गिरीश कुबेर

वाहिनीच्या वृत्तनिवेदकांकडूनच उलटतपासणी, मग ती संतप्त पत्रकार परिषद आणि त्याहूनही क्रुद्ध दूरध्वनी-संभाषण..

या साऱ्यानंतर अर्नॉन मिश्किन यांना विचारलं गेलं :

तुम्ही आपला अंदाज बदलणार का?

अमेरिकेतल्या या बहुचर्चित निवडणुकीतली सर्वात मोठी म्हणावी अशी घटना तशी चर्चिली गेली नाही. साहजिकच ते. कोण जिंकणार आणि मुख्य म्हणजे कोण हरणार या दोन प्रश्नांपुरतीच सर्वसाधारण निवडणुकीची चर्चा आणि कुतूहल मर्यादित असतं. पण या जय आणि पराजय यांच्या मध्ये खूप काही नाटय़ असतं. संगीतातल्या सात सुरांच्या मध्येही अनेक श्रुती असतात, तसंच. अमेरिकेतल्या या निवडणुकीत तर बरंच काही बेसूरच होतं. पण सुरांप्रमाणे बेसुरांतही अनेक श्रुती दडलेल्या असतात.

कोणत्याही निवडणुकीत सर्वात मोठा बेसूर, खरं तर भसाडा, सूर असतो तो माध्यमांचा. अमेरिकेत तर या बेसुरांचीही वाटणी झालेली आहे. म्हणजे एमएसएनबीसी वा सीएनएनसारख्या वाहिन्या या पुरोगामी किंवा अलीकडे शिवीसम उच्चारल्या जाणाऱ्या सहिष्णु- लिबरल्स- यांच्या. या उलट फॉक्ससारखी वाहिनी मात्र खास प्रतिगामी, असहिष्णुंची. अशी ही सरळ वाटणी. या वाहिन्या आपापल्या लौकिकांना नेहमीच जागतात. म्हणजे फॉक्स कधी सहिष्णुतेचा आव आणत नाही की आम्हीही किती पुरोगामी आहोत वगैरे दाखवायला जात नाही. (हा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आणि अनुकरणीय). त्याचप्रमाणे एमएसएनबीसी आणि सीएनएन या दोन्ही वाहिन्याही.

कोणत्याही देशात, मग तो देश अमेरिका असला तरी, प्रतिगामी, कटकारस्थानवादी, बहुसंख्याकांचं लांगूलचालन करणाऱ्यामागेच मोठी गर्दी असते. अगदी आपल्याकडेही ‘समाजस्वास्थ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे असतानाही कुटुंब नियोजनासाठी कंडोमला कडाडून विरोध करणारे ‘भाला’कार भोपटकर आदी होतेच की. ‘या रबरी टोप्यांतून (पक्षी : कंडोम) उद्याचे रामकृष्ण वाया जातील’ अशी भीती घालणारे आणि त्यातून गर्दी खेचणारे भोपटकरांचं ‘भाला’ हे र. धों. कव्र्याच्या ‘समाजस्वास्थ्य’पेक्षा किती तरी अधिक लोकप्रिय होतं. तेव्हा एकविसाव्या शतकात अमेरिकेत फॉक्स ही अन्य विवेकवादी वाहिन्यांपेक्षा अधिक लोकप्रिय असणार यात काही नवल नाही.

तेव्हा ‘लोकसत्ता’च्या वाचकांना फॉक्सची भूमिका अधिक विस्तारानं सांगायची गरज नाही. ही वाहिनी सातत्यानं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे उभी आहे. अगदी त्यांची अध्यक्षपदी निवड होण्याआधीपासूनच. ट्रम्प यांच्या देशभर निर्माण झालेल्या प्रतिमेमागे फॉक्सचा मोठा वाटा आहे हे खुद्द ट्रम्प यांनीच बोलून दाखवलेलं आहे. ही वाहिनी अमेरिकेत सर्वाधिक पाहिली जाणारी. त्यामुळे ट्रम्प यांचा आवाज सर्वदूर पोहोचला. आताही ऐन मतमोजणीच्या काळात या वाहिनीनं दर्शकसंख्येत एमएसएनबीसी आणि सीएनएन वा एबीसी या वाहिन्यांना कित्येक लाखांनी मागे टाकलं. रिपब्लिकन पक्ष आणि त्यातही ट्रम्प यांचा प्रतिपाळ फॉक्सनं अगदी पालकांसारखा केला. एकदा आपला दर्शकवर्ग माहीत असला की त्यांना आंजारणं सोपं जातं. फॉक्सला आपला चाहता वर्ग अचूक माहीत. त्यामुळे संख्येनं प्रचंड असलेला हा वर्ग आपल्यापासून कदापिही दूर जाणार नाही, याची काळजी फॉक्स डोळ्यात तेल घालून घेत असते. याबाबत ती इतकी जागरूक आहे की मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांचे वकील आणि न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर रूडी ज्युलियानी खास पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविषयी जेव्हा अद्वातद्वा वाटेल ते आरोप करत होते तेव्हा त्याचं थेट प्रक्षेपण एकटय़ा फॉक्सनं केलं. एमएसएनबीसी, सीएनएन, एबीसी या वाहिन्यांनी ज्युलियानी यांच्या बेताल बडबडीस काडीचीही प्रसिद्धी दिली नाही. इतकंच काय, मंगळवारी रात्री अडीच वाजता जेव्हा ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला विजय जाहीर केला आणि मतमोजणीविरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा केली तेव्हा या ऐतिहासिक घटनेच्या वार्ताकनासाठी या वाहिनीचे लॉरा इंग्राम आणि जेनी पिरो हे दोन लोकप्रिय वृत्तनिवेदक स्वत: गेले होते. साहजिकच फॉक्ससाठी ट्रम्प यांचा जयापजय हा घरचा प्रश्न होता.

पण तरीही ट्रम्प यांना या निवडणुकीतील पहिला खरा धक्का हा फॉक्स या वाहिनीनं दिला. ट्रम्प त्यातून अद्याप सावरलेले नाहीत.

झालं असं की मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर फ्लोरिडा वगैरे राज्यांतून डेमॉक्रॅटिक पक्षाच्या विजयांचे हुंकार घुमू लागले. पण एमएसएनबीसी, सीएनएन वगैरे आपल्या बातम्या सावधपणेच देत राहिले. असा शहाणा सावधपणा फॉक्सला मंजूर नसावा. त्या वाहिनीनं जाहीर करून टाकलं : फ्लोरिडात ट्रम्प यांचा विजय. फ्लोरिडा ही पुढची अमेरिका.

तसंच झालं. रिपब्लिकन पक्षानं फ्लोरिडा राज्य दणदणीत मतांनी जिंकलं. ट्रम्प आणि त्यांचा संघ सुखावला. झालंच आता..व्हाइट हाऊसमधला मुक्काम हलवायची काही गरजच नाही. आपणच जिंकणार. रिपब्लिकनांचा वारू चौखूर उधळला.

पण त्यानंतर रात्री ११.३० वाजता भूकंप झाला.

फॉक्सच्या निवडणूक विश्लेषण चमूतले प्रमुख विदातज्ज्ञ (डेटा एक्स्पर्ट) अर्नॉन मिश्किन यांनी घोषणा केली : अ‍ॅरिझोनामध्ये ट्रम्प पराभूत.

ट्रम्प यांच्या कंपूत प्रचंड खळबळ. हे असं कसं होऊ शकतं आणि मुख्य म्हणजे ‘आपली’ फॉक्स अशी बातमी देऊच कशी शकते. ही बातमी फॉक्सनं दिली आहे म्हटल्यावर बाकीच्या वाहिन्यांनीही अ‍ॅरिझोनात किती चुरस आहे वगैरे कथानकं चालवायला सुरुवात केली. वृत्तवाहिन्यांना असं करावंच लागतं. एकाच्या वेडेपणाला दुसऱ्याचा शहाणपणा हे उत्तर या व्यवसायात असू शकत नाही. या फॉक्सकृत्यानं हवा इतकी तापली की फॉक्सच्या वृत्तनिवेदकांवरच मिश्किन यांचा उलटजबाब घेण्याची वेळ आली. त्यातही मिश्किन यांनी आपल्या सांख्यिकी प्रारूपावर विश्वास दर्शवत अ‍ॅरिझोनात ट्रम्प हरणार हा मुद्दा लावूनच धरला.

प्रत्यक्षात शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत अ‍ॅरिझोनाचा निकाल लागलेला नाही. या राज्यात ट्रम्प हरतील अशी चिन्हं आहेत. पण बायडेन जिंकलेले नाहीत अद्याप.

या फॉक्स कृत्यानं ट्रम्प प्रचंड संतापले. त्यांच्या रागाच्या सुरस कथा अमेरिकी पत्रकारांच्या वर्तुळात चर्चिल्या जाताहेत. पण तिथेच थांबले तर ते ट्रम्प कसले? त्यांनी फॉक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुझान स्कॉट यांना फोन करून झाप झाप झापलं. त्यानंतर ट्रम्प यांची ती वादग्रस्त पत्रकार परिषद झाली. फॉक्सच्या निवेदकांनी त्याचीही खिल्ली उडवली. या वाहिनीचे मुख्य राजकीय वृत्त निवेदक ब्रेट ब्रायर यांनी ट्रम्प यांच्या धमकीमुळे लोकशाहीच कशी धोक्यात येऊ शकते, अशी टिप्पणी केली.

यावर ट्रम्प यांचं काय झालं असेल याची कल्पना करणं सहजशक्य आहे. त्यानंतर उठलेल्या वादळानंतर फॉक्सला प्रश्न विचारला गेला : तुम्ही अ‍ॅरिझोनाबाबत आपला अंदाज बदलणार का? मिश्किन यांनी उत्तर दिलं : अजिबात नाही. मी जे सांगतोय ते साधं अंकगणित आहे. तेच जर चुकलं तरच मी चूक असू शकेन.

यानंतर फॉक्सच्या दर्शकांतही चांगलीच खळबळ उडाली. ‘आपली’ फॉक्स वाहिनी असं कसं काय करू शकते, हाच प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी होता. फ्लोरिडात ट्रम्प यांचा विजय फॉक्सनं सर्वात आधी वर्तवला होता; तेव्हा फॉक्स ‘आपली’ होती. आणि अ‍ॅरिझोनात पराभवाचा अंदाज वर्तवल्यावर ‘परकी’ कशी झाली.. हा प्रश्न माध्यमांत चर्चिला जाऊ लागला.

ट्रम्प यांना कोणीतरी विचारलं. या एका वर्षांत नक्की बदललं काय?  फॉक्स..हे त्यांचं उत्तर होतं. फॉक्सचे मालक रूपर्ट मर्डॉक यांचा थोरला मुलगा लाशलन मर्डॉक यालाही विचारलं गेलं. तुमचा पहिला क्रमांक आता डळमळीत होणार का? ते म्हणाले : सरकार कोणाचंही येवो. पहिल्या क्रमांकावर आम्हीच असू.

फॉक्सच्या राजकीय वृत्त विभागानं स्पष्ट केलं :  निवडणुका, मतमोजणी वगैरे जेव्हा असते, तेव्हा आम्ही ‘कोणाचेही’ नसतो. कल, त्याची शास्त्रीय पाहणी आणि आमचे विश्लेषक यांचंच आम्ही ऐकतो. ते सांगतील ती बातमी. मग कोणाला काहीही वाटो..!

आता तरी ट्रम्प आणि रिपब्लिकनांना कळलं असेल- कोणा माध्यमगृहाला जवळ करून आपण वास्तव काही बदलू शकत नाही आणि ते बदलायला आपण जवळ केलेले काहीही मदत करू शकत नाहीत.

शिकायचं असलंच तर बरंच काही आहे यातून शिकण्यासारखं..

girish.kuber@expressindia.com

@girishkuber