News Flash

भविष्यवेधी!

मध्यंतरी ब्रिटनच्या राणीकडून त्यांचा सन्मान झाला तेव्हा काहींनी सारा गिल्बर्ट हे नाव पहिल्यांदा ऐकलं.

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

‘उशिरापर्यंत प्रयोगशाळेत काम करणाऱ्या आमच्या पथकासाठी कॉफी मागवायलाही आमच्याकडे पैसे नसायचे’ असं सांगणाऱ्या सारा यांना पुढे राणीकडून सन्मान मिळाला आणि अगदी अलीकडे, लोकांकडून मानवंदनाही..

सारा गिल्बर्ट यांच्या आयुष्यात बरंच काही घडलं.

३१ डिसेंबर २०१९च्या मध्यरात्रीच्या ठोक्याला सारं जग नव्या वर्षांच्या स्वागतोत्सवात मग्न असताना सारा गिल्बर्ट प्रयोगशाळेतलं काम आटोपून निघण्याच्या तयारीत होत्या. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो. आजही. त्याही दिवशी २०२० सालच्या नववर्षदिनी तो तसाच सुरू होणार होता. त्याआधी सरत्या वर्षांतलं काम संपवून जाताना संगणक बंद करणार तर नेमका एक ईमेल येऊन टपकला. त्याचं उत्तर देण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. उद्या बघू असं म्हणत त्या संगणक बंद करत होत्या. उत्तर देत बसायचं नाहीये; पण मेलचा विषय तरी बघू म्हणून त्यांनी नजर टाकली.

त्यांच्याच संस्थेतल्या सहकाऱ्याचा होता तो. चीनमधल्या वुहानमधे अनामिक आजारात चार जण दगावल्याची माहिती त्यात होती. ती नोंदवली त्यांनी मनात आणि घरी गेल्या. नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशीच त्यांच्या कामाला दिशा मिळणार होती.

त्याआधी गेली दहा वर्ष त्या प्रयोगशाळेत लस संशोधनात मग्न होत्या. मलेरिया (हिवताप) या आजारावर लस विकसित करणं हा त्यांचा प्रयोग विषय. त्यासाठी लशीचं पारंपरिक तंत्रज्ञान त्यांना वापरायचं नव्हतं. त्यात खरोखर आजार पसरवणारा मृत वा अशक्त विषाणू वापरून लस तयार केली जाते. ही लस निरोग्याच्या शरीरात टोचली की या विषाणूची प्रतिरूपं तयार होतात आणि खरा आजाराचा विषाणू जेव्हा शरीरात शिरतो तेव्हा त्याच्यावर हल्ला करून त्याला नेस्तनाबूत करतात. सारा गिल्बर्ट यांचं तंत्र वेगळं होतं. त्यांनी काय केलं? तर आपल्याला साधं सर्दी-पडसं ज्यामुळे होतं तो विषाणू निवडला, प्रयोगशाळेतील अभियांत्रिकीच्या साह्य़ानं त्याचं रूपडं बदललं आणि त्याला लस म्हणून वापरण्यासाठी सिद्ध केलं. या पद्धतीत ती टोचलेल्याच्या शरीरात प्रतिपिंडं तयार होत नाहीत. तर शरीरातल्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या, ‘टी- सेल्स’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या पेशींचा आजार-विषाणूशी परिचय होतो. आजार पसरवणाऱ्या विषाणूचं प्रथिनयुक्त काटेरीयुक्त कवच दिसलं की मग या टी- पेशी कामाला लागतात आणि या विषाणूंचा शरीरातला प्रसार रोखतात.

म्हटलं तर तसं सांगायला हे तंत्रज्ञान साधं वाटतं. पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी जवळपास दहा वर्ष सारा आणि त्यांचे सहकारी त्यावर काम करतायत. एरवीही हे काम असंच चालू राहिलं असतं काही काळ. पण त्या १ जानेवारीच्या मेलनं सारांच्या मनात पाल चुकचुकली. गेली काही वर्ष जागतिक आरोग्य संघटना जगभरातील लसशास्त्रज्ञ, संशोधन संस्था, विद्यापीठं वगैरेंना सातत्यानं सांगतीये. एखाद्या अकल्पित आजाराला रोखण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्या. हा आजार कधीही पसरू शकेल.

सारा यांच्या मनात येऊन गेलं जागतिक वैद्यकीय संघटना म्हणतीये तो अकल्पित आजार हाच तर नाही? या संघटनेनं ‘डिसीज एक्स’ म्हणून उल्लेख केलेल्या आजाराला रोखण्यासाठी काम सुरू करण्याची हीच तर वेळ नाही?

दोन- तीन दिवसांत त्यांना या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळालं. वुहानमधूनच. या आजाराच्या प्रसाराच्या बातम्या येऊ लागल्या, त्याच्या गांभीर्याच्या वदंता पसरू लागल्या आणि ‘डिसीज एक्स’ तो हाच हे नक्की झालं. त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं काम या आजाराच्या विषाणूला रोखणं या एकाच मुद्दय़ाभोवती केंद्रित झालं. ‘‘हा विषाणू काही वेगळा नव्हता. गेल्या दहा वर्षांत प्राण्यांकडून माणसांकडे अनेक विषाणू आलेत. त्याच्यावर आमचं काम सुरू होतंच. हा नवा त्याच घराण्यातला,’’ असं त्या सांगतात. ‘मर्स’ (मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) आणि एबोला या आजारांवर त्या अनेक वर्ष काम करतायत. त्या पार्श्वभूमीवर हा नवा विषाणू आल्यानं त्या स्वत:ला भाग्यवान समजतात. भाग्यवान का? तर ‘‘हा विषाणू अल्पजिवी आहे, तो फार काळ टिकत नाही. हा जर एड्ससारखा असता तर आपलं काही खरं नव्हतं. त्याला रोखण्यासाठी काही संशोधन करणं फारच अवघड गेलं असतं’’, असं त्यांचं मत.

या नव्या विषाणूला रोखणं इतकं सोपं होतं तर त्यावर उपाय शोधण्यातली मोठी अडचण कोणती? ‘पैसा, निधी ही एकमेव अडचण,’ असं त्या सांगतात. सुरुवातीला त्यांनी आपल्या संस्थेच्या निधीतनं त्यासाठी खर्च केला. पण तो अत्यंत तुटपुंजा. औषध, लस यांच्या संशोधनासाठी बख्खळ पैसा लागतो. एखादी शैक्षणिक संस्था काही तितका पैसा उभा करू शकत नाही. ‘कधी कधी तर उशिरापर्यंत प्रयोगशाळेत काम करणाऱ्या आमच्या पथकासाठी कॉफी मागवायलाही आमच्याकडे पैसे नसायचे. मी प्रयोगशाळेत रडलीये या काळात अनेकदा इतकी आमची परिस्थिती हलाखीची होती’, हे आता सांगतानाही त्या तेव्हाच्या आठवणींनी व्याकूळ होतात. पण पुढे या आजाराच्या साथीचा वेग असा काही वाढला की त्यावरच्या इलाजाची गरज अनेकांना वाटू लागली. त्यांच्या देशात तर या आजारानं हाहाकारच उडवला. तो इतक्या वेगानं पसरला की जणू जगबुडी आली असं वाटावं. त्यामुळे एक झालं. सारा गिल्बर्ट आणि मंडळींना संशोधनासाठी आवश्यक तो निधी येऊ लागला. त्यांची चिंता मिटली.

पण ते या पद्धतीनं व्हायला नको होतं, हे त्यांचं मत लक्षात घ्यावं असं. जे झालं त्यामुळे उगाच विज्ञान बदनाम झालं, वैज्ञानिक बेसावध होते असं चित्र निर्माण झालं, ते सारा यांना मंजूर नाही.  ‘‘या प्रश्नावर चुकले ते राजकारणी, वैज्ञानिक नव्हे’’ हे त्या ठामपणे सांगतात तेव्हा विज्ञानाच्या उदात्त परंपरेची प्रभा त्यांच्याभोवती स्पष्टपणे दिसत असते.

विज्ञानाचा समोरच्याला दरारा वाटेल असा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांचे सहकारी सांगतात बाईंसमोर कसं दडपल्यासारखं वाटतं ते. त्यात त्यांचा स्वभाव. प्रयोगशाळा, संशोधन आणि आपला अभ्यास यातच त्यांना आनंद. विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांची कमी उपस्थिती त्यांना बोचते. ‘‘उच्चविज्ञान संशोधनात आम्ही कमी असल्यानं आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे स्त्रीपुरुष संख्या संतुलन दाखवण्यासाठी आमच्या गळ्यात संशोधनाच्या बरोबरीनं अन्य कामंही मारली जातात. संस्था आम्हाला मिरवते. पुरुष वैज्ञानिकांचं असं होत नाही. ते निवांतपणे स्वत:ला गाडून घेऊ शकतात. या क्षेत्रातही आमच्यावर अन्यायच.’’ असं त्या ठणठणीतपणे बोलून दाखवतात.

मध्यंतरी ब्रिटनच्या राणीकडून त्यांचा सन्मान झाला तेव्हा काहींनी सारा गिल्बर्ट हे नाव पहिल्यांदा ऐकलं. प्रसिद्धिपराङ्मुख राहायला त्यांना आवडतं. आपलं काम महत्त्वाचं, आपण नाही.. हे त्यांचं आवडतं तत्त्व. राणीच्या सन्मानानंतरही त्यांचं नाव जगभर झालं असं नाही. पण २८ जूनच्या दुपारी त्यांच्यावर १२० कॅमेरे रोखले गेले, उपस्थित जनसमुदायानं उभं राहून त्यांना मानवंदना दिली आणि जगभरातील दीडएकशे देशांतील कोटय़वधींनी ते पाहिलं आणि नंतर अचानक सारा गिल्बर्ट हे नाव आणि त्यामागच्या कर्तृत्वाचं चांदणं अनेकांच्या मनात पसरलं.

मानसन्मान, प्रतिष्ठा, कीर्ती दिगंत होणं म्हणजे नक्की काय? एखादी व्यक्ती, तिचा चेहरा, व्यक्तिमत्त्व सर्वदूर माहीत असणं आणि ही व्यक्ती दिसल्यावर चाहत्यांचा जल्लोष होणं हा एक प्रकारे सन्मानच. या सन्मानाची रूपं बऱ्याचदा दिसतात. ती दिसतील अशी व्यवस्थाही चतुराईनं केली जाते. या अशा चातुर्यातनंच तर तृतीयपर्णी संस्कृती जन्माला आली आणि फोफावली. पण असंही होतं कधी की बहुसंख्यांना एखादं कार्य माहीत असतं पण ते कार्य सिद्धीस नेणारी व्यक्ती कोण हे माहीत नसतं. व्यक्तीच माहीत नाही तर तिचा चेहरा परिचयाचा असण्याची शक्यता नाही. आणि अशावेळी समजा कळलं की ही व्यक्ती या क्षणी आपल्यामधे आहे तर उपस्थित हरखून जातात आणि न कळतपणे मग या व्यक्तीस मानवंदना देतात.

विंबल्डन टेनिस सामन्यांच्या शुभारंभी हे घडलं आणि शाही आसनावर विराजमान झालेल्या सारा गिल्बर्ट यांना- त्यांच्या भविष्यवेधी संशोधनाला-  जगानं मानवंदना दिली.

त्यांचा परिचय : करोनावरच्या अ‍ॅस्ट्रा-झेनेका या लशीच्या त्या निर्मात्या.

संशोधन स्थळ : ऑक्सफर्ड विद्यापीठ.

दुसऱ्या दिवशी आपल्याकडे विद्यापीठांत फलज्योतिषाचा अभ्यासक्रम शिकवण्याची शिफारस हा चर्चेचा विषय होता!

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 2:21 am

Web Title: loksatta anyatha article about woman scientist sarah gilbert life zws 70
Next Stories
1 प्राण तळमळला… पण कशासाठी?
2 शहाणपणाची शिक्षा!
3 विद्या परीक्षेन शोभते!
Just Now!
X