03 June 2020

News Flash

..मग हरणार कोण?

बराच काळ बहुचर्चित असलेला ‘फेसबुक’चा रिलायन्सच्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय एकदाचा झाला

संग्रहित छायाचित्र

गिरीश कुबेर

आधीचे पर्याय नाकारून हाच का गोड मानला? यातून कुणाला काय मिळणार? त्यातलं ‘आयतं’ काय असणार आणि हे जे काही त्यांना मिळणार आहे त्याच्याशी आपला काय संबंध? ‘ऑनलाइन’, ‘परकीय गुंतवणूक’ यांची आपल्याकडली धोरणं इतकी वळणदार कशी काय?.. या साऱ्याच प्रश्नांची उत्तरं माहिती आणि तर्काच्या साह्यनं मिळतील.. पण पुढल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हवंय?

बराच काळ बहुचर्चित असलेला ‘फेसबुक’चा रिलायन्सच्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय एकदाचा झाला. ही देशातली अलीकडच्या काळातली सगळ्यात मोठी परकीय गुंतवणूक असेल. त्यातून ४३,५७४ कोटी रु. फेसबुक या कंपनीत गुंतवेल. ‘भारताला आघाडीचा डिजिटल समाज’ बनवण्यासाठी आपण ही गुंतवणूक करतोय, असं ‘फेसबुक’कार मार्क झुकेरबर्ग म्हणाला.

हे फारच झालं. भारताच्या हिताचा विचार करता करता, आपल्याला या गुंतवणुकीतून काय मिळणार आहे हेदेखील त्यानं सांगितलं असतं तर जरा बरं झालं असतं. हे सर्व उद्योजक अमेरिकेत रास्त प्रामाणिकपणा दाखवतात आणि तिसऱ्या जगात काही गुंतवणूक करायची म्हटलं, की व्यापक देशहित वगैरे दांभिकपणा सुरू करतात. असो. पण निदान आपण तरी या गुंतवणूक निर्णयाचा जमाखर्च मांडायला हवा. आणि त्याचबरोबर आधी काही परदेशी गुंतवणूक पर्याय आपण नाकारलेले असताना हाच नेमका गोड मानून घ्यावा असं आपल्याला का वाटलं, हेही तपासायला हवं.

आज भारतात स्मार्टफोन ग्राहकांची संख्या आहे ६३ कोटी ५० लाख इतकी. त्यातले ३८ कोटी ८० लाख.. म्हणजे निम्म्याहून अधिक हे जिओचे ग्राहक आहेत. हा झाला भारताचा दूरसंचार. दुसऱ्या बाजूला फेसबुकचे क्रियाशील सदस्य आहेत ३३ कोटी. यापेक्षा वेगळा असा एक वर्ग असा आहे की जो फेसबुकच्या वाटेला गेलेला नाही. पण व्हॉट्सअ‍ॅप मात्र वापरतो. त्याची कारणं काहीही असतील.. म्हणजे अलीकडे नव्यानं उदयास आलेली व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठं किंवा वाढता भक्त संप्रदाय वगैरे. तर अशा मंडळींची संख्या आहे तब्बल ४० कोटींहून अधिक. यात आणखी इन्स्टाग्रामचे आठ ते दहा कोटी. तिसऱ्या बाजूला आहेत चार कोटी किराणा ग्राहक.

या सगळ्या संख्या आता जोडल्या, की या व्यवहारामागचा अर्थ कळायला लागेल. ‘फिजिटल’ अशी एक नवीच संज्ञा यातून आकाराला येणार आहे. ‘फिजिकल’ आणि ‘डिजिटल’ या दोन स्वतंत्र शब्दांचा संकर म्हणजे ‘फिजिटल’! त्यात होणार आहे काय, तर आपल्या नाक्यावरची किराणा किंवा अन्य दुकानं या नव्या जाळ्यात ओढली जाणार. म्हणजे आताच्या घडीला जी दुकानं अधिकृत अशा ई-कॉमर्सच्या साखळीत नाहीयेत, ती या नव्या फिजिटल पद्धतीचा भाग बनतील. मोफत सेवा देऊन जिओने आपला नवा प्रचंड असा ग्राहकवर्ग तयार केलेला आहेच. आपल्या कोपऱ्यावरच्या चहाच्या टपरीवाल्याकडेही अलीकडे जिओचा(च) फोन असतो. समजा, ज्या कोणाकडे तो नसेल, तेही अन्य मार्गाने फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप किंवा इन्स्टाग्राम यातलं काहीना काही वापरत असतातच.

म्हणजे ४० कोटी व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे अलगदपणे.. खरं तर त्यांच्या नकळतपणे.. जिओशी जोडले जाणार. म्हणजे ज्या वेळी रिलायन्सची दुकानं त्यांची प्रस्तावित फिजिटल साखळी उभारतील, त्या वेळी इतके ग्राहक त्या दुकानाला आपोआप मिळतील. सोप्या शब्दांत सांगायचं म्हणजे या दुकानाचं शटर उघडेल त्या क्षणी ४० अधिक इन्स्टाचे १० असे साधारण ५० कोटी ग्राहक समोर असतील. याउलट या दुकानाच्या गल्ल्यावर बसलेला सहमालक- फेसबुकचा झुकेरबर्ग याला, आजच्या घडीला जिओच्या ग्राहकांची सर्व ‘विदा’ म्हणजे डेटा मिळेल. त्यांचं नाव, गाव, पत्ता, उत्पन्नाचं साधन, आर्थिक स्थिती वगैरे सर्व माहिती फेसबुकला मिळू लागेल.

याचं वर्णन ‘एकमेकांना घास भरवणे’ असं करता येईल. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टा यांची बाजारपेठ जिओला मिळेल आणि जिओमुळे फेसबुकला संपूर्ण मंडईच खुली केली जाईल. खरं तर त्याबाबत अजूनही आपल्याकडे धोरणसातत्य नाही. याआधी अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा वॉलमार्ट यांच्याबाबत आपण आपले असे निर्णय बदलले. अ‍ॅमेझॉन भारतात आल्यापासून पारंपरिक दुकानदार नाराज होते. कारण या ऑनलाइन कंपन्या भरघोस सवलती देतात म्हणून. त्यामुळे जमिनीवर प्रत्यक्ष दुकानं असलेल्यांनी अ‍ॅमेझॉन वगैरेंच्या ऑनलाइन शॉपिंग आणि सवलतींना हरकत घेतली.

ग्राहकांना अशा सवलती मिळत असताना या पारंपरिक दुकानदारांच्या पोटात का दुखलं? तर त्यांच्या दुकानांवर या सवलतींचा परिणाम होऊ लागला म्हणून. म्हणजे दुकानात जाऊन खरेदी करणाऱ्यांच्या ऐवजी ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागला. ग्राहक ऑनलाइन खरेदी करतात; कारण ते चार पैसे स्वस्त पडते म्हणून. वस्तुत: या ऑनलाइनच्या आधी एकटय़ादुकटय़ा दुकानांऐवजी आधी भव्य दुकानांतून खरेदी वाढू लागली होती. त्यात रिलायन्ससह अनेक बडे उद्योग येऊ लागल्यावर सरकारनं रडणाऱ्या लहान दुकानदारांकडे दुर्लक्ष केलं. पण ऑनलाइनवाल्या अ‍ॅमेझॉनविरोधात रिलायन्स आणि तत्सम तक्रार करू लागल्यावर मात्र सरकारनं आपलं धोरणच बदललं. त्या वेळी स्वदेशीचा मुद्दा काहींनी उपस्थित केला होता. पण ऑनलाइन कंपन्या जरी परदेशी असल्या तरी त्यांच्या व्यवहारांमुळे देशींचाच फायदा होणार आहे. अशा वेळी या देशी ग्राहकांचं हित पाहायचं, की काही फुटकळांचा नफा कमी झाला म्हणून त्यांच्या हिताचा विचार करायचा? ही स्वदेशी/विदेशी फारकत किती करणार, हाही मुद्दा आहेच की. मारुती मोटार कंपनीत काम करणारे बरेचसे कर्मचारी भारतीय आहेत. पण ती कंपनी जपानी मालकीची आहे. मग आपण ती बंद करणार का? फ्लिपकार्ट कंपनी भारतीय होती. ती वॉलमार्टने प्रचंड किमतीला विकत घेतल्यावर भारतीयांचा ऊर भरून आला. पण या व्यवहारातून भारताच्या तिजोरीत एक पैदेखील पडली नाही. कारण फ्लिपकार्टची मालकी सिंगापुरातली आहे. त्यामुळे हा व्यवहार त्या देशात नोंदला गेला.

त्याआधी वॉलमार्ट स्वतंत्रपणे भारतात दुकानं सुरू करू पाहात होता, त्याला आपला विरोध. का? तर पारंपरिक दुकानांच्या पोटावर पाय येईल म्हणून. वॉलमार्ट अमेरिकी. आता जिओत गुंतवणूक करणारी फेसबुकदेखील अमेरिकी. त्या वेळी आपल्याला स्वदेशीच्या मुद्दय़ावर वॉलमार्ट नको होती. पण रिलायन्समधल्या अमेरिकी गुंतवणुकीवर आता स्वदेशीमधला ‘स्व’देखील कोणी काढणार नाही. त्यामागचं कारण काय.. हे काय सांगायची गरज नाही. आणि डेटा सिक्युरिटी वगैरेचं काय, हा प्रश्न कदाचित कोणी उपस्थितही करणार नाही. त्यामागचं कारणही सांगायची गरज नाही.

पण यातून मक्तेदारी तयार होते का? ते पाहण्यासाठी आपल्याकडे एक आयोग आहे. म्हणजे असं आपण मानतो. त्यानं यात लक्ष घालायला हवं.. असंही आपणच मानतो. फेसबुक आणि जिओच्या या हातमिळवणीमुळे बाजारात प्रचंड आकाराचा एकच खेळाडू तयार होतोय. त्याची ताकद इतकी की, कोणी समोरदेखील उभं राहू शकणार नाही. अमेरिकेत १८९० साली जॉन डी. रॉकफेलर यांची ‘स्टॅण्डर्ड ऑइल’ ही कंपनी अशी आकारानं प्रचंड होत होती, तर ती तोडण्याचा आदेश सरकारनं दिला. त्यातूनच अँटीट्रस्ट अ‍ॅक्ट तयार झाला. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट, एटीअँडटी अशा अनेक मातब्बर कंपन्यांना या कायद्याने हिसका दिलाय. आपल्या कॉम्पिटिशन कमिशनच्या कामाला अजून गती यायचीये.

फेसबुक आणि जिओ यांच्या हातमिळवणीला बाजारपेठीय परिभाषेत ‘विन विन’ असं म्हणतात. म्हणजे दोघेही जिंकले. मग हरणार कोण?

याचं खरं उत्तर आपल्याला हवंय का, हा प्रश्न आहे.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2020 12:01 am

Web Title: loksatta anyatha article facebook investment in reliance industries jio platforms abn 97
Next Stories
1 जरा सा ‘झूम’ लूं मैं..
2 साथसोवळ्याची साथ!
3 हस्तप्रक्षालनार्थे..
Just Now!
X