ काय? त्याचे काय परिणाम होतील? या प्रश्नांच्या मुळाशी एकच मुद्दा होता.

हितसंबंधांचा संघर्ष. Conflict Of  Interest.

तो कसा काय? या पदाला तर काही मानधनसुद्धा नाही.

पत्रकारांचं म्हणणं होतं की फायनान्शियल टाइम्स या मातब्बर दैनिकाच्या संपादकपदावरची व्यक्ती अर्थविश्वात मानाची असते. त्याच्या शब्दाला उद्योग, वित्तसंस्था अशांत एक किंमत असते आणि टेट वस्तुसंग्रहालयाच्या विविध प्रदर्शनांचे पुरस्कर्ते कोण असतात? तर डॉईचे बँक, अर्न्‍स्ट अँड यंग, बँक ऑफ अमेरिका, मेरिल लिंच, आयएचएस मर्किट ही वित्तवृत्त सेवा, अ‍ॅक्सेंचर, रॉयल बँक ऑफ कॅनडा, बीपी अशा एकापेक्षा एक मातब्बर संस्था, कंपन्या या टेटच्या पुरस्कर्त्यां आहेत. या खासगी कंपन्या प्रचंड पैसा टेटमध्ये ओतत असतात. गेल्या वर्षांत या कंपन्यांनी ११ कोटी पौंड टेटच्या प्रदर्शनांवर खर्च केलेत. शिवाय टेटला ब्रिटिश सरकारकडनं ३० टक्के अनुदान मिळतं. गेल्या एकाच वर्षांत टेटला ब्रिटिश सरकारकडून साडेतीन कोटी पौंड इतकं भरभक्कम अनुदान मिळालं. खुद्द बार्बर यांची नेमणूक पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंजुरीनंतरच होऊ शकली. म्हणजे इतकं हे पद महत्त्वाचं आहे आणि सरकारशी संबंधितही आहे.

तेव्हा मुद्दा असा की एका निधडय़ा वर्तमानपत्राच्या संपादकानं टेटचं प्रमुखपद घ्यावं का? यातल्या काही उद्योगपती, धनाढय़ दाते यांच्याशी बार्बर यांचा संबंध येणार. अशा वेळी ते आपलं संपादकपद आणि टेटचं प्रमुखपद यांच्यात होऊ शकणारी गल्लत रोखणार कशी? टेटच्या प्रमुखाचं महत्त्वाचं काम असतं या वस्तुसंग्रहालयासाठी देणग्या गोळ्या करणं. आता हे काम संपादक बार्बर यांना करावं लागेल. ते समजा एखाद्याकडे गेले देणगी मागायला तर बार्बर यांच्याकडे ती व्यक्ती फायनान्शियल टाइम्सचा संपादक म्हणून बघणार की टेटचा प्रमुख म्हणून? आणि समजा या टेटच्या प्रमुखास समोरच्यांनी नकार दिला तर फायनान्शियल टाइम्सच्या संपादकाची प्रतिक्रिया काय असेल? आणि मुख्य म्हणजे हे वर्तमानपत्र त्याच्या कलासमीक्षेच्या दीर्घाकासाठी ओळखलं जातं. या वर्तमानपत्राचा संपादकच एका वस्तुसंग्रहालयाचा प्रमुख झाल्यावर इतर वस्तुसंग्रहालयातल्या कलाक्षेत्रावर त्यामुळे अन्याय नाही का होणार..?

हे सगळे प्रश्न तिथे चर्चिले जात होते. मुख्य म्हणजे अन्य वर्तमानपत्रं हे मुद्दे उपस्थित करत होतीच. पण खुद्द फायनान्शियल टाइम्सदेखील हे सगळं छापत होता. हितसंबंधांचा संघर्ष होऊ देणार नाही, अशी ग्वाही संपादक बार्बर देत होते. या वर्तमानपत्राची मालकी असलेली निक्केई ही जपानी कंपनीही तशी हमी देत होती.

म्हणून जगाला प्रश्न विचारणाऱ्यांनाही उत्तरं द्यायला लावणारी वयात आलेली लोकशाही कशी असते ते पाहता येत होतं.

पण राडिया टेपची आठवण भानावर यायला पुरेशी होती.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber