22 August 2018

News Flash

‘रणजित’ राक्षस

अमेरिकेनं हे तंत्रज्ञान विकत घेतलं आणि त्याच्या निर्मितीचा कारखानाच सुरू केला.

अमेरिकेनं हे तंत्रज्ञान विकत घेतलं आणि त्याच्या निर्मितीचा कारखानाच सुरू  केला. मग रशियानंही तेच केलं. आता हा बाटलीतनं बाहेर पडलेला राक्षस पुन्हा काही बाटलीत जायला तयार नाही.. अशा राक्षसांचा पराभव कसा करायचा याचं उत्तर आता कोणाकडेच नाही..

‘ओ ईथाइल एस २ डायसोप्रोपिलअ‍ॅमिनो इथाइल मिथाइलफॉस्फोनोथिओएट’ हे रसायननाम, किम जोंग नाम आणि डॉ. रणजित घोष ही नावं वाचून आपल्या फार काही लक्षात यायचं नाही. कोण आहेत हे आणि त्यांचा आपल्याशी काय संबंध इतकाच काय तो प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकेल. तसं योग्यच ते.

यातला किम जोंग नाम हा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचा सख्खा सावत्र भाऊ. म्हणजे या दोघांचे वडील एकच. किम जोंग इल. हे उत्तर कोरियाचे राज्यकर्ते. त्यांना तीन अर्धागी होत्या. नाम आणि उन ही त्यांच्या पहिल्या दोन पत्नींची अपत्यं. तर या किम जोंग नाम याची गेल्या आठवडय़ात हत्या झाली. मलेशियाच्या क्वालालंपूर विमानतळावर दोन महिलांनी त्याला ठार केलं.

म्हणजे गोळ्या घातल्या, भोसकलं, गळा दाबला वगैरे काही नाही. या दोन महिलांमधली एक किम जोंग नाम यांच्या समोर आली. तिच्या दोन हातात काही चिकटसा द्राव होता. तो तिनं हातावर हात घासता घासता एकत्र केला आणि किम जोंग नाम यांच्या चेहऱ्याला फासला. दुसरीनं त्यांच्या चेहऱ्यावर एक फवारा उडवला.

खेळ खल्लास. इतकंच काय ते या दोन महिलांनी केलं आणि किम जोंग नाम हे मरून गेले. रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला त्यांना, पण ते वाचण्याची काहीही शक्यताच नव्हती. कारण त्यातल्या पहिल्या महिलेच्या हातात हे ‘ओ ईथाइल एस २ डायसोप्रोपिलअ‍ॅमिनो इथाइल मिथाइल फॉस्फोनोथिओएट’ हे रसायन होतं. चिकटसर. काही वास वगैरेही नसतो त्याला. त्यामुळे त्याचं वेगळेपणही कळत नाही. खरं तर कसलेच काही ठसठशीत असे ‘गुण’ नसतात त्याला, पण ‘धर्म’ मात्र असतो त्याला.

माणसं मारण्याचा. काही मिलिग्रॅम इतकंसुद्धा हे रसायन माणसाच्या संपर्कात आलं तर प्राण घ्यायला ते पुरेसं असतं. त्याचा स्पर्श झाल्या झाल्या ते त्याच क्षणाला धुतलं गेलं नाही आणि ताबडतोब या विषावर उतारा शरीरात दिला गेला नाही तर मरण हमखास. त्यापासनं कोणीही वाचू आणि वाचवूही शकत नाही. इतकं ते घातक असतं. दोन पद्धतीनं त्याची मारकता वापरता येते. एक म्हणजे हे असं किम जोंग नाम यांच्या अंगाला फासलं तसं आणि दुसरं म्हणजे ते श्वासातनं हुंगलं जाईल अशी व्यवस्था करणं. किम जोंग नाम यांच्या चेहऱ्यावर फवारा उडवण्याचा प्रयत्न झाला, तो याच हेतूनं.

थोडक्यात म्हणजे किम जोंग नाम हे रसायनास्त्रानं मारले गेले. किम जोंग नाम यांच्यावर जे काही झालं त्याचा चांगलाच बभ्रा झाला. नंतर कळलं ते उत्तर कोरियाचे सत्ताधीश किम जोंग उन यांच्या कटाला बळी पडलेत. उन यांनीच आपल्या सावत्र भावाची हत्या घडवून आणली. हेतू हा की, आपल्या सत्तेतला संभाव्य वाटेकरी संपवून टाकायचा.

कसं संपवलं त्यांनी किम जोंग नाम यांना?

रसायनास्त्र. या दोन महिलांनी वापरलेलं हे व्हीएक्स रसायन जगातल्या काही मोजक्या घातक रसायनांत गणलं जातं. नव्‍‌र्ह एजंट म्हणतात त्याला. किती घातक असावं ते? तर या रसायनाच्या एका ग्रॅमच्या शंभराव्या भागानंही माणसं मरू शकतात. संयुक्त राष्ट्र संघानं त्याचं वर्गीकरण केलंय वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स.. घाऊक माणसं मारण्याचा मार्ग, असं. २००३ साली याच अस्त्रांच्या शोधासाठी अमेरिकेने सद्दाम हुसेन याच्या इराकवर हल्ला केला होता. या हल्ल्यात शोध घेतला गेला तो याच व्हीएक्सचा. या रसायनाच्या आधारे सद्दाम यानं कुर्द नावानं ओळखल्या जाणाऱ्या जमातीतल्या हजारोंचे प्राण घेतले होते, पण मुळात सद्दाम याच्याकडे हे रसायन आलंच कसं? हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे या रसायनाच्या निर्मितीची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. तितकं रासायनिक तंत्रसामथ्र्य फारच मोजक्या देशांकडे आजमितीला असल्यानं सुदैवानं या अस्त्राचा प्रसार रोखला गेला. तेव्हा ते सद्दामकडे गेलं कसं?

याच्या उत्तरासाठी पुन्हा अमेरिकेकडेच बोट दाखवावं लागेल. १९८० साली इराण आणि इराक या दोघांत युद्ध सुरू झालं. या युद्धात इराणचे अयोतोल्ला खोमेनी यांना अमेरिका शस्त्रास्त्र पुरवठय़ात मदत करत होती आणि सद्दाम हुसेनदेखील शस्त्रास्त्रांसाठी अमेरिकेवरच अवलंबून होते. त्या वेळी युद्धकाळात बगदादला सद्दाम हुसेन याला भेटण्यासाठी अमेरिकेहून एक व्यक्ती मुद्दाम पाठवली गेली. या व्यक्तीसमवेत दोन खोकी तेवढी होती. ती सद्दामला त्या व्यक्तीनं जातीनं दिली.

त्यात होती रासायनिक आणि जैविक अस्त्रं आणि ती व्यक्ती होती डोनाल्ड रम्सफेल्ड. नंतर धाकटय़ा जॉर्ज बुशसाहेबांच्या काळात ते अमेरिकेचे संरक्षणमंत्री होते आणि इराकवर हल्ला करून वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स नष्ट करायलाच हवीत असं त्यांचं मत होतं. खरं तर आग्रह होता. त्यानुसार मग इराकवर हल्ला झाला, पण ही अस्त्रं काही सापडली नाहीत. हा अलीकडचा इतिहास आहे.

त्याची आता पुन्हा नव्यानं उजळणी करावी लागते, कारण या किम जोंग नाम यांची हत्या. अमेरिका, त्या वेळचा सोव्हिएत रशिया अशा देशातनं गेलेल्या आणि इराक, सीरिया आणि उत्तर कोरिया अशा देशांतनं आलेल्या रासायनिक अस्त्रांचं काय करायचं, असा प्रश्न आज जगातल्या अनेक सुरक्षातज्ज्ञांना पडलेला आहे. साध्या उत्तर कोरियासारख्या देशात एका अंदाजानुसार पाच हजार टन ही अशी रासायनिक अस्त्रं साठवून ठेवण्यात आलेली आहेत. मध्यंतरी जपानमधल्या एका रेल्वे स्टेशनवर ‘ओम शिनरिक्यो’ या अघोरी पंथातल्या दहशतवाद्यांनी ऐन गर्दीच्या वेळी अशा प्रकारचंच एक रसायन सोडून काय होऊ शकतं याचं भयानक स्वरूप दाखवून दिलं होतं. कित्येक माणसं त्या वेळी जपानमध्ये गेली. त्यानंतर अगदी अलीकडे सीरियात आपल्याच नागरिकांविरोधात सत्ताधीश असाद यांनी ही रसायनं सोडून त्यांच्या जिवाचे हालहाल केले होते. त्या वेळी अगदी लहान लहान मुलंही या रसायन अस्त्रांच्या हल्ल्यात कोळपून गेलेली जगभर दिसली होती.

वास्तविक या अस्त्रांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे खरा, पण उत्तर कोरियासारख्या देशानं त्यावर काही स्वाक्षरी केलेली नाही. हा देश आपल्याकडे जैविक, रासायनिक अस्त्रं आहेत हे मान्य करतो; परंतु कराराला मान्यता देऊन या अस्त्रांवर बंदी घालू द्यायची काही त्याची तयारी नाही.

हे सगळं वाचल्यावर एक मूलभूत प्रश्न पडू शकतो. हे डिक्ससारखं महासंहारक अस्त्र विकसित केलं कोणी?

तिथे आपल्या डॉ. रणजित घोष यांचं नाव येतं. डॉ. घोष इंग्लंडमध्ये इंपिरियल केमिकल इंडस्ट्रीज, म्हणजे विख्यात आयसीआय, या कंपनीच्या पीक संरक्षण विभागात संशोधक होते. त्या वेळी पिकांसाठी कीटकनाशकं तयार करण्याच्या प्रयत्नात असताना एका टप्प्यावर त्यांच्या हातून या ‘ओ ईथाइल एस २ डायसोप्रोपिलअ‍ॅमिनो इथाइल मिथाइल फॉस्फोनोथिओएट’ रसायनाची निर्मिती झाली. त्याच्या चाचण्या पिकांवर घेताना त्यांना लक्षात आलं, हे रसायन फारच भयानक विध्वंसक आहे. म्हणून त्या कंपनीनं त्याची निर्मिती थांबवली. ही १९५० सालची घटना.

त्यानंतर अमेरिकेनं हे तंत्रज्ञान विकत घेतलं आणि त्याच्या निर्मितीचा कारखानाच सुरू केला. मग रशियानंही तेच केलं. आता हा बाटलीतनं बाहेर पडलेला राक्षस पुन्हा काही बाटलीत जायला तयार नाही. किम जोंग नाम यांच्या मरणानं तो किती आपल्या जवळ आहे, हे दाखवून दिलंय. अशा राक्षसांचा पराभव कसा करायचा याचं उत्तर आता कोणाकडेच नाही.

आपण प्रगत होत जाताना हे असं राक्षसांचं ‘रणजित’ होत जाणं काळजी वाढवणारं आहे.

 

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

 

First Published on February 25, 2017 2:38 am

Web Title: kim jong nam girish kuber