देश असो वा उद्योगपतीचे घराणे, एखादी व्यक्ती थोर असली तरी तिच्याकडून तितक्याच थोर व्यवस्थादेखील तयार व्हाव्या लागतात. व्यवस्थांअभावी व्यक्तीचं कर्तृत्व मातीमोल होतं, एवढय़ासाठी व्यक्तीपेक्षा व्यवस्था महत्त्वाची..

माणसं किती कर्तृत्ववान असतात. एकहाती किती काय काय करता येतं त्यांना.

ली कुआन हा या अशा एकहाती कर्तृत्ववानांचा मापदंड. अगदी गचाळ, डबक्यांच्या प्रदेशाचं त्यांनी जगप्रसिद्ध शहरात रूपांतर केलं. सिंगापूर ही ली कुआन यांची सर्वोत्कृष्ट निर्मिती. आज मुंबईची धारावी जशी आहे त्याहीपेक्षा सिंगापूर वाईट होतं एके काळी. नुसती बजबजपुरी. हे शहर एखाद्या वस्तीसारखं होतं. ना आकार न उकार.

पन्नासच्या दशकात ली कुआन राजकीय क्षितिजावर आले आणि बघता बघता चित्र पालटायला लागलं. ब्रिटिशांच्या ताब्यातलं हे बेट नंतर स्वतंत्र प्रजासत्ताक झालं. एका बेटाचं शहर हे आणि आसपास जवळपास ६० एक बेटुल्या. म्हणजे अगदी लहान लहान बेटं. सिंगापूरचं भौगोलिक अस्तित्व इतकंच.

या छोटय़ाशा एक शहरी देशाला ओळख दिली ली कुआन यांनी. जवळपास चार दशकं पंतप्रधान होते ते सिंगापूरचे. आजची जगातला अत्यंत प्रगत, अद्ययावत, तंत्रस्नेही आणि श्रीमंत देश अशी ओळख सिंगापूरची झाली ती केवळ ली कुआन यांच्या द्रष्टय़ा राजवटीमुळे. भविष्यात शहराच्या गरजा काय असतील, आपल्याला जास्त चांगलं काय जमतं, काय जमत नाही.. याचा विचार करीत त्यांनी सिंगापूरसाठी नेमक्या उद्योगांची निवड केली. बँका, वित्तीय संस्था वगैरे आपल्या या शहर राज्यासाठी योग्य हे त्यांनी ओळखलं आणि तेवढय़ांचं नियमन करत त्यांनी त्यांचा प्रसार होऊ दिला. आज जगातलं मोठं वित्तीय केंद्र म्हणून सिंगापूर ओळखलं जातं.

हे सगळं सगळं कर्तृत्व एकाच व्यक्तीचं. ली कुआन.

हे असं सगळं एकाहाती असणं म्हणजे एकचालकानुवर्ती सत्ता. तो म्हणेल ती पूर्व. राजकीय विरोध नाही. कोणी प्रतिस्पर्धी नाही. म्हणजे काही कोणाचं आव्हानच नाही. तसं पाहायला गेलं तर सिंगापूरमध्ये आहे लोकशाही व्यवस्था. चांगली आपल्यासारखी बहुपक्षीय लोकशाही. पण ही लोकशाही म्हणजे लोकांना फक्त मतदानाचा अधिकार देणारी, पण मत द्यायचं फक्त ली कुआन आणि त्यांच्या पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीला.

त्यात मतदारांचा बुद्धिभेद करायला स्वतंत्र बाण्याची वगैरे वर्तमानपत्रंही नाहीत. म्हणजे वर्तमानपत्रं आहेत, पण त्यांनी काय छापायचं आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे काय छापायचं नाही.. हे सगळं ठरवतं सरकारच. त्यामुळे हा राजकीय पक्ष चांगला की तो अशी चर्चाही नाही. एका अर्थानं बरंच हे असं असणं. कारण माध्यमांमुळे गोंधळ उडतो आणि माध्यमं काय.. जो कोणी सत्तेवर असेल त्याच्यातली वैगुण्यंच तेवढी दाखवतात. त्यामुळे सत्ताधारी बदनाम होतात. लोकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी पसरते. मग त्याचा परिणाम म्हणून सत्ताधारी लोकप्रियता गमावतात.. विरोधकांना संधी मिळते आणि मग हे वर्तमानपत्रवाले हादेखील कसा वाईटच आहे.. हे सांगायला सुरुवात करतात. म्हणजे हा चांगला नाही आणि तोदेखील वाईटच, अशी परिस्थिती. उगाच गोंधळ वाढतो जनतेच्या मनात अशा वर्तमानपत्रांमुळे. त्यापेक्षा वर्तमानपत्रांची ब्याद नसलेलीच बरी.

असाच विचार केला ली कुआन यांनी आणि उगाच आचारविचार स्वातंत्र्याच्या नावाखाली वर्तमानपत्रांना शेफारू दिलंच नाही त्यांनी. आणि दुसरं असं की, हे वर्तमानपत्रवाले प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतात. त्यामुळे किती अडचण होते विकासाभिमुख नेत्यांची. काहीच करता येत नाही त्यांना. असा समाज मागे राहतो मग आपल्यासारखा. हाच विचार करून ली कुआन यांनी प्रसारमाध्यमं, विविध पक्षांतनं तयार होणारे विरोधक वगैरे निर्माण व्हायला संधीच ठेवली नाही.

सगळा एकहाती कारभार. सिंगापूरच्या यशात ली कुआन यांचा आणि ली कुआन यांच्या यशात या विरोधकविहीन व्यवस्था, नियंत्रित प्रसारमाध्यमे यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून तर सिंगापूर आज कुठल्या कुठे पोहोचलंय.

या कहाणीत नवीन काय?

काहीही नाही. इतक्यांदा ही सिंगापूरची कथा गायली गेलीये की आता त्यात नवीन असं काही राहिलेलं नाही. नवीन असलंच काही तर ते आहे या कथेच्या उत्तररंगात. गेले पंधरा दिवस सिंगापूरच्या पार्लमेंटचं अधिवेशन जे कोणी पाहात असतील त्यांना या कथेत नवीन काय हे कळलं असेल. हे नवीन काय.. हे सांगण्यासाठीच हा लेखप्रपंच.

००००

झालंय असं की, ली हैसेन यांग यांनी आपल्या मायदेशाचा त्याग करायचा निर्णय घेतलाय. आता सिंगापूरमध्ये राहण्यात काही अर्थ नाही असं त्यांना वाटू लागलंय. ते देश सोडतायत. एव्हाना हा देशत्याग प्रत्यक्षात आलाही असेल. हे ली यांग सिंगापूरच्या हवाई वाहतूक मंत्रालयाचे प्रमुख आहेत. त्याआधी सिंगटेल या प्रख्यात खासगी दूरध्वनी मंत्रालयाचे ते प्रमुख होते. अर्थातच बडी असामी आहे. खूप नाव आहे त्यांचं सिंगापुरी उद्योगजगात. पण हे असं काही ते बोलल्यामुळे चांगलीच खळबळ उडालेली आहे तिकडे. इतका मोठा उद्योगपती देश सोडायचं म्हणतोय म्हणून बरेच जण गोंधळून गेलेत.

पण ही अशी टोकाची भूमिका घेणाऱ्यांत ते काही एकटे नाहीत. ली वै लिंग यांचंदेखील तसंच मत आहे. त्या अजून देशत्यागाची भाषा करू लागलेल्या नाहीत, पण सिंगापुरात आता काही अर्थ नाही, असं त्याही म्हणतायत. या ली वै या सिंगापुरातल्या अत्यंत आघाडीच्या मेंदुचिकित्सक. फारच नावाजलेल्या. इतक्या की त्यांच्याकडून शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी अनेक जण सिंगापूरला जातात, पण अलीकडे त्याही रागावलेल्या आहेत आपल्या देशावर. इथे कसली किंमत नाही आपल्याला वगैरे भाषा करतात त्या.

या दोघांचा राग आहे तो ली सैन लुंग यांच्यावर. हे ली सैन खूपच मनमानी आहेत. आम्हाला ते विश्वासात घेतच नाहीत. कोणाला जुमानत नाहीत.. अशा प्रकारच्या तशा ओळखीच्या तक्रारी आहेत या दोघांच्या ली सैन यांच्याविरुद्ध. या दोघांचं म्हणणं असं की ली सैन यांनी ज्या काही गोष्टी कबूल केल्या होत्या त्यादेखील आता ते पूर्ण करीत नाहीत. त्यांना स्वत:च्याच शब्दाची काही किंमत नाही.

पण कोण आहेत हे ली सैन?

ते आहेत सिंगापूरचे सध्याचे पंतप्रधान. आणि ली यांग आणि ली वै हे त्यांचेच भाऊ-बहीण आहेत. म्हणजे हा या तीन भावंडांमधला वाद आहे. पण मुद्दा असा की, या भावाबहिणींच्या वादात सिंगापूरसारख्या प्रगत देशानं इतकं अडकायचं कारणच काय?

तर यामागचं कारण म्हणजे या तिघांच्या वडिलांचं नाव. ली कुआन हे या तिघांचे वडील. म्हणजेच ही तीनही मुलं आधुनिक सिंगापूरच्या जनकाची मुलं आहेत; पण सध्या या तिघांत जोरदार युद्ध सुरू आहे. त्याची सुरुवात अगदी छोटय़ा कारणानं झाली. ली कुआन आयुष्यभर ज्या घरात राहिले त्या घरात सध्या ली वै रहातात. माझ्या मृत्यूनंतर माझं कोणतंही स्मारक वगैरे उभारायचं नाही.. मी राहत होतो ते घरही पाडून टाकायचं.. अशी ली कुआन यांची अट होती. जोपर्यंत ली वै त्या घरात राहू इच्छिते तोपर्यंत तिला राहू द्यावं. नंतर ते पाडावं, असं कुआन यांचं मृत्युपत्र आहे.

पण प्रश्न असा की ली वै आता त्या घरात राहत नाहीत. तरीही ते घर पाडलं जात नाही. ते का पाडलं जात नसावं?

ली वै आणि ली यांग यांचा आरोप असा की, ते घर तसंच राखून त्यांच्या स्मृतींचं भांडवल करण्याचा प्रयत्न ली सैन करतोय. त्याला फक्त रस आहे तो सत्तेत. वडिलांची पुण्याई तो स्वत:च्या सत्तेसाठी, स्वार्थासाठी वापरतोय.

हे तीन भावंडांमधलं युद्ध सिंगापुरात टिपेला पोहोचलंय. संपूर्ण देश त्यामुळे दुभंगलाय आणि म्हणून ली यांग म्हणतायत, देश सोडायला हवा.. नाही तर माझ्या जिवाचं काही खरं नाही. याचा अर्थ स्वत:च्या सख्ख्या भावावर त्यांना संशय आहे. चित्र असं की ली कुआन यांच्या पोटच्या पोरांतले वाद चव्हाटय़ावर आल्यानं सिंगापूरविषयी संशय निर्माण होतोय. या देशातील व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण केले जातायत.

थोडक्यात सिंगापूर काहीसा अस्थिर बनलाय.

बरं मग?

तात्पर्य इतकंच की, एखादी व्यक्ती थोर असली तरी तिच्याकडून तितक्याच थोर व्यवस्थादेखील तयार व्हाव्या लागतात. व्यवस्थांअभावी व्यक्तीचं कर्तृत्व मातीमोल होतं. म्हणून व्यक्तीपेक्षा व्यवस्था महत्त्वाची.

ही एकलकोंडय़ाची गोष्ट म्हणूनच बरंच काही शिकवून जाते आपल्याला.